Sunday, December 18, 2016

सार्‍या देशाला कवायत करायला लावलीय

हातातल्या घड्याळाचा सेल संपला होता. 
शेजारच्या दुकानात गेलो. दीडशे रूपये झाले. मी विचारले, "कार्ड चालेल का?"

दुकानदार म्हणाला, " सर, गेला दीड महिना धंदाच झाला नाय. जेमतेम 20 ते 25% गिर्‍हाइक आहे. कार्डाचं मशिन काय फुकट मिळतय? दुकानाच्या भाड्याचे पैसे कुठून आणायचे याची चिंता पडलीय. खरं सांगतो, दररोज एकदा तरी मनात येतंच, कोठून दुर्बुद्धी सुचली आणि कधी नव्हे ते यावेळी मतदान करायला गेलो."

मी म्हटलं, " 2000 रूपयांची नोट देतो, चालेल?"

तो म्हणाला, " जो उठतो तो गरिबाची चेष्टा करतोय. मी कुठून आणू सुट्टे पैसे?"

इतक्यात एकजण आले, ते आमचं बोलणं ऎकत होते. म्हणाले, " आम्हाला कष्टाच्या 2000 रूपयांसाठी या ***** चारचार तास रांगेत उभे केलं. तिकडं मात्र दहा दहा कोटीच्या नव्या नोटा आरामात पोचताहेत.

सगळ्या राजकीय पक्षांना सूट.

मी 35 वर्षे इमानेइतबारे नोकरी केली तेव्हा कोठे किरकोळ पेन्शन मिळतेय. आणि या ******* विधानसभेत नुसतं बुड जरी टेकलं तरी दीडदीड लाख रूपये पेन्शन यांना. लोकसभेत दमडीचंही काम नाही. कोट्यावधी रूपये पाण्यात. पण यांचे भत्ते चालू. पेन्शन चालू. सारे एकाच माळेचे मणी. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर. 

माझ्या लहानपणी मी दोन रूपयात जेवायचो. आज 200 रूपये लागतात. याचाच अर्थ आजच्या 1000 रूपयाच्या नोटेची किंमत आहे अवघी 10 रूपये.
 ह्या नोटा बंद करून या ****** सार्‍या देशाला कवायत करायला लावलीय.

 मुर्खपणा चाललाय सगळा."