Wednesday, October 31, 2018

ऋतुरंग- वैशिष्ट्यपूर्ण आणि दर्जेदार दिवाळी अंक




ऋतुरंग हा दिवाळी अंक सर्वोत्तम दिवाळी अंकापैकी एक मानला जातो. सातत्याने आणि सलगपणे दर्जा टिकवून ठेवणे ही फार अवघड गोष्ट आहे. ऋतुरंगचे हे २६ वे वर्ष आहे. "बीज अंकुरे अंकुरे" या एका संकल्पनेवरचे २९ लेख असलेला या वर्षीचा हा अंक वैशिष्ट्यपूर्ण आणि दर्जेदार दिवाळी अंक ठरला आहे. ख्यातनाम कवी आणि संपादक अरूण शेवते यांनी सलग २६ वा अंक दणकट आणि संग्राह्य बनवलेला आहे.

शेवते या अंकासाठी वर्षभर काम करतात. प्रत्येक लेख लिहिला जात असताना आणि तो संपादित करताना ते व्यक्तीश: परिश्रम घेतात. त्यामुळे अंक तर हातोहात संपतोच पण नंतर त्याचे पुस्तक प्रकाशित होते. त्यांच्या २५ वर्षांच्या २५ दिवाळी अंकांची आजवर ५० पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. ही कामगिरी असाधारण म्हटली पाहिजे.

या वर्षीच्या अंकात गिरिश कुबेर, मेघना गुलजार, दीपिका पदुकोण, अंबरिश मिश्र, जनार्दन वाघमारे, नागराज मंजुळे, कल्पना दुधाळ, केदार वैद्य, आनंद नाडकर्णी, हेरंब कुलकर्णी, प्राजक्त देशमुख, नितीन चव्हाण यांचे लेख भन्नाट आहेत. वाचलेच पाहिजेत असे. दीर्घकाळ मनात रेंगाळणारे.

राजेंद्र ओंबासे, सु.वा.कुलकर्णी आणि रमेश राठिवडेकर ही पुस्तक विक्रीच्या क्षेत्रातील तीन तालेवार नावं. पण या तिघांनी फूटपाथवर रद्दी विकणं, दुसर्‍यांच्या दुकानांमध्ये नोकर म्हणून अतिशय हलकी कामं करणं अशी सुरूवात करून अफाट मेहनतीच्या आणि कर्तबगारीच्या जोरावर जी उत्तुंग भरारी घेतलीय ती वाचताना त्यांचा अभिमान वाटतो.आज देशात लाखोच काय कोट्यावधी युवक बेकार-बेरोजगार आहेत. त्यांनी या यशोगाथा वाचाव्यात आणि प्रेरणा घ्यावी.

वाफसा ह्या कल्पना दुधाळ यांच्या लेखाचा विशेष उल्लेख करायला हवा. ह्या कवयित्रीने कवितेच्या प्रातांत जोरदार मुसंडी मारलेली आहे. त्या मुळात शेतकरी आहेत. माहेरहून आजीने दिलेल्या भोपळ्याच्या बिया त्यांनी आपल्या सासरी पेरल्या तेव्हा झालेली चेष्टा, निगुतीनं घेतलेली काळजी आणि मग आलेलं चवदार भोपळ्यांचं मुबलक पिक, गोड मक्याच्या पिकाच्या आठवणी आणि पोतंभर बडीशेप पिकवली त्याची गोष्ट त्या ज्या जिव्हाळ्यानं सांगतात त्यानं हा लेख सरस बनत जातो. अस्सल मातीचा सुगंध असलेलं रसदार लेखन. स्वप्नपुर्ती,  श्री पी.डी.पाटील आणि अमृत, निळकंठराव जगदाळे यांचे यशोगाथात्मक लेखही जमून आलेत. पुर्णब्रह्म-जयंती कठाळे, मानसी होळेहुन्नूर, जांभूळ-तात्यासाहेब आर.ओ.पाटील, रवींद्र पांढरे,  या यशोगाथा प्रेरणादायी आहेत. उर्जादायी आहेत.

मुकेश माचकर, जुई कुलकर्णी, दिनेश गुणे, प्रशांत गडाख, प्रदीप म्हापसेकर, दगडू माळी आणि विजय पाडळकर यांचे लेखही उल्लेखनीय.

शेवतेंच्या प्रत्येक अंकात गुलजार असतातच. याही अंकात त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मराठी ग्रंथातील मस्त कविता आहेत. अनुवादासाठी किशोर मेढेंना धन्यवाद.

आज मराठीत उणेपुरे ३५० ते ४०० दिवाळी अंक प्रकाशित होतात. त्यातले ५ ते १० टक्के दर्जेदार, ३५% चांगले, ४०% ठीक-बरे आणि १५ ते २०% कचरा असतात.

२२४ पृष्ठांच्या ऋतुरंगमधली मजकूर असलेली बहुतेक सगळीच पानं वाचनीय असणं ही कामगिरी सोपी नाही. याही अंकात काही मजकूर बरा किंवा ठीक म्हणता येईल असा आहे, मात्र त्याचं प्रमाण १०% पेक्षाही कमी आहे. उर्वरित ९०% मजकूर उत्तम, भिडणारा आणि  वाचनानंद देणाराय.

ऋतुरंगला  अ++  श्रेणी द्यावी लागेल.

अप्रतिम मुखपृष्ठापासून, रेखाटनं, छायाचित्रं, मजकूराचा टाईप, अंकाची मांडणी या सार्‍यांमुळे ऋतुरंग २०१८ हा अंक खरोखरच मजबूत आणि संग्राह्य बनलेला आहे. अरूणराव शेवते आणि टिमचं हार्दीक अभिनंदन.

-प्रा. हरी नरके, ३१ ऑक्टोबर २०१८

No comments:

Post a Comment