Friday, October 5, 2018

आमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य ’जातिवंत’

१. घासीराम कोतवालमध्ये तेंडूलकरांनी आधी एक दृश्य घातलेले होते. एक मराठा सरदार बावनखणीत [ पुण्याच्या वेश्यावस्तीत] जातात असे त्यात दाखवले होते. त्यावेळचे गृहखात्याचे राज्यमंत्री मराठा समाजाचे जाणते राजकारणी होते. त्यांनी हे नाटक पाहिले आणि तेंडूलकरांना सांगितले, तुमचे हे नाटक तुम्हाला महाराष्ट्रात दाखवायचे असेल तर हे दृश्य वगळा. अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाल्या नाटककार विजय तेंडूलकरांनी ते दृश्य ताबडतोब वगळले.

२. घासीराम कोतवालमुळे ब्राह्मण समाजाची बदनामी होतेय असे ज्यांनी तेव्हा गळे काढले तेच सगळे आज " पाणी आदिवासी मुलीच्या जांभळ्या स्तनांसारखंही असतं..." ही कवितेची ओळ वाचून अनेक आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या असताना मात्र आदीवासींचा उल्लेख एकजात झुंड या शब्दात करीत आहेत. प्रबळ जातींच्या खर्‍या झुंडी जेव्हा रस्ते कब्ज्यात घेतात तेव्हा मात्र आम्ही तमाम सारे विचारी लोक आमच्या नष्ट झालेल्या अवयवासह मौनात का बरे गेलेले असतो?

३. दया पवारांच्या बलुतंमधल्या बौद्ध समाजाच्या चित्रणातून आमच्या समाजाची बदनामी झाली, आम्ही बलुतंची होळी करणार असा आरडाओरडा करणारेच आज मात्र " पाणी आदिवासी मुलीच्या जांभळ्या स्तनांसारखंही असतं" असं लिहिणारा कवी आपल्या समाजाचा आहे म्हणून अभिव्यक्तीच्या रक्षणार्थ पुढे धावले पाहिजे या जातजाणीवेनं कवीच्या पाठींब्याच्या पत्रकावर सह्या करू लागलेत.

४. पैठणला धार्मिक कार्यक्रमाच्या नावावर गोरगरिबांची लूट करणार्‍या प्रवृत्तीवर "दशक्रिया" या चित्रपटात भाष्य आहे म्हटल्यावर ब्राह्मण समाजाची बदनामी आहे, या सिनेमावर त्वरित बंदी घाला, अशी ओरड झाली तेव्हा किंवा बाजीराव मस्तानी चित्रपटातल्या नृत्याच्या दृष्यात ब्राहमण स्त्रियांना नाचताना दाखवल्याने या समाजाची बदनामी झालीय, सिनेमावर बंदी झाला असा गदारोळ झाला तेव्हा तोंडाला कुलूप लावून तमाशा बघत बसणारे तमाम इसम आदीवासी मुलीच्या स्तनांचा मुद्दा आल्यावर मात्र अभिव्यक्तीच्या बाजूने सरसावलेत. एखाद्या जात समुहाच्या उल्लेखासह अशा प्रतिमा वापरणे अनावश्यक असल्याची जनभावना असेल तर ती समजून घ्यायला नको? तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तसे आदीवासींना विरोधाचे स्वातंत्र्य नाही काय?

५. पद्मावत चित्रपटाचे सेट जाळले गेले, मोर्चे काढून दिग्दर्शक, नायिका यांची डोकी कापून आणणारांना कोट्यावधींची बक्षिसं जाहीर झाली तेव्हा अभिव्यक्तीबद्दल मूग गिळून चिडीचूप बसलेले तमाम चित्रपटवाले आदीवासी मुलीचा मुद्दा आल्यावर मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तळी उचलून धरताहेत. "माझे पती छत्रपती" या नावाचे नाटक पुण्यात उधळले गेले होते. "माझे पती छत्रीपती!" असा नावात बदल करायला भाग पाडले गेले. कन्यादानमध्ये आमच्या जातीची बदनामी करण्यात आलीय म्हणून नाटककार विजय तेंडूलकरांना नाशिकच्या संमेलनात चप्पल फेकून मारली गेली. त्यावेळी खोलखोल मौनात गेलेले बायाबाप्येच आज मात्र आदीवासींना विवेक शिकवताना दिसताहेत. आम्ही विचारी लोक ताकदवान झुंडींसमोर मौनीबाबा असतो नी दुबळ्यांना मात्र प्रवचनं देतो हे आमचे खरे रूप आहे.

६. नट समाजातल्या भटक्या स्त्रियांना दोन घास मिळवण्यासाठी आपलं शरिर विकावं लागतं असा उल्लेख एका शासकीय अहवालात आला तेव्हा एक साहित्य अकादमी विजेते मराठी लेखक तो अहवाल जाळायला सरसावले. आता मात्र आदीवासी स्त्रियांच्या अब्रूचा मुद्दा आल्यावर त्यांना हा कवी आपला वाटायला लागला.

दलित-आदीवासी, भटके विमुक्त, अल्पसंख्याक, ओबीसी समाजातल्या स्त्रियांवर अत्याचार झाले, बलात्कार झाले, त्यांच्या हत्या झाल्या, त्यांच्या नग्न धिंडी निघाल्या, आदीवासी-दलित लेखकांच्या संपुर्ण पुस्तकांवरच बंदी आल्या, तेव्हा या लेखक कवींना पाठींबा न देता चूप राहिलेले साहित्यिक आता आदीवासी स्त्रिच्या भावनांसाठी, जनभावनेसाठी एक कविता अभ्यासक्रमातून काय वगळली, [ पुस्तक वगळलेले नाही]  तर लगेच " कवींची राष्ट्रव्यापी संघटना असावी. त्यात भिन्न भिन्न विचारधारेचे लोक असतील. पण solidarity च्या बाबतीत एकमत असेल." अशी पताका फडकावित आहेत. जेव्हा आनंद यादवांना अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून येऊनही बसू दिले गेले नाही, त्यावेळी कु्ठे होते?

