Thursday, November 8, 2018

पु.ल.देशपांडे






१९८८ साली बाळ गांगल या संस्कृत व इतिहासात २ पीएच.डी. मिळवलेल्या सनातनी इसमाने महात्मा फुले यांच्यावर अतिशय गलिच्छ २ लेख लिहिले होते. साप्ताहिक सोबतमध्ये ग.वा.बेहरे यांनी ते छापले होते. तेव्हा मी एम.फिल. करीत होतो. सामाजिक चळवळीच्या सत्संगाने महात्मा फुले यांचे साहित्य शाळकरी वयातच वाचलेले होते. एम.फिल. ला महात्मा फुले यांचे साहित्य अभ्यासाला होते. गांगलांच्या लेखांचे सप्रमाण खंडन करणारे लेख मी सकाळ, म.टा., लोकसत्ता आदींमधून लिहिले. लेख वाचून पु.ल. देशपांडे यांचे मला पत्र आले. तू यावर पुस्तक लिही असं त्यांनी मला कळवलं. पंधरा दिवसात मी त्यावर पुस्तक लिहिलं. "महात्मा फुले यांची बदनामी: एक सत्यशोधन" चं चंद्रपूरला पुलंच्या हस्ते प्रकाशन झालं. पुल त्या पुस्तकावर भरभरून बोलले. परिणामी कार्यक्रमातच पुस्तकाच्या ५०० प्रती लगेच संपल्या.

शाळेत असताना पुलंची पुस्तकं मला खूप आवडायची.

८ नोव्हेंबर हा पुलंचा वाढदिवस. मी चौथीत असताना पुल राहात ती रूपाली इमारत शोधून काढली. त्यांच्या वाढदिवशी एक पुस्तक घेऊन त्यांना भेटायला गेलो. दहाएक किलोमीटर सायकल चालवल्याने मी घामानं निथळलेला होतो. पुल आणि सुनिताबाई अतिशय आपुलकीनं बोलले. मी त्यांना वर्तमानपत्रात बांधलेलं, भेट दिलेलं पुस्तक त्यांनी उघडून बघितलं. मी हेच पुस्तक का निवडलं असं त्यांनी मला विचारलं. मी संकोचलो. खरं सांगितलेलं त्यांना आवडणार नाही अशी मला भिती वाटली. त्यामुळं मी सांगायचं टाळत होतो. पण ते पुन्हापुन्हा विचारत राहिले. मी म्हटलं, "गड आला पण सिंह गेला" ही हरी नारायण आपटे यांची ही कादंबरी माझी आवडती आहे. पुस्तकांच्या दुकानात बारा आण्याला मिळणारं हेच एकमेव पुस्तक होतं. माझा सफाई कामगार म्हणून पगार महिन्याला दहा रूपये होता. सगळा पगार आईला द्यावा लागायचा. त्यातला फक्त एक रूपया आई मला पुस्तकांसाठी द्यायची."
पुल आणि सुनिताबाई या पहिल्या भेटीतच जणू सख्खे मित्र असल्यासारखे वागले. पुलंचा मोठेपणा असा की चौथीत असताना हे पुस्तक वाचून त्यावर आयुष्यातली पहिली एकांकिका
त्यांनी लिहिली होती असं त्यांनी मला सांगितलं. मी तर हूरळूनच गेलो. बहुदा मला बरं वाटावं म्हणून त्यांनी हे सांगितलं असावं असं आता वाटतं.

पुढे प्रत्येक भेटीत पुल त्यांचं एकतरी पुस्तक मला भेट द्यायचे. अमूक पुस्तक वाच, तमूक वाच असं आवर्जून सांगायचे. माझ्या लग्नात त्यांनी घेतलेला पुढाकार याबद्दल मी फेबुवर लिहिलेच होते. २५ वर्षांपुर्वी पुलंच्या अमृत महोत्सवी वर्षी मी लोकमतमध्ये पुलंबद्दल लेख लिहिला होता. त्या सगळ्या आठवणी पुन्हा लिहित नाही. तो लेखच शोधून फेबुवर टाकीन.
पुलंच्या लेखनाने खूप आनंद दिला. जणू पंचवीस-तीस प्रतिभावंत लोकांचं काम पुल एकहाती करायचे. विनोदकार, नाटककार, वक्ते, दिग्दर्शक, अभिनेते, लेखक, गायक, संगीतकार, दर्दी रसिक ही त्यांची असंख्य रुपं विलोभनीय होती. त्यांच्या बहुमुखी प्रतिभेचा मी ऋणी आहे. जन्मशताब्धीनिमित्त पुलंच्या स्मृतीस वंदन.

-प्रा. हरी नरके, ८ नोव्हेंबर २०१८

No comments:

Post a Comment