Sunday, December 18, 2016

हमाली करताना काळूचा मृत्यू

1. बाजारचा दिवस
गावाकडे सगळे व्यवहार आठवडी बाजारावर अवलंबून असायचे. सोमवारी गावचा बाजार असायचा. शेतातलं जे काही विकण्याजोगं असेल ते बाजारात विकायचं आणि गरजेच्या सगळ्या गोष्टी खरेदी करायच्या असा परिपाठ होता.
संध्याकाळी मंडळी बाजार करून परत यायची तेव्हा आम्ही कामधंदा, मुख्य म्हणजे खेळायचे सोडून वस्तीबाहेर रस्त्यावर बसायचो. बाजारातून आजीनं काहीतरी खाऊ आणलेला असायचा. जास्तकरून त्यात भेळ, गोडशेव, रेवड्या किंवा केळी असायची. त्यासाठी आठ दिवस वाट बघण्यात जायचे. आठवड्यातून एकदाच मिळणारा हा खाऊ जिव की प्राण असायचा.
मी चारेक वर्षाचा असतानाची गोष्ट.
एकदा माझ्या चुलत आजीने वाटेकडे डोळे लावून बसलेल्या मला तिच्या घरात नेलं. भेळ दिली खायला. ती गायीला पाणी पाजायला,चारा घालायला गोठ्यात निघून गेली. माझी भेळ खाऊन झाल्यावर मीही खेळायला निघून गेलो.
तासाभराने आजी भांडतच आली. तिने तिच्या सख्ख्या नातवंडांसाठी आणलेला शेवरेवड्याचा पुडा गायब झालेला होता. तिचा संशय माझ्यावर होता. तिने माझ्या आईकडे तक्रार केली. आईने मला बडवबडव बडवलं.
मी शेवरेवड्यांचा पुडा घेतलेला नव्हता. पण आळ माझ्यावर आलेला होता. मी खूप रडलो, आईने मारलं म्हणून आणि विनाकारण आळ आला म्हणूनही.
आठवड्याआधी खळं तयार झालं होतं.
खळ्यातल्या धान्याच्या त्या राशीत पुजेचा नारळ ठेवलेला होता. माझा मोठा चुलत भाऊ काळू आणि मी त्या खळ्याचं राखण करीत होतो.
काळूदादानं तो नारळ धान्यातून काढला. शेजारच्या मारूती मंदिरात जाऊन फोडला. मलाही त्यानं काही खोबरं खायला दिलं. भूकही लागली होती आणि खोबरं खाण्याचा मोहही होता. मात्र नारळाचं कोणाला सांगू नकोस नाहीतर गाठ माझ्याशी आहे असा त्यानं मला दम भरला.
दुसर्‍या दिवशी काकांच्या लक्षात आलं की नारळ गायब आहे. काळू आणि माझ्याकडं विचारणा झाली. काळुदादाच्या भितीने मी गप्प राहिलो. मला माहित नाही असं सांगितलं. पण मारूती मंदिरात फोडलेल्या नारळाच्या करवंट्या शेजारीच पडलेल्या होत्या. काकांनी त्याला लागलेल्या कुंकवावरून तो नारळ ओळखला.
काळूला आणि मला लाथाबुक्क्यांचा मार पडला.
आणि आठवड्यात चुलत आजीचा शेवरेवड्यांचा पुडा गायब झाला. मी शेवरेवड्यांचा पुडा घेतला नाही यावर कोणाचाच विश्वास बसला नाही.
एका चुकीमुळे दुसरीचा आळ आला याचं दु:ख होतं.
दोन दिवसांनी चुलत आजी सांगत आली, " अगं सोनाई तू उगीच मारलं लेकराला. अगं, आता मी अंडी ठेवायला उतरंडीजवळ गेले तर बघते तो काय? मेल्या उंदरांनी फाडला तोडलेला शेवरेवड्यांचा पुडा मिळाला बघ गाडग्यामागे पडलेला.त्यातल्या शेवरेवड्या कुरतडलेल्या आहेत."
माझ्या आईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं, आणि तिच्या आलं, म्हणून माझ्याही!
आज पन्नास वर्षांनी ही आठवण का बरं व्हावी?
............................

2. हमाली करताना काळूचा मृत्यू
माझा मोठा चुलत भाऊ काळू गावातल्या बाजारपेठेत हमाली करायचा.
एकदा ट्रकमधून धान्याची पोती उतरून घ्यायचं काम हमाल करीत असताना ड्रायव्हरचा कंट्रोल गेला आणि ट्रकचा समोरच्या हमालाला धक्का लागला. तो ट्रकच्या पुढच्या चाकाखाली आल्यानं त्याचा जागेवरच मृत्यू झाला. क्लिनर ओरडला म्हणून ड्रायव्हरने ट्रक रिव्हर्समध्ये घेतला. पाठीवर धान्याचं पोतं असल्यानं काळूला दिसलं नाही आणि ट्रकचं मागचं चाक काळूच्या अंगावरून गेलं. त्याचाही जागेवरच मृत्यू झाला.
काळूचं नुकतच लग्न झालेलं होतं. लग्नाला अवघे सहा महिने झालेली, अंगावरची हळदही अजून उतरली नसताना वहिनी विधवा झालेली.
काकाकाकूंचा कमावता मुलगा गेला. ट्रकमालकानं पोलीसांशी संधान साधलं. पोलीसांनी काकांना सांगितलं, ट्रकच्या मागच्या चाकाखाली माणूस गेला तर कसलीही भरपाई मिळत नसते. कायद्याप्रमाणं ती काही ड्रायव्हरची चूक मानली जात नाही. काकांनी गावातल्या एका पुढार्‍यांकडे चौकशी केली. त्यांची त्या व्यापार्‍याबरोबर भागीदारी असल्यानं ते म्हणाले "खरय पोलीसांचं."
मग काका गप्प राहिले.
तेव्हा मी आठवीत होतो.
कर्वेनगरचे ओगले नावाचे एक सामाजिक कार्यकर्ते अपघात नुकसान भरपाईच्या केसेसमध्ये मोफत सल्ला द्यायचे. मी त्यांना भेटलो. माहिती दिली. ते म्हणाले,पंचनाम्याची प्रत आणा, आपण ट्रायब्युनलकडे नुकसान भरपाईची केस दाखल करू.
काकांनी आणि मी पोलीस चौकीत अनेक हेलपाटे मारले. पोलीस काही पंचनाम्याची प्रत देईनात. मी पोलीसांकडे लेखी अर्ज करून त्याचा लेखी पाठपुरावा करीत राहिलो.
अपघाताला सहा महिने उलटून गेल्यावर पोलीसांनी पंचनाम्याची प्रत दिली.
ओगलेंनी ट्रायब्युनलकडे अपघात नुकसान भरपाईची केस दाखल केली. अपघाताला सहा महिने उलटून गेल्याने ट्रायब्युनलने मुदतबाह्य केस म्हणून केस फेटाळून लावली.
ओगलेंनी "अपघात नुकसान भरपाई " या आपल्या पुस्तकात ही सगळी व्यथा विस्ताराने मांडलेली आहे.
काका शिकलेले नव्हते. कायद्याची निरक्षरता, पोलीसांचे आणि नेत्यांचे व्यापार्‍याशी असलेले संगनमत आणि कायद्याची मुदतीतच केस दाखल व्हायला हवी ही आंधळी वृती, परिणामी गरिब काकांना आणि काळूच्या विधवेला तो कामावर असताना अपघातात मृत्यू पावला असूनही भरपाई मिळालीच नाही.
...............................

No comments:

Post a Comment