Thursday, May 7, 2020

गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर - एक सहप्रवास : प्रा. हरी नरके








गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर - एक सहप्रवास : प्रा. हरी नरके

१* १९०८ जाने. - भीमरावांचा मॅट्रीक परीक्षा पास झाल्याबद्दल सत्कार झाला. त्यावेळी कृ. अ. केळुसकर [ कुणबी ] लिखित बुद्ध चरित्र भीमरावांना भेट मिळाले.
हे पुस्तक वाचून आपण बुद्धाकडे वळलो. प्रेरित आणि प्रभावित झालो असे बाबासाहेब " बुद्ध आणि त्यांचा धम्म" च्या प्रस्तावनेत म्हणतात. " I read this book with great interest and was greatly impressed and mooved by it.
२* २७ मे १९२४ बार्शी- नामांतर की धर्मांतर या विषयावर बाबासाहेबांचे भाषण.
३* १३ सप्टें. १९३३- बाबासाहेब लंडनवरून सुभेदार विश्राम गंगाराम सुभेदार यांना पत्र लिहितात. त्यात ते म्हणतात, " माझा कल बुद्धधर्माकडे आहे."
४* १९३४, दादर, मुंबई, बाबासाहेबांनी बांधलेल्या बंगल्याला राजगृह हे बौद्ध नाव दिले.
५* १३ ऑक्टोबर १९३५ - येवला परिषद. बाबासाहेबांची घोषणा, " मी जरी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही."


६* १२/१३ जाने. १९३६- पुणे, अहिल्याश्रम- धर्मांतराचा विचार करण्यासाठी परिषदेचे आयोजन
७* ३०, ३१ मे व १जून जाने. १९३६- मुंबई, दादर, धर्मांतराचा विचार करण्यासाठी परिषदेचे आयोजन
८* २४ सप्टें. १९४४ - मद्रास येथे रॅशनॅलिस्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या सभेत ब्रिटीश सरकारमधील केंद्रीय मंत्री म्हणून बोलताना ते म्हणाले, "बौद्ध धर्म व ब्राह्मणी धर्म " यात बुद्धीवादी बौद्ध धर्मच श्रेष्ठ आहे."
९* ८ जुलै १९४५, मुंबई, पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून तिला " प्रज्ञा, शील, करूणा " हे ब्रिदवाक्य दिले.

१०* २० जून १९४६-  सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना करून बुद्ध भवन व आनंदभवन अशी सभागृहाची नामकरणे केली.
११* २ मे १९५०- दिल्लीतील बुद्ध जयंती समारंभामध्ये बाबासाहेबांचे भाषण, " बुद्धधर्म हा नीतिधर्म आहे."
१२* ५ मे १९५० मुंबई, जनता पत्राला मुलाखत देताना बाबासाहेब म्हणाले, "आपण बौद्ध धर्म स्विकारणार आहोत."

१३* २६ मे १९५० - कॅण्डी, येथे पत्रकार परिषदेत आपण बौद्ध समारंभ व विधींचा अभ्यास करण्यासाठी येथे आल्याचा उल्लेख केला. जागतिक बौद्ध धम्म परिषदेत बाबासाहेबांचे भाषण.
१४* मे १९५०- महाबोधी सोसायटीच्या बुद्ध जयंती विशेषांकात बाबासाहेबांनी लेख लिहून बुद्ध धम्माचे भवितव्य उज्वल असल्याचे नमूद केले.
१५* ६ जून १९५०, कोलंबो, श्रीलंका, जागतिक प्रतिनिधींसमोर बाबासाहेबांचे " भारतातील बुद्ध धम्माचा उदय आणि र्‍हास" यावर भाषण

१६* जुलै १९५१, बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध संघाची स्थापना केली. " बौद्ध उपासना पाठ" ही पुस्तिका प्रकाशित केली.
१७* नोव्हेंबर १९५१, "बुद्ध आणि त्यांचा धम्म" च्या लेखनाला प्रारंभ केला. फेब्रुवारी १९५६ ला पुर्ण करून त्याच्या ८० प्रती विद्वानांना अभिप्रायार्थ पाठवल्या.

१८* १६ मे १९५४, बाबासाहेब रंगून, ब्रह्मदेशातील बुद्ध जयंती समारंभाला उपस्थित.
१९* २८ ऑक्टोबर १९५४ - मुंबई पुरंदरे स्टेडीयम, जाहीर सभेत बाबासाहेब म्हणाले, "बुद्ध, कबीर व महात्मा फुले हे आपले तीन गुरू आहेत."

२०* १९५४, बाबासाहेबांनी "दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडीया" ची स्थापना केली. ४ मे १९५५ ला धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केली.

२१* २५ डिसेंबर १९५४, देहूरोड, बुद्ध मुर्तीची बाबासाहेबांच्या हस्ते विहारात स्थापना.
२२* १९५५, जनता पेपरचे " प्रबुद्ध भारत" असे नामकरण केले.

२३* १४ ऑक्टोबर १९५६, नागपूरला बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्विकारला. लाखो अनुयायांना धम्म दिक्षा दिली.
२४* २० नोव्हेंबर १९५६, नेपाळ, काठमांडूला बाबासाहेबांचे जागतिक बौध्द परिषदेत भाषण.
२५* २५ नोव्हेंबर १९५६, सारनाथ, जिथे भगवान बुद्धांनी धम्म चक्र परिवर्तन सुत्त कथन केले तिथे बसून बाबासाहेबांचे आयुष्यातील शेवटचे भाषण, "चलो बुद्ध की ओर" ची जगाला हाक दिली.

-प्रा. हरी नरके, बौद्ध पौर्णिमा, ०७/०५/२०२०
.................................................

Wednesday, May 6, 2020

रा.स्व.संघ २२/ " ब्राह्मण म्हणून मुलाहिजा केला जाणार नाही" : शिवाजी महाराज








शिवाजी महाराज म्हणतात, " ब्राह्मण म्हणून मुलाहिजा केला जाणार नाही" : प्रा.हरी नरके
"जो कोणी धर्मवेडेपणा आणि धर्मद्वेश बाळगतो तो ईश्वरी आज्ञेच्या विरूद्ध वागतो." छ. शिवराय

संघवाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना रेशीमबागेच्या रंगात पुरते बुडवून टाकलेले आहे. त्यांचे पार ब्राह्मणीकरण करून टाकलेले आहे. ही महाराजांची बदनमी आहे. महाराज जर गोब्राह्मण प्रतिपालक होते तर त्यांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या अफजलखानाच्या ब्राह्मण वकीलाची हत्त्या कशी केली? महाराज जर गोब्राह्मण प्रतिपालक होते तर जिवाजी विनायक सुभेदार या ब्राह्मण कारकुनाला गद्दारीबद्दल महाराजांनी शिक्षा कशी केली? ब्राहमण म्हणून कोणतीही गय केली जाणार नाही, सवलत मिळणार नाही असे त्याला ठणकावणारे महाराजांचे हे अस्सल पत्र संघवाले का दडवून ठेवतात?

ब्राह्मणाची गय केली जाणार नाही-

पत्र १८ जानेवारी १६७५ चे आहे. अतिशय जळजळीत आणि कठोर आहे. महाराज या ब्राह्मण कारकुनाला नादान म्हणतात. "गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी राजे" या ब्राह्मणाला "हरामखोर" अशी चक्क शिवी देतात. लाचखोरही म्हणतात. तुमच्यासारख्या लाच खाणारांना "ठिकेठाक" केले जाईल असा सज्जड दम भरतात. महाराज या पत्रात म्हणतात, " ऎशा चाकरास ठीकेठाक केले पाहिजेत. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो?.. याउपरी बोभाटा आलिया तुमचा मुलाहिजा करणार नाही. गनिमाचे चाकर गनीम जालेस, ऎसे जाणून बरा नतिजा तुम्हास पावेल. ताकीद असे." महाराज जर गोब्राहमण प्रतिपालक असते तर म्हणाले असते, " ब्राहमणदेवता, आपण शत्रूचे पैसे खाल्लेत, आमच्याशी गद्दारी केलीत, हरकत नाही, आम्ही आपले धर्माचे चाकर आहोत. आपण आमचे मालक. तेव्हा आपले उत्तम चालूय. असेच पुढे चालू द्या."

ब्राह्मण असलात तरी गर्दन मारली जाईल- 

पण महाराज तर या ब्राह्मणाला चक्क धमकी देतात. बघून घेऊ म्हणतात. ब्राह्मणाला आपला चाकरही म्हणतात, हे कसे काय? बरे इथे ठीकेठाक केले जाईल म्हणजे गर्दन मारली जाईल असे महाराज सांगताहेत! धर्मशास्त्रानुसार ब्रह्महत्त्या वर्ज्य असतानाही महाराज चक्क ब्रह्महत्त्येची धमकी कशी काय देतात? त्याकाळातले काही ब्राह्मण लाचखोर होते, स्वराज्याशी गद्दारी करणारे होते याचे हे पत्र हा खणखणीत पुरावाच आहे. म्हणून तर दडवादडवी चाललेली नाही ना?

एक श्लेष काढायचा तर असे म्हणता येईल की समाजात तोवर ब्राह्मणांना विशेषाधिकार असल्याने ब्राह्मणांच्या लाचखोरीकडे, गद्दारीकडे कानाडोळा केला जात असेल. तसा मुलाहिजा [तशी सवलत ] यापुढे बंद करण्यात आलेली आहे असे महाराज या पत्रांद्वारे सुनावताहेत. मग महाराज जर गोब्राह्मण प्रतिपालक होते तर त्यांनी ब्राह्मणांची ही पुर्वापार चालत आलेली ही सवलत तडकाफडकी बंद कशी काय केली बुवा? दया, कुछ तो गडबड है!

" धर्मवेडेपणा आणि धर्मद्वेश बाळगणे म्हणजे ईश्वरी आज्ञेचा भंग करणे होय." - छ. शिवराय 

कुठलाच उपलब्ध दस्तऎवज अशा निष्कर्षास येत नाही की शिवाजी राजांचा संघर्ष धर्मासाठी होता असे ते मानत होते. 




"हिंदवी स्वराज्य"वाली पत्रे बनावट-

महान इतिहासकार द. वि. आपटे, त्र्यं. शं. शेजवलकर आणि ग. ह. खरे यांच्या मते, ज्या पत्रांमध्ये "हिंदवी स्वराज्य" हे शिवाजीराजांचे ध्येय होते असे म्हटलेले आहे ती पत्रे विश्वासार्ह नाहीत. [ पगडी, २६] याचाच अर्थ ती पत्रे बनावट आहेत.

राज्य आणि स्वराज्य या शब्दांचे जे अर्थ आज घेतले जातात, त्याकाळात ते शब्द खूप संकुचित अर्थाने वापरले जात असत. १७ जुलै १६५७ ला चाकणच्या पुजार्‍याला दिलेल्या इनामपत्रात शिवाजीराजे आपल्या जहागिरीला राज्य म्हणतात. १६६० पर्यंत त्यांच्या ताब्यातील प्रदेश म्हणजे " मोकासा " म्हणजे देणगी मिळालेली जहागिर असाच होता.[ पगडी, २७]


जहाल धर्मांध आणि वंशवादी औरंगजेब- तो हिंदुमुस्लीम अशा सर्व भारतीयांचा द्वेश करी-

याचा अर्थ आजच्या अर्थाने राजे धर्मनिरपेक्ष होते असेही नाही. ते धर्माने हिंदू होते. हिंदू जीवनपद्धतीत वाढलेले होते. धर्मांध औरंगजेबाची वर्तणूक त्यांना अमान्य होती. औरंगजेब वंशवादी होता.

त्याला त्याच्या तुरेनियन वंशाचा गर्व होता. त्याच्या नजरेत सर्वच हिंदुस्थानी म्हणजे हिंदू आ्णि मुस्लमान दोघेही तिरस्करणीय होते. तो त्यांचा द्वेश करीत असे. याच्या उलट शिवराय धर्मवेडे नव्हते. ते धर्माचे पालन करणारे, धर्माने सांगितलेले पुजाविधी करणारे राजे होते. त्यांचा संघर्ष राजकीय होता. त्यामुळे धार्मिक अवडंबरापासून राजे दूर राहिले.

दुर्दैवाने त्यांच्या अनेक चरित्रकारांनी त्यांचा हा संघर्ष धर्मवादी नजरेने पाहिला. पक्षपाती पद्धतीने रेखाटला. परमानंदाने तर त्यांना परमेश्वराचा अवतारच बनवून टाकले. अर्थातच राजांच्या विरोधकांचे चित्रण त्याने राक्षस असे केले. या परमानंदाचे आजचे सगळे संघीय वारसदार महाराजांचा संघर्ष हा हिंदुमुस्लीम धर्माचा संघर्ष म्हणून रंगवतात. त्यात सगळ्या मुस्लीमांच्या वागण्याला ते अतिरंजित स्वरूपात अत्याचार म्हणून पेश करतात.

बाबा याकुत यांच्या आशिर्वादासाठी राजांची धडपड -

पण ते विसरतात की, राजे सहिष्णू होते. विविध धर्म आणि पंथांबद्दल त्यांना मनापासून आदर होता. इस्लामी धर्मग्रंथ आणि मशिदी, पिरांची ठाणी यांच्याशी ते सन्मानाने वागत. बाबा याकुत यांचे आशिर्वाद मिळवण्यासाठी राजे सदैव धडपड करीत. [पगडी, ३२]

छ. शिवराय औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात म्हणतात, "जो कोणी धर्मवेडेपणा आणि धर्मद्वेश बाळगतो तो ईश्वरी आज्ञेच्या विरूद्ध वागतो." [ पगडी, १२ ]

कुठलाच उपलब्ध दस्तऎवज अशा निष्कर्षास येत नाही की शिवाजी राजांचा संघर्ष धर्मासाठी होता असे ते मानत होते. [ पगडी, ११ ]

असहिष्णुतेमुळे विनाश -

कितीही मोठी असली तरी माणसं आणि संस्था यांचा असहिष्णुतेमुळे विनाश होतो असेही शिवाजीराजे औरंगजेबाला लिहितात. विभिन्न जाती आणि धर्म यांच्याबद्दल सहिष्णुता अवलंबिली तरच मनुष्य जातीला शांतता आणि सुबत्ता लाभेल अशीही ताकीद शिवराय औरंगजेबाला देतात. [ पगडी, १२ ] अशा शिवरायांना स्वार्थासाठी संघाने कडवे हिंदुत्ववादी बनवून टाकलेय.

कवी परमानंद संघाला सोयीचे-

शिवरायांच्या समकालीन लेखकांमध्ये संस्कृत कवी परमानंद, जयराम, हिंदी कवी भूषण, मराठी बखरकार सभासद यांनी शिवाजी राजे हिंदुंचे कैवारी असल्याचे चित्र रंगवले त्याचे कारण त्यांच्यावर [ या चरित्रकारांवर ] असलेला पौराणिक कथांचा पगडा होय.

समकालीन पर्शियन बखरकार मुहम्मद कासीम आणि मुस्तेखान तसेच दखनी लेखक नुसरती यांनी महाराजांचे वर्णन नेमके उलटे केलेय.

युरोपियन लेखक आधी महाराजांना बंडखोर ठरवतात, मात्र त्यांची सरशी होऊ लागताच त्यांचे वर्णन उमदा युवराज असे करतात.

शिवराय हिंदूंचे कैवारी होते नी ते मुस्लीमवर्चस्वाविरूद्ध लढत होते ही मांडणी टोकाची, अतिरेकी असल्याचे सेतुमाधवराव पगडी आपल्या ग्रंथात पुराव्यानिशी दाखवून देतात. [ पगडी, १३] पगडी जरी संघाचे नाव घेत नसले तरी त्यांना संघच अभिप्रेत आहे हे स्पष्ट दिसते.

संघपरिवाराचा सततचा आंधळा आणि रक्ताळलेल्या असहिष्णुतेचा त्वेष त्यांनी मुत्सद्दी राजकारणी असलेल्या शिवरायांवर शेंदरासारखा लेपून टाकलाय. हा शेंदूर खरवडायला हवा. तेव्हाच महाराजांचे खरे रूप दिसू शकेल. हे काम धर्माचे चष्मे नसलेल्या सत्यशोधकांनाच करावे लागेल.
क्रमश:....

प्रा. हरी नरके, ७/५/२०२०

संदर्भासाठी पाहा: १. सेतुमाधवराव पगडी, छत्रपती शिवाजी, काँन्टीनेंटल प्रकाशन, पुणे, २०१९, पृ. ११, १२, १३, २६, २७,
२. दि. वि. काळे, छत्रपति शिवाजी महाराज, पुणे विद्यापीठ, पुणे, १९७१, पृ. २६४/६५

संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.  https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR3iGVCMJEhRtiAUu2-k_xFSJAUkHd_IcieJC_nmxlHjCCU3KBdfHUl67dU

रा.स्व.संघ २१/ संघाचे छ.शिवराय गोब्राह्मण प्रतिपालक आणि मुस्लीमद्वेष्टेच का?








रा.स्व.संघ २१/ संघाचे छ.शिवराय गोब्राह्मण प्रतिपालक आणि मुस्लीमद्वेष्टेच का?- प्रा. हरी नरके

बहुजनांचे महापुरूष पळवायचे, त्यांचे दैवतीकरण करायचे आणि त्यांना स्वत:च्या कब्ज्यात ठेवायचे, आपल्या फायद्यासाठी हत्त्यार म्हणून वापरायचे ही रा. स्व. संघाची कपटनिती आहे. महाराजांचा जन्म १६३० चा. शिवराय १६८० ला गेले. त्यांचा जीवनकाळ ५० वर्षांचा होता. या ३९० वर्षातली २६० वर्षे या मंडळींना शिवरायांची साधी आठवणसुद्धा का आली नाही? या मंडळींचे शिवरायांबद्दलचे प्रेम पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्यात तसे अचानकच का उद्भवले? गेल्या ५०/६० वर्षातच ते उतू का जाऊ लागले? संघाचे छ. शिवराय "गोब्राह्मण प्रतिपालक" का? "कुळवाडीभूषण" का नाहीत? ते मुस्लीमद्वेष्टेच का? संघाने महाराजांना अवतारी पुरूष का बनवलेय? संघाचे मनोहर भिडे त्यांचा उल्लेख "शिवप्रभू" असा का करतात? ३२ मण सोन्याचे सिंहासन, खडा पहारा या नावाखाली हजार बाराशे कोटी रूपयांचा " एमबी [मनोहर भिडे] केयर्स फंड" त्यांना का जमवायचा आहे? रायगडावर त्यांना कब्जा का मिळवायचा आहे? यामागे मराठा तरूणांना संमोहित करण्याचा कोणता कट, कोणती कपटनिती आहे?

देवाचे पेटंट भटजीचे- ही तर रोजगार हमी-
यांचे एक वचन आहे. " देव मंत्राधीन आहेत. म्हणजे आधी दगडाची किंवा शाडूची साधी मुर्ती असते. तिच्यात मंत्राद्वारे भटजी प्राण निर्माण करतो. विसर्जनाआधी ते पुन्हा काढून घेतो. मंत्र भटजीच्या ताब्यात असतात. अंतिमत: देवांवर मालकी कोणाची असते तर भटजीची." म्हणून प्रत्येक महापुरूषाचा यांना देव करायचा असतो. त्याचा देव झाला की त्याचे पेटंट यांच्या नावे जमा होते. त्याची रॉयल्टी पिढ्यानुपिढ्या यांना मिळते. म्हणजे मानवनिर्मित देव ही यांची हजारो वर्षांची रोजगार हमी योजना आहे तर!

जातपात नाही मानत मग दलित शंकराचार्य का नाही? दलित सरसंघचालक का नाही?

एरवी बहुजनांच्या आरक्षणाला प्राणपणाने विरोध करणारे हे लोक भटजीची नियुक्ती मात्र जन्माच्या आरक्षणाद्वारे करण्याबद्दल आग्रही असतात. तिथे का गुणवत्तेवर नियुक्त्या नको असतात? या एकाच जातीला दिलेल्या १०० टक्के आरक्षणाबद्दल सगळेच गप्प कसे असतात? तिथे का सगळ्या हिंदुंना प्रवेश नाही? आजपर्यंत एकही ब्राह्मणेतर शंकराचार्य का झाला नाही? संघ जातपात मानत नाही तर आजपर्यंत किती सरसंघचालक अनुसुचित जातींचे झालेत? किमान एक तरी शूद्र या पदावर का बसला नाही? आजही संघाच्या पहिल्या श्रेणीच्या श्रेष्ठींमध्ये एकही शूद्र किंवा अतिशूद्र का नाही?

भिती दाखवण्यासाठी शत्रू हवा, म्हणून मुस्लीमद्वेश-
हिंदु संघटन करायचे तर भिती दाखवण्यासाठी शत्रू हवा. यांनी मुस्लीमांना शत्रू ठरवले. सतत मुस्लिम समाजाचा द्वेश करीत बोलायचे. लिहायचे. वागायचे. मुस्लीमद्वेश वगळला तर संघ संपला.
यांचे शिवराय कट्टर मुस्लीमद्वेष्टेच का? याचे उत्तर यात आहे. भारतीय संस्कृती ही मुलत: गंगाजमुना तहजीब आहे. म्हणजे गंगा आणि यमुना या दोघींच्या एकत्रित पाण्यावर पोसलेली. या देशात हिंदु राजे महाराजे व मुस्लीम नबाब, सुलतान यात संघर्ष झाले, हे खरे आहे. पण ते धर्माचे नव्हे तर सत्तेचे संघर्ष होते. इथली सामान्य हिंदुमुस्लीम जनता गुण्यागोविंदाने नांदत होती. गावोगावी हिंदुलोक मुस्लीम पिरांच्या यात्रा करीत होते. पिराच्या पुजा करीत होते. कोकणात मुस्लीम लिगची स्थापना झाली तर ती गावच्या मारूतीला नारळ फोडून. [ संदर्भ- हमीद दलवाई]

सत्तेसाठी झालेल्या लढाया या धार्मिक लढाया नव्हत्या. म्हणून इंग्रजी राज्य यायच्याआधी या देशात कधीही हिंदुमुस्लीम जातीय दंगली झाल्या नाहीत. १८५७ चे स्वातंत्र्यसमर ते दोघे एकत्रितपणे लढले. इंग्रजांनी त्यांच्यात पद्धतशीरपणे फूट पाडली म्हणून आठशे वर्षांच्या इतिहासात ११ ऑगष्ट १८९३ ला भारतातली पहिली हिंदुमुस्लीम दंगल झाली. पुढे मुस्लीम लिगने घडवलेल्या दंगली व पाकीस्तानची निर्मिती यातनं कटुता वाढत गेली. पाकच्या कारवायांनी तर आता ही कटुता, द्वेशभावना, आकसभावना गु्णाकाराच्या वेगाने वाढते आहे.

गंगाजमुना तहजीब-

इथले संगित, खाणेपिणे, कपडेलत्ते, भाषा, साहित्य, कला, विद्या या सार्‍यांमध्ये सरमिसळ आहे. अगदी रक्तातसुद्धा. भांडारकर नावाच्या शास्त्रज्ञांनी १०० वर्षांपुर्वीच हे सिद्ध केलेले आहे की शुद्ध रक्त नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही. हजारो, लाखो वर्षांच्या मानवी प्रवासात सगळ्यांचे रक्त एकमेकात मिसळलेले आहे. शुद्ध रक्ताच्या निव्वळ थापा आहेत.

एक हिंदू व दोन मुस्लीम सत्ता मिळून मुघलांशी का लढत होते?
आज महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांचे सरकार अस्तित्वात येण्यामागे ज्या पत्राचे सुत्र आहे, तिकडे आपले लक्ष वेधतो. पत्र शिवाजी राजांचे आहे. मार्च १६७७ मधले आहे. राज्याभिषेकानंतरच्या राजकारणावरचे आहे. मालोजीराजे घोरपडे यांना लिहिलेले आहे. महाराज पत्रात म्हणतात, "संप्रती राजकारण वर्तमान म्हणजे, दक्षिणेचे पातशहा तीन.निजामशाह, आदिलशहा, कुतुबशाहा. त्यातली निजामशाही बुडाली... पठाण [दिल्लीकर मुघल] बळावला म्हणजे एका उपरी एक दक्षिणीयांची घरे बुडविल. कोणास तगो देणार नाही. ऎसे आम्ही समजोन कुतुबशहा यांसी पहिलेपासून रूजुवात राखिली होती... आम्ही त्यांच्या भेटीस गेलो. या भेटीत असे ठरले की, "आपली पादशाही जितकी वाढवू तितकी वाढवणे. पठाणाची नेस्तनाबूत करणे. दक्षिणेची पादशाही आम्हा दक्षिणीयांच्या हाती राहे ते करावे."

शिवाजी महाराजांचे हे पत्र हा सज्जड पुरावा आहे की लढाई हिंदुमुस्लीम अशी नव्हती. १ हिंदू आणि २ मुस्लीम सत्ताधिश एकत्र मिळून मुस्लीम असलेल्या मोगलांशी लढत होते. कारण लढाई धर्माची नाही तर सत्तेची होती.
क्रमश:....

प्रा.हरी नरके, ६/५/२०२०

संदर्भासाठी पाहा: दि. वि. काळे, छत्रपति शिवाजी महाराज, पुणे विद्यापीठ, पुणे, १९७१, पृ. २७१

संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.  https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR1wyrOJM-Z-vA7dsV47JiWtcD0MoB4SNG4ykT0bG9U1akS6hQtPCgm-Ybg

Sunday, May 3, 2020

रा.स्व.संघ 20/ व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे : मनू










रा.स्व.संघ 20/ व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे : मनू : मनू संतांच्या एक पाऊल पुढे, मनोहर भिड्यांनी संतांचा केला अपमान-प्रा.हरी नरके


महाराष्ट्राची जडणघडण करण्यामध्ये संतविचारांचा फार मोठा वाटा. न्या.रानडे ते प्रा.गंबा.सरदार यांनी संतसाहित्याची सामाजिक आणि राजकीय फलश्रुती समाजाऊन सांगितलेली आहे. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य उभारणीची पुर्वतयारी संतांच्या प्रबोधनपर विचारांनी केली होती हे न्या.म. गो.रानडे यांनी " मराठा सत्तेचा उदय" या ग्रंथात सप्रमाण मांडलेले आहे. संघाचे चेले मनोहर भिडे उठताबसता शिवछत्रपतींचे नाव घेत असतात आणि तरीही ते संतांचा धडधडीत अपमान करतात. दोन वर्षांपुर्वी भिड्यांनी जेव्हा संतांचा अवमान करणारी मुक्ताफळं उधळली तेव्हाच मी भिड्यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. त्यांनी देहू-आळंदीहून पंढरपूरला जाणार्‍या वारीत पुण्यात तलवारधारी झुंडी घुसवल्या होत्या. वारकरी चळवळ ताब्यात घेण्याचा त्यांच हा डाव वारकर्‍यांनी उधळून लावला.

महाराष्ट्राला पहिल्यांदा शिवराय सांगितले फुल्यांनी .त्यांना तर भिडे देशद्रोही म्हणतात. १९०६ कुणबी मराठा कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी ६०० पृष्ठाचे मौलिक शिवचरित्र लिहिले त्याचा उल्लेखसुद्ध भिडे करीत नाहीत. भिड्यांना शिवरायांच्या नावाचा गैरवापर करून मराठा-बहुजन मुलांची टाळकी संमोहित करून पेशवाईच्या सावलीत न्यायची आहेत.

भिड्यांचे शिवराय रयतेचे राजे नाहीत, ते शेतकरी, कुणबी, मावळ्यांचे उद्धारकर्ते नाहीत तर ते गोब्राह्मण प्रतिपालक, रात्रंदिन परधर्मद्वेश शिकवणारे, युवकांची माथी भडकावणारे, आधुनिक काळातून पुन्हा विषमतावादी ब्राह्मणी, वैदीक राज्यात नेऊ पाहणारे भिडेवादी शिवराय आहेत. त्यावर सविस्तर लिहिणारच आहे. आज भिड्यांना पुजनीय असणार्‍या मनूची काही मतं बघूयात.

मनू म्हणतो,
" व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे." [ अध्याय ९ वा श्लोक १९]
" लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे." [५/१५२]
" पती सदाचारशून्य असो, तो दुसर्‍या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी." [५/१५४]
" स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्या चा भोग घेतात." [९/१४]
" पुरूषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावत: स्नेहशून्य असतात. [9९/१५]
" नवर्‍याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची मालकी कायम राहते."[९/४६]
................................

"मनुस्मृती" हा संस्कृत भाषेतील प्राचीन ग्रंथ बारा अध्यायांचा असून त्यात २६८४ श्लोक आहेत. हा ग्रंथ कधी लिहिला गेला यावर विद्वानांमध्ये मतभेद आहेत. मनू एक की अनेक यावरही वाद आहेत. मनू ही व्यक्ती होती की संस्था [मठ/परंपरा] याबद्दलही भिन्न मतं आहेत. इ.स.पुर्व १७५ ते इ.स.१७५ या साडेतीनशे वर्षात हा ग्रंथ विकसीत झाला असावा असे तज्ञ सांगतात. तशा हिंदूंना प्रमाण असलेल्या एकुण स्मृती १३७ असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदु कोड बिलाच्या चर्चेत संसदेत सांगतात. त्यात सर्वाधिक महत्वाच्या म्हणून मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, पाराशर स्मृती या मानल्या जातात. मनुस्मृती ही शेकडो वर्षे भारतीय समाजाची जणू राज्यघटनाच होती. अगदी ब्रिटीश भारतातसुद्धा इंग्रज न्यायालये कौटुंबिक कलहांमध्ये   मनुस्मृतीच्या आधारेच निकाल देत असत. मनुस्मृती हा फक्त धर्मग्रंथ नव्हता तर तो कायद्याचा ग्रंथ होता. त्याला धर्मशास्त्र असेही म्हटले जाई. बाबासाहेब त्याचा धर्मिक व राजकीय प्रभाव सांगताना ते लिगल आणि पिनल कोड होते असे नेमके शब्द वापरतात. 

" सार्थ श्रीमनुस्मृती" हा मूळ संस्कृत श्लोकांसह त्यांचा मराठी अनुवाद देणारा ग्रंथ वेदशास्त्रसंपन्न विष्णुशास्त्री बापट यांचा आहे. हा ग्रंथ जिज्ञासूंनी अवश्य वाचायला हवा. विशेषत: सर्व समाजातील स्त्रिया आणि माळी, मराठा, साळी, तेली, कुणबी, वंजारी, आगरी, भंडारी, शिंपी, सोनार, सुतार, नाव्ही आदींनी आवर्जून वाचायलाच हवा.

संस्कृत पाठशाळा चालवणारे बापटशास्त्री या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये लिहितात, " मनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे व त्याची योग्यता इतर कोणत्याही स्मृतीपेक्षा अधिक आहे. सनातन धर्माचा जीव असे जे चार आश्रम व चार वर्ण त्यांची व्यवस्था या स्मृतीमध्ये जशी स्पष्ट दिसते तशी ती वेदांमध्ये आढळत नाही...स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांचा या स्मृतीमध्ये पूर्णपणे विचार केलेला आहे. "

मनुस्मृतीवर मेधातिथी, सर्वज्ञनारायण, कुल्लकभट्ट, राघवानंदसरस्वती, नंदन,रामचंद्र, गोविंदराज, श्रीमाधवाचार्य, धरणीधर, श्रीधरस्वामी, रूचीदत्त, विश्वरूप, भोजदेव व भारूचि अशा एकंदर चौदा महापंडितांनी निरनिराळ्याकाळी केलेल्या चौदा टिका सर्वमान्य आहेत.

या सर्व टिकांचे आठ खंड भारतीय विद्या भवनने प्रकाशित केलेले आहेत. ते मी वाचलेले आहेत. पॅट्रीक वोलिव्हेल [ Patrick Olivelle] यांनी वर्षानुवर्षे संशोधन करून मनुस्मृतीची प्रमाण [चिकित्सक] आवृ्त्ती तयार केलेली आहे. तिचे नावच "Manu's Code of Law: A Critical Edition and Translation of the Manava-Dharmasastra," असे असून हे पुस्तक  Oxford University Press ने प्रकाशित केलेले आहे. भारतरत्न पां.वा.काणे, यांचा पाच खंडांतील, आठ भागांचा, हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, पुणे 

डॉ. आ. ह. साळुंखे, आचार्य नरहर कुरूंदकर, डॉ. प्रदीप गोखले व भदन्त आनंद कौशल्यायन यांचे मनुस्मृतीवरचे ग्रंथ अतिशय मौलिक आहेत. ते कार्यकर्त्यांनी वाचलेच पाहिजेत.


महामहोपाध्याय बापटशात्रींचा मराठी अनुवाद पुढे देत आहे. [कंसात अध्याय व श्लोक क्रमांक दिलेला आहे.]

" सहज शृंगार चेष्टेने मोहित करून पुरूषांस दुषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे.यास्तव ज्ञानी पुरूष स्त्रियांविषयी कधी बेसावध राहात नाहीत." [२/१३]
" माता, बहीण व कन्या यांच्या बरोबरही पुरूषाने एकांतात बसू नये." [२/१५]
" ज्यांना फक्त मुलीच झालेल्या असतील त्यांच्या मुलींशी लग्नं करू नयेत." [३/८]
" जिला भाऊ नसतील तिच्याशी शहाण्याने विवाह करू नये." [ ३/११]
" ज्या कुळामध्ये पिता, पती द्वारा स्त्रियांची पूजा होत असते तेथील देवता प्रसन्न होतात." [३/५६]

" नवर्‍याने बायकोसोबत एका ताटात जेवन करू नये. तसेच पत्नीला जेवताना, शिंकताना, जांभई देताना पाहू नये." [४/४३]
" आता स्त्रियांचे धर्म सांगतो, ते ऎका- बाल्यावस्थेत मुलीने, तरूण स्त्रीने किंवा वृद्ध बाईनेही घरातील लहानसे कार्यही स्वतंत्रपणे करू नये." [५/४७]
" स्त्रीने कधीही स्वतंत्र होऊ नये." [५/४८]
" पिता, पती,पुत्र यांच्यावेगळी राहणारी स्त्री दुष्ट झाल्यास आपल्या दोन्हीं कुळांस निंद्य करते." [५/४९]
" पति जरी विरूद्ध असला तरी स्त्रिने प्रसन्न मुद्रेने असावे. गृहकर्मामध्ये दक्ष होऊन राहावे. घरातील सर्व भांडी तिने घासून पुसून स्वच्छ ठेवावीत." [५/१५०]

" लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे." [५/१५२]
" पती सदाचारशून्य असो, तो दुसर्‍या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी." [५/१५४]
" पतीची सेवा हेच पत्नीचे व्रत होय. तिचा यज्ञ होय. त्याच्या आज्ञेत राहाणे हाच तिचा स्वर्ग होय." [५/१५५]
" स्त्रियांनी पहिला पती वारला तरी कधीही दुसरा नवरा करू नये." [५/१६२]
" स्त्रीधर्माप्रमाणे मन, वाणी, देह, यांच्याद्वारे जी आपली पतीची कायम सेवा करते तिलाच स्वर्ग मिळतो." [५/१६६]

" पहिली पत्नी वारली तर तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे." [५/१६८]

" पिता,पती, आप्त यांनी स्त्रियांस सर्वदा आपल्या आधीन ठेवावे. सामान्य विषयांमध्ये त्या आसक्त झाल्यास त्यास आपल्या वश करून घ्यावे." [६/२]
" विवाहाच्या पुर्वी पित्याने, त्यानंतर पतीने, म्हातारपणी पुत्राने तिचे रक्षण करावे. सारांश कोणतीही स्त्री स्वातंत्र्यास पात्र नाही.योग्य नाही." [ ६/३]
" स्त्रीसाठी मद्यपान, दुर्जनसमागम, पतीपासून दूर राहणे, इकडे तिकडे भटकणे, अयोग्य वेळी निजणे, दुसर्‍याच्या घरी राहणे हे सहा व्याभिचारदोष होत." [९/१३]
"स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्या चा भोग घेतात." [९/१४]
"पुरूषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावत: स्नेहशून्य असतात. [९/१५]

" स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही. स्मृतींचा नाही. धर्माचा नाही. त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीत. त्या अशुभ असतत." [९/१८]
" व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे." [९/१९]

" नवर्‍याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची मालकी कायम राहते."[९/४६]

तर संघाच्या मनोहर भिड्यांना मनुस्मृतीचे असे राज्य पुन्हा हवेय. लक्षात ठेवा या राज्यात सर्व स्त्रिया आणि मराठा, माळी, साळी, कुणबी, आग्री, भंडारी, वंजारी, तेली हे सर्व बलुतेदार, शूद्र तसेच अनुसुचित जातींचे लोक यांना गुलामाचे जीवन जगावे लागेल. अंधारीगुहा आणि वेठबिगारी करावी लागेल.हवेय असे राज्य तुम्हाला? या पोस्टवर प्रतिक्रिया लिहिताना मनु वा मनोहर भिडे यांच्याबद्दल संसदीय भाषाच वापरावी. शिवीगाळ करण्यामुळे मुद्दे मागे पडतात,त्यातनं आपलंच नुकसान होतं हे लक्षात ठेवा.
विशेषत: माझ्या फेसबुक मित्रयादीतील मैत्रिणी, भगिनी, मुली, माता यांची यावर काय मतं आहेत ते जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. 
संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.  https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR0sHk873-gdTIHynAQXFnSMvawoIdspxcQeYgXosgHDQ8gAkqOlEiycF7w


-प्रा.हरी नरके, ४/५/२०२०
[लेखक भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. लेखात व्यक्त झालेली मतं लेखकाची व्यक्तीगत मतं आहेत.]


