Monday, May 18, 2020

राजन खान, संजय आवटे यांना आचार्य अत्रे पुरस्कार- प्रा. हरी नरके








लेखक राजन खान, संपादक संजय आवटे आणि कलावंत भाऊ कदम यांना आचार्य अत्रे पुरस्कार- प्रा. हरी नरके 

मित्रवर्य राजन खान, संजय आवटे आणि भाऊ कदम यांचे आचार्य अत्रे पुरस्कारासाठी मन:पुर्वक अभिनंदन. राजन खान हे मराठीतले दणकट लिहिते लेखक आहेत. संजय आवटे हे सव्यसाची पत्रकार-संपादक आहेत. "चला हवा येऊ द्या" या अफाट लोकप्रिय मालिकेद्वारा तुफान लोकप्रियता मिळवलेले भाऊ कदम हे टिव्ही व चित्रपट क्षेत्रातील गुणी कलावंत आहेत.

राजन खान यांनी कादंबरी आणि कथेच्या प्रांतात दमदार योगदान दिलेले आहे. अक्षर मानव या अनेक क्षेत्रात महत्वाची कामगिरी करणार्‍या संस्थेचे ते संस्थापक आहेत. धडपड्या तरूणांचा फार मोठा संच त्यांनी अक्षर मानवच्या माध्यमातून उभा केलेला आहे. राजनसर अतिशय कल्पक आहेत. उत्तम संघटक आहेत. बोलायला कमालीचे स्पष्टवक्ते. पण फटकळ नाहीत. अध्यक्ष किंवा नियोजित कार्यक्रम पत्रिका नसलेले अभिनव साहित्य संमेलन ते गेली विसेक वर्षे घेत असतात. पुर्वी ते पाचगणीजवळच्या खिंगरला होत असे. भर पावसाळ्यात या संमेलनात धमाल येई. मी खूपदा ह्या संमेलनाला गेलोय. आता हे संमेलन फिरते असते. गेल्या वर्षीचे संमेलन भंडारदर्‍याला झाले. पाऊस इतका जास्त होता की संमेलनस्थळी गुडघ्याएव्हढे पाणी साठलेले. 

वळवाच्या पावसासारखा मुसळधार पाऊस तीन दिवस पडत होता. निवासाच्या सर्व खोल्यांमध्ये रांजन रांजण पाणी. तरिही संमेलन झाले. गाजले. दिवसाचे १२ ते १४ तास एकदम कडक, ताजी टवटवीत चर्चासत्रे झडतात. संमेलनाला आलेल्या सर्वांना बोलावे लागते. त्यामुळे नव्या लोकांचे ऎकण्याची ही संधी दुर्मिळ असते. मोलाची असते. रात्रभर राजनसरांशी रसरशीत गप्पा होतात. ते रात्र जागवतात. जुलै २०१९ च्या भंडारदरा संमेलनात राजनसरांसोबत रवींद्र पोखरकर,Ravindra Pokharkar,  राजेंद्र गलांडे, Adv. Rajendra Galande, सतीