Sunday, May 3, 2020

रा.स्व.संघ 20/ व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे : मनू










रा.स्व.संघ 20/ व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे : मनू : मनू संतांच्या एक पाऊल पुढे, मनोहर भिड्यांनी संतांचा केला अपमान-प्रा.हरी नरके


महाराष्ट्राची जडणघडण करण्यामध्ये संतविचारांचा फार मोठा वाटा. न्या.रानडे ते प्रा.गंबा.सरदार यांनी संतसाहित्याची सामाजिक आणि राजकीय फलश्रुती समाजाऊन सांगितलेली आहे. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य उभारणीची पुर्वतयारी संतांच्या प्रबोधनपर विचारांनी केली होती हे न्या.म. गो.रानडे यांनी " मराठा सत्तेचा उदय" या ग्रंथात सप्रमाण मांडलेले आहे. संघाचे चेले मनोहर भिडे उठताबसता शिवछत्रपतींचे नाव घेत असतात आणि तरीही ते संतांचा धडधडीत अपमान करतात. दोन वर्षांपुर्वी भिड्यांनी जेव्हा संतांचा अवमान करणारी मुक्ताफळं उधळली तेव्हाच मी भिड्यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. त्यांनी देहू-आळंदीहून पंढरपूरला जाणार्‍या वारीत पुण्यात तलवारधारी झुंडी घुसवल्या होत्या. वारकरी चळवळ ताब्यात घेण्याचा त्यांच हा डाव वारकर्‍यांनी उधळून लावला.

महाराष्ट्राला पहिल्यांदा शिवराय सांगितले फुल्यांनी .त्यांना तर भिडे देशद्रोही म्हणतात. १९०६ कुणबी मराठा कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी ६०० पृष्ठाचे मौलिक शिवचरित्र लिहिले त्याचा उल्लेखसुद्ध भिडे करीत नाहीत. भिड्यांना शिवरायांच्या नावाचा गैरवापर करून मराठा-बहुजन मुलांची टाळकी संमोहित करून पेशवाईच्या सावलीत न्यायची आहेत.

भिड्यांचे शिवराय रयतेचे राजे नाहीत, ते शेतकरी, कुणबी, मावळ्यांचे उद्धारकर्ते नाहीत तर ते गोब्राह्मण प्रतिपालक, रात्रंदिन परधर्मद्वेश शिकवणारे, युवकांची माथी भडकावणारे, आधुनिक काळातून पुन्हा विषमतावादी ब्राह्मणी, वैदीक राज्यात नेऊ पाहणारे भिडेवादी शिवराय आहेत. त्यावर सविस्तर लिहिणारच आहे. आज भिड्यांना पुजनीय असणार्‍या मनूची काही मतं बघूयात.

मनू म्हणतो,
" व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे." [ अध्याय ९ वा श्लोक १९]
" लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे." [५/१५२]
" पती सदाचारशून्य असो, तो दुसर्‍या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी." [५/१५४]
" स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्या चा भोग घेतात." [९/१४]
" पुरूषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावत: स्नेहशून्य असतात. [9९/१५]
" नवर्‍याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची मालकी कायम राहते."[९/४६]
................................

"मनुस्मृती" हा संस्कृत भाषेतील प्राचीन ग्रंथ बारा अध्यायांचा असून त्यात २६८४ श्लोक आहेत. हा ग्रंथ कधी लिहिला गेला यावर विद्वानांमध्ये मतभेद आहेत. मनू एक की अनेक यावरही वाद आहेत. मनू ही व्यक्ती होती की संस्था [मठ/परंपरा] याबद्दलही भिन्न मतं आहेत. इ.स.पुर्व १७५ ते इ.स.१७५ या साडेतीनशे वर्षात हा ग्रंथ विकसीत झाला असावा असे तज्ञ सांगतात. तशा हिंदूंना प्रमाण असलेल्या एकुण स्मृती १३७ असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदु कोड बिलाच्या चर्चेत संसदेत सांगतात. त्यात सर्वाधिक महत्वाच्या म्हणून मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, पाराशर स्मृती या मानल्या जातात. मनुस्मृती ही शेकडो वर्षे भारतीय समाजाची जणू राज्यघटनाच होती. अगदी ब्रिटीश भारतातसुद्धा इंग्रज न्यायालये कौटुंबिक कलहांमध्ये   मनुस्मृतीच्या आधारेच निकाल देत असत. मनुस्मृती हा फक्त धर्मग्रंथ नव्हता तर तो कायद्याचा ग्रंथ होता. त्याला धर्मशास्त्र असेही म्हटले जाई. बाबासाहेब त्याचा धर्मिक व राजकीय प्रभाव सांगताना ते लिगल आणि पिनल कोड होते असे नेमके शब्द वापरतात. 

