हा तर भारतीय संविधान, डा.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पं.नेहरू यांचा अवमान..
श्री.राधाकृष्ण विखे यांचे राजकीय अज्ञान
.......................
राज्य सरकारने स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विधान सभेतले विरोधी पक्षनेते श्री.राधाकृष्ण विखेपाटील यांनी यामुळे जातीयवाद वाढेल अशी प्रतिक्रिया दिली. यातून त्यांचे घोर राजकीय अज्ञानच प्रकट झाले.
1930 साली मुंबई प्रांत सरकारने ओएचबी स्टार्ट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीत आमदार डा.बाबासाहेब आंबेडकर सदस्य होते. त्या समितीत म.गांधींचे सहकारी ठक्करबापाही
होते.समितीने 3 वर्गांना घटनात्मक संरक्षण देण्याची शिफारस केली. 1.अनु.जाती. 2.अनु.जमाती, 3. इतर मागास वर्ग.
यातूनच 1932 साली सरकारने समाज कल्याण खाते सुरू केले.
पुढे घटना परिषदेत पं जवाहरलाल नेहरू यांनी संविधानाचा मुलभूत पाया ज्या ठरावावर आधारित होता, तो ठराव 13 डिसें. 1946 रोजी मांडला आणि त्यात 3 वर्गांना घटनात्मक संरक्षण देण्याचे वचन दिले.1.अनु.जाती. 2.अनु.जमाती, 3. इतर मागास वर्ग.
त्यानुसार घटनेत कलम 15,16, 243, 330 ते 342 द्वारे या वर्गांना संरक्षण देण्यात आले.
तमीळनाडू सरकारने 1950मध्ये तर कर्नाटक,आंध्र यांनी 1960 च्या दशकात स्वतंत्र ओबीसी मंत्रालये स्थापन केली.
आक्टो. 1967 ला महाराष्ट्रात वसंतराव नाईक सरकारने ओबीसी आरक्षण सुरू केले.
1990 ला मंडल आयोगाची अंमलबजावणी झाल्यानंतर असे तिसरे मंत्रालय निर्माण करणे ही सरकारची जबाबदारीच होती.
तेव्हापासून गेली 50 वर्षे प्रलंबित असलेली मागणी फडणवीस सरकारने मान्य केली.ओबीसी ही एक जात नसून तो देशात 2365 जातींचा आणि राज्यात [365+51+11= 427जाती व जमाती यांचा ] सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला वर्ग आहे. स्वत: एका जातीच्या कुंपणात अडकलेल्या जातीयवादी मानसिकतेला हे कळणे अवघडच आहे म्हणा.
खरं तर 1995 मध्येच दि.गोपीनाथराव मुंढे यांनी हे स्वतंत्र मंत्रालय निर्माण केले. ते समाजकल्याणला जोडले.
त्याला छगन भुजबळ यांनी 15 वर्षे सतत बळ दिले.
आता या खात्याला स्वतंत्र मंत्री देण्याची घोषणा झाली. त्याचे स्वागत करण्याऎवजी विधान सभेतले विरोधी पक्षनेते जेव्हा असली मुक्ताफळे उधळतात तेव्हा ते भारतीय संविधान, डा.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पं.नेहरू, ठक्कर बाप्पा,यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक आदींचा अवमान करीत आहेत, याचे तरी भान त्यांना आहे काय?
...........................
No comments:
Post a Comment