Sunday, November 18, 2018

महात्मा फुलेंचे क्रांतिदर्शी समग्र वाङ्मय-



'महात्मा फुले समग्र वाङ्मय' हा संपादक प्रा हरि नरके यांचा ग्रंथ महाराष्ट्रातील घराघरात गेला पाहिजे अशा तोलामोलाचा आहे...

'महात्मा फुले समग्र वाङ्मय' हा संपादक प्रा. हरि नरके यांचा ग्रंथ महाराष्ट्रातील घराघरात गेला पाहिजे अशा तोलामोलाचा आहे. आज २१व्या शतकात सोशल मीडिया जोरदार चालू असताना, मतामतांचा गलबला वाढलेला असताना हा ग्रंथ 'मूळ साधनांच्या अभ्यासाचे' महत्त्व अधोरेखित करतो. सध्या 'जो जे वांछिल तो ते लाहो' अशा काळात महात्मा फुले आणि त्यांचे समग्र वाङ्मय आपल्यासाठी एक कसोटीचा दगड ठरू शकते. यामुळेच हा ग्रंथ महाराष्ट्रातील घराघरात जाण्याची गरज आहे.

या समग्र वाङ्मयाचे सुरुवातीचे संपादक धनंजय कीर, स. गं. मालशे आणि य. दि. फडके होते. 'मूळ प्रकाशक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ' होते. नवी समिती २०१३ मध्ये अस्तित्वात आली. त्यांनी ही नवी आवृत्ती अलीकडेच प्रकाशित केली आहे. या आवृत्तीचे वैशिष्ट्य म्हणजे 'आद्य फुले चरित्र - यशवंत जोतीराव फुले' या भागाचा समावेश. खंडाला प्रा. हरि नरके यांची ३९ पृष्ठांची प्रदीर्घ प्रस्तावना आहे. या खंडाची मध्यवर्ती कल्पना म्हणजे 'स्त्री-पुरुष समानता, ज्ञानार्जन आणि अंधश्रद्धा निर्मूलन' यांचा पुरस्कार करणे. यासाठी कार्यरत असणाऱ्या, झटणाऱ्या लोकांसाठी हा खंड म्हणजे अक्षय्य ऊर्जा केंद्र आहे.

महात्मा फुले कोण होते? त्यांचे योगदान काय? असे अज्ञ किंवा उर्मट प्रश्न विचारण्याचे धाडस काही जण दबक्या आवाजात करीत असतात. अशांना संपादकीय प्रस्तावनेत जोरदार उत्तर नरके यांनी दिले आहे. शिक्षणतज्ञ, कृषितज्ञ, अर्थतज्ञ, आधुनिक नाटककार, निबंधकार, आद्य शिवचरित्रकार, आधुनिक मराठी क वितेचे जनक, पुण्याचे आयुक्त, पुणे कमर्शियल अॅण्ड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचे कार्यकारी संचालक आणि प्रकाशक एवढ्या साऱ्या भूमिका त्यांनी एकाच आयुष्यात बजावल्या.

१८७३ मध्ये 'गुलामगिरी' ग्रंथ निग्रो चळवळीला अर्पण करणे, शिक्षण मोफत, सक्तीचे आणि सार्वत्रिक करणे या गोष्टी महात्मा फुले यांच्या दूरदर्शित्वाच्या निदर्शक होत. संपादकीयात नरके यांनी पुढील शब्दात फुलेंच्या साहित्याबद्दल लिहिले आहे- 'त्यांचे समग्र साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा जाहीरनामाच होय. हा श्रेष्ठ ग्रंथ हे परिवर्तनाचे ऊर्जाकेंद्र आणि समताधिष्ठित समाजाचे संकल्पचित्र असल्याने त्यांचे जागतिक साहित्यात आगळेवेगळे स्थान आहे.' संपादकांनी योग्य आणि अचूक शब्दात साहित्याचे मर्म ओळखले आहे. संपादकीयात त्यांनी ज्या चार पायऱ्या दिलेल्या आहेत त्यांची यथार्थता आजही कमी झालेली नाही.