" सार्थ श्रीमनुस्मृती" हा मूळ संस्कृत श्लोकांसह त्यांचा मराठी अनुवाद देणारा ग्रंथ वेदशास्त्रसंपन्न विष्णुशास्त्री बापट यांचा आहे. हा ग्रंथ जिज्ञासूंनी अवश्य वाचायला हवा. विशेषत: सर्व समाजातील स्त्रिया आणि माळी, मराठा, साळी, तेली, कुणबी, वंजारी, आगरी, भंडारी, शिंपी, सोनार, सुतार, नाव्ही आदींनी आवर्जून वाचायलाच हवा.

संस्कृत पाठशाळा चालवणारे बापटशास्त्री या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये लिहितात, " मनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे व त्याची योग्यता इतर कोणत्याही स्मृतीपेक्षा अधिक आहे. सनातन धर्माचा जीव असे जे चार आश्रम व चार वर्ण त्यांची व्यवस्था या स्मृतीमध्ये जशी स्पष्ट दिसते तशी ती वेदांमध्ये आढळत नाही...स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांचा या स्मृतीमध्ये पूर्णपणे विचार केलेला आहे. "

मनुस्मृतीवर मेधातिथी, सर्वज्ञनारायण, कुल्लकभट्ट, राघवानंदसरस्वती, नंदन,रामचंद्र, गोविंदराज, श्रीमाधवाचार्य, धरणीधर, श्रीधरस्वामी, रूचीदत्त, विश्वरूप, भोजदेव व भारूचि अशा एकंदर चौदा महापंडितांनी निरनिराळ्याकाळी केलेल्या चौदा टिका सर्वमान्य आहेत.

या सर्व टिकांचे आठ खंड भारतीय विद्या भवनने प्रकाशित केलेले आहेत. ते मी वाचलेले आहेत. पॅट्रीक वोलिव्हेल [ Patrick Olivelle] यांनी वर्षानुवर्षे संशोधन करून मनुस्मृतीची प्रमाण [चिकित्सक] आवृ्त्ती तयार केलेली आहे. तिचे नावच "Manu's Code of Law: A Critical Edition and Translation of the Manava-Dharmasastra," असे असून हे पुस्तक  Oxford University Press ने प्रकाशित केलेले आहे. भारतरत्न पां.वा.काणे, यांचा पाच खंडांतील, आठ भागांचा, हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, पुणे 

डॉ. आ. ह. साळुंखे, आचार्य नरहर कुरूंदकर, डॉ. प्रदीप गोखले व भदन्त आनंद कौशल्यायन यांचे मनुस्मृतीवरचे ग्रंथ अतिशय मौलिक आहेत. ते कार्यकर्त्यांनी वाचलेच पाहिजेत.


महामहोपाध्याय बापटशात्रींचा मराठी अनुवाद पुढे देत आहे. [कंसात अध्याय व श्लोक क्रमांक दिलेला आहे.]

" सहज शृंगार चेष्टेने मोहित करून पुरूषांस दुषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे.यास्तव ज्ञानी पुरूष स्त्रियांविषयी कधी बेसावध राहात नाहीत." [२/१३]
" माता, बहीण व कन्या यांच्या बरोबरही पुरूषाने एकांतात बसू नये." [२/१५]
" ज्यांना फक्त मुलीच झालेल्या असतील त्यांच्या मुलींशी लग्नं करू नयेत." [३/८]
" जिला भाऊ नसतील तिच्याशी शहाण्याने विवाह करू नये." [ ३/११]
" ज्या कुळामध्ये पिता, पती द्वारा स्त्रियांची पूजा होत असते तेथील देवता प्रसन्न होतात." [३/५६]

" नवर्‍याने बायकोसोबत एका ताटात जेवन करू नये. तसेच पत्नीला जेवताना, शिंकताना, जांभई देताना पाहू नये." [४/४३]
" आता स्त्रियांचे धर्म सांगतो, ते ऎका- बाल्यावस्थेत मुलीने, तरूण स्त्रीने किंवा वृद्ध बाईनेही घरातील लहानसे कार्यही स्वतंत्रपणे करू नये." [५/४७]
" स्त्रीने कधीही स्वतंत्र होऊ नये." [५/४८]
" पिता, पती,पुत्र यांच्यावेगळी राहणारी स्त्री दुष्ट झाल्यास आपल्या दोन्हीं कुळांस निंद्य करते." [५/४९]
" पति जरी विरूद्ध असला तरी स्त्रिने प्रसन्न मुद्रेने असावे. गृहकर्मामध्ये दक्ष होऊन राहावे. घरातील सर्व भांडी तिने घासून पुसून स्वच्छ ठेवावीत." [५/१५०]

" लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे." [५/१५२]
" पती सदाचारशून्य असो, तो दुसर्‍या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी." [५/१५४]
" पतीची सेवा हेच पत्नीचे व्रत होय. तिचा यज्ञ होय. त्याच्या आज्ञेत राहाणे हाच तिचा स्वर्ग होय." [५/१५५]
" स्त्रियांनी पहिला पती वारला तरी कधीही दुसरा नवरा करू नये." [५/१६२]
" स्त्रीधर्माप्रमाणे मन, वाणी, देह, यांच्याद्वारे जी आपली पतीची कायम सेवा करते तिलाच स्वर्ग मिळतो." [५/१६६]

" पहिली पत्नी वारली तर तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे." [५/१६८]

" पिता,पती, आप्त यांनी स्त्रियांस सर्वदा आपल्या आधीन ठेवावे. सामान्य विषयांमध्ये त्या आसक्त झाल्यास त्यास आपल्या वश करून घ्यावे." [६/२]
" विवाहाच्या पुर्वी पित्याने, त्यानंतर पतीने, म्हातारपणी पुत्राने तिचे रक्षण करावे. सारांश कोणतीही स्त्री स्वातंत्र्यास पात्र नाही.योग्य नाही." [ ६/३]
" स्त्रीसाठी मद्यपान, दुर्जनसमागम, पतीपासून दूर राहणे, इकडे तिकडे भटकणे, अयोग्य वेळी निजणे, दुसर्‍याच्या घरी राहणे हे सहा व्याभिचारदोष होत." [९/१३]
"स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्या चा भोग घेतात." [९/१४]
"पुरूषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावत: स्नेहशून्य असतात. [९/१५]

" स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही. स्मृतींचा नाही. धर्माचा नाही. त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीत. त्या अशुभ असतत." [९/१८]
" व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे." [९/१९]

" नवर्‍याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची मालकी कायम राहते."[९/४६]

तर संघाच्या मनोहर भिड्यांना मनुस्मृतीचे असे राज्य पुन्हा हवेय. लक्षात ठेवा या राज्यात सर्व स्त्रिया आणि मराठा, माळी, साळी, कुणबी, आग्री, भंडारी, वंजारी, तेली हे सर्व बलुतेदार, शूद्र तसेच अनुसुचित जातींचे लोक यांना गुलामाचे जीवन जगावे लागेल. अंधारीगुहा आणि वेठबिगारी करावी लागेल.हवेय असे राज्य तुम्हाला? या पोस्टवर प्रतिक्रिया लिहिताना मनु वा मनोहर भिडे यांच्याबद्दल संसदीय भाषाच वापरावी. शिवीगाळ करण्यामुळे मुद्दे मागे पडतात,त्यातनं आपलंच नुकसान होतं हे लक्षात ठेवा.
विशेषत: माझ्या फेसबुक मित्रयादीतील मैत्रिणी, भगिनी, मुली, माता यांची यावर काय मतं आहेत ते जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. 
संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.  https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR0sHk873-gdTIHynAQXFnSMvawoIdspxcQeYgXosgHDQ8gAkqOlEiycF7w


-प्रा.हरी नरके, ४/५/२०२०
[लेखक भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. लेखात व्यक्त झालेली मतं लेखकाची व्यक्तीगत मतं आहेत.]


संदर्भ-
१. सार्थ श्रीमनुस्मृती," मराठी अनुवाद, वेदशास्त्रसंपन्न विष्णुशास्त्री बापट, गजानन बुक डॆपो, कबुतर खाना,दादर,मुंबई, भरत नाट्य मंदीर,पुणे
२. Olivelle, Patrick (translator) (2004), The Law Code of Manu, Oxford World's Classics, Oxford University Press, ISBN 978-0-19-280271-2
३. Olivelle, Patrick (translator) (2005), Manu's Code of Law: A Critical Edition and Translation of the Manava-Dharmasastra, Oxford University Press, ISBN 978-0-19-517146-4
४. Olivelle, Patrick (translator) (1999), The Dharmasutras: The Law Codes of Ancient India, Oxford World's Classics, OUP Oxford, ISBN 978-0-19-283882-7
५. भारतरत्न पां.वा.काणे, हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, पुणे
*** डॉ. आ. ह. साळुंखे, आचार्य नरहर कुरूंदकर, डॉ. प्रदीप गोखले व भदन्त आनंद कौशल्यायन यांचे            मनुस्मृतीवरचे ग्रंथ
*** मनुस्मृतीवरील मेधातिथी, सर्वज्ञनारायण, कुल्लकभट्ट, राघवानंदसरस्वती, नंदन,रामचंद्र, गोविंदराज, श्रीमाधवाचार्य, धरणीधर, श्रीधरस्वामी, रूचीदत्त, विश्वरूप, भोजदेव व भारूचि अशा चौदा महापंडितांनी केलेल्या चौदा टिका, आठ खंड, भारतीय विद्या भवन, मुंबई

No comments:

Post a Comment