Sunday, November 18, 2018

महात्मा फुलेंचे क्रांतिदर्शी समग्र वाङ्मय-'महात्मा फुले समग्र वाङ्मय' हा संपादक प्रा हरि नरके यांचा ग्रंथ महाराष्ट्रातील घराघरात गेला पाहिजे अशा तोलामोलाचा आहे...

'महात्मा फुले समग्र वाङ्मय' हा संपादक प्रा. हरि नरके यांचा ग्रंथ महाराष्ट्रातील घराघरात गेला पाहिजे अशा तोलामोलाचा आहे. आज २१व्या शतकात सोशल मीडिया जोरदार चालू असताना, मतामतांचा गलबला वाढलेला असताना हा ग्रंथ 'मूळ साधनांच्या अभ्यासाचे' महत्त्व अधोरेखित करतो. सध्या 'जो जे वांछिल तो ते लाहो' अशा काळात महात्मा फुले आणि त्यांचे समग्र वाङ्मय आपल्यासाठी एक कसोटीचा दगड ठरू शकते. यामुळेच हा ग्रंथ महाराष्ट्रातील घराघरात जाण्याची गरज आहे.

या समग्र वाङ्मयाचे सुरुवातीचे संपादक धनंजय कीर, स. गं. मालशे आणि य. दि. फडके होते. 'मूळ प्रकाशक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ' होते. नवी समिती २०१३ मध्ये अस्तित्वात आली. त्यांनी ही नवी आवृत्ती अलीकडेच प्रकाशित केली आहे. या आवृत्तीचे वैशिष्ट्य म्हणजे 'आद्य फुले चरित्र - यशवंत जोतीराव फुले' या भागाचा समावेश. खंडाला प्रा. हरि नरके यांची ३९ पृष्ठांची प्रदीर्घ प्रस्तावना आहे. या खंडाची मध्यवर्ती कल्पना म्हणजे 'स्त्री-पुरुष समानता, ज्ञानार्जन आणि अंधश्रद्धा निर्मूलन' यांचा पुरस्कार करणे. यासाठी कार्यरत असणाऱ्या, झटणाऱ्या लोकांसाठी हा खंड म्हणजे अक्षय्य ऊर्जा केंद्र आहे.

महात्मा फुले कोण होते? त्यांचे योगदान काय? असे अज्ञ किंवा उर्मट प्रश्न विचारण्याचे धाडस काही जण दबक्या आवाजात करीत असतात. अशांना संपादकीय प्रस्तावनेत जोरदार उत्तर नरके यांनी दिले आहे. शिक्षणतज्ञ, कृषितज्ञ, अर्थतज्ञ, आधुनिक नाटककार, निबंधकार, आद्य शिवचरित्रकार, आधुनिक मराठी क वितेचे जनक, पुण्याचे आयुक्त, पुणे कमर्शियल अॅण्ड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचे कार्यकारी संचालक आणि प्रकाशक एवढ्या साऱ्या भूमिका त्यांनी एकाच आयुष्यात बजावल्या.

१८७३ मध्ये 'गुलामगिरी' ग्रंथ निग्रो चळवळीला अर्पण करणे, शिक्षण मोफत, सक्तीचे आणि सार्वत्रिक करणे या गोष्टी महात्मा फुले यांच्या दूरदर्शित्वाच्या निदर्शक होत. संपादकीयात नरके यांनी पुढील शब्दात फुलेंच्या साहित्याबद्दल लिहिले आहे- 'त्यांचे समग्र साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा जाहीरनामाच होय. हा श्रेष्ठ ग्रंथ हे परिवर्तनाचे ऊर्जाकेंद्र आणि समताधिष्ठित समाजाचे संकल्पचित्र असल्याने त्यांचे जागतिक साहित्यात आगळेवेगळे स्थान आहे.' संपादकांनी योग्य आणि अचूक शब्दात साहित्याचे मर्म ओळखले आहे. संपादकीयात त्यांनी ज्या चार पायऱ्या दिलेल्या आहेत त्यांची यथार्थता आजही कमी झालेली नाही.

सामाजिक न्यायासाठी राखीव जागांची मागणी भारतात सर्वप्रथम महात्मा फुले यांनी केली. त्यांच्या विचारांचा आधार घेऊन सत्तेवर आलेली मंडळी 'समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय विसरून सत्तेवाचून सकळ कळा, झाल्या अवकळा', यावर दृढ विश्वास ठेवून चालत आहेत.

या ग्रंथाचा गाभा आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणविषयक कार्य आणि विचार. विचारांची मांडणी खूप जण करतात. कृती मात्र थोड्यांनाच जमते. 'शिक्षण हा स्त्रियांचा मानवी अधिकार आहे आणि समग्र देशाची उन्नती स्त्रीशिक्षणाविना शक्य नाही' असा विचार १९व्या शतकात नुसता मांडायचा नाही तर स्वत: अस्तित्वात आणायचा. हे अवघड काम उभयतांनी केले. त्याचा पुरावा २९ मे १८५२च्या 'पुना ऑब्झर्वर' वृत्तपत्रातील पत्रात आहे. वाचकांच्या पत्रात एका विद्यार्थ्याचे पत्र आहे. तो लिहितो - 'जोतीरावांच्या शाळातील मुलींची पटसंख्या सरकारी शाळातील मुलांपेक्षा दहापटीने मोठी आहे. त्याचे कारण मुलींना शिकविण्याची जी व्यवस्था आहे ती मुलांच्या शासकीय शाळांतील व्यवस्थेपेक्षा अनेकपटींनी श्रेष्ठ आहे.'