सामाजिक न्यायासाठी राखीव जागांची मागणी भारतात सर्वप्रथम महात्मा फुले यांनी केली. त्यांच्या विचारांचा आधार घेऊन सत्तेवर आलेली मंडळी 'समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय विसरून सत्तेवाचून सकळ कळा, झाल्या अवकळा', यावर दृढ विश्वास ठेवून चालत आहेत.

या ग्रंथाचा गाभा आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणविषयक कार्य आणि विचार. विचारांची मांडणी खूप जण करतात. कृती मात्र थोड्यांनाच जमते. 'शिक्षण हा स्त्रियांचा मानवी अधिकार आहे आणि समग्र देशाची उन्नती स्त्रीशिक्षणाविना शक्य नाही' असा विचार १९व्या शतकात नुसता मांडायचा नाही तर स्वत: अस्तित्वात आणायचा. हे अवघड काम उभयतांनी केले. त्याचा पुरावा २९ मे १८५२च्या 'पुना ऑब्झर्वर' वृत्तपत्रातील पत्रात आहे. वाचकांच्या पत्रात एका विद्यार्थ्याचे पत्र आहे. तो लिहितो - 'जोतीरावांच्या शाळातील मुलींची पटसंख्या सरकारी शाळातील मुलांपेक्षा दहापटीने मोठी आहे. त्याचे कारण मुलींना शिकविण्याची जी व्यवस्था आहे ती मुलांच्या शासकीय शाळांतील व्यवस्थेपेक्षा अनेकपटींनी श्रेष्ठ आहे.'

महात्मा फुले यांचा आणखी एक दुर्मीळ पैलू या ग्रंथातून समोर येतो. एखादा लेखक क्वचितच दुसऱ्या लेखकाची स्तुती करतो किंवा पाठराखण करतो. १८८२ मध्ये ताराबाई शिंदे यांच्या 'स्त्री-पुरुष तुलना' पुस्तकाने खळबळ उडवून दिली. पुरुषी वर्चस्वाच्या मानसिकतेतून या पुस्तकावर टीका होताच 'सत्सार' या नियतकालिकातून महात्मा फुले यांनी ताराबाईंची पाठराखण केली. स्त्रीदु:खाचा कढ जितका समर्थपणे स्त्रियाच व्यक्त करू शकतात, तितका तो पुरुषांकडून प्रगट होणे शक्य नाही याची जोतीराव प्रांजळ कबुली देतात. आजही किती जणांना हे जमेल?

अभिनव कल्पना लढविण्यात या पती-पत्नींचा हात कोणी धरू शकत नव्हता. १८५२ मध्ये पहिले भारतीय शालेय ग्रंथालय उभारणे, मुलामुलींना पहिलीपासून इंग्रजी, शेतीशिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण देणे, विद्यार्थी गळतीचा प्रश्न सोडविण्यासाठी गरीब मुलामुलींना पगार देणे, मुलामुलींच्या आई-वडिलांसाठी रात्रशाळा काढणे, शिकायला चला सांगणारे 'तृतीय रत्न' नाटक लिहिणे या सगळ्यातून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे सेंद्रिय विचारवंत कसे होते हे समजते.

इतिहासाच्या पुनर्निमितीचा खरं म्हणजे पुनर्लेखनाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. ऐतिहासिक तथ्ये मोडतोड न करता सामाजिक शहाणपणाचा अवलंब करून कशी मांडता येतात आणि त्यासाठी तारतम्य कसे वापरावे हे आपणास जोतीरावांच्या पोवाड्यातून समजते.

जगातील धर्मग्रंथांसंदर्भात महात्मा फुले यांचे जे निरीक्षण आहे त्याचे आश्चर्य वाटते. जगभराच्या धर्मग्रंथांनी कमी-अधिक प्रमाणात स्त्रियांवर अन्याय केला. हे धर्मग्रंथ पुरुषांनी लिहिल्याने त्यांनी स्वार्थासाठी पक्षपात केल्याचेही निरीक्षण जोतीरावांनी नोंदविले आहे. काळाचा विचार करता जोतीरावांचे द्रष्टेपणच जणू आपणास दिसते. या सखोल अभ्यासातूनच त्यांना पर्यायी संस्कृतीचे वेध लागल्याचे दिसते. पुढे 'पर्यायी संस्कृतीचे जनक' म्हणून महात्मा फुले यांची जी प्रतिमा पुढे आली त्याची पाळेमुळे आपणास येथे दिसतात.

शेतकरी संघटनेच्या अधिवेशनास महिला उपस्थित होत्या हा इतिहास पाठ्यपुस्तकात आला आहे. १९२५ मध्ये वर्धा येथे सत्यशोधक महिला परिषदेला पाच हजार महिला उपस्थित राहतात हा भाग आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात कधी येणार? सत्यशोधक विवाहपद्धती, भाऊपणा व बहीणपणा, सामाजिक संघटन, पाणी अडवा पाणी जिरवा, उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव, नेशन बिल्डिंगसाठी नेशन बिल्डरची भूमिका, शेती आणि अर्थव्यवहारांसंबंधी त्यांची भूमिका या गोष्टी पाठ्यपुस्तकातून किंवा सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून गोष्टीरूपाने विद्यार्थ्यांसमोर मांडण्याची गरज आहे. समाज विनाकारण कोणालाही महात्मा पदवी अर्पण करीत नाही.

आद्य फुले चरित्र ही ग्रंथाची जमेची बाजू आहे. नऊ परिशिष्टे अत्यंत महत्त्वाची आहेत. संदर्भ टीपा, निवडक शब्दांचा कोश, निवडक संदर्भ सूचीने ग्रंथाचे मोल वाढविले आहे. संपादकीयातील काही पॅरेग्राफ चुकून दोनदा छापले गेले आहेत ते पुढील आवृत्तीत दुरुस्त करता येतील. सरकारने मनावर घेतल्यास ग्रंथाची स्वस्त जनआवृत्ती काढता येईल.

महात्मा फुले समग्र वाङ्मय,संपादक : प्रा. हरि नरके,
प्रकाशक : फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन,
पृष्ठं : ८६२, किंमत : ३२० रु.
म.टा. रविवार, दि. १८ नोव्हेंबर २०१८, संवाद, पृ. ६
https://epaper.timesgroup.com/Olive/ODN/MaharashtraTimes/#
https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/mahatma-fulles-revolutionary-composite-class/articleshow/66662150.cms
डॉ गणेश राऊत- मटा ऑनलाइन | Updated:Nov 18, 2018, 04:00AM IST

Sunday, November 11, 2018

प्रा. अविनाश डोळस अचानक नी अकाली गेले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समितीचे विद्यमान सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस अचानक नी अकाली गेले. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाल्याची बातमी आत्ताच एका मित्राने दिली. खूप सारी वेदना आणि हळहळ वाटली. एक मस्त दोस्त असा मधेच निघून गेला.
अविनाश हा हसतमुख, सौजन्यशील आणि जगमित्र माणूस होता. त्यांच्या वयाला साठ वर्षे पूर्ण झाली म्हणुन अलिकडेच मित्रमंडळीने त्यांचा एक गौरवग्रंथ प्रकाशित केला होता. नुकतेच भेटलो तेव्हा त्यांनी जेवायचा खूप आग्रह केला. माझे जेवन झालेले होते. तरीही केवळ अविनाशच्या अतिव आग्रहापोटी त्याच्याच ताटात मी परत थोडं जेवलो. आमचे दोघांचे कार्यालय एकच असल्याने आम्ही नियमितपणे भेटत असू. मनमुराद गप्पांची मैफिल सजत असे. आंबेडकरी चळवळीत आयुष्य गेलेला अविनाश तसा अनाग्रही आणि सौम्य प्रकृतीचा होता. ३० वर्षांपुर्वी माझे महात्मा फुल्यांवरचे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा अविनाशचे पत्र आले. औरंगाबादला एका कार्यक्रमासाठी गेलेलो असताना अविनाश येऊन भेटला. त्याच्या स्कूटरवर मागे बसवून त्याच्या महाविद्यालयात मला घेऊन गेला. त्याने तिथे माझे भाषण आयोजित केलेले. त्यानंतर मला त्याच्या घरी घेऊन गेला. त्याचा पाहुणचार, अगत्य आणि दोस्ताना कायमचा होऊन गेला. अनेकदा भेटीगाठी होत. मालेगावच्या मित्रांनी एकदा आम्हा दोघांची एकत्रित भाषणे ठेवली होती. खूप गर्दी होती. एका शाळेच्या मैदानावर कार्यक्रम होता. तो वहिनींना घेऊन आला होता. खूप मनापासून बोलला तो. त्याचे भाषण ऎन रंगात आलेले असताना संयोजकांनी भाषण आवरते घ्या अशी त्याला चिठ्ठी दिली. अविनाश तसा कधीही न रागावणारा पण त्या चिठ्ठीने तो भडकला. संयोजकांचीही चूकच झालेली होती. त्यात त्यांचा आगाऊपणा म्हणजे " फार वेळ झालाय, आम्हाला अजून हरी नरकेंचे भाषण ऎकायचेय" असे म्हणे त्यांनी चिठ्ठीत लिहिलेले. " मग मला कशाला बोलावले?" असे अविनाशने त्यांना झापले. गेली आठ नऊ वर्षे अविनाश डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समितीचा सदस्य सचिव म्हणून काम बघत होता. प्रा.दत्ता भगत यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या जागेवर अविनाशला नेमावे यासाठी मी सचिवांकडे शिफारस केली.आग्रह धरून पाठपुरावा केला. आमचे अधिकारी मित्र शुद्धोधन आहेर यांनी शासनादेश काढण्यासाठी खूप मदत केली. तेव्हा आमचे कार्यालय मंत्रालयासमोरच्या बॅरॅक्समध्ये होते. कार्यालयाचे नूतनीकरण चालू असताना अविनाशने त्याच्या केबिनसाठी दुप्पटीहून जास्त जागा घेतली. माझ्या केबिनमध्ये जेमतेम दोन खुर्च्या बसतील एव्हढीच जागा ठेवली. मी त्याला विचारायला गेलो तर अविनाश असा पठठ्या की मला म्हणाला, "अरे तो इंजिनियर मूर्ख होता. त्याला मी बोललो होतो की माझी [ म्हणजे अविनाशची ] केबिन आणखी मोठी कर. माझ्याकडे कार्यकर्ते येतात. तर त्या गाढवाने तुझीच केबिन मोठी करून ठेवली." मी रागवायचे विसरलो आणि हसू लागलो. अविनाश श्री. प्रकाश आंबेडकरांचा विश्वासू सहकारी होता. मा. बाळासाहेबांचा तो निस्सिम भक्त होता. तेव्हढा विषय आला की त्याचे विचार करायचे इंद्रीय तो बंद करायचा आणि निष्ठावंत अनुयायी या भुमिकेत जायचा. तो बाळसाहेबांच्या प्रत्येकच कृतीचे समर्थन करायचा. एरवी चिकित्सक असलेला अविनाश बाळासाहेबांच्या बाबतीत मात्र फक्त "भक्त" असायचा. दत्ता भगतसर, शुद्धोधन, संजू हिंगे आणि मी २०१० साली बाबासाहेबांचा फोटो आल्बम प्रकाशित केला. तो सिंगापूरहून छापून आणलेला होता. त्याच्या दहा हजार प्रती एका आठवड्यात संपल्या. खूप कौतुक झाले. अर्थात नेहमीप्रमाणे काही विघ्नसंतोषी लोकांनी चढ्या सूरात थातूरमातूर मुद्दे काढून विरोधी कोल्हेकुई केलीच. ही खेकडावृत्तीच चळवळीची कायम हानी करीत आलीय. अविनाशने या खंडाची अलिकडेच सुधारित आवृत्ती काढली. संशोधनाची शिस्त धाब्यावर बसवून त्याने पहिल्या आवृत्तीच्या आम्हा सर्वांचीच नावे गाळून टाकली. वाईट वाटले. चळवळीतही टोकाचा अविश्वास, असूया आणि जातीयवाद आहे. अविनाश कधीही तसा नव्हता. पण त्याच्यावर त्याच्या सहकार्‍यांचा, नेत्यांचा दबाव असेल. मी त्यानंतर अनेकदा भेटलो,पण त्याने तो विषय टाळला. मीही स्वत:हून त्या अप्रिय विषयावर बोलणे टाळले. बाकी आमच्या गप्पा होत राहिल्या. आमच्या दोस्तान्यात अंतर पडले नाही. आणि आज अविनाश असा तडकाफडकी निघून गेला. अविनाश, मित्रा असे अचानक नी अकाली जाणे हे मात्र तुझे चुकलेच. प्रा. हरी नरके, ११ नोव्हेंबर २०१८