संदर्भ-
१. सार्थ श्रीमनुस्मृती," मराठी अनुवाद, वेदशास्त्रसंपन्न विष्णुशास्त्री बापट, गजानन बुक डॆपो, कबुतर खाना,दादर,मुंबई, भरत नाट्य मंदीर,पुणे
२. Olivelle, Patrick (translator) (2004), The Law Code of Manu, Oxford World's Classics, Oxford University Press, ISBN 978-0-19-280271-2
३. Olivelle, Patrick (translator) (2005), Manu's Code of Law: A Critical Edition and Translation of the Manava-Dharmasastra, Oxford University Press, ISBN 978-0-19-517146-4
४. Olivelle, Patrick (translator) (1999), The Dharmasutras: The Law Codes of Ancient India, Oxford World's Classics, OUP Oxford, ISBN 978-0-19-283882-7
५. भारतरत्न पां.वा.काणे, हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, पुणे
*** डॉ. आ. ह. साळुंखे, आचार्य नरहर कुरूंदकर, डॉ. प्रदीप गोखले व भदन्त आनंद कौशल्यायन यांचे            मनुस्मृतीवरचे ग्रंथ
*** मनुस्मृतीवरील मेधातिथी, सर्वज्ञनारायण, कुल्लकभट्ट, राघवानंदसरस्वती, नंदन,रामचंद्र, गोविंदराज, श्रीमाधवाचार्य, धरणीधर, श्रीधरस्वामी, रूचीदत्त, विश्वरूप, भोजदेव व भारूचि अशा चौदा महापंडितांनी केलेल्या चौदा टिका, आठ खंड, भारतीय विद्या भवन, मुंबई

Saturday, May 2, 2020

जेव्हा संघाचे मनोहर भिडे डॉ. बाबासाहेबांना मनुसमर्थक ठरवतात, रा.स्व.संघ 19

















संघाच्या लबाड्या-४, जेव्हा संघाचे मनोहर भिडे डॉ. बाबासाहेबांना मनुसमर्थक ठरवतात- प्रा.हरी नरके

मिरज दंगल घडवल्याचे, जोधा अकबर चित्रपटाला सांगलीत हिंसक विरोध केल्याचे आणि भीमा कोरेगाव दंगलीचे सुत्रधार असल्याचे खटले ज्यांच्यावर चालू आहेत ते आहेत मनोहर उर्फ संभाजी भिडे. रा.स्व.संघाचे १९८० पर्यंत निष्ठावंत स्वयंसेवक असलेले हे भिडे १९८४ पासून श्री शिव प्रतिष्ठान, हिंदुस्थान, ही संस्था चालवतात. मनोहर उर्फ संभाजी भिडे वयाने ९० च्या आसपास असल्याचे सांगितले जाते. त्यांच्यावर असत्यकथन, सत्यापलाप आणि नागरिकांच्या भावना भडकावणारी वक्तव्ये केल्याचे अनेक गुन्हे आहेत.


सर्वात गाजलेले प्रकरण म्हणजे ते म्हणतात, आंबे खाल्ले की मुलं होतात. त्यांची आय.बी.एन.लोकमतवर बेधडक या कार्यक्रमात उदय निरगुडकर यांनी १ तासाची मुलाखत घेतली. ती सर्वांनी बघितली. त्यात ते जाहीरपणे म्हणाले, " बाबासाहेब मनुला मानणारे होते. मनुस्मृती वाचूनच आपण भारताची राज्यघटना लिहिली असे ते म्हणत. मनु हा महान कायदेतज्ञ होता असे त्यांनी लिहिले आहे. राजस्थानच्या विधान भवनात मनुचा पुतळा बाबासाहेबांच्या हस्ते बसवण्यात आला. तेव्हा त्यांनी आपल्या भाषणात मनुचा गौरव केला. या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद उपस्थित होते." या मुलाखतीत आणखी बरीच वादग्रस्त वक्तव्ये त्यांनी केली पण त्यावर नंतर कधीतरी बोलू. आज बाबासाहेब आणि मनुगौरव ्याची झाडाझडती घेऊ.


भिडेंचे असत्यकथन आणि वस्तुस्थिती १-  राजस्थानमध्ये मनुचा पुतळा उच्च न्यायालयाच्या प्रांगणात आहे. विधानभवनात नाही.

भिडेंचे असत्यकथन आणि वस्तुस्थिती २-  हा पुतळा २८ जुलै १९८९ ला बसवण्यात आला. त्याच्या ३३ वर्षे आधी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झालेले होते. तर राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद या घटनेच्या २६ वर्षे आधी म्हणजे २८ फेब्रुवारी १९६३ ला वारलेले होते. ३३/२६ वर्षे आधी निधन पावलेल्या महापुरूषांना हे भिडे मनूच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला हजर करतात. हे भिडे इतकं धडधडीत खोटं बोलतात आणि त्याबद्दल त्यांना खंत, खेद वाटत नाही, त्याबद्दल ते माफी मागत नाहीत, उलट मुलाखतकार, आयबीएन लोकमत वाहिनीचे संपादक निरगुडकर नंतर गुपचुप या मुलाखतीतला भिडेंचा खोटेपणाचा पुरावा असणारा भाग गाळून ही मुलाखत यु ट्युबवर ठेवतात. गैरसोयीचे असलेले, लबाडी आणि गुन्हेगारी सिद्ध करणारे पुरावे नष्ट करण्याची हिंदुत्ववाद्यांची ही सवय प्राचीन काळापासून चालत आलेली असून ती आजही कायमच आहे.


पत्रकार, लेखक, इतिहासकार हा समाजाच्या स्मरणशक्तीचा रखवालदार असतो. हे लोक रखवालदार आहेत की मारेकरी यावर वेगळं बोलायची गरज आहे काय? ही मुलाखत ऎकल्यावर मी स्वत: निरगुडकरांशी बोललो होतो. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळलेली असताना भिडे बाबासाहेबांना मनुचे समर्थक ठरवत असताना तुम्ही त्यांना महाडचा मनुस्मृतीदहनाचा प्रश्न का विचारला नाही असे मी त्यांना विचारले. ते मला म्हणाले, " भिडे आमच्याकडे आले होते ते याच अटीवर की एकही अडचणीचा प्रश्न विचारायचा नाही, प्रतिप्रश्न केला तर मी उठून जाईन, म्हणून मी गप्प बसलो." 


मी त्यांना जयपुरचा पुतळा बाबासाहेब गेल्यानंतर ३३ वर्षांनी बसल्याचे सांगितल्यावर त्यांनी माझा तसा बाईट घेतला. तो त्यांच्या वाहिनीवर दाखवलाही. जयपुरला आयबीएनची टिम पाठवून पुतळ्याचे फुटेज आणले, तेही दाखवले. पण लोक हे सगळे विसरल्यावर भिडेंचा खोटेपणा सांगणारा मुलाखतीतला भाग वगळून टाकला.


हे लिहून उपयोग काय असे काहीजण मला विचारतात. उपयोग हा की लिहून हे पुरावे जपले पाहिजेत नाहीतर हे लोक दिवसाढवळ्या पुरावे नष्ट करतात आणि इतिहासाचे विकृतीकरण / ब्राह्मणीकरण करतात.

३. भिंड्यांचा मी ताबडतोब समाचार घेतला होता.
" भिडेंचं विधान बिनबुडाचं - हरी नरके

दरम्यान, मनुस्मृतीचा अभ्यास करून आपण संविधान लिहिलं असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते हे विधान बिनबुडाचं आहे अशी टीका प्रा.हरी नरकेंनी केली.

