डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समितीचे विद्यमान सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस अचानक नी अकाली गेले. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाल्याची बातमी आत्ताच एका मित्राने दिली. खूप सारी वेदना आणि हळहळ वाटली. एक मस्त दोस्त असा मधेच निघून गेला.
अविनाश हा हसतमुख, सौजन्यशील आणि जगमित्र माणूस होता. त्यांच्या वयाला साठ वर्षे पूर्ण झाली म्हणुन अलिकडेच मित्रमंडळीने त्यांचा एक गौरवग्रंथ प्रकाशित केला होता. नुकतेच भेटलो तेव्हा त्यांनी जेवायचा खूप आग्रह केला. माझे जेवन झालेले होते. तरीही केवळ अविनाशच्या अतिव आग्रहापोटी त्याच्याच ताटात मी परत थोडं जेवलो.
आमचे दोघांचे कार्यालय एकच असल्याने आम्ही नियमितपणे भेटत असू. मनमुराद गप्पांची मैफिल सजत असे. आंबेडकरी चळवळीत आयुष्य गेलेला अविनाश तसा अनाग्रही आणि सौम्य प्रकृतीचा होता. ३० वर्षांपुर्वी माझे महात्मा फुल्यांवरचे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा अविनाशचे पत्र आले. औरंगाबादला एका कार्यक्रमासाठी गेलेलो असताना अविनाश येऊन भेटला. त्याच्या स्कूटरवर मागे बसवून त्याच्या महाविद्यालयात मला घेऊन गेला. त्याने तिथे माझे भाषण आयोजित केलेले. त्यानंतर मला त्याच्या घरी घेऊन गेला. त्याचा पाहुणचार, अगत्य आणि दोस्ताना कायमचा होऊन गेला.
अनेकदा भेटीगाठी होत.
मालेगावच्या मित्रांनी एकदा आम्हा दोघांची एकत्रित भाषणे ठेवली होती. खूप गर्दी होती. एका शाळेच्या मैदानावर कार्यक्रम होता. तो वहिनींना घेऊन आला होता. खूप मनापासून बोलला तो. त्याचे भाषण ऎन रंगात आलेले असताना संयोजकांनी भाषण आवरते घ्या अशी त्याला चिठ्ठी दिली. अविनाश तसा कधीही न रागावणारा पण त्या चिठ्ठीने तो भडकला. संयोजकांचीही चूकच झालेली होती. त्यात त्यांचा आगाऊपणा म्हणजे " फार वेळ झालाय, आम्हाला अजून हरी नरकेंचे भाषण ऎकायचेय" असे म्हणे त्यांनी चिठ्ठीत लिहिलेले. " मग मला कशाला बोलावले?" असे अविनाशने त्यांना झापले.
गेली आठ नऊ वर्षे अविनाश डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समितीचा सदस्य सचिव म्हणून काम बघत होता. प्रा.दत्ता भगत यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या जागेवर अविनाशला नेमावे यासाठी मी सचिवांकडे शिफारस केली.आग्रह धरून पाठपुरावा केला. आमचे अधिकारी मित्र शुद्धोधन आहेर यांनी शासनादेश काढण्यासाठी खूप मदत केली. तेव्हा आमचे कार्यालय मंत्रालयासमोरच्या बॅरॅक्समध्ये होते. कार्यालयाचे नूतनीकरण चालू असताना अविनाशने त्याच्या केबिनसाठी दुप्पटीहून जास्त जागा घेतली. माझ्या केबिनमध्ये जेमतेम दोन खुर्च्या बसतील एव्हढीच जागा ठेवली. मी त्याला विचारायला गेलो तर अविनाश असा पठठ्या की मला म्हणाला, "अरे तो इंजिनियर मूर्ख होता. त्याला मी बोललो होतो की माझी [ म्हणजे अविनाशची ] केबिन आणखी मोठी कर. माझ्याकडे कार्यकर्ते येतात. तर त्या गाढवाने तुझीच केबिन मोठी करून ठेवली." मी रागवायचे विसरलो आणि हसू लागलो.
अविनाश श्री. प्रकाश आंबेडकरांचा विश्वासू सहकारी होता. मा. बाळासाहेबांचा तो निस्सिम भक्त होता. तेव्हढा विषय आला की त्याचे विचार करायचे इंद्रीय तो बंद करायचा आणि निष्ठावंत अनुयायी या भुमिकेत जायचा. तो बाळसाहेबांच्या प्रत्येकच कृतीचे समर्थन करायचा. एरवी चिकित्सक असलेला अविनाश बाळासाहेबांच्या बाबतीत मात्र फक्त "भक्त" असायचा.
दत्ता भगतसर, शुद्धोधन, संजू हिंगे आणि मी २०१० साली बाबासाहेबांचा फोटो आल्बम प्रकाशित केला. तो सिंगापूरहून छापून आणलेला होता. त्याच्या दहा हजार प्रती एका आठवड्यात संपल्या. खूप कौतुक झाले.
अर्थात नेहमीप्रमाणे काही विघ्नसंतोषी लोकांनी चढ्या सूरात थातूरमातूर मुद्दे काढून विरोधी कोल्हेकुई केलीच. ही खेकडावृत्तीच चळवळीची कायम हानी करीत आलीय.
अविनाशने या खंडाची अलिकडेच सुधारित आवृत्ती काढली. संशोधनाची शिस्त धाब्यावर बसवून त्याने पहिल्या आवृत्तीच्या आम्हा सर्वांचीच नावे गाळून टाकली. वाईट वाटले. चळवळीतही टोकाचा अविश्वास, असूया आणि जातीयवाद आहे. अविनाश कधीही तसा नव्हता. पण त्याच्यावर त्याच्या सहकार्यांचा, नेत्यांचा दबाव असेल. मी त्यानंतर अनेकदा भेटलो,पण त्याने तो विषय टाळला. मीही स्वत:हून त्या अप्रिय विषयावर बोलणे टाळले. बाकी आमच्या गप्पा होत राहिल्या. आमच्या दोस्तान्यात अंतर पडले नाही.
आणि आज अविनाश असा तडकाफडकी निघून गेला. अविनाश, मित्रा असे अचानक नी अकाली जाणे हे मात्र तुझे चुकलेच.
प्रा. हरी नरके, ११ नोव्हेंबर २०१८
No comments:
Post a Comment