यंदा गावाकडे मस्त थंडी पडलीय. विजय सुट्टीवर आल्याचं समजलं. बर्याच दिवसात भेट नव्हती. खूप गप्पा मारायच्या होत्या.
कडकडून मिठी मारून विजय म्हणाला, "यार आपला देश खरोखरच बदललाय! लय भारी वाटतं यार."
"कसा काय?"
"हे बघ नोटाबंदीबद्दल काही नतद्रष्ट लोक गळे काढून रडत असतील,पण ते हे विसरतात की या निर्णयाचा देशाला जागतिक पातळीवर किती मोठा लाभ झालाय?"
"मी नाही समजलो."
"असं बघ, देशासाठी सीमेवर सैनिक... असं बोधवक्य उच्चारताच कशी जादूची कांडी फिरल्यासारखा परिणाम होतोय. ज्या इंग्रजांनी आपल्यावर 200 वर्षे राज्य केलं, त्यांच्याविरूद्ध आपण कसोटी क्रिकेटमध्ये 4*0 ने दणदणीत विजय मिळवलाय. करूण नायरनं त्रिशतक ठोकलं. हा नोटाबंदीचा विजय नाही?"
" काहीही काय बोलतोस? नोटाबंदीचा कसोटी विजयाशी अन त्रिशतकाशी काय संबंध? "
"आहेच मुळी. सीमेवरच्या सैन्याचं उदाहरण सतत दिल्यानं खेळाडूंमध्ये एकदम जोश आला. जणू पाकीस्तानशीच आपण युद्ध खेळत असल्याची भावना क्रिकेटपटूंमध्ये निर्माण झाली. मी तर म्हणतो, नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय आलिंपिक स्पर्धेच्या आधी घेतला असता तर किमान 50 सुवर्णपदकं मिळवली असती भारतानं"
" ते जाऊ दे.
तुझा रेल्वे प्रवास कसा झाला?"
"ते मात्र विचारू नकोस. रिझर्व्हेशन असतानाही डब्यात खच्चून गर्दी होती. उभं राहायलाही जागा नव्हती. टीसीकडे तक्रार केली तर तो म्हणाला, काय राव देशासाठी सैनिक एव्हढा त्रास सोसतात आणि तुम्हाला बसायला जागा मिळाली नाही तर एव्हढी कुरकूर करता, शोभतं का तुम्हाला हे? झकत उभा राहून 1400 किलोमीटरचा प्रवास केला."
" सकूताईला भेटलास की नाही मुंबईत?"
" हो तर. आधी तिच्याकडे गेलो. मरणाची गर्दी त्या लोकलला. गर्दीत कोणीतरी पाकीट मारलं माझं. त्यात दोन बँकांची क्रेडीट कार्डं होती. पोलीसात तक्रार द्यायला गेलो तर पीआय म्हणाले, कसली तक्रार करताय? तिकडे देशासाठी सीमेवर सैनिक... ...!!धृ!! अन इकडं तुम्ही मारलं कोणी एखादं पाकीट तर लगेच निघाला तक्रार करायला? देशासाठी काहीतरी त्याग करायला शिका राव."
" सकूताईला गोडाधोडाचं करायचं होतं. पण घरात पैसे नव्हते. दाजी बॅंकेत गेले सकाळीसकाळी. दोन हजाराची बंदी नोट घेऊन आले. मग काय सुट्टे नाहीत म्हणून सगळ्या दोन हजाराची मिठाई घेऊन आले. मला सांग, नोटाबंदी नसती तर एरवी एव्हढी दोन हजारांची मिठाई मिळाली असती आमच्या सकूताईला?"
"खरय बाबा तुझं. बरं सध्या करतोयस काय? सुट्टी मजेत चाललीय ना?"
"अरे कसलं काय? गेल्या आठवड्यात जमीनीच्या कामासाठी दोनदा तलाठ्याकडे गेलो, त्याला चांगला ढोस दिला. म्हणलं, गेले चार वर्षे हेलपाटे मारतोय. यावेळी काम झालं नाही तर सरळ पीएमओ पोर्टलवर तक्रार करीन. मग होशील सस्पेंड."
"मग केलं का त्यानं काम?"
"मग केलं का त्यानं काम?"
"तो म्हणाला, काय राव, तिकडे देशासाठी सीमेवर सैनिक... ...!!धृ!! अन तुम्ही किरकोळ जमिनीचं काम नाही झालं म्हणून थेट पं. प्र. ना त्रास देणार? सध्या जमिन व्यवहारात मंदी आल्यानं काहीच कमाई नाही. उद्या येताना दहा गुलाबी नवे कोरे गांधीबाबा घेऊन या. करून टाकू तुमचं काम."
काल बायको म्हणाली, " संपदाच्या शिक्षकांना जाऊन भेटा जरा. तिचा अभ्यास काही नीट चाललेला नाही." गेलो भेटायला तर शाळेत शिक्षकांचा पत्ताच नाही. पोरं सगळी क्रिकेट खेळत होती.
मुख्याध्यापकांना भेटलो. तक्रार केली तर ते म्हणाले, "काय राव, तिकडे देशासाठी सीमेवर सैनिक... ...!!धृ!! अन तुम्ही एका गरिब शिक्षकानं नाही शिकवलं वर्गात, नाही आला चार आठ दिवस शाळेत तो तर एव्हढे गळे काढायचे?"
आम्ही दोघे माझ्या गाडीनं पुण्याला निघालो. रस्त्यात रिलांयन्सचा टोलनाका लागला. रस्त्यातल्या असंख्य खड्ड्यांनी विजयची हाडं खुळखुळी झालेली होती. पार वैतागला होता तो. टोलवाल्या पोराशी तो वाद घालू लागला. एव्हढे पैसे घेता टोलचे मग खड्डे बुजवता येत नाहीत?"
तो पोरगा म्हणाला, " काय राव, तिकडे देशासाठी सीमेवर सैनिक... ...!!धृ!! अन तुम्ही किरकोळ खड्डे नाय सहन करू शकत? काढा 200 रूपये."
विजयनं त्याचं आयकार्ड काढलं. टोलवाला पोरगा म्हणाला," हे कार्ड आमच्या नाक्यावर चालत नाही."
आम्ही निमुटपणे टोलचे पैसे भरले.
.... आणि सैन्यात अधिकारी असलेला माझा मित्र विजय पठाणकोटच्या आपल्या सैनिक तळावर ड्युटीवर हजर होण्यासाठी निघाला....
................................
[ डिसक्लेमर- यातील पात्रे, प्रसंग आणि संवाद काल्पनीक वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.]
No comments:
Post a Comment