Saturday, November 10, 2018

श्रेष्ठ प्रतिभेचे धनी प्रा. रंगनाथ पठारे






प्रा.रंगनाथ पठारे यांचे आजच्या मराठी साहित्यात अव्वल स्थान आहे. श्रेष्ठ दर्जाचे कादंबरीकार, दणकट कथाकार, समीक्षक आणि विचारवंत म्हणून गेली ४० वर्षे ते अविरतपणे योगदान देत आलेत. सुमारे चाळीसेक मौलिक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. ताम्रपट ह्या महाकादंबरीने ते पहिल्या श्रेणीचे कादंबरीकार बनले. अरूण साधू यांच्यामते काळाचा अफाट अवाका असलेली, ग्रामजीवनाचे अस्सल चित्रण करणारी, ताम्रपटच्या तोडीची दुसरी कादंबरीच मराठीत नाही.

"सातपाटील कुलवृत्तांत" ही सुमारे आठशे वर्षांचा महाकाय पट चितारणारी, मराठा योद्धे आणि समाज जीवनाचा सबाल्टर्न हिस्ट्रीच्या अंगाने वेध घेणारी महामहाकादंबरी ते सध्या लिहित आहेत. असे मजबूत आणि चिरेबंदी काम मराठीत आजवर झालेलेच नाही.


पठारेसर मूळचे भौतिक शास्त्राचे प्राध्यापक. ते उत्तम खेळाडू आणि निसर्गप्रेमी आहेत. दुबळ्यांबद्दल अपार कणव, मराठा असूनही सरंजामशाहीचा तिटकारा आणि ज्ञाननिर्मितीबद्दल जिव्हाळा ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये. अतिशय नम्र, मातीशी घट्ट नाते आणि तुफान वाचन-चिंतन.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळूच शकत नाही असे ज्या काळात बहुतेक सगळे दिग्गज म्हणत होते तेव्हा सरांनी एकदा मला फोन केला आणि प्रदीर्घ चर्चा केली. मराठी भाषेबद्दल ममत्व आणि तिच्या भल्याची आस असल्यानं सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही ताबडतोब कामाला लागलो आणि म्हणता म्हणता एक महाकाय अहवाल तयार झाला. पठारे समितीचा हा अहवाल केंद्र सरकारने भाषा तज्ज्ञांकडे पाठवला. त्यांनी त्याची छाननी करून मराठीला हा दर्जा द्यावा अशी एकमुखी शिफारस केली.

या काळात सरांचा प्रदीर्घ सहवास मला लाभला. त्यांचा उमदा स्वभाव, सलगपणे १६ ते १८ तास काम करण्याची क्षमता, शिस्त आणि सखोल संशोधनाची वृत्ती यांनी मी प्रभावित झालो.

भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, सरांचे संगमनेरचे घर, माझे पुण्यातले घर, यशदा आणि शासकिय विश्रामधाम येथे आम्ही सलगपणे असंख्य बैठका घेतल्या नी महिनोन महिने काम केले. सरांमुळे एक मजबूत काम कसे उभे राहाते याचा साक्षात अनुभव मला घेता आला.

