Saturday, October 6, 2018

सापात चांभार की माणसात साप ?



सत्यशोधक चळवळीने आधुनिक भारतात सर्वप्रथम जातीनिर्मुलनाचा विषय हाती घेतला. जातीव्यवस्थेचे लाभार्थी आणि शोषित अशी ही सरळ लढाई नव्हती. जातीव्यवस्थेकडून नागवले जात असूनही तिचे समर्थन करणारे लोक होते आणि जातीव्यवस्थेचे लाभ मिळत असूनही तिला विरोध करणारे विवेकी लोकही होते. असे गुंतागुंतीचे चित्र पुढे येऊ लागले.
महाडच्या सत्याग्रहातून जातीचा हा मुद्दा आणखी कणखरपणे पुढे आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजशास्त्रीय अंगाने जातीनिर्मुलनाची आवश्यकता प्रभावीपणे मांडीत असत.

अलिबागचे कुलाबा समाचार हे सनातन्यांचे वर्तमानपत्र होते. ते जातीव्यवस्थेचे समर्थक होते. या वर्तमानपत्राने एक खोडसाळ बातमी छापली. पेणच्या पिठ्या महाराला साप चावला असता त्याच्यावर उपचार करणार्‍या मांत्रिकाने म्हणे सांगितले की त्याला चांभार जातीचा साप चावलेला आहे. ते ही सांगोवांगी बातमी भरपूर मिठमसाला लावून छापूनच थांबले नाहीत तर त्यांनी सत्यशोधकांना सवाल केला, " जिथे सापात चांभार आहेत, तिथे माणसातल्या जाती जाणं कसं शक्यय? जी जात नाही ती जात."


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारतातून याचा खरपूस समाचार घेतला. बाबासाहेबांनी दिलेले उत्तर बिनतोड तर होतेच पण आजही ते उद्बोधक आहे. मार्गदर्शक आहे.
त्यांनी कुलाबा समाचारकर्त्यांना काही प्रश्न विचारले.

१. मुळात परळला स्थापन झालेल्या [ पुढे हाफकीन इन्स्टीट्यूट म्हणून नावाजलेल्या ] वैज्ञानिक संस्थेत हे सिद्ध झाले आहे की, सापाचे विष मंत्राने उतरत नाही. त्यासाठी डॉक्टरी इलाज करावे लागतात. तर पिठ्याला डॉक्टरकडे न नेता मांत्रिकाकडे का नेले?

२. मांत्रिकाने अंगात आल्यावर म्हणे पिठ्याच्या अंगात आलेल्या सापाला काही प्रश्न विचारले. "तू कुठे आहेस? तू पिठ्याला का चावलास? सापा, तुझी जात कोणती?"
तर साप म्हणाला की, " मी आता जंगलात फिरतोय. पिठ्याचा मला धक्का लागला म्हणून मी चावलो. मी चांभार जातीचा साप आहे."

जर तो साप ज्यावेळी पिठ्याच्या अंगात आला होता त्याचवेळी तो जंगलातही फिरत होता, याचा अर्थ सापाला दोनदोन आत्मे असतात काय?


३. मुळात सापाला जात विचारण्याचे कारण काय? मांत्रिकाने त्याला जात विचारली यावरून जात मांत्रिकाच्या डोक्यात होती व तोच जातीग्रस्त असल्याचे सिद्ध होते.

४. जाती जर कामावरून आल्या असे जातीव्यवस्थेचे समर्थक सांगतात, म्हणजे लोखंडाचे काम करतो तो लोहार, सोन्याचे काम करणारा सोनार आणि चामड्याचे काम करणारा चांभार. तर सापाला मूळात पायच नसतात. त्यामुळे तो चप्पल, बूट, सॅंडल घालत नाही. मग सापात चांभार कसे काय असतील?

५. याचा अर्थ असाय की सापात चांभार नसतात पण माणसांमध्ये मात्र सापाच्या प्रवृत्तीचे काही लोक असतात. आणि ते सर्व जातींमध्ये असतात. जाती निसर्गाने निर्माण केलेल्या नाहीत. त्या मानवनिर्मित आहेत. जर निर्धार केला तर माणूस जाती घालवू शकतो. जातीनिर्मुलनाची खरी लढाई ही मानसिकतेविरूद्धची लढाई आहे. ती प्रवृत्तीविरूद्धची लढाई असल्याने तिच्याविरूद्ध चिवटपणे चळवळी करीत राहाव्या लागतील. जात जाईल पण त्यासाठी शिक्षण, विज्ञाननिष्ठा, सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा विचार सर्वांनी स्विकारायला हवा. तो आचरणात आणायला हवा. जातीतल्या लग्नांना नकार द्यायला हवा. स्त्रीपुरूष समता, ज्ञानार्जन, संसाधनांचे फेरवाटप, धर्मचिकित्सा यांची कास धरावी लागेल. आपल्याला जातीच्या बहुमतावर चालणारी लोकशाही नको, आपल्याला विचारांचे बहुमत हवेय असा निर्धार करायला हवा."
{ पाहा- डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००८,  [ ब.भा.१६ ऑगष्ट १९२९ ] पृ.३११}

-प्रा.हरी नरके, ६ आक्टोबर २०१८

No comments:

Post a Comment