Wednesday, October 3, 2018

अभिव्यक्ती स्वातंत्र्य व पहिली बाजू आणि दुसरी बाजू

पहिली बाजू- श्रेष्ठ कवी दिनकर मनवरांची वादग्रस्त कविता आणि 'दृश्य नसलेल्या दृश्यात' हा कवितासंग्रह दर्जेदार आहे. हा कवितासंग्रह अभ्यासक्रमात असल्यामुळे समकालीन समृद्ध वाड्मयीन आकलनाला बळ मिळते. सदर कवितासंग्रह अभ्यासक्रमातून काढा, त्यांच्या या कवितासंग्रहावर बंदी घाला अशी मागणी गैर आहे. मनवर यांच्या या संग्रहातली ती एकच ओळ मूळ कवितेतून तोडून काढून त्यावर हल्ला करणं साहित्य संस्कृतीच्या निकोप वाढीला घातक आहे. समाजाच्या भावना दुखावल्या ही तक्रार मला निव्वळ राजकीय वाटते. हे अस्मितांचे राजकारण आपल्याला विनाशाकडे घेऊन जाईल.

मुंबई विद्यापीठाच्या ज्या अभ्यास मंडळाने हे पुस्तक अभ्यासक्रमाला लावले होते त्यांनीच एकमताने निमूटपणे त्यातली ही कविता अभ्यासक्रमातून रद्दही केली.
ही कविता असलेला हा संग्रह विद्यापिठीय पाठ्यपुस्तक म्हणून टीवायबीएच्या अभ्यासक्रमाला लावण्याला श्रमजिवी संघटना आणि आदीवासींच्या अनेक संघटनांनी विरोध केला होता.

दुसरी बाजू- ही कविता वर्गात शिकवणारी प्राध्यापिका एक तरूण आदीवासी स्त्री असेल तर तिला ही कविता वर्गातील १०० युवकयुवतींपुढे वाचून दाखवताना काय वाटेल?
त्या वर्गात असलेल्या कोवळ्या वयाच्या तरूण आदीवासी मुलींना काय वाटेल? त्यांच्या शेजारी वर्गात बसणार्‍या इतर मित्रमैत्रिणींना काय वाटेल? याचा विचार अभ्यास मंडळाने केला होता काय? शेरे-ताशेरेंने भरलेले बुणगे हा विचार कुठून करणार म्हणा?

अगदी शिकणार्‍या, शिकवणारात कोणीही आदीवासी नसले तरी कोणत्याही समाजाच्या स्त्री प्राध्यापकांना ही कविता मोकळेपणाने भर वर्गात वाचता येईल काय? शिकवता येईल काय?
वर्गात त्यांना ही कविता शिकताना, शिकवताना लज्जा वाटणार नाही एव्हढा आपला समाज प्रगल्भ झालाय काय? आपला समाज खुला, निरामय नाही. लिंगभावाची ही निकोपता आपल्यात नसल्याने एखाद्या पुरूष प्राध्यापकाने वर्गात कवितेची ही ओळ वाचताना माझ्याकडे सहेतूक बघितले अशी तक्रार दाखल झाली तर त्या पुरूष प्राध्यापकावर काय बिलामत ओढवेल हेही समजून घ्या.

स्त्री ही कोणत्याही समाजाची असली तरी ती माणूस म्हणून आदरणीयच आहे. इथे कोणत्या समाजाची स्त्री आहे हा मुद्दा महत्वाचा नाही. स्त्री आहे हा मुद्दा महत्वाचा आहे.

या आदीवासी शब्दाच्या जागी समजा मराठा, ब्राह्मण, माळी, बौद्ध किंवा अन्य कोणत्याही समाजाचा उल्लेख असता तरीही शिकवताना अडचण आलीच असती.

टीवायबीएचा वर्ग म्हणजे वयोगट २० वर्षाचा. या तरूण वयात शारिरिक कुतूहल जागृत होऊन मुलंमुली नाजूक स्थितीतून जात असतात. या गोंधळलेल्या वयात भर वर्गात स्त्रीच्या खाजगी अवयवाचा हा उल्लेख करणे मस्ट आहे?

कवीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असायलाच हवे.
लोकशाहीत वयोगट, अभ्यासक्रम, क्लासरूम आणि स्त्रीसुलभभावना हे सारे पुस्तक अभ्यासक्रमाला लावताना विचारात घेतले असते तर अभ्यास मंडळावर ही नामुष्की ऒढवली नसती. ही असली भुरटी आणि बिनकण्याची अभ्यास मंडळे काय कामाची?
-प्रा.हरी नरके, ३ आक्टोबर २०१८

No comments:

Post a Comment