Saturday, August 31, 2019

श्री शरद पवार का रागावले? तिसरा अँगल- प्रा. हरी नरके







काल ते पत्रकार परिषदेत रागावून बोलले. नेते सोडून चालल्याने ते रागावले असावेत, वय झाल्यामुळे चिडले असावेत, आजारपणामुळे त्यांचा तोल गेला असावा, त्या पत्रकाराने त्यांना नातेवाईंकांवरून प्रश्न विचारायला नको होता, अशी चर्चा सध्या होत आहे. मला पवारांसारख्या सराईत आणि मुत्सद्दी राजकारण्याच्या बाबतीत या चर्चा अपुर्‍या वाटतात. श्री शरद पवारसाहेब हे अफाट राजकीय क्षमता असलेले राष्ट्रीय नेते आहेत. त्यांचे वागणे-बोलणे अतिशय मधाळ- सुसंस्कृत असते. त्यांचा अनुभव दांडगा आहे. ते का रागावले असावेत त्याची ही कारणे मला पटत नाहीत. ती वेगळीच असणार असे मला वाटते.

१. वसंत दादांचा शरद पवारांवर पोटच्या मुलासारखा विश्वास होता. पोलीस अधिकार्‍यांनी जेव्हा पवारांच्या काहीतरी संशयास्पद हालचाली चालू आहेत असे मुख्यमंत्री दादांना ब्रिफिंग केले तेव्हा दादा म्हणाले, "शरद आपला माणूस आहे. त्याच्याकडून चुकीचं काही घडणार नाही. माझा त्याच्यावर संपुर्ण विश्वास आहे."  आणि नेमकी त्याच दिवशी पवारांनी दादांची साथ सोडली नी जनता पक्षाच्या ताकदीवर [ज्यात जनसंघही होता] ते मुख्यमंत्री झाले. [ संदर्भ- राम प्रधान, मेटकॉफ हाऊस ते राजभवन ]

२. यशवंतराव चव्हाणांनी आपली सगळी ताकद वापरून पवारांना १९६७ साली आमदारकीचे तिकीट दिले. त्यांनी आपली सगळी प्रतिष्ठा वापरून पवारांना बळ दिले. वाढवले. पण हेच चव्हाणसाहेब जेव्हा काँग्रेसमध्ये परतले तेव्हा पवारसाहेब त्यांच्यासोबत गेले नाहीत. त्यावेळी चव्हाणांना काय वाटले असेल?

३. आजवर पवारांनी काय कमी फोडाफोड्या केल्या? खुद्द धनंजय मुंड्यांना त्यांनी काकापासून फोडले तेव्हा दिवंगत गोपीनाथ मुंड्यांना काय वाटले असेल?

४. १९८० ते ८६ याकाळात श्री पवार विरोधी पक्षात होते. त्यानंतर त्यांनी राजीव गांधींच्या उपस्थितीत सत्ताधारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तेव्हा त्यांना एका पत्रकाराने विचारले " तुम्ही सत्ताधारी पक्षात का गेलात?"
ते म्हणाले, " ५ वर्षांपुर्वी मी ६० आमदार निवडून आणले होते. पाच वर्षांच्या शेवटी आज माझ्यासोबत फक्त चार शिल्लक आहेत. काँग्रेसवाले सत्तेशिवाय राहुच शकत नाहीत. जिकडे सत्ता तिकडे आम्ही. ह्या सोडून गेलेल्यांच्या निष्ठा सेक्युलॅरिझम, फुले-शाहू- आंबेडकर, मराठा पॉवर यावर असतात ह्या निव्वळ अफवा आहेत."

५. सर्व पक्षीय मैत्री हे त्यांचे वैशिष्ट्य. सर्व पर्याय खुले आहेत हे पवारांचे कायमचे राजकारण असते. सगळे पक्ष पवारच चालवतात असेही बोलले जायचे. आपली माणसं प्रत्येक पक्षात मोक्याच्या जागी बसवण्यात ते वाकबगार होते. आज त्यांचा तो करिष्मा संपलेला दिसतो. पवारांचे राजकीय वजन आता कमी झालेले दिसते. पवारांनी स्वत:च्या हाताने आपली विश्वासार्हता संपवलेली आहे. ते जे बोलतात तसे ते वागतील अशी कोणालाही खात्री वाटत नाही. त्यांचे राजकारण साहसवादी होते. आहे. पण मग त्यातून जशी राजकीय न्य़ुशन्स व्हॅल्यू  [उपद्रवमूल्य ] वाढते तशी राजकीय विश्वासार्हता घटते.

६. पाच वर्षांपुर्वी त्यांनी काँग्रेसशी असलेली आघाडी तोडून स्वतंत्रपणे निवडणूका लढवल्या. निवडणूक निकाल येत असतानाच पवारांनी भाजपाला पाठींबा दिला होता. यावरून खुद्द शरद पवारांच्या राजकीय निष्ठा स्पष्ट होतात. गेली ५ वर्षे सत्तेत नसतानाही त्यांचे पहिल्या फळीतले नेते गेली ५ वर्षे  त्यांना सोडून का गेले नाहीत? ते आत्ताच का चाललेत?

पवारांची मोदी-शहांशी राजकीय मैत्री होती. माझ्या पक्षातल्या पहिल्या फळीतल्यांना तुम्ही तुमच्या पक्षात घ्यायचे नाही असे पवारांचे मोदी शहांशी ठरले होते. मोदी-शहानाही राज्यसभेत भाजपाचे बहुमत नसल्याने पवारांची गरज होती. आपण राष्ट्रवादी सोडून गेलो तरी भाजपा आपल्याला घ्यायला तयार नाही, पवार मोदी-शहांच्या सहाय्याने आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवतील ही भिती त्यामागे होती. आता ती राहिली नाही. राजकारणात निष्ठा वगैरे बकवास असते. राजकीय मुल्ये, विकास, लोकहित ह्या फक्त बोलायच्या गोष्टी. सोयीचे-सत्तेचे राजकरण हेच तेव्हढे खरे असते. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच एकमेव सूत्र असते. पवारांनी आपल्या अनुयायांना स्वत:च्या कृतीतून जे शिकवले त्याचाच प्रयोग ते आता पवारांवर करीत आहेत.


७.  कार्यकर्त्यांचा अफाट ताफा त्यांनी संग्रहित केलेला आहे. मतदारांमध्ये - कार्यकर्त्यांमध्ये आजही त्यांना मान आहे. पवारांची राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक जाण अफाट आहे. त्यांचा व्यासंग दांडगा आहे. कितीही नेते सोडून गेले तरी एकटे पवार त्यांचा पक्ष चालवतील, वाढवतीलही अशी क्षमता त्यांच्यात काल होती. आज मात्र ती तशी राहिलेली दिसत नाही. तथापि ती सगळीच संपलीय हे खरे नाही. शेवटी ते शरद पवार आहेत. ते जेव्हा त्यांचे राखीव बाण बाहेर काढतील तेव्हा भल्याभल्यांना पळती भुई थोडी होईल.

८. पहिल्या फळीतले नेते सोडून चाललेत, आपले फोनही घेत नाहीत. त्यांच्याशी जाहीरपणे संपर्क करण्याचा हा मार्ग त्यांनी निवडला असावा.पवार जे काही करतात, ते चुकून किंवा रागात करतात हे खरे नाही. ते विचारपुर्वकच करतात. मागे ते छत्रपती-पेशवे वगैरे बोलले तेव्हा तुम्ही असे चुकून बोलून गेलात काय असे त्यांना विचारले गेले. ते म्हणाले, "मी जे काही बोलतो, करतो ते पुर्ण विचारांती करतो."

पवार प्रचंड रागावलेत आता आपली काही खैर नाही, असा मेसेज सोडून जाणार्‍या नेत्यांना त्यांना द्यायचा होता. तेव्हा रागवण्याचा त्यांचा हा अभिनय हेतुपुर्वक होता. तो किती यशस्वी होतो ते लवकरच कळेल. मात्र रागावण्याची हीही एक राजकीय खेळीच असणार यात मला तरी शंका वाटत नाही.

-प्रा.हरी नरके, ३१ ऑगष्ट २०१९





Monday, August 26, 2019

आंबेडकरी प्रतिभावंताची गौरवगाथेला दाद








आंबेडकरी प्रतिभावंताची गौरवगाथेला दाद- प्रा.हरी नरके

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाची गौरवगाथा" या स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेचे आज ८५ एपिसोड पुर्ण झाले. आजवर जाणते प्रेक्षक आणि सर्व स्तरातील जनतेचे अमाप प्रेम लाभलेल्या या मालिकेला आंबेडकरी प्रतिभावंतानी मनापासून दाद दिलीय. आज या मालिकेत मोठ्या भीमरावांचा [ सागर देशमुख ] प्रवेश होत आहे. तो प्रोमो पाहताना [कडूबाई खरातांचा काळीज चिरणारा आवाज आणि दृश्य परिणाम बघून] छान वाटले असे ते आमच्या एका टिममेंबरला म्हणाले.

आंबेडकरी समाज हा प्रबुद्ध समाज आहे. प्रतिभावंत, बुद्धीवादी, नेते, कलावंत, साहित्यिक यांची संख्या मोठी आहे. भारतातील एकुणच बुद्धीवादी वर्ग टिव्हीवरील मालिकांकडे मनोरंजन म्हणून पाहतो. एकतर काही मालिका खरंच सुमार असतात. शिवाय हा वर्ग आपापल्या मौलिक निर्मितीमध्ये व्यस्त असल्याने त्याला मालिका बघायला वेळही मिळत नाही. जर आपण मालिका पाहिल्या तर बुद्धीवादी जगात आपली प्रतिष्ठा कमी होईल असेही वाटत असेल.

संस्कृतीकरण सिद्धांतानुसार वरच्या वर्गात जाण्याची प्रेरणा असते. त्यामुळे ज्याला सांस्कृतिक क्षेत्रात फारशी प्रतिष्ठा नाही त्यापासून चार हात दूर राहायचे असाच बहुतेकांचा खाक्या असतो. हाच प्रतिष्ठीत वर्ग आजकाल नेटफ्लिक्सची मात्र तोंड फाटेस्तोवर स्तुती करीत असतो.

बुद्धजयंतीला १८ मे २०१९ रोजी आपली "डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाची गौरवगाथा" ही मालिका सुरू झाली. अनेकांनी आम्हाला मौलिक सुचना केल्या. सुधारणा सुचवल्या. आम्ही त्या अमलात आणल्या. पुढेही आणू. आम्ही त्यांचे ऋणी आहोत.

आजवर तमाम प्रबुद्ध जनतेने आणि जाणत्यांनी कोटींच्या संख्येने या मालिकेला भरभरून दाद दिलेली आहे.
टिव्हीवरील कोणतीही मालिका न बघणारे एक आंबेडकरी प्रतिभावंत "डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा" बघून आनंदित झाले आणि त्यांनी आपल्या टिमचे कौतुक केले. ही दाद आमच्यासाठी मोलाची आहे. आमचा हुरूप वाढवणारी आहे.

आपली तमाम मराठी माणसांची अभिरूची अतिशय उच्च दर्जाची असते. त्यामुळे टिकाकारांची गरजच नसते. आपल्या अनेक मित्रांना सामान्य जनतेपासून फटकून राहण्याची सवय लागलेली असते. जे जे लोकप्रिय ते ते टाकाऊ असं काही मानतात. जनता बालीश असते असे ते समजतात. त्यांचे काम तेव्हढे मोलाचे बाकी सब दुय्यम असा पुर्वग्रहही असतो.

सामुहिक शहाणपणाला सार्वभौम मानणारे तथागत बुद्ध आम्हाला प्रेरणापुरूष वाटतात. आधुनिक भारताचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाच्या प्रत्येक घरात पोचावेत हा आमचा ध्यास आहे.

बाबासाहेबांना जाऊन ६३ वर्षे झाली. खाजगी वाहिन्या येऊन २५ वर्षे झालीत. आणि तरिही आजवर कोणत्याही भाषेतील कोणत्याही वाहिनीला ह्या विषयावर मालिका करावीशी वाटली नाही. ज्यांना गौरवगाथा आवडत असेल किंवा नसेल त्यांनी यापेक्षा अधिक धारदार, भव्य आणि अचूक तपशीलांची मालिका अवश्य कराव्यात. आमच्या त्यांना सर्व शुभेच्छा आहेत. ही पहिली मालिका असली तरी ती शेवटची नक्कीच नाही. उलट ती एक सुरूवात ठरावी. शेकडो मालिका, नाटकं आणि चित्रपट या विषयावर यावेत असेच आम्हाला वाटते.
माझ्या कोंबड्याने उगवत नसेल तर सूर्यच उगवता कामा नये ही नकारात्मक मानसिकता समाजाला पुढे नेत नसते असे आम्ही मानतो.

जगभरात जिथेजिथे मराठी माणसं आहेत तिथं तिथं ही मालिका बघितली जाते. आजवर कधीही टिव्ही मालिका न बघणारा मोठा वर्ग आवर्जून ही मालिका बघू लागला. अवघ्या पंच्याऎंशी भागात या मालिकेने टी आर पी चे नवे उच्चांक गाठले. नुकत्याच दाखवण्यात आलेल्या बाबासाहेब-रमाईंचा विवाह ह्या एपिसोडला पाच कोटींपेक्षा अधिक प्रेक्षकांची पसंती लाभली. अर्थातच ही लोकप्रियता, ही कमाई आमची नसून ती बाबासाहेबांची आहे. ही पुण्याई बाबासाहेबांच्या बावन्नकशी जीवनगाथेची आहे. त्यांच्या संघर्षाची आहे. त्यांच्या जीवनातच एवढे नाट्य आहे की ते प्रामाणिकपणे दाखवावे एव्हढीच आमची मर्यादित भुमिका होती. आहे. राहिल. आम्ही केवळ निमित्तमात्र आहोत. यात जे काही चांगले आहे ते बाबासाहेबांचे आहे. उणीवांची जबाबदारी मात्र आमची आहे हे नम्रपणे नमूद करायला हवे.

मालिकेबाबत आम्ही मनमोकळ्या टिकेचे, सुचनांचे, उणीवा, त्रुटी दाखवणारांचे मन:पुर्वक स्वागत करतो.

ही मालिका आहे. हा अनुबोधपट [ डॉक्युमेंटरी ] नाही. मालिकेला अनेक मर्यादा असतात याची आम्हाला नम्र जाणीव आहे. मालिका चारपाच कोटींपर्यत थेट पोचते. चळवळीचे काम मोलाचेच आहे. पण तिच्या पोचण्याला मर्यादा असते. या फिक्शनची, या माध्यमाची ताकद प्रतिगाम्यांना कळली. आम्ही मात्र त्यात मागे राहिलो. आज जीवनाच्या सगळ्या आघाड्यांवर कोण मागे पडलंय आणि कोणाची सरशी होतेय ते दिसतेच आहे.

बाबासाहेबांचे जीवन अथांग आहे. त्याचा तळ सापडणे केवळ अशक्य आहे. तरिही आपल्या पाठींब्यावर गौरवगाथा टिमने हे धाडस केलेले आहे.

तुमचा प्रचंड प्रतिसाद आमचे मनोबल वाढवित आहे. आम्ही आपले कृतज्ञ आहोत.
- प्रा. हरी नरके, २६ ऑगष्ट २०१९

छायाचित्र- टिम गौरवगाथा - डावीकडून उजवीकडे- अभिजित खाडे, शिल्पा कांबळे,  नरेंद्र मुधोळकर, हरी नरके, अपर्णा पाडगावकर, नितिन वैद्य, अक्षय पाटील, निनाद वैद्य, अमित ढेकळे

Sunday, August 18, 2019

आंबेडकरी चळवळीतले महत्वाचे लेखक- शंकरराव खरात,




शंकरराव खरात यांची पुढील वर्षी जन्मशताब्धी सुरू होत आहे. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभलेला होता. ते आंबेडकरी चळवळीतले महत्वाचे लेखक आणि इतिहासकार होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा संपादीत केली. त्यांचे स्वत:चे आत्मकथन "तराळ अंतराळ" खूप गाजले. त्यांनी ललित आणि वैचारिक अशा दोन्ही प्रकारचे मुलभूत लेखन केले.

त्यांचे "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात, अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मांतर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय विचार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार, महाराष्ट्रातील महारांचा इतिहास, हे वैचारिक ग्रंथ संदर्भग्रंथ म्हणून जाणकारांच्या पसंतीस उतरले.

त्यांच्या दहा कादंबर्‍या आणि १३ कथासंग्रह आहेत. याशिवाय इतरही विपुल लेखन त्यांनी केलेले आहे.