आणीबाणीच्या पार्श्वभुमीवरील " दिवे गेलेले दिवस" आणि  " अनुभव विकणे आहे" या पुस्तकांनी सरांनी कादंबरी व कथा लेखनाला प्रारंभ केला. त्यानंतर गेली ४० वर्षे सर अव्याहतपणे लिहित आहेत. अखंडपणे आलेल्या रथ, हारण, चक्रव्यूह, टोकदार सावलीचे वर्तमान, ताम्रपट, त्रिधा, कुंठेचा लोलक, दु:खाचे श्वापद, भर चौकातील अरण्यरूदन, एका आरंभाचे प्रास्ताविक, चोषक फलोद्यान या त्यांच्या एकाहून सरस एक अशा महत्वाच्या कादंबर्‍या.

सर मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळ्याचे. त्यांच्या आणि माझ्या तालुक्यांना जोडणारी घोडनदी. या परिसरात बोलली जाणारी मराठी अचूकपणे त्यांच्या कादंबर्‍यामधून, कथांमधून येते. आमच्या भागातल्या या गावरान मराठीला पठारेसरांनी आपल्या साहित्यातून अजरामर केले. गावगाड्याची जी आरपार समज त्यांना आहे तशी आणि तितकी क्वचितच अन्य कोणा मराठी साहित्यिकाला असेल. हिंदीमध्ये जे काम फनिश्वरनाथ रेणूंनी केलेय त्यातोडीचे काम पठारेसर आज मराठीत करीत आहेत. आज नेमाडेसरांनंतर ज्ञानपीठ मिळायला हवे असे नाव म्हणजे रंगनाथ पठारेसर. घरात लेखनाचा कोणताही वारसा नसताना एकाच पिढीत त्यांनी किती मोठी भरारी घेतलीय! केवळ अभिमानास्पद!

गाव, गोत, कुळ, समकालीन आर्थिक-राजकीय वास्तव, परंपरा व परिवर्तनाची नाळ, जातीय तेढ, अहंकार आणि वर्चस्ववादी मानसिकता यांचे समाजशास्त्रीय दस्तावेजीकरण म्हणजे सरांचे ग्रंथ होत.

त्यांच्या सार्‍याच पुस्तकांवर मी विस्ताराने लिहिणार आहे.

तळेगाव ढमढेरे हे गाव ऎतिहासिक गाव आहे. नुक्ताच ८०० वर्षांपूर्वींचा एक शिलालेख गावात एका वाड्याच्या उत्खननात मिळालाय. हडाप्पा, मोहेनजोदाडो पूर्वकालीन वस्तीचे पुरावे उत्खननात मिळालेले इनामगाव तळेगावपासून जवळच आहे.

महात्मा फुले तळेगावात आल्याचे व एक ऎतिहासिक सामाजिक संघर्ष त्यांनी इथे केल्याचे पुरावे खुद्द जोतीरावांनीच लिहून ठेवलेत. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत शहीद झालेले हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे तळेगावचेच.

बृहद पुणे शहराच्या सीमा आता तळेगावपर्यंत विस्तारल्या आहेत. विकासाचा फार मोठा डोलारा या भागात उभा राहतोय. गेली १३ वर्षे आपण या गावात सोनाई नरके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सोनाई व्याख्यानमाला चालवतो. पुण्याचे बौद्धिक, शैक्षणिक, सांस्कृतिक वैभव या भागाला मिळावे यासाठी, या परिसराचे नितांत गोमटे व्हावे यासाठी ही व्याख्यानमाला महत्वाची पाऊलवाट तयार करते आहे.

निळू फुले, डॉ. आ. ह.साळुंखे, डॉ. सदानंद मोरे, डॉ. रामचंद्र देखणे, संजय आवटे, संजय सोनवणी, संजय भास्कर जोशी आदींची भाषणे खूप गाजली. लोक वर्षभर या व्याख्यानमालेची वाट बघतात. पंचक्रोशीतून उदंड प्रतिसाद मिळतो.

सोनाई व्याख्यानमाला, २०१८, यावर्षीचे वक्ते आहेत- प्रा.रंगनाथ पठारे,

सोमवार दि. १२ नोव्हेंबर, सायं. ६ वाजता,

स्थळ- सावता महाराज मंगल कार्यालय, तळेगाव ढमढेरे, ता.शिरूर, जि.पुणे.

