रमाकांत एक खोल विवर - जयंत पवार, विशाखा दिवाळी अंक, सर्वोत्कृष्ठ कथा २०१८ - प्रा. हरी नरके
श्री जयंत पवार हे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कथाकार आहेत. त्यांच्या फिनिक्सच्या राखेतून उठला मोर आणि वरणभात लोण्चा.... ह्या दोन्ही कथासंग्रहांना
जाणकारांची पसंती मिळालेली आहे. त्यांच्याकडून वाचकांच्या फार अपेक्षा आहेत.
यंदाच्या विशाखा दिवाळी अंकात त्यांची "रमाकांत एक खोल विवर" ही कथा प्रकाशित झालेली आहे.
गेल्या पंधरा दिवसात मी बरेच दिवाळी अंक वाचले.
काही चाळले.
त्यातल्या कथांशी तुलना करता पवारांची ही कथा यावर्षीची सर्वोत्कृष्ठ कथा ठरावी अशी दणकट कथा आहे.
मुंबईतल्या रमाकांत साठे आणि अनघाची खूप स्वप्नं असतात. स्वतंत्र खोली मिळाल्यावरच लग्न करायचं असं त्यांनी ठरवलेलं असतं. रमाचे वडील मुंबई महापालिकेत सफाई कामगार असतात. त्यांना एका गाडीने ठोकल्यामुळे ते अंथरूणाला खिळलेले असतात. आई, दोन धाकट्या बहिणी आणि अपघातात अपंग झालेले वडील हे सारे रमाकडे आशेनं बघत असतात.
रमा पदवीनंतर अॅनिमेशनचा कोर्स करीत असतो. या क्षेत्रात करियर करायचं, काहीही झालं तरी वडलांसारखं गटारं साफ करण्याचं काम करायचं नाही असा त्याचा पक्का निर्धार असतो.
वडीलांच्या जागी अनुकंपा तत्वावर सफाई कामगाराची नोकरी मिळत असतानाही रमा ती निर्धाराने नाकारतो.
अनघाच्या घरून लग्नाची घाई केली जाते. त्यामुळे तो अॅनिमेशन जगतात नोकरीचा शोध घेऊ लागतो.
आणि इतक्यात केंद्र सरकार नोटाबंदी जाहीर करतं.....
काय होतं रमाचं? अनघाचं? त्यांच्या प्रेमाचं? त्यांच्या कुटुंबांचं?
श्रेष्ठ कथाकार बाबूराव बागूल यांच्या स्मृतीला पवारांनी ही कथा अर्पण केलेली आहे.
प्रचंड अस्वस्थ करणारी, अंतर्मुख करणारी, महानगरी मुंबईतील सफाई कामगारांचं आणि त्यांच्या नव्या पिढीचं जगणं विलक्षण सामर्थ्यानं टिपणारी महान कथा.
प्रत्येकाने आवर्जून वाचायलाच हवी अशी, क्वचितच लिहिली जाणारी तगडी कथा.
-प्रा.हरी नरके, ५ नोव्हेंबर २०१८
No comments:
Post a Comment