Saturday, November 10, 2018

श्रेष्ठ प्रतिभेचे धनी प्रा. रंगनाथ पठारे






प्रा.रंगनाथ पठारे यांचे आजच्या मराठी साहित्यात अव्वल स्थान आहे. श्रेष्ठ दर्जाचे कादंबरीकार, दणकट कथाकार, समीक्षक आणि विचारवंत म्हणून गेली ४० वर्षे ते अविरतपणे योगदान देत आलेत. सुमारे चाळीसेक मौलिक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. ताम्रपट ह्या महाकादंबरीने ते पहिल्या श्रेणीचे कादंबरीकार बनले. अरूण साधू यांच्यामते काळाचा अफाट अवाका असलेली, ग्रामजीवनाचे अस्सल चित्रण करणारी, ताम्रपटच्या तोडीची दुसरी कादंबरीच मराठीत नाही.

"सातपाटील कुलवृत्तांत" ही सुमारे आठशे वर्षांचा महाकाय पट चितारणारी, मराठा योद्धे आणि समाज जीवनाचा सबाल्टर्न हिस्ट्रीच्या अंगाने वेध घेणारी महामहाकादंबरी ते सध्या लिहित आहेत. असे मजबूत आणि चिरेबंदी काम मराठीत आजवर झालेलेच नाही.


पठारेसर मूळचे भौतिक शास्त्राचे प्राध्यापक. ते उत्तम खेळाडू आणि निसर्गप्रेमी आहेत. दुबळ्यांबद्दल अपार कणव, मराठा असूनही सरंजामशाहीचा तिटकारा आणि ज्ञाननिर्मितीबद्दल जिव्हाळा ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये. अतिशय नम्र, मातीशी घट्ट नाते आणि तुफान वाचन-चिंतन.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळूच शकत नाही असे ज्या काळात बहुतेक सगळे दिग्गज म्हणत होते तेव्हा सरांनी एकदा मला फोन केला आणि प्रदीर्घ चर्चा केली. मराठी भाषेबद्दल ममत्व आणि तिच्या भल्याची आस असल्यानं सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही ताबडतोब कामाला लागलो आणि म्हणता म्हणता एक महाकाय अहवाल तयार झाला. पठारे समितीचा हा अहवाल केंद्र सरकारने भाषा तज्ज्ञांकडे पाठवला. त्यांनी त्याची छाननी करून मराठीला हा दर्जा द्यावा अशी एकमुखी शिफारस केली.

या काळात सरांचा प्रदीर्घ सहवास मला लाभला. त्यांचा उमदा स्वभाव, सलगपणे १६ ते १८ तास काम करण्याची क्षमता, शिस्त आणि सखोल संशोधनाची वृत्ती यांनी मी प्रभावित झालो.

भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, सरांचे संगमनेरचे घर, माझे पुण्यातले घर, यशदा आणि शासकिय विश्रामधाम येथे आम्ही सलगपणे असंख्य बैठका घेतल्या नी महिनोन महिने काम केले. सरांमुळे एक मजबूत काम कसे उभे राहाते याचा साक्षात अनुभव मला घेता आला.

आणीबाणीच्या पार्श्वभुमीवरील " दिवे गेलेले दिवस" आणि  " अनुभव विकणे आहे" या पुस्तकांनी सरांनी कादंबरी व कथा लेखनाला प्रारंभ केला. त्यानंतर गेली ४० वर्षे सर अव्याहतपणे लिहित आहेत. अखंडपणे आलेल्या रथ, हारण, चक्रव्यूह, टोकदार सावलीचे वर्तमान, ताम्रपट, त्रिधा, कुंठेचा लोलक, दु:खाचे श्वापद, भर चौकातील अरण्यरूदन, एका आरंभाचे प्रास्ताविक, चोषक फलोद्यान या त्यांच्या एकाहून सरस एक अशा महत्वाच्या कादंबर्‍या.

सर मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळ्याचे. त्यांच्या आणि माझ्या तालुक्यांना जोडणारी घोडनदी. या परिसरात बोलली जाणारी मराठी अचूकपणे त्यांच्या कादंबर्‍यामधून, कथांमधून येते. आमच्या भागातल्या या गावरान मराठीला पठारेसरांनी आपल्या साहित्यातून अजरामर केले. गावगाड्याची जी आरपार समज त्यांना आहे तशी आणि तितकी क्वचितच अन्य कोणा मराठी साहित्यिकाला असेल. हिंदीमध्ये जे काम फनिश्वरनाथ रेणूंनी केलेय त्यातोडीचे काम पठारेसर आज मराठीत करीत आहेत. आज नेमाडेसरांनंतर ज्ञानपीठ मिळायला हवे असे नाव म्हणजे रंगनाथ पठारेसर. घरात लेखनाचा कोणताही वारसा नसताना एकाच पिढीत त्यांनी किती मोठी भरारी घेतलीय! केवळ अभिमानास्पद!

गाव, गोत, कुळ, समकालीन आर्थिक-राजकीय वास्तव, परंपरा व परिवर्तनाची नाळ, जातीय तेढ, अहंकार आणि वर्चस्ववादी मानसिकता यांचे समाजशास्त्रीय दस्तावेजीकरण म्हणजे सरांचे ग्रंथ होत.

त्यांच्या सार्‍याच पुस्तकांवर मी विस्ताराने लिहिणार आहे.

तळेगाव ढमढेरे हे गाव ऎतिहासिक गाव आहे. नुक्ताच ८०० वर्षांपूर्वींचा एक शिलालेख गावात एका वाड्याच्या उत्खननात मिळालाय. हडाप्पा, मोहेनजोदाडो पूर्वकालीन वस्तीचे पुरावे उत्खननात मिळालेले इनामगाव तळेगावपासून जवळच आहे.

महात्मा फुले तळेगावात आल्याचे व एक ऎतिहासिक सामाजिक संघर्ष त्यांनी इथे केल्याचे पुरावे खुद्द जोतीरावांनीच लिहून ठेवलेत. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत शहीद झालेले हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे तळेगावचेच.

बृहद पुणे शहराच्या सीमा आता तळेगावपर्यंत विस्तारल्या आहेत. विकासाचा फार मोठा डोलारा या भागात उभा राहतोय. गेली १३ वर्षे आपण या गावात सोनाई नरके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सोनाई व्याख्यानमाला चालवतो. पुण्याचे बौद्धिक, शैक्षणिक, सांस्कृतिक वैभव या भागाला मिळावे यासाठी, या परिसराचे नितांत गोमटे व्हावे यासाठी ही व्याख्यानमाला महत्वाची पाऊलवाट तयार करते आहे.

निळू फुले, डॉ. आ. ह.साळुंखे, डॉ. सदानंद मोरे, डॉ. रामचंद्र देखणे, संजय आवटे, संजय सोनवणी, संजय भास्कर जोशी आदींची भाषणे खूप गाजली. लोक वर्षभर या व्याख्यानमालेची वाट बघतात. पंचक्रोशीतून उदंड प्रतिसाद मिळतो.

सोनाई व्याख्यानमाला, २०१८, यावर्षीचे वक्ते आहेत- प्रा.रंगनाथ पठारे,

सोमवार दि. १२ नोव्हेंबर, सायं. ६ वाजता,

स्थळ- सावता महाराज मंगल कार्यालय, तळेगाव ढमढेरे, ता.शिरूर, जि.पुणे.

नक्की यायचं!


प्रा. हरी नरके, ११ नोव्हेंबर २०१८

No comments:

Post a Comment