Saturday, May 16, 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदिवासींसाठीचे मौलिक योगदान - प्रा. हरी नरके














डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदिवासींसाठीचे मौलिक योगदान - प्रा. हरी नरके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामी करणारे हिंदुत्ववादी खोडसाळपणे असे सांगतात की त्यांनी आदिवासींसाठी काहीच केले नाही. केले ते फक्त स्वत:च्या जातीसाठी. आदिवासींचा बुद्धीभेद करण्यासाठी त्यांचे एखादे वाक्य संदर्भापासून तोडून विकृत करून समोर ठेवले जाते. आणि अफवा तंत्र वापरून ही कुजबूज गॅंग विष पसरवित राहते. 

तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदिवासींसाठीचे मौलिक योगदान काय होते, आहे याची वस्तुस्थिती आपण पुराव्यांनिशी बघूयात.


१] " अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट " हा ग्रंथ म्हणजे बाबासाहेबांचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ. मास्टरपिस. १९३६ सालच्या या पुस्तकात बाबासाहेबांनी संपुर्ण एक प्रकरण आदिवासींच्या समस्या, वेदन, दु:ख आणि ते दूर करण्याचे मार्ग यावर लिहिलेले आहे. त्यात ते म्हणतात, " भारतीय आदिवासींना आज दु:खाच्या, गुलामीच्या अंधार्‍या गुहेत जनावराचे जीवन जगायला भाग पाडण्यात आलेले आहे. त्यातल्या काहींवर तर गुन्हेगारीचा शिक्का मारण्यात आलेला आहे. या आपल्याच बांधवांना जनावरासारखे वागवताना हिंदुंना त्याची लाजसुद्धा वाटत नाही. असे उदाहरण जगात दुसरे सापडणार नाही. कोट्यावधी आदिवासींना शिक्षण, आरोग्य, आधुनिक रोजगार, इतर नागरी सुविधांपासून वंचित ठेवणारी ही जातीव्यवस्था भयंकर आहे. कसल्या संस्कृतीच्या आणि उच्चत्वाच्या गप्पा मारतात हे वैदीक लोक? या फक्त बढाया आहेत. यांना थोडीजरी लाजशरम असेल तर या बांधवांना ते जवळ करतील. लाजिरवाण्या मागास अवस्थेतून त्यांना बाहेर काढून सन्मानजनक जीवन मिळावे यासाठी झटतील. त्यांच्यात जाऊन राहा. त्यांना आपले म्हणून स्विकारा. ही आपुलकीची भावनाच त्यांना मागासपणातून, रानटी आयुष्यातून बाहेर काढायला उपयोगी पडेल. पण जातीग्रस्त हिंदू तसे करीत नाहीत. प्रत्येक उच्चजातीय हिंदू माणूस आपली जात जपण्यासाठी राबणारा चिंतातूर जंतुच बनलेला असतो. या पतित मानव्याबद्दल वैदीकांना ना शरम ना लाज. वैदीकांची मानसिकता अत्यंत गलिच्छ आहे. देशबांधवांप्रती कर्तव्यभावना नसलेले हे निर्लज्ज वैदीक.

उद्या जर अहिंदूंनी, ख्रिश्चन मिशनर्‍यांनी त्यांना जवळ केले, त्यांच्यात सुधारणा घडवल्या, धर्मांतर करवले तर अहिंदुंच्या संख्येत मोठी भर पडेल आणि याची संपुर्ण जबाबदारी वैदीक आणि त्यांची घृणास्पद जातीव्यवस्था यावर असेल." ***

२] आदिवासी बांधवांच्या दु:खावर प्रकाश टाकणारा बाबासाहेबांचा हा मजकूर इतका बोलका आहे की त्यावर कोणतेही अधिक भाष्य करायची गरजच नाही. मला सांगा, आदिवासी भावंडांबद्द्ल कळवळा असल्याशिवाय असे घनाघाती आणि वैदीकांच्या थोबाडीत चपराक मारणारे लेखन शक्य आहे काय? लक्षात ठेवा हे लेखन ८४ वर्षांपुर्वीचे आहे. तोपर्यंत एकाही हिंदूने वा वैदीकाने आदिवासींबद्दल असे लेखन केलेले नव्हते. म्हणे बाबासाहेब आदिवासींना विसरले. बुद्धीभेद करणारे हे **वे दुसरे काय करु शकतात?