७. कविला धमक्या, शिव्या देणारे, ट्रोल करणारे चुकच करीत आहेत. दिनकर मनवर यांना शिवीगाळ करणे, धमक्या देणे किंवा ट्रोलिंग करणे हे बेकायदेशीर तर आहेच पण ते अनैतिकही आहे. त्यांच्या कवितेतल्या एका उल्लेखाशी तुमचे मतभेद आहेत. ती कविता आता अभ्यासक्रमातून गाळण्यात आलेली आहे. श्री मनवर हे आदीवासींचे शत्रू तर नाहीतच, विरोधकही नाहीत. ते आदीवासींबद्दल कळवळा असलेले श्रेष्ठ कवी आहेत. त्यांना आदीवासीविरोधी गोटात बळजबरीनं ढकलू नका. त्यांना ज्यांनी पाठींबा दिलाय त्यातलेही बहुसंख्य कवी, लेखक हे दलित-आदीवासी-भटके-ओबीसी यांच्याबद्दल आस्था असलेले ज्ञानी लोक आहेत. त्यांना टार्गेट करणे किंवा व्यक्तीगत पातळीवर दुखावणे म्हणजे आपल्याच पायावर दगड पाडून घेणे होय याचे भान राखा. आपल्या साहित्याद्वारे ज्यांनी आदीवासी जीवनाबद्दल जागृती घडवलेली आहे ते आपलेच दोस्तलोक आहेत. संयम सोडू नका. विवेकाने वागा.

८. दुसरी बाजू अतिशय संयमाने जेव्हा मांडली गेली, नेमक्या काय अडचणी आहेत त्या सभ्य भाषेत संगतवार सांगितल्या गेल्या तेव्हा मात्र या प्रतिभावंत कवी-समिक्षकांनी दुसरी बाजू नावाची काही बाब असूच शकत नाही, आमची बाजू हीच एकमेव बाजू, असं हिरिरीनं लिहिलं. ही कुत्सित आणि दांभिक वृत्ती नाही?

वेगळं काही सभ्यपणे कोणी मांडत असेल तर त्याची टिंगळ टवाळी करणे, त्यांना मुर्खात काढणे, प्रतिगामी ठरवणे, म्हणजे सामान्य लोकांपासून कायम फटकून राहणे होय. आम्ही तुच्छतावादी क्रांतिकारक, प्रतिभावंत आहोत. संतप्त लोक आमच्या अंगावर आले की ते जर दुबळ्या समाजातले असले तर त्यांना आम्ही झुंडी म्हणून हिणवतो, तेच आम्ही सारे बुद्धीवादी प्रबळ जातींपुढे मात्र आमची मान झुकवतो.हा पक्षपात का?

९. होय प्रश्न गरिब आदीवासींचाच आहे. प्रबळ जातींच्या स्त्रियांबद्दल अवाक्षर लिहून बघा, एकतर तुमची तशी हिंमतच होणार नाही, केलीत तर तुमचा आनंद यादव होईल. तर आमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे असे मोजून मापून हिशेबी असलेले. मग हा दुटप्पीपणा, दुतोंडीपणा नाही?


अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त तुम्हालाच हवं, प्रबळ जातींना हवं, दुबळे आदीवासी, त्यांच्या भावनांना काहीच अर्थ नाही? आदीवासी स्त्रियांच्या खाजगी अवयवांचा उल्लेख झाला तर बिघडत नाही. आम्हा प्रबळ जातींवर अवाक्षर लिहाल, बोलाल तर मात्र याद राखा. जिभा छाटल्या जातील. धिंड काढली जाईल. या राज्यात राहता येणार नाही. हा न्याय आहे?


१०. आज कवीच्या समर्थनार्थ पुढे आलेल्या किती जणांनी हा कविता संग्रह विकत घेऊन वाचलाय? कवितासंग्रह अभ्यासक्रमाला लावला म्हणून नविन आवृत्ती काढावी लागली. वादंग झाल्यावर त्याच्या प्रती मिळेनाश्या झाल्या. तोवर त्याच्याकडे कितीजणांचे लक्ष गेले होते? काही पोलीसांनी घेतल्या. काही स्वत: कवीनेच.

मर्ढेकरांसारख्या सर्वश्रेष्ठ मराठी कवीचा कवितासंग्रह "मर्ढेकरांची कविता" १३० पृष्ठांचा आहे. तो अवघ्या ३० [तीस] रूपयांना मिळतो. गेल्या २५ वर्षात त्याच्या ५०० प्रतीही संपलेल्या नाहीत. फुकटात अभिव्यक्तीच्या नावानं चांगभलं म्हणणार्‍या फेसबुक्यांनो, आधी कोणत्याही कवीच्या कवितासंग्रहाची एकतरी प्रत विकत घ्या, संग्रही ठेवा, वाचा आणि मगच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोला. नुसती दांभिकांची पंढरी नको.

११. अभिव्यक्तीवाल्यांनो, आजच्या या लढाईत किती आदीवासी तुमच्यासोबत आहेत? एकतरी आदीवासी स्त्री तुमच्या बाजूने आहे का? याचा अर्थ आम्ही आदीवासींपासून तुटलेले आहोत. त्यांच्याशी आमचा संवाद नको? की शेवटी परदु:ख शितळ हेच खरे?

-प्रा. हरी नरके, ५ आक्टोबर, २०१८


No comments:

Post a Comment