ते म्हणाले, राजस्थान विधिमंडळाच्या सभागृहात मनुचा पुतळा बसवलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: उपस्थित होते. त्या पुतळ्याखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मनुचा गौरव करणारे विधान दिलेले आहे. प्रत्यक्षात राजस्थान विधीमंडळाच्या सभागृहात किंवा प्रांगणात मनुचा पुतळाच नसल्याने भिडे यांचे हेही विधान बिनबुडाचे आहे अशी टीकाही नरकेंनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 ला महाडला मनुस्मृती जाळली होती. तो ठराव गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे या त्यांच्या ब्राह्मण सहकार्‍याने मांडला होता. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समर्थन दिले आणि सभेला जमलेल्या अस्पृश्य साधूसंताच्या हस्ते मनुस्मृती जाळण्यात आली.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान सभेतील सर्व भाषणे लोकसभा सचिवालयाने "संविधान सभेतील चर्चा,खंड 1 ते 12" मध्ये छापलेली आहेत. त्यात मनुचा गौरव करणारे एकही विधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले नाही. उलट मुलभूत अधिकाराच्या कलम 13 मध्ये मनुस्मृतीसारख्या सर्व जुन्या कायद्यांचे उच्चाटन 26 जानेवारी 1950 रोजी केल्याची नोंद बाबासाहेबांनी केलेली आहे. तेव्हा भिडे यांच्या वरील दोन्ही दाव्यात सत्यता नाही, ते चुकीची माहिती देत आहेत असं हरी नरकेंनी सांगितलं."


https://lokmat.news18.com/mumbai/babasheb-ambedkar-wrote-the-constitution-by-studying-manusmriti-say-sambhaji-bhide-296168.html


४. म्हणे बाबासाहेब मनुचे समर्थक होते. डोके ठिकाणावर असलेला कोणीही माणूस मनुचे वाभाडॆ काढणार्‍या, मनुस्मृती जाळणार्‍या, राज्यघटनेच्या १३ कलमाद्वारे मनुस्मृती नाकारणार्‍या बाबासाहेबांना मनुवादी म्हणूच शकत नाही. भिडे मात्र म्हणतात. किळसवाणा आणि त्यांच्या वयाला, नेतृत्वाला, संस्कारांना न शोभणारा भाग म्हणजे मनुस्मृती वाचून मी राज्यघटना लिहिली असे बाबासाहेब म्हणायचे असे भिडे सांगतात. मनुस्मृती जाळून मी राज्यघटना लिहिली असे म्हणणारे बाबासाहेब चक्क उलटे करून, विकृत करून भिडे सांगतात, हे सत्यवचन आहे? ही देशभक्ती आहे? हे भिडेंच्या देश, धर्म, देवाला चालते? की हाच त्यांचा धर्म आहे? हीच त्यांची संस्कृती आहे का?

 बुद्ध कुचकामाचा म्हणे!-

५. या मुलाखतीत त्यांना विचारले गेले, तुम्ही फुले-शाहू-आंबेडकरांना मानता का?" यावर होय असे भिडे म्हणाले नाहीत. विषयांतर करून भलतेच बोलत राहिले. यावरून काय ते सिद्धच होते. परदेशात बोलताना मोदींनी बुद्धाचा देश असा उल्लेख केल्याची बातमी आल्यावर भिड्यांनी जाहीरपणे मुलाखत देऊन सांगितले, " बुद्ध काही कामाचा नाही. मोदी चुकीचे बोलले." एकाबाजूला ते मोदींच्या महाआरत्या ओवाळत होते. पुण्यात्मा काय, संत काय, धर्मराजा काय, निष्कलंक काय आणि ऋषीमुनी काय! एकही विशेषण त्यांनी शिल्लक म्हणून ठेवले नाही. इतकी किळसवाणी भाटगिरी! जग भारताला बुद्धाचा देश म्हणूनच ओळखते भिडेमहाशय! तुम्ही कितीही द्वेश करा बुद्धाचा, कितीही आकस बाळगा, कितीही तिरस्कार करा, कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते. हा देश बुद्धाचा होता, आहे, राहिल!

दंगली घडवणं हीच यांची महान देशभक्ती-
६. हिंदुत्ववाद्यांना जागतिक पातळीवरचा सोडा, अ.भा. पातळीवरचाही विचारवंत, प्रज्ञावंत, दार्शनिक घडविता आलेला नाही. म्हणतात ना, वासरात लंगडी गाय शहाणी, तशा अर्धशिक्षित तरूण, बेरोजगार आणि संमोहित बहुजन मुलांची डोकी भडकाऊन त्यांना दंगली करायला लावणं हीच यांची महान देशभक्ती. हिंदुत्वाच्या तयार केलेल्या बाजारगप्पा, बुटक्या लोकांची स्तोत्रं, बकवास त्यागाच्या विक्रमवेताळ कहाण्या आणि परधर्मद्वेश यांच्या जोरावर यांची दुकानं चालतात. विधायक, निरामय, निकोप आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवणारं एकही काम यांच्या खात्यावर आजवर जमा नाही!

स्वातंत्र्याच्या चळवळीत हे नुस्तेच गैरहजर नव्हते, तर यांचे बापाजादे त्यावेळी ब्रिटीशांच्या पोटार्थी चाकर्‍या करीत होते. जनरल डायरच्या सोबत निष्पाप भारतीयांवर गोळीबार करायला आघाडीवर होते.रावसाहेब, रावबहादूर असल्या पदव्या मिळवण्यासाठी ब्रिटीशांचे बूट चाटत होते. ते आता आम्हाला देशभक्ती शिकवताहेत! देश म्हणजे काल्पनिक देवीचा फोटो नसतो. हाडामासाची माणसं म्हण्जे देश असतो. यांची देश, देव आणि धर्माची भाषा म्हणजे निव्वळ पोपटपंची. बासुंदीकथा. मनाचे श्लोक. आंबाभुर्जी. स्त्रिया, बहुजन आणि कष्टकर्‍यांना उपाशी ठेऊन दक्षिणेत मिळवलेली.

https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR1xwd0NiWLH3HilVmmEWcY7kyAdb6DIOAVZ31TTZj69mXHwkO0M3OB8q5E

-प्रा. हरी नरके, ०३/०५/२०२०

संदर्भासाठी पाहा:

१. https://blogs.maharashtratimes.indiatimes.com/saransh/dr-br-ambedkar-many-and-sambhaji-bhide/
बाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे!, July 17, 2018, विजय चोरमारे in सारांश | राजकारण, history
..............................................................

२. डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहिली : संभाजी भिडे
लोकसत्ता ऑनलाइन | July 17, 2018 06:55 am
डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहिली : संभाजी भिडे
विशिष्ट आंबा खाल्ला की पुत्रप्ताप्ती होते, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता,अशाप्रकारची विविध वादग्रस्त विधानं करुन सतत चर्चेत असणारे श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून राज्यघटना लिहिली, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. संभाजी भिडेंच्या या विधानामुळे नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

‘न्यूज 18 लोकमत’च्या एका कार्यक्रमात बोलताना भिडे म्हणाले, ”डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनूचं कौतुक केलं होतं हा इतिहास आहे. राजस्थान विधानसभेच्या भवनाबाहेर मनूचा पुतळा उभा करण्यासाठी पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर गेले होते. मनूचा जो पुतळा उभा करण्यात आला होता, त्या पुतळ्याखाली “मनू हा जगातला पहिला कायदेपंडित होता” असं बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहिलं असा दावा भिडेंनी केला. तसंच संविधान देशासाठी अर्पण करताना, मी हे लिहिलं मनुस्मृतीचा अभ्यास करून लिहिलं असंही बाबासाहेब म्हणाले होते असा दावाही भिडेंनी केला आहे. याशिवाय याचा पुरावाही मिळेल तो मीडियाने शोधून काढावा” असं भिडे म्हणाले. मनुने विश्वाच्या कल्याणासाठी ग्रंथ लिहिला. जपान सारखे राष्ट्र मनूला मानतं अनेक विदेशातील विद्यापीठात मनुस्मृतीचा अभ्यास करतात असा दावाही त्यांनी केला.

या कार्यक्रमात बोलताना भिडे यांनी कोरेगाव-भिमा दंगलीवरही भाष्य केलं आणि मिलिंद एकबोटेंचं समर्थन करत संभाजी ब्रिगेडनेच ही दंगल पेटवली होती, अशी टीकाही केली. याशिवाय, तो विशिष्ट आंबा खाल्ला की माणसाची पौरूष शक्ती वाढते आणि त्यामुळे पुत्रप्ताप्ती होते या विधानावरही संभाजी भिडे गुरूजी ठाम राहिले, गरज पडली तर कोर्टात पुराव्यानिशी आपला दावा सिद्ध करेन असंही ते म्हणाले.

https://www.loksatta.com/maharashtra-news/sambhaji-bhide-says-babasheb-ambedkar-wrote-the-constitution-by-studying-manusmriti-1714702/
....................................


३. भिडेंचं विधान बिनबुडाचं -हरी नरके

दरम्यान, मनुस्मृतीचा अभ्यास करून आपण संविधान लिहिलं असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते हे विधान बिनबुडाचं आहे अशी टीका प्रा.हरी नरकेंनी केली.

ते म्हणाले, राजस्थान विधिमंडळाच्या सभागृहात मनुचा पुतळा बसवलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: उपस्थित होते. त्या पुतळ्याखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मनुचा गौरव करणारे विधान दिलेले आहे. प्रत्यक्षात राजस्थान विधीमंडळाच्या सभागृहात किंवा प्रांगणात मनुचा पुतळाच नसल्याने भिडे यांचे हेही विधान बिनबुडाचे आहे अशी टीकाही नरकेंनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 ला महाडला मनुस्मृती जाळली होती. तो ठराव गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे या त्यांच्या ब्राह्मण सहकार्‍याने मांडला होता. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समर्थन दिले आणि सभेला जमलेल्या अस्पृश्य साधूसंताच्या हस्ते मनुस्मृती जाळण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान सभेतील सर्व भाषणे लोकसभा सचिवालयाने "संविधान सभेतील चर्चा,खंड 1 ते 12" मध्ये छापलेली आहेत. त्यात मनुचा गौरव करणारे एकही विधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले नाही. उलट मुलभूत अधिकाराच्या कलम 13 मध्ये मनुस्मृतीसारख्या सर्व जुन्या कायद्यांचे उच्चाटन 26 जानेवारी 1950 रोजी केल्याची नोंद बाबासाहेबांनी केलेली आहे. तेव्हा भिडे यांच्या वरील दोन्ही दाव्यात सत्यता नाही, ते चुकीची माहिती देत आहेत असं हरी नरकेंनी सांगितलं.
https://lokmat.news18.com/mumbai/babasheb-ambedkar-wrote-the-constitution-by-studying-manusmriti-say-sambhaji-bhide-296168.html
...................................................
४. https://www.sarkarnama.in/dr-babasaheb-ambedkar-never-praised-manu-hari-narke-critisizes-bhide-guruji-26176
..................................................
५. News18 Lokmat
Bedhadak with Sambhaji Bhide By Dr. Uday Nirgudkar On Bhima Koregaon violence आय बी एन लोकमत
https://www.youtube.com/watch?v=dPL_3dUIU60  Bedhadak with Sambhaji Bhide By Dr. Uday Nirgudkar
..................................................................................

