Friday, October 26, 2018

महाविद्यालयीन जीवनातली काळी करडी युवागाथा

श्री प्रणव सखदेव हे नव्या पिढीतले महत्वाचे लेखक आहेत. त्यांची या आठवड्यात प्रकाशित झालेली "काळे करडे स्ट्रोक्स" ही मजबूत कादंबरी आहे. सखदेव यांची लेखनकळा प्रवाही, चित्रशैलीतली आणि वाचकांशी गप्पा मारणारी आहे. मुंबईच्या रूईया महाविद्यालयात शिकणार्‍या तीन युवक युवतींची उत्तर आधुनिक काळातली चटका लावणारी गोष्ट या कादंबरीतून उलगडत जाते. समीर, सानिका आणि सलोनी या तिघांची वाचकांशी दोस्ती होऊन जाते. अरण्या उर्फ अरूण आणि दादूकाका ही भन्नाट अवलियांची जोडी तर काळजातच घुसते. रूईया महाविद्यालयाचा परिसर, दडकर कट्टा, दादर, फाइव्ह गार्डन, मुंबई लोकलचा व्हीडीयो कोच आणि हिमाचल प्रदेश मधलं मॅकलीओडगंज ही नुसती स्थळं न राहता या कादंबरीतली अफलातून पात्रं बनुन आपल्याला भेटतात. मुंबईचा पाऊस, विशेषत: २६ जुलैचा महाप्रलय, २६ अकराचा अतिरेकी हल्ला हे केवळ नेपथ्य न राहता या गोष्टीचा आलेख उंचावत नेणारं कलात्मक शक्तीस्थळ बनत जातं.

सखदेवांनी समकालीन युवकांची घुसमट अतिशय प्रभावीपणे चितारलेली आहे. प्रत्येक महानगरी माणूस हा आपापल्या ओझ्यांनी, अपार दु:खांनी गांजलेला असतो. जनरेशन गॅप, सामाजिक - सांस्कृतिक गोची आणि विस्कटलेली, पोकळीत जगणारी युवापिढी यांची ही सिंफनी मूळातून अनुभवायला हवी. आपल्या आजुबाजूच्या पर्यावरणातला समकालीन कोलाहल सखदेव भेदक पद्धतीनं टिपत जातात. सोनेरी युवावस्था आणि परिस्थितीचे काळे ढग यांची करडी काळी पोकळी वाचकाला तुफान घेरून सोडते. थेट दंशच करते.

मासकॉंम करणार्‍या समीरला चित्रपट दिग्दर्शक बनायचं असतं. सलोनीला तिच्या आजारावरच्या अत्त्याधुनिक उपचारांसाठी न्यूझीलंडला जायचं असतं. सानिकाला डेथविश असते.. काय होतं त्यांचं?
समीरला विलास सारंग आणि तारकोव्हस्की आवडत असतात. भन्नाट आयुष्य जगणार्‍या अरूणलाही.
अवघ्या २१९ पृष्ठांमध्ये सखदेव फार मोठा ऎवज आपल्यापुढे चितारत जातात. कथेतली पात्रं गोलगोल न फिरता सतत विकसित होत जातात. त्यांची मानसिक आंदोलनं आपल्याला जखमी करत जातात. छळतात. तरूण पिढीचा टिपलेला जिवघेणा संघर्ष, औदासिन्य, व्यसनं, सेक्स, हलकल्लोळ,कोलाहल,पोकळी आणि आरपार भिडत जाणारा रक्ताळलेला प्रवास यामुळे ही कादंबरी महत्वाची ठरते.

मरण काय असतं
जगण्याचा एक भाग बनून
अचानक फणा काढतं
आणि जातं डसून

इथून सुरू झालेली ही चित्तरकथा

उदासी
चमकत्या अंधाराच्या दिवसांची
जिच्या फण्यावर
हिंदळतोय
तुझ्या-माझ्या नात्याचा आस....

इथवर घेऊन जाते. कादंबरी संपली तरी तिच्या अनुभवातनं आलेली अस्वस्थता चिरत राहते.

रोहन प्रकाशनाची ही दर्जेदार ग्रंथनिर्मिती असून साजेसं मुखपृष्ठ अन्वर हुसेन यांचं आहे. अनुजा जगतापांनी ग्रंथ संपादन केलंय तर प्रकल्प समन्वयक आहेत रोहन चंपानेरकर

टिम रोहन आणि प्रणव सखदेव तुम्ही लय भारी काम केलेलं आहे.

-प्रा.हरी नरके, २५ ऑक्टोबर २०१८

काळे करडे स्ट्रोक्स, प्रणव सखदेव, रोहन प्रकाशन, पुणे, १८ ऑक्टोबर २०१८, दसरा, युथ एडिशन, रू. १९९/-, पृष्ठे २१९


No comments:

Post a Comment