नक्की यायचं!


प्रा. हरी नरके, ११ नोव्हेंबर २०१८

Thursday, November 8, 2018

पु.ल.देशपांडे






१९८८ साली बाळ गांगल या संस्कृत व इतिहासात २ पीएच.डी. मिळवलेल्या सनातनी इसमाने महात्मा फुले यांच्यावर अतिशय गलिच्छ २ लेख लिहिले होते. साप्ताहिक सोबतमध्ये ग.वा.बेहरे यांनी ते छापले होते. तेव्हा मी एम.फिल. करीत होतो. सामाजिक चळवळीच्या सत्संगाने महात्मा फुले यांचे साहित्य शाळकरी वयातच वाचलेले होते. एम.फिल. ला महात्मा फुले यांचे साहित्य अभ्यासाला होते. गांगलांच्या लेखांचे सप्रमाण खंडन करणारे लेख मी सकाळ, म.टा., लोकसत्ता आदींमधून लिहिले. लेख वाचून पु.ल. देशपांडे यांचे मला पत्र आले. तू यावर पुस्तक लिही असं त्यांनी मला कळवलं. पंधरा दिवसात मी त्यावर पुस्तक लिहिलं. "महात्मा फुले यांची बदनामी: एक सत्यशोधन" चं चंद्रपूरला पुलंच्या हस्ते प्रकाशन झालं. पुल त्या पुस्तकावर भरभरून बोलले. परिणामी कार्यक्रमातच पुस्तकाच्या ५०० प्रती लगेच संपल्या.

शाळेत असताना पुलंची पुस्तकं मला खूप आवडायची.

८ नोव्हेंबर हा पुलंचा वाढदिवस. मी चौथीत असताना पुल राहात ती रूपाली इमारत शोधून काढली. त्यांच्या वाढदिवशी एक पुस्तक घेऊन त्यांना भेटायला गेलो. दहाएक किलोमीटर सायकल चालवल्याने मी घामानं निथळलेला होतो. पुल आणि सुनिताबाई अतिशय आपुलकीनं बोलले. मी त्यांना वर्तमानपत्रात बांधलेलं, भेट दिलेलं पुस्तक त्यांनी उघडून बघितलं. मी हेच पुस्तक का निवडलं असं त्यांनी मला विचारलं. मी संकोचलो. खरं सांगितलेलं त्यांना आवडणार नाही अशी मला भिती वाटली. त्यामुळं मी सांगायचं टाळत होतो. पण ते पुन्हापुन्हा विचारत राहिले. मी म्हटलं, "गड आला पण सिंह गेला" ही हरी नारायण आपटे यांची ही कादंबरी माझी आवडती आहे. पुस्तकांच्या दुकानात बारा आण्याला मिळणारं हेच एकमेव पुस्तक होतं. माझा सफाई कामगार म्हणून पगार महिन्याला दहा रूपये होता. सगळा पगार आईला द्यावा लागायचा. त्यातला फक्त एक रूपया आई मला पुस्तकांसाठी द्यायची."
पुल आणि सुनिताबाई या पहिल्या भेटीतच जणू सख्खे मित्र असल्यासारखे वागले. पुलंचा मोठेपणा असा की चौथीत असताना हे पुस्तक वाचून त्यावर आयुष्यातली पहिली एकांकिका
त्यांनी लिहिली होती असं त्यांनी मला सांगितलं. मी तर हूरळूनच गेलो. बहुदा मला बरं वाटावं म्हणून त्यांनी हे सांगितलं असावं असं आता वाटतं.