६. https://www.bbc.com/hindi/india-48720079
'मोदी के गुरु' संभाजी भिड़े के नासा विज्ञानी होने का सच
फ़ैक्ट चेक टीम, बीबीसी न्यूज़ 22 जून 2019

दावाः संभाजी भिड़े नासा की सलाहकार समिति में काम करते थे और उन्हें विज्ञान के क्षेत्र में 100 से ज़्यादा सम्मान मिल चुके हैं. संभाजी भिड़े एटॉमिक फिजिक्स में गोल्ड मेडलिस्ट हैं.

इतना ही नहीं, उनके बारे में यह भी कहा जा रहा है कि वो नासा की सलाहकार समिति में काम करते थे, 67 डॉक्टरेट और पोस्ट डॉक्टरेट रिसर्च में गाइड रहे थे, अब महाराष्ट्र में समाज सेवा कर रहे हैं और उनके 10 लाख से भी ज़्यादा फॉलोअर्स हैं.

फ़ैक्ट चेक:बीबीसी ने सोशल मीडिया पर फैलाई जा रही इस ख़बर की पड़ताल की. संभाजी भिड़े के संगठन के प्रवक्ता नितिन चौगुले ने इन दावों को ग़लत बताया है. पुणे यूनिवर्सिटी ने भी उनसे संबद्ध एक कॉलेज में भिड़े के प्रोफ़ेसर या स्टूडेंट होने की जानकारी न होने की बात कही

..............................................
7. https://www.youtube.com/watch?v=85g4AlFOLIo

#SambhajiBhide #GujaratiNews #TV9News
Buddha is of no use to the world: Sambhaji Bhide sparks yet another controversy| TV9News

https://www.youtube.com/watch?v=dPL_3dUIU60

.................................................

8. http://thewirehindi.com/60305/rajasthan-high-court-statue-of-manu/
मनु की प्रतिमा को हाईकोर्ट परिसर से हटाने की याचिकाएं वर्ष 1989 से लंबित हैं, जिन पर 2015 के बाद से सुनवाई नहीं हुई है. सोमवार को औरंगाबाद की दो महिलाओं के प्रतिमा पर कालिख पोतने के बाद मामला फिर गर्मा गया है.

इस घटना के बाद पिछले 29 साल से चल रहा विवाद फिर से ताज़ा हो गया है. गौरतलब है कि राजस्थान हाईकोर्ट में मनु की प्रतिमा की स्थापना 28 जुलाई, 1989 को हुई थी. इसे राजस्थान उच्च न्यायिक सेवा एसोसिएशन ने लॉयन्स क्लब के आर्थिक सहयोग से लगवाया था.

उस समय इसका खूब विरोध हुआ. हाईकोर्ट ने एक प्रशासनिक निर्णय के तहत इसे न्यायालय परिसर से हटाने का निर्देश भी दिया, लेकिन विश्व हिंदू परिषद के नेता आचार्य धर्मेंद्र ने इस फैसले को चुनौती देते हुए याचिका दायर कर दी.

इस पर सुनवाई करते हुए हाईकोर्ट के तत्कालीन न्यायाधीश महेंद्र भूषण ने प्रतिमा हटाने पर अंतरिम रोक लगा दी. उन्होंने मामले को वृहद पीठ को भेजते हुआ कहा कि अंतिम फैसला आने तक प्रतिमा हटाने पर लगी रोक बरक़रार रहेगी.

हैरत की बात है कि वृहद पीठ ने इस मामले का निपटारा करने की बजाय इसे ठंडे बस्ते में डाल दिया. इस दौरान प्रतिमा के पक्ष और विपक्ष में कई याचिकाएं ज़रूर दायर हुईं.

2015 में तत्कालीन मुख्य न्यायाधीश सुनील अंबवानी ने पहली बार इस मामले में रुचि ली. उनकी अगुवाई में वृहद पीठ ने 13 अगस्त, 2015 को मामले की सुनवाई की, जो इतनी हंगामेदार रही कि इसके बाद आज तक इस पर जिरह नहीं हो पाई है.

हुआ यूं कि प्रतिमा के विरोध में याचिका दायर करने वाले पीएल मीमरोठ की ओर से अधिवक्ता अजय कुमार जैन ने जैसे ही हाईकोर्ट परिसर में मनु की प्रतिमा पर सवालिया निशान लगाना शुरू किया, बड़ी संख्या में वकीलों ने उनकी मुखालफत शुरू कर दी. इनमें से कई जोर-जोर से चिल्लाने लगे.

न्यायाधीश सुनील अंबवानी ने वकीलों को शांत करने के काफी प्रयास किए, लेकिन उन्हें इसमें कामयाबी नहीं मिली. अंत में वे उठकर चले गए. इस दिन के बाद इस मामले में आज तक सुनवाई नहीं हुई है. हाईकोर्ट के वरिष्ठ वकीलों की मानें तो यह मामला मधुमक्खी के छत्ते जैसा है, जिसमें शायद ही कोई न्यायाधीश हाथ डाले.

याचिकाकर्ता पीएल मीमरोठ कोर्ट के इस रवैये से परेशान हैं. वे कहते हैं, ‘न्याय में देरी एक तरह से अन्याय होता है. इस मामले को कोर्ट में चलते हुए 29 साल हो गए हैं. कोर्ट न्याय करने की बजाय कहता है कि जब इस विषय पर किसी प्रकार का जनाक्रोश नहीं परिलक्षित होता है तो बेवजह गड़े मुर्दे क्यों उखाड़े जा रहे हैं.’






......................

Friday, May 1, 2020

निवडणूक आयोगानुसार दत्तोपंत ठेंगडींचे पुस्तक म्हणजे निव्वळ थापा- रा.स्व.संघ 18











संघाच्या लबाड्या ३: निवडणूक आयोगानुसार दत्तोपंत ठेंगडींचे पुस्तक म्हणजे निव्वळ थापा- प्रा. हरी नरके

संघाचे वरिष्ठ नेते, समरसता मंचाचे संस्थापक दिवंगत दत्तोपंत ठेंगडी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिलेले पुस्तक म्हणजे निव्वळ थापा असल्याचे एव्हाना आम्ही वेगवेगळे पुरावे देऊन सिद्ध केलेले आहेच. ते पुरावे खुद्द बाबासाहेबांच्या साहित्यातले असल्याने त्यांची विश्वासार्हता १००% आहे. १९५२ च्या निवडणुकीत जनसंघाबरोबर बाबासाहेबांच्या शेकाफे पक्षाची युती होती असा दावा दत्तोपंत /संघ करतात. त्यासाठी दत्तोपंत ठेंगडी यांच्या या पुस्तकाची साक्ष काढली जाते. संघाचे दत्तोपंत यांचे हवाले म्हणजे निव्वळ हवेतल्या बाता असल्याचे पुरावे खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यातून आणि संसदेच्या दस्तऎवजांमधून आपण दिलेले असून ते यापुर्वीच्या लेखांमधून आपण बघितलेलेच आहे..
याशिवाय आता आणखी एक नवा पुरावा पुढे आलेला आहे. निवडणूक आयोगाकडची १९५२ च्या निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी सांगते की या जनसंघ आणि बाबासाहेबांचा शेकाफे हा पक्ष या दोन पक्षात निवडणूक युती नव्हती.


जेव्हा दोन पक्षात युती असते तेव्हा प्रत्येक मतदारसंघात दोघांपैकी एकाचाच उमेदवार उभा असतो. म्हणजे त्यावेळच्या मध्यप्रांतात प्रत्येक मतदार संघात एकतर जनसंघाचा उमेदवार हवा किंवा शेकाफेचा. यालाच युती म्हणतात ना?

पण मध्यप्रदेशात असे असंख्य मतदारसंघ होते की जिथे जनसंघ व शेकाफे दोघांचेही उमेदवार उभे होते. याला युती म्हणत नाहीत.

या निवडणुकीत उदा. काटोल, ब्रह्मपुरी, हिंगना, कम्पति, नागपुर-१ आणि महासमुंद आदी विधानसभा जागांवर शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन आणि भारतीय जनसंघ दोघांचेही उमेदवार एकमेकांविरूद्ध उभे होते. दोघांनाही मतं पडली असे निवडणुक आयोगाचे दप्तर सांगते. हे निवडणूक आयोगाचे आकडे असल्याने त्यावर सर्वांना विश्वास ठेवणे भागच आहे. बरं १९५२ साली इव्हीएम मशिन्स नव्हत्या बरं का!



संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR3MpmLYDr8JaKOvKzdrTvyl-ZW-FFGn3lr9VY9OA_3BlbqVT20NEOqkO04

प्रा.हरी नरके, २ मे २०२०

[संदर्भासाठी पाहा- अरविंद कुमार, https://hindi.theprint.in/opinion/the-election-commission-data-exposes-the-alleged-proximity-of-ambedkar-and-the-rss/134455/?fbclid=IwAR3aa7-C8dlLF7sFlBjPifZ2pnj_BzYq3mugktqanT7LTDMNYx1yvFqbu_o ]

डॉ. आंबेडकरांचे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील योगदान उपेक्षित का? भीमजयंती 20/8



















डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील योगदान उपेक्षित का?- प्रा. हरी नरके

आज ६० वा महाराष्ट्रदिन साजरा होत असताना मुंबईतील १०५ हुतात्मे, आंदोलनाचे प्रमुख नेते एसेम जोशी, आचर्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, श्री. अ. डांगे, अण्णाभाऊ साठे, सेनापती बापट यांची आठवण काढली जाणे स्वाभाविक आहे. मात्र या लढ्यातले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महत्वपुर्ण योगदान विसरले जाते. हे मुद्दाम होते की अनवधानाने ते शोधावे लागेल. मुंबई कोणाची? गुजरातची की महाराष्ट्राची हा वाद पेटला असताना तमाम बुद्धीजिवी मुंबई गुजरातची किंवा स्वतंत्र अशी भुमिका मांडत होते. तेव्हा एकट्या बाबासाहेबांनी मुंबई महाराष्ट्राचीच असे सबळ पुराव्यांनिशी सिद्ध केले हे त्यांचे योगदान बुद्धीजिवी लोक का दुर्लक्षित ठेवतात?

बाबासाहेबांनी १९४८,१९५३ आणि १९५५ साली या विषयावर संशोधनपर लेखन केले. ते इतके बिनतोड होते की गुजराती लॉबी आणि मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू पाहणारी,मुंबईला स्वतंत्र राज्य बनवा म्हणणारी मंडळी यांची बोलतीच बंद झाली. नेमका काय होता बाबासाहेबांचा हा युक्तीवाद?

मुंबईतील व्यापार, उद्योग आणि आर्थिक विश्व गुजरात्यांच्या ताब्यात असल्याने मुंबई गुजरातची तर मुंबई ना महाराष्ट्राची ना गुजरातची, ती स्वतंत्रच हवी म्हणणारे काय दावा करीत होते, त्यांचा तो दावा बाबासाहेबांनी कसा खोडून काढला ते बघूयात.

बाबासाहेबांनी त्यांच्यासमोर नऊ प्रश्न उभे केले.
१. मुंबई कधीच महाराष्ट्रात नव्हती याला पुरावा काय आहे?
२. मुंबई मराठा राज्याचा हिस्सा नव्हती असे कशाच्या आधारावर म्हणता?
३. मराठी भाषकांची लोकसंख्या मुंबईत सर्वाधिक नव्हती असे कसे म्हणता येईल?
४. काय गुजराती हे मुंबईचे मूळचे रहिवासी आहेत की गुजरातचे?

५. मुंबई हे व्यापारी बेट असल्याने ते एकट्या महारष्ट्राचे नाही तर ते सर्व भारताचे आहे या म्हणण्यात कितपत तथ्य आहे?
६. मुंबईचा व्यापार-उदीम गुजरात्यांनी उभा केलाय, मराठी लोक हे फक्त हमाल आणि कारकून आहेत, म्हणून मुंबईला महाराष्ट्रात घालू नये हा दावा किती टिकाऊ आहे?
७. मुंबईच्या कमाईवर, नफ्यावर जगता यावे, आयते खाता यावे यासाठी महाराष्ट मुंबईवर दावा करतोय हे खरे आहे काय?
८. बहुभाषिक राज्य चांगले असते कारण तिथे अल्पसंख्यक भाषकांना अभय असते हे बरोबर आहे काय?

९. राज्यांची पुनर्रचना रॅशनल असावी, नॅशनल नको हा दावा योग्य आहे काय?

याची उत्तरे देताना बाबासाहेबांनी इतिहास आणि भुगोल असे दुहेरी पुरावे समोर ठेवले.

चालुक्य आणि शिलाहार राजांपासूनचे ऎतिहासिक पुरावे सांगतात की गुजरातवर मराठ्यांनी राज्य केले, गुजरात्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलेले नाही. अरबी समुद्रालगतचा भुगोल सांगतो की मुंबई महाराष्ट्राचे अविभाज्य अंग आहे, गुजरातचे नाही. मध्ययुगीन मराठा राजवटी या प्रामुख्याने जमिनीवर राज्य करायच्या, समुद्रावर नाही, म्हणून मुंबई मधला काही काळ मराठा साम्राज्यात नसल्याने काहीच बिघडत नाही.

बाबासाहेब पुढे म्हणतात, १९४१ च्या जनगणनेनुसार मुंबईत मराठी भाषकांची लोकसंख्या ५१ टक्के होती. आहे. ब्रिटीशांचे राज्य आल्यापासून सार्‍या भारतातून लोक रोजगार,व्यापार,उदीम यासाठी मुंबईत आले. वसले. त्यांचे मराठी माणसांनी स्वागत केले हा त्यांचा गुन्हा झाला काय?

बाबासाहेबांनी हे सिद्ध केले की गुजराती मूळचे मुंबईचे नाहीत तर गुजरातचे आहेत. जसे पोर्तुगिज, ब्रिटीश, फ्रेंच, डच मुंबईत स्वत:हून आले तसे गुजराती आलेले नाहीत. तर ब्रिटीशांनी त्यांना " मध्यस्थ-दलाल" म्हणून काम करण्यासाठी मुंबईला बोलावून घेतले. ब्रिटीशांनी गुजराती व्यापार्‍याबरोबर केलेला लेखी करारच बाबासाहेबांनी पुढे मांडला. १६७१ सालचा म्हणजे शिवरायांच्या काळातले हे करारपत्र आहे. शिवाय महाजनसभा आणि ब्रिटीश यांच्यातील पत्रव्यवहार त्यांनी समोर आणला. त्यानुसार, गुजरात्यांना राहण्यासाठी, व्यापारासाठी, गुदाम अणि कारखाने काढण्यासाठी फुकट जमिन देण्यात आली. व्यापारात करसवलत देण्यात आली. जहाजे आणि मालमत्तेला संरक्षण पुरवण्यात आले.

तेव्हा कुठे ते गुजरातमधून मुंबईत आले आहेत याचे लिखित पुरावेच बाबासाहेबांनी विरोधकांच्या तोंडावर मारले. हा प्रहार गुजरात्यांच्या वर्मी लागला. 

मुंबईत जसा त्यांनी व्यापार उदीम केला तसाच तो त्यांनी कलकत्त्याला केलेला आहे. शिवाय बिहारच्य खाणीतही ते मालक आहेत. म्हणून कलकत्ता किंवा खाणींचा भाग असलेला बिहार गुजरातला जोडणार काय?

मुख्य मुद्दा आहे तो मुंबईला पाणी कोण पुरवतो? गुजरात की महाराष्ट्र?
ज्या विजेवर हे  व्यापार, उदीम, कारखाने चालतात ती वीज कुठून येते महाराष्ट्रातून की गुजरातमधून? 
कामगार शक्ती कुठली आहे?

आणि म्हणून वीज,पाणी, कामगार शक्ती महाराष्ट्राची तर मुंबईवर मालकी महाराष्ट्राचीच.
अशा रितीने सर्वच्या सर्व नऊ प्रश्नांची उत्तरे फाडफाड तोंडावर फेकून त्यांनी गुजरात्यांची बोलतीच बंद केली. हा सगळा भाग बाबासाहेबांच्या पुस्तकांमधूनचा तुम्ही वाचायला हवा.

पुराव्यांचे बळ, संशोधनाची ताकद आणि साधार, तर्कशुद्ध युक्तीवाद यांची फौज बाबासाहेबांनी महाराष्ट्राच्या बाजूने उभी केली तेव्हा कुठे मुंबई महाराष्ट्राला मिळाली.

आज पुन्हा एकदा केंद्रातील काही गुजरात्यांचा मुंबईवर डोळा आहे. अशावेळेला मराठी माणसाला आणि मुख्य म्हणजे मुंबईला त्यांच्या तावडीतून बाबासाहेबांचे हे साहित्यच वाचवू शकते.

बाबासाहेबांचे भाषावार प्रांतरचनेत एव्हढे मोठे डोंगराएव्हढे योगदान असताना रा.स्व.संघाचे कृष्ण गोपाल शर्मा बिनधास्त सांगतात, भाषेच्या आधारावर राज्यं बनवायला आंबेडकरांचा विरोध होता. ह्या फेकुगिरीचं काय करायचं?


मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आला त्यामागे जशी हुतात्म्यांचे, चळवळीतल्या आधी सांगितलेल्या नेत्यांचे योगदान आहे, तितकेच मोठे योगदान या लढाईत दोन मौलिक ग्रंथ लिहिणार्‍या  बाबासाहेबांचेही आहे. त्यांची आठवण महाराष्ट्राने जशी ठेवायला हवी तशीच ती बाबासाहेबांचीसुद्धा ठेवायला हवी.

-प्रा. हरी नरके, १ मे २०२० महाराष्ट्र दिन

संदर्भ- 1. Dr Babasaheb Ambedkar, Maharashtra as a Linguistic Province, 1948
2. Dr Babasaheb Ambedkar, Need for Checks and Balances, The Times of India,23 Apr. 1953
3. Dr Babasaheb Ambedkar, Thoughts on Linguistic States, 1955
4. Dr Babasaheb Ambedkar : Writings and Speeches, Vol.1, Govt of Maharashtra, Mumbai, 14 Apr.1979