महात्मा फुले यांचा आणखी एक दुर्मीळ पैलू या ग्रंथातून समोर येतो. एखादा लेखक क्वचितच दुसऱ्या लेखकाची स्तुती करतो किंवा पाठराखण करतो. १८८२ मध्ये ताराबाई शिंदे यांच्या 'स्त्री-पुरुष तुलना' पुस्तकाने खळबळ उडवून दिली. पुरुषी वर्चस्वाच्या मानसिकतेतून या पुस्तकावर टीका होताच 'सत्सार' या नियतकालिकातून महात्मा फुले यांनी ताराबाईंची पाठराखण केली. स्त्रीदु:खाचा कढ जितका समर्थपणे स्त्रियाच व्यक्त करू शकतात, तितका तो पुरुषांकडून प्रगट होणे शक्य नाही याची जोतीराव प्रांजळ कबुली देतात. आजही किती जणांना हे जमेल?

अभिनव कल्पना लढविण्यात या पती-पत्नींचा हात कोणी धरू शकत नव्हता. १८५२ मध्ये पहिले भारतीय शालेय ग्रंथालय उभारणे, मुलामुलींना पहिलीपासून इंग्रजी, शेतीशिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण देणे, विद्यार्थी गळतीचा प्रश्न सोडविण्यासाठी गरीब मुलामुलींना पगार देणे, मुलामुलींच्या आई-वडिलांसाठी रात्रशाळा काढणे, शिकायला चला सांगणारे 'तृतीय रत्न' नाटक लिहिणे या सगळ्यातून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे सेंद्रिय विचारवंत कसे होते हे समजते.

इतिहासाच्या पुनर्निमितीचा खरं म्हणजे पुनर्लेखनाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. ऐतिहासिक तथ्ये मोडतोड न करता सामाजिक शहाणपणाचा अवलंब करून कशी मांडता येतात आणि त्यासाठी तारतम्य कसे वापरावे हे आपणास जोतीरावांच्या पोवाड्यातून समजते.

जगातील धर्मग्रंथांसंदर्भात महात्मा फुले यांचे जे निरीक्षण आहे त्याचे आश्चर्य वाटते. जगभराच्या धर्मग्रंथांनी कमी-अधिक प्रमाणात स्त्रियांवर अन्याय केला. हे धर्मग्रंथ पुरुषांनी लिहिल्याने त्यांनी स्वार्थासाठी पक्षपात केल्याचेही निरीक्षण जोतीरावांनी नोंदविले आहे. काळाचा विचार करता जोतीरावांचे द्रष्टेपणच जणू आपणास दिसते. या सखोल अभ्यासातूनच त्यांना पर्यायी संस्कृतीचे वेध लागल्याचे दिसते. पुढे 'पर्यायी संस्कृतीचे जनक' म्हणून महात्मा फुले यांची जी प्रतिमा पुढे आली त्याची पाळेमुळे आपणास येथे दिसतात.

शेतकरी संघटनेच्या अधिवेशनास महिला उपस्थित होत्या हा इतिहास पाठ्यपुस्तकात आला आहे. १९२५ मध्ये वर्धा येथे सत्यशोधक महिला परिषदेला पाच हजार महिला उपस्थित राहतात हा भाग आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात कधी येणार? सत्यशोधक विवाहपद्धती, भाऊपणा व बहीणपणा, सामाजिक संघटन, पाणी अडवा पाणी जिरवा, उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव, नेशन बिल्डिंगसाठी नेशन बिल्डरची भूमिका, शेती आणि अर्थव्यवहारांसंबंधी त्यांची भूमिका या गोष्टी पाठ्यपुस्तकातून किंवा सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून गोष्टीरूपाने विद्यार्थ्यांसमोर मांडण्याची गरज आहे. समाज विनाकारण कोणालाही महात्मा पदवी अर्पण करीत नाही.

आद्य फुले चरित्र ही ग्रंथाची जमेची बाजू आहे. नऊ परिशिष्टे अत्यंत महत्त्वाची आहेत. संदर्भ टीपा, निवडक शब्दांचा कोश, निवडक संदर्भ सूचीने ग्रंथाचे मोल वाढविले आहे. संपादकीयातील काही पॅरेग्राफ चुकून दोनदा छापले गेले आहेत ते पुढील आवृत्तीत दुरुस्त करता येतील. सरकारने मनावर घेतल्यास ग्रंथाची स्वस्त जनआवृत्ती काढता येईल.

महात्मा फुले समग्र वाङ्मय,संपादक : प्रा. हरि नरके,
प्रकाशक : फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन,
पृष्ठं : ८६२, किंमत : ३२० रु.
म.टा. रविवार, दि. १८ नोव्हेंबर २०१८, संवाद, पृ. ६
https://epaper.timesgroup.com/Olive/ODN/MaharashtraTimes/#
https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/mahatma-fulles-revolutionary-composite-class/articleshow/66662150.cms
डॉ गणेश राऊत- मटा ऑनलाइन | Updated:Nov 18, 2018, 04:00AM IST

No comments:

Post a Comment