३] १९२७ साली बाबासाहेब मुंबई प्रांताचे आमदार झाले. त्यांनी ताबडतोब अनु. जाती, अनु. जमाती व ओबीसी यांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी सरकारला कमिशन नेमायला लावले. स्वत: गावोगाव फिरून,पाड्या - झोपड्यांवर जाऊन सर्व्हेक्षण केले. तीन वर्षे [१९२८ ते १९३०] धांडोळा घेऊन या ओ. बी. एच. स्टार्ट कमिशनचा रिपोर्ट बाबासाहेबांनी तयार केला. त्यात आदिवासी बांधवांना घटनात्मक संरक्षण आणि शिक्षण, आरोग्य, रोजगाराची व्यवस्था व नागरी सुविधा-सवलती सरकारने द्याव्यात अशी मागणी पहिल्यांदा केली. ती शिफारस ब्रिटीश सरकारला मान्य करायला लावली. 

४] त्यामुळेच महाराष्ट्र राज्यात [मुंबई प्रांत] प्रथमच समाज कल्याण बोर्ड व स्वतंत्र समाज कल्याण खाते सुरू झाले. आदिवासींसाठी वसतीगृहे, आश्रमशाळा, शिष्यवृत्त्या सुरू झाल्या. आज जे पहिल्या-दुसर्‍या पिढीतले आदिवासी नेते दिसताहेत हे त्यातनं तयार झालेले आहेत. आणि म्हणे बाबासाहेब आदिवासींना विसरले. कृतघ्न वैदीक.

५] १९३५ च्या इंडीया अ‍ॅक्टमध्ये आदिवासींना फारसे हक्क दिले गेले नाहीत. पण हा कायदा बाबासाहेबांनी तयार केलेला नाही. तो ब्रिटीशांनी केला. त्यावेळी ज्यांच्याकडे देशाचे नेतृत्व होते, ते त्यात
कमी पडले. मग पावती बाबासाहेबांच्या नावावर का फाडताय?

६] राज्यघटना लिहिताना बाबासाहेबांनी देशातील आदिवासींसाठी सर्वाधिक घटनात्मक संरक्षण पुरवले जाईल अश्या तरतुदी केल्या. भारतीय संविधानाचे कलम १३ ते ५१ आणि कलम ३३० ते ३४२ व ३७१ बघा म्हणजे तुमच्या डोक्यात प्रकाश पडेल.

७] शैक्षणिक आरक्षण, सरकारी नोकर्‍यातील राखीव जागा, ग्रामपंचायत ते संसदेतले आरक्षण, ट्रायबल एरियासाठी स्वतंत्र तरतुदी, बजेटमध्ये राखीव निधी, आदिवासी संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी, तिच्यातील योग्य गोष्टींचे जतन करण्यासाठी संस्थात्मक काम एव्हढे सारे करूनही जर वैदीक बाबासाहेबांबद्दल अपप्रचार करीत असतील तर विधायक-सकारात्मक प्रपोगंडा करण्यात आम्ही आंबेडकरवादी कमी पडलोय. 

आमचं कसंय ना, आमचे झाले थोडे नी व्याह्याने धाडले घोडे. आमचेच प्रश्न डोंगराएव्हढे. तेच सोडवता सोडवता आमचं कंबरडं मोडलेलं. काय सांगावं? आधीच्या पिढ्यांना दोष तरी कसा द्यावा.

तेज्याबाला, फेसबुक्यांचं बरंय, उठसूठ कुणावर तरी पावती फाडून मोकळं व्हायचं. नुसते हे करा, नी ते करा असे फुकटचोट सल्ले देत राहायचं. बस्स झालं, हे उंटावरून शेळ्या हाकणं, प्रत्यक्ष कामात उतरा नी मग शहाजोग सल्ले द्या.

निदान आतातरी डोळे उघडा, " आमचे बाबासाहेब, आमचे बाबासाहेब" असं करीत बाबासाहेबांच्या पायाला लटकण्याऎवजी ते   "आपले बाबासाहेब"  "सर्वांचे बाबासाहेब " कसे होतील यासाठी काम करा. "भारतभाग्यविधाता" असलेल्या बाबासाहेबांच्या कार्याचे चांगल्या अर्थाने मार्केटींग करा नाहीतर ही हलकट विरोधी अफवा गॅंग आज आदिवासी, उद्या ओबीसी, परवा भटके विमुक्त, आणखी कुणीतरी यांचे कान खोट्या प्रचाराने भरतील आणि बघता बघता या समुहांना बाबासाहेबांच्या विचारांपासून तोडतील. उशीर व्हायच्या आत जागे व्हा मित्रांनो. आता चर्चा पुरे झाल्या. कामाला लागू या.
- प्रा. हरी नरके, १६/५/२०२०


*** संदर्भासाठी पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे, खंड १ ला, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९८९, पृ. ५२/५३

No comments:

Post a Comment