पुढे प्रत्येक भेटीत पुल त्यांचं एकतरी पुस्तक मला भेट द्यायचे. अमूक पुस्तक वाच, तमूक वाच असं आवर्जून सांगायचे. माझ्या लग्नात त्यांनी घेतलेला पुढाकार याबद्दल मी फेबुवर लिहिलेच होते. २५ वर्षांपुर्वी पुलंच्या अमृत महोत्सवी वर्षी मी लोकमतमध्ये पुलंबद्दल लेख लिहिला होता. त्या सगळ्या आठवणी पुन्हा लिहित नाही. तो लेखच शोधून फेबुवर टाकीन.
पुलंच्या लेखनाने खूप आनंद दिला. जणू पंचवीस-तीस प्रतिभावंत लोकांचं काम पुल एकहाती करायचे. विनोदकार, नाटककार, वक्ते, दिग्दर्शक, अभिनेते, लेखक, गायक, संगीतकार, दर्दी रसिक ही त्यांची असंख्य रुपं विलोभनीय होती. त्यांच्या बहुमुखी प्रतिभेचा मी ऋणी आहे. जन्मशताब्धीनिमित्त पुलंच्या स्मृतीस वंदन.

-प्रा. हरी नरके, ८ नोव्हेंबर २०१८

Tuesday, November 6, 2018

सर्वोत्कृष्ठ कथा २०१८




रमाकांत एक खोल विवर - जयंत पवार, विशाखा दिवाळी अंक, सर्वोत्कृष्ठ कथा २०१८ - प्रा. हरी नरके

श्री जयंत पवार हे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कथाकार आहेत. त्यांच्या फिनिक्सच्या राखेतून उठला मोर आणि वरणभात लोण्चा.... ह्या दोन्ही कथासंग्रहांना
जाणकारांची पसंती मिळालेली आहे. त्यांच्याकडून वाचकांच्या फार अपेक्षा आहेत.
यंदाच्या विशाखा दिवाळी अंकात त्यांची "रमाकांत एक खोल विवर" ही कथा प्रकाशित झालेली आहे.
गेल्या पंधरा दिवसात मी बरेच दिवाळी अंक वाचले.
काही चाळले.
त्यातल्या कथांशी तुलना करता पवारांची ही कथा यावर्षीची सर्वोत्कृष्ठ कथा ठरावी अशी दणकट कथा आहे.

मुंबईतल्या रमाकांत साठे आणि अनघाची खूप स्वप्नं असतात. स्वतंत्र खोली मिळाल्यावरच लग्न करायचं असं त्यांनी ठरवलेलं असतं. रमाचे वडील मुंबई महापालिकेत सफाई कामगार असतात. त्यांना एका गाडीने ठोकल्यामुळे ते अंथरूणाला खिळलेले असतात. आई, दोन धाकट्या बहिणी आणि अपघातात अपंग झालेले वडील हे सारे रमाकडे आशेनं बघत असतात.

रमा पदवीनंतर अ‍ॅनिमेशनचा कोर्स करीत असतो. या क्षेत्रात करियर करायचं, काहीही झालं तरी वडलांसारखं गटारं साफ करण्याचं काम करायचं नाही असा त्याचा पक्का निर्धार असतो.
वडीलांच्या जागी अनुकंपा तत्वावर सफाई कामगाराची नोकरी मिळत असतानाही रमा ती निर्धाराने नाकारतो.

अनघाच्या घरून लग्नाची घाई केली जाते. त्यामुळे तो अ‍ॅनिमेशन जगतात नोकरीचा शोध घेऊ लागतो.

आणि इतक्यात केंद्र सरकार नोटाबंदी जाहीर करतं.....

काय होतं रमाचं? अनघाचं? त्यांच्या प्रेमाचं? त्यांच्या कुटुंबांचं?

श्रेष्ठ कथाकार बाबूराव बागूल यांच्या स्मृतीला पवारांनी ही कथा अर्पण केलेली आहे.

प्रचंड अस्वस्थ करणारी, अंतर्मुख करणारी, महानगरी मुंबईतील सफाई कामगारांचं आणि त्यांच्या नव्या पिढीचं जगणं विलक्षण सामर्थ्यानं टिपणारी महान कथा.
प्रत्येकाने आवर्जून वाचायलाच हवी अशी, क्वचितच लिहिली जाणारी तगडी कथा.

-प्रा.हरी नरके, ५ नोव्हेंबर २०१८