११ जुलै १९२१ ला त्यांचा जन्म झाला. वयाच्या ७९ व्या वर्षी ९ एप्रिल २००१ ला त्यांचे निधन झाले. १९८४ ला जळगावला झालेल्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना लाभले होते.  ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते.

ते शासकीय तंत्रनिकेतन, पुणेच्याशेजारी, चतु:शृंगीला राहात. मला त्यांचा जवळून सहवास लाभला. ते अतिशय ऋजु स्वभावाचे होते. आम्ही त्यांचा बालगंधर्वमध्ये राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते सत्कार केला होता.

त्यांची सर्व पुस्तके माझ्या संग्रही आहेत. त्यांच्या स्वाक्षर्‍या लाभलेले त्यांचे बहुतेक सगळे ग्रंथ मला वाचता-अभ्यासता आले याचा आनंद वाटतो.

त्यांचे कथा आणि कादंबरी विश्व पुढीलप्रमणे आहे.
आज इथं तर उद्या तिथं (१९८३, ललितलेखसंग्रह)
आडगावचे पाणी (१९७०, कथासंग्रह]
गावचा टिनपोल गुरुजी (१९७१, कादंबरी)
गाव-शीव (१९७०)
झोपडपट्टी (१९७३, कादंबरी)
टिटवीचा फेरा (१९६३, कथासंग्रह)
तडीपार (१९६१)
दौण्डी (१९६५) (कथासंग्रह)
फूटपाथ नंबर १ (१९८०, कादंबरी)
बारा बलुतेदार (१९५९)
मसालेदार गेस्ट हाऊस (१९७४, कादंबरी)
माझं नाव (१९८७, कादंबरी]
सांगावा (१९६२)
सुटका (१९६४, कथासंग्रह)
हातभट्टी (१९७०, कादंबरी)


-प्रा.हरी नरके, १८ ऑगष्ट २०१९

Friday, August 16, 2019

लोकप्रियता विरूद्ध जाणत्यांची मान्यता








राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायण हे जागतिक साहित्याचे जाणते समीक्षक होते. १९४३ साली त्यांनी केरळ विद्यापीठातून सुवर्णपदक जिंकलेले होते. इंग्रजी साहित्य हा मुख्य विषय घेऊन त्यांनी ही पदवी मिळवली होती. त्यांनी याच विषयात पुढे एम.ए.ही केले होते. भारतीय विदेश सेवेत [आय.एफ.एस.] त्यांनी उच्च पदांवर काम केलेले होते. देशाच्या सर्वोच्च पदावर असलेले नारायणनसर अतिशय नम्र आणि सौजन्यशील व्यक्तीमत्त्व होते.

आम्ही पुण्याचे काही साहित्यिक मित्र त्यांना भेटायला दिल्लीला गेलो होतो. पत्रकार-संपादक श्री अरूण खोरे हे आमच्या गटाचे नेते होते. त्यांची रितसर वेळ घेऊन आम्ही त्यांना भेटलो. आम्हाला त्यांच्या कार्यालयाने भेटीसाठी अवघा ३ मिनिटांचा वेळ दिलेला होता. प्रत्यक्षात मात्र ही भेट ५३ मिनिटे चालली. त्यांना आमच्याशी मराठी साहित्यावर भरभरून बोलायचं होतं. शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजयवर ते फिदा झालेले होते. त्यावर ते कितीतरी वेळ बोलले. मृत्युंजय ही माझी अतिशय आवडती कादंबरी. मराठीतली सर्वोच्च लोकप्रियता मिळालेल्या या कलाकृतीला नुकताच ज्ञानपीठ समकक्ष असलेला मुर्तीदेवी पुरस्कार त्यांच्या हस्ते देण्यात आलेला होता. त्यानिमित्ताने त्यांनी मृत्युंजय [इंग्रजी भाषांतर] वाचलेली होती.

या कादंबरीकडे मराठी समिक्षकांनी पाठ का फिरवली या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आमच्याकडे नव्हते. ही कादंबरी १९६० च्या दशकात का गाजली यावर आम्ही बोललो. महाराष्ट्रात कुठेही जा तुम्हाला ही कादंबरी आवडलेले लोक भेटतील. पण जाणत्या समिक्षकांनी मात्र तिला नाकं मुरडली.

पुढे ते मराठी कवितेकडे वळले. ते म्हणाले, "बाबुराव बागूल हे माझे सर्वाधिक आवडते कवी आहेत. त्यांच्या अलिकडच्या कविता मला सांगा."

आमच्यातले एक साहित्यिक पटकन म्हणाले, "बागूल कवी नव्हेत. ते तर कथाकार आहेत."
तेव्हा नारायणनसर म्हणाले, " काय सांगताय? बाबुराव बागूल कवी नाहीत? मग ’वेदाआधी तू होतास’ ही कविता कोणाची आहे?"

"ती कविता बाबुराव बागूलांचीच आहे," मी उत्तरलो.

तेव्हा सर म्हणाले, " मग ते कवी नाहीत असे ह्यांनी का म्हटले?" त्यावर आमचा हा साहित्यिक मित्र निरूत्तर झाला.

नारायणन म्हणाले, "कवितांच्या संख्येवरून गुणवत्ता ठरत नाही. भले एकच कविता असेल पण ती जर श्रेष्ठ असेल तरी तो महान कवी आहे असे मी मानतो."


क्रमश:[१]

प्रा.हरी नरके, १६ ऑगष्ट २०१९

Tuesday, August 13, 2019

’रणांगण’ बरी लिहिलीय असं कोणीच म्हणालं नाही- विश्राम बेडेकर







’रणांगण’ बरी लिहिलीय असं कोणीच म्हणालं नाही- विश्राम बेडेकर -प्रा.हरी नरके

विश्राम बेडेकर अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा मी पुणे विद्यापीठात मराठी विभागात एम.ए.करीत होतो. त्यांचा त्यानिमित्त विभागातर्फे सत्कार करावा आणि त्यांचे भाषण ठेवावे असे आम्ही ठरवले. विभागप्रमुखांची रितसर परवानगी घेऊन मी बेडेकरांना त्यांच्या घरी जाऊन भेटलो. कार्यक्रम निश्चित केला.
ते आले. सत्कार घेतला,पण म्हणाले, " मी भाषण करीत नाही. आपण गप्पा मारू."
मग मी त्यांची प्रकट मुलाखत घेतली.

प्रश्न- तुम्ही रणांगणसारखी श्रेष्ठ कादंबरी लिहिलीत. आणि पुढे मात्र २०-२५ वर्षे काहीच लिहिले नाही, हे कसे?

उत्तर- मी रणांगण लिहिल्यानंतर पहिली २०-२५ वर्षे ती बरी आहे असं मला कोणीही सांगितलं नाही. म्हणून मग पु्ढे मी काहीही लिहिलं नाही. २५ वर्षांनी एक समीक्षक  म्हणाले,"तुम्ही बरं लिहिलंय, मग मी पुन्हा लिहू लागलो."

प्रश्न- "तुमच्या आत्मचरित्रात { एक झाड आणि दोन पक्षी} सगळा भवताल चित्रशैलीत येतो. पण १९४२ चे आंदोलन, स्वातंत्र्य चळवळ याबद्दल तुम्ही फारसे काही लिहित नाही, असे का?"

उत्तर-" आम्ही भित्रे मध्यमवर्गीय लोक. घराची दारं-खिडक्या लावून बसलेलो होतो त्यावेळी. मी काही बघितलेच नाही मग कसे लिहिणार १९४२ चे आंदोलन, स्वातंत्र्य चळवळ याबद्दल?"
[ बेडेकरांनी "भित्रे" या शब्दाऎवजी अतिशय कडक शब्द वापरला होता. स्वत:बद्दल इतके प्रांजळ, पारदर्शक बोलायला लागणारे धाडस त्यांच्याकडे होते.]

बेडेकरांची रणांगण पहिली २०-२५ वर्षे का गाजली नाही? तर दुसर्‍या महायुद्धात जखमी झालेल्या सैनिकांसाठी लोखंडी खाटा पुरवणार्‍या एका साहित्यप्रेमी कंत्राटदाराने पहिल्या आवृत्तीच्या सर्व प्रती खरेदी केल्या. प्रत्येक खाटेमागे जखमी सैनिकांना वाचायला एक प्रत भेट म्हणुन मिल्ट्री हॉस्पीटलला दिल्या. फार कमी प्रती चोखंदळ वाचक समीक्षक यांच्या हाती पडल्या. परिणामी पहिली २०-२५ वर्षे पुस्तक जाणकारांपर्यंत पोचलेच नाही.

[मुलाखतीमधून]

- प्रा.हरी नरके, १३ ऑगष्ट २०१९

Wednesday, August 7, 2019

कॉम्रेड सुबोध मोरे साहबकोही गुस्सा क्यों आया?







कॉम्रेड सुबोध मोरे साहबकोही गुस्सा क्यों आया? - प्रा.हरी नरके

१. माझे परममित्र श्रीयुत सुबोध मोरेसाहेब यांनी माझ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्यावरील फेबु पोस्टचे खंडन करणारा प्रदीर्घ लेख लिहीलेला आहे. त्यात त्यांनी माझ्यावर भरमसाठ आरोप केलेले आहेत. व्यक्तीगत पातळीवरची टिका केलेली आहे. मलाही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देता येईल. मात्र मी तसे करणार नाही. श्री मोरे हे कम्युनिस्ट चळवळीतले पिढीजात कार्यकर्ते आहेत. त्यांच्याविषयी मला नितांत आदर आहे.

२. कॉ. मोरे, मला एक कळले नाही की माझ्या लेखावर तुम्ही का भडकलाय? मी माझ्या लेखात अण्णा भाऊंच्या उपेक्षेला तुम्हाला जबाबदार धरलेले नव्हते. माझ्यासकट आपण सारेच समाज म्हणून त्यासाठी जबाबदार आहोत हा माझा मुद्दा असताना तुम्हालाच मिरची का झोंबली? आमची तुमच्यापेक्षा वेगळी मतं असू शकतात मालक.

कॉम्रेड अण्णा भाऊ साठे, कॉ. अमर शेख, कॉ. गव्हाणकर, कॉ. गोविंद पानसरे, कॉ. बाबूराव बागूल, कॉ. एस. के. लिमये, कॉ. भास्करराव जाधव, कॉ. भाऊ फाटक, कॉ. तुळपुळे, कॉ. ज्योती बसू, कॉ. मोहित सेन, कॉ. सोमनाथ चटर्जी, कॉ. भालचंद्र कांगो, कॉ. अजित अभ्यंकर, कॉ. मिलिंद रानडे, कॉ. मुक्ता मनोहर यांच्यासारख्या त्यागी, तपस्वी आणि राष्ट्रनिष्ठ डाव्यांबद्दल मला खूप आदर आणि जिव्हाळा वाटतो.  श्रमिक, कामगार, कष्टकर्‍यांच्या चळवळीला प्रागतिक डाव्यांचे मौलिक योगदान आहे.

३. कॉ. मोरे, उजव्यांना मनुची तर सनातनी डाव्यांना दाखवायला मार्क्सची नी मनातून मनूची पोथी हवी असते. पोथी महत्वाची. फुले-आंबेडकरी चळवळीच्या द्वेशावर जगणारे हे वतनदार.  हे चमको आणि सनातनी डावे म्हणजे निव्वळ अहंकारी, माणूसघाणे आणि पोथीनिष्ठ असतात असा माझा अनुभव आहे. केवळ वर्गिय पोपटपंची करणार्‍या या महाभागांना लिंगभाव आणि जातीच्या प्रश्नाबद्दल आकस असतो.

४. कॉ. मोरे, चर्चा, वादविवाद, असहमती, वादग्रस्त मुद्दे यावर तुमचा विश्वास नाही काय? तुमच्या एकेरी दृष्टीला सत्य हे एकांगीच दिसते काय? तुम्ही म्हणाल तेव्हढेच सत्य आणि सत्याचा कॉपीराईट फक्त तुमच्याकडे आहे काय? कॉ. मोरेसाहेब, एखाद्या गोष्टीला दोन किंवा अधिक बाजू असू शकतात यावर तुमचा नसला तरी माझा विश्वास आहे.

५. कॉ. मोरे, एकदा राशोमन [अकिरा कुरोसावा] हा चित्रपट बघा.

६. कॉ. मोरे, अण्णा भाऊंचा जेव्हढा सन्मान व्हायला हवा होता, तेव्हढा तो झाला नाही ही माझी खंत आहे. ती आजवर अनेक मान्यवरांनी मांडलेली आहे. अगदी कम्युनिस्ट पक्षाचे हायकमांड असलेल्या कॉ. श्रीपाद अमृत डांग्यांनीही ती मांडलेली आहे. तेव्हा मी तसं म्हटलं की लगेच मी अण्णा भाऊंचा अपमान करतोय, त्यांची बदनामी करतोय हा कांगावा कशाला करताय तुम्ही?

७. कॉ. मोरे, दुसर्‍यांच्या प्रसिद्धी, लोकप्रियता आणि विश्वसनियतेवर आयुष्यभर जळणारे तुमच्यासारखे चमको आणि निव्वळ पढीक बरनॉलमॅन लोकांच्या मनातून का उतरले?
रशियात किंवा चीनमध्ये पाऊस पडला की मुंबईत छत्री उघडून चालणारे तुम्ही लाल छत्रीवाले.
प्रश्न विचारणारांना तुम्ही चळवळीचे थेट शत्रू ठरवून मोकळे होता. जे तुमच्यासोबत नाहीत ते तुमचे शत्रू इतके सोपे गणित असते तुमचे.

आमच्या मुद्द्यांची आणि अडचणीच्या प्रश्नांची सप्रमाण उत्तरं देता येत नाहीत म्हणून थयथयाट करणारे तुमच्यासारखे चमको कॉम्रेड आणि उजवे एकाच माळेचे मणी होत.

८. कॉम्रेडसाहेब, अण्णा भाऊ साठे यांची उपेक्षा झाली असे मी म्हटले तर मी अण्णा भाऊंची बदनामी करतोय असा तुम्ही माझ्यावर पुन्हापुन्हा आरोप केलेला आहे. पण तुम्हीही तेच म्हणताय. फरक एव्हढाच आहे की कम्युनिस्ट सोडून उरलेल्या भारतीयांनी अण्णा भाऊंची उपेक्षा केली असे तुम्हाला वाटतेय. याचा अर्थ तुम्हाला अण्णा भाऊंशी देणंघेणं नाही. तुम्हाला फक्त कम्युनिस्टांच्या आरत्या गाण्यात आणि त्यांचं मार्केटिंग करण्यात रस आहे. शहीद कॉ. गोविंद पानसरे अण्णांनी अण्णा भाऊंच्या नावे साहित्य संमेलनं घेतली. कारण त्यांना ते स्वत:चं कर्तव्य वाटत होतं आणि पक्षाने अण्णा भाऊंची उपेक्षा केल्याचं त्यांना दु:ख होतं.

९. कॉ. मोरे, आधल्या दिवशी टॅक्सीत बेशुद्ध अवस्थेत तुम्ही अण्णा भाऊंना पाहिलेत व टॅक्सीवाल्याच्या मदतीने त्यांना तुम्हीच त्यांच्या घरी सोडलेत असा दावा तुम्ही केलाय. म्हणे टॅक्शीवाला मला विचारत आला. अख्ख्या मुंबईत टॅक्शीवाल्याला तुम्हीच सापडला असणार! दुसर्‍या दिवशी सकाळी अण्णा भाऊ वारले. बेशुद्ध माणसाला दवाखान्यात नेण्याऎवजी तुम्ही घरी सोडून पळून गेलात? निदान पक्ष नेत्यांच्या/कार्यकर्त्यांच्या कानावर ही बाब घालून त्यांच्याकरवी अण्णा भाऊंना दवाखान्यात नेण्याची व्यवस्था करायला हरकत नव्हती. साडेदहा वर्षाच्या लहान वयात आजारी माणसाला दवाखान्यात न्यायचे असते हे तुम्हाला नक्कीच समजत असणार! तुम्ही त्यांना घरी सोडल्यानंतर १५ ते १६ तासांनी ते वारले. मग याकाळात तुमच्या पार्टीच्या एकालाही त्यांना दवाखान्यात न्यावे असे का वाटले नाही?

१०. कॉ. मोरे, अण्णा भाऊंना ४९ व्या वर्षी प्रदीर्घ आजारपणाने अकाली मृत्य़ू आला. त्यांना जर चांगल्या दवाखान्यात उपचार मिळते तर ते वाचले असते. कर्तव्यदक्ष कम्युनिस्ट पक्षाने त्यांना उपचारांसाठी, औषदपाण्यासाठी पैसे का दिले नाहीत? त्यांना उपचारासाठी रशियाला का पाठवले नाही?

११. कॉ. सुबोध, अण्णा भाऊंचे [यकृत] लिव्हर खराब झाल्याने ते वारले असा दावा तुम्ही केलाय. म्हणजे अण्णा भाऊ दारूडे होते म्हणून त्यांचे लिव्हर खराब झाले असे सांगून तुम्हीच त्यांची बदनामी करताय.

१२ कॉ. मोरे, अण्णा भाऊंना सरकारच्या वृद्ध कलावंत सहाय्यता निधीवर जगावे लागत होते. [ जे मंत्रालयातून घेऊन ते आधल्याच दिवशी आले होते असे तुम्हीच सांगताय] त्यांना सरकारी कोट्यातून घर मिळेपर्यंत झोपडपड्डीत राहावे लागले होते. त्यांच्या पत्नीला व मुलीला मजूरी करावी लागत होती. आणि तरिही अण्णा भाऊ हलाखीत जगत नव्हते तर त्यांचे जगणे अगदी चैनीत चालू होते असे तुम्ही सांगताय. तुमचा पक्ष त्यांच्यासाठी जर जागृत होता तर पक्षाने त्यांना सरकारच्या मदतीवर जगण्याची पाळी का येऊ दिली होती? पक्षाने अण्णा भाऊंच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था का केली नाही? तुमच्या पक्षाचे श्रेष्ठी [हायकमांड] असलेले उच्चभ्रू नेते काय अण्णा भाऊंसारखे झोपडपट्टीत राहात होते? त्यांनाही सरकारकडून  घर घ्यावे लागले होते काय? मग पक्षाच्या या श्रीमंत नेत्यांनी अण्णा भाऊंना राहायला घर का दिले नाही?

१३. कॉ. मोरे, ज्या अण्णा भाऊंच्या कार्यक्रमांना लाखो लोक जमत असत, त्यांच्या अंत्ययात्रेला अवघे २५० ते ३०० लोक होते असे तुम्ही सांगताय आणि पक्षाने त्यांचा महान सन्मान केल्याचा दावाही करताय, हा प्रकार संतापजनक नाही?

अहो कॉम्रेड, एखाद्या सामान्य माणसाच्याही मैतीला एक -दोन हजार लोक सहज जमतात. तिथे अण्णा भाऊंसारख्या जगप्रसिद्ध कलावंत, लोकशाहीर, साहित्यरत्न असलेल्या महान लेखकाच्या अंत्ययात्रेला लाखो लोक का नव्हते हा माझा प्रश्न आहे.

१४. कॉ. मोरे, सामान्य लोक अण्णा भाऊंना प्रेमाने खाऊ घालत होते अशी माहिती तुम्ही देताय. अण्णा भाऊंसारख्या बुद्धीवंताला लोकांच्या घरी जाऊन जेवावे लागणे यात त्यांचा आत्मसन्मान दुखावला जातोय हे तुमच्या आजही लक्षात येत नाही कारण तुमचा अण्णा भाऊंच्या सुखदु:खाशी काडीमात्र संबंध नव्हता.

१५. कॉ. मोरे, अण्णा भाऊंच्या अंत्ययात्रेला हजर असलेल्या ज्या पंचवीस लोकांची तुम्ही नावे दिलीत त्यातल्याच तिघांनी मला सांगितले की खूप कमी लोक अंत्ययात्रेला होते.
परवा पुण्यात बाल गंधर्व नाटयमंदिरात बोलताना प्रसिद्ध विचारवंत आणि अण्णा भाऊ साठे निवडक वाड्मयाचे संपादक अर्जून डांगळे जाहीरपणे म्हणाले, "अण्णा भाऊंच्या अंत्ययात्रेला मी हजर होतो. त्याठिकाणी ५० ते ६० लोक होते." या भाषणाचे व्हिडीओ रेकॉर्डींग माझ्याकडे आहे. तुम्ही तोच आकडा सराईतपणे पाचपट वाढवून २५० ते ३०० करताय. तुम्ही अर्जून डांगळे यांच्यासह अन्य उपस्थित मान्यवरांना खोटे का ठरवताय?

१६. कॉ. मोरे, कम्युनिस्ट पक्षाने, ज्येष्ठ नेते कॉम्रेड डांगे यांनी अण्णा भाऊंच्या 'शाहीर' पुस्तकाला प्रस्तावना लिहून त्यांचा गौरव केला असे तुम्ही म्हणताय. ती प्रस्तावना अण्णा भाऊ साठे निवडक वाड्मयात छापलेली आहे. [पृ.११३९ ते ११४६] त्यात कॉ. डांगे यांनी अण्णा भाऊंचा अगदी हात राखून गौरव केलाय. अण्णा भाऊंच्या लेखनावर त्यांनी प्रस्तावनेत टिका करून औचित्यभंगही केलेला आहे.

कॉ. डांगे म्हणतात, "अण्णा भाऊंचे लेखन प्रचारकी आहे." "अण्णा भाऊंच्या काव्यात न्यूनता दिसते." "अण्णा भाऊंना इतिहासाची माहिती असल्याचे दिसत नाही." हा गौरव आहे की नालस्ती?

१७. अण्णा भाऊंसाठी पक्षाने यांव केले नी त्यांव केले याची भली मोठी यादी कॉ. मोरे यांनी दिलेली आहे. पक्षाने त्यांच्यावर औषदोपचार का केले नाहीत हा अण्णा भाऊ प्रेमींचा सवाल आहे? एव्हढ्या मोठ्या प्रतिभावंताची कदर करण्याची दानत डाव्या, उजव्यात, बुद्धीवंतात आणि बहुजनात कोणातच नव्हती हेच माझे दु:ख आहे.

१८. त्यांच्या कथेवर चित्रपट तयार झाला आणि तो बघायला मात्र अण्णा भाऊंना आपल्या बायकोला स्वत: तिकीट काढून पाठवावे लागले असे कॉ. मोरे लिहितात. खुद्द लेखकाला थिएटरचा पास [सन्मानिका ] का मिळाला नाही? लेखकाला तिकीट काढावे लागणे हा त्यांचा गौरव आहे की अपमान?

१९ . अण्णा भाऊ साठे यांचे नाव कॉ. मोरे अनेकदा "अण्णाभाऊ" साठे असे एकत्र लिहितात. त्यांचे नाव तुकाराम उर्फ अण्णा असे होते. भाऊ हे त्यांच्या वडीलांचे नाव होते. तेव्हा अण्णा भाऊंचे नाव नीट लिहिता यावे यासाठी कॉ. मोरे यांनी त्यांचे चरित्र वाचावे. अण्णा भाऊंची पुस्तके चाळावीत ही विनंती.

२०. असे मुद्दे तर अनेक आहेत. तुर्तास एव्हढेच.

-प्रा.हरी नरके, ७ ऑगष्ट २०१९

Sunday, August 4, 2019

गौरवगाथा मालिकेद्वारे राष्ट्रीय कार्य -


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारलेली प्रदीर्घ अशी दूरदर्शन मालिका बनवून व प्रसारित करून 'स्टार प्रवाह' ही वाहिनी एक महत्त्वपूर्ण असे राष्ट्रीय कार्य निभावत आहे, असे माझे मत आहे. प्रस्थापित विषमतावादी व्यवस्थेने माणसातील 'माणूस' मारून टाकला होता. माणसाकडे माणूस म्हणून बघण्याची दृष्टीच हरवून गेली होती. त्यामुळे बाबासाहेबांचा जिवंतपणी आणि महापरिनिर्वाणानंतरही प्रचंड मोठा द्वेष केला गेला.

हा द्वेष अज्ञानापोटी आणि एका रोगट मानसिकतेतून केला जात होता. 'स्टार प्रवाह' ही वाहिनी सध्या बाबासाहेबांवरील जी मालिका प्रसारित करत आहे, ती मालिका जो कोणी नियमितपणे बघेल त्याच्यातला 'माणूस' नक्कीच जागा होईल. बाबासाहेब हा त्याच्या जीवनाचा आदर्श बनेल. 'स्टार प्रवाह'ने बनवलेली ही मालिका अत्यंत जिवंत आणि प्रत्ययकारी बनलेली आहे. यामधील प्रत्येक कलावंताने आपली भूमिका उत्तम रीत्या साकार केली आहे.

त्यातही बाबासाहेबांच्या आत्याची भूमिका ज्या अभिनेत्रीने साकार केलेली आहे, ती तर फारच उत्तम झालेली आहे.बाबासाहेबांची वेगवेगळ्या वयातली चार रूपं या मालिकेत दाखवलेली दिसतात. बाबासाहेबांचे बाल रूप, किशोर वयातील रूप, तरुणपणातील रूप आणि प्रौढपणातील रूप ही सारीच रूपं त्या-त्या कलावंतांनी जीव ओतून साकार केलेली दिसतात.

त्यातही बाल भिवाचे रूप मनाला फार भावलं. किशोर वयात विहिरीचे पाणी पिले म्हणून मारहाण करणाऱ्या लोकांवर भिवाने उगारलेला धोंडा फार महत्त्वाचा वाटला. संवाद अत्यंत सुंदर आहेत. त्याला संगीताचीही उत्तम साथ मिळाली आहे.

बाबासाहेबांचा बाळा दादा हा भाऊ बँड वाजावण्याची नोकरी करण्यासाठी गेला आणि परत आलाच नाही. त्याबद्दल मालिका काहीच बोलत नाही. आनंदाचं लग्न झालं, पण बाळादादाचं लग्न झालं का? तो घरी परत कधीच का येत नाही?

बाबासाहेबांच्या चरित्रातील त्यांचे कर्तृत्व सिद्ध होऊ लागल्या नंतरच्या गोष्टी बहुतांश जणांना माहीत असतात; परंतु त्यांचे बालपण, तरुणपण, त्यांचे बालपणातील व तरुणपणातील सवंगडी, त्यांच्या बहिणी, त्यांची नंतरही आई, त्यांचे मुंबईतले शिक्षक,यांच्याबद्दल लोकांना फारशी माहिती नसते.

बाबासाहेबांच्या व्यक्तिगत जीवनातील अत्यंत महत्त्वाची माहिती, त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग आपल्या वहिनीने जिवंत केले आहेत. आपल्या वाहिनीवरील ही मालिका एका राष्ट्र जाणिवेची आणि संवैधानिक मूल्यांची पेरणी करत आहे. ही पेरणी करत असल्याबद्दल मी 'स्टार प्रवाह' या वाहिनीचे अभिनंदन करतो आणि आभारही व्यक्त करतो.

मी ही मालिका रोज नियमीतपणे पाहतो. सर्वांनीच बघावी अशी ही उत्तम दर्जाची दूरदर्शन मालिका आहे.
by Prof. Anant Raut- प्रा.अनंत राऊत [ प्रख्यात लेखक-नांदेड ] डॉ. अनंत राऊत
प्रमुख, मराठी विभाग पीपल्स कॉलेज नांदेड.
अध्यक्ष,
युवा प्रबोधन मंच प्रणित संविधान जागरण समिती
भ्र. ध्व - 98 60 52 55 88
ई मेल पत्ता - anantraut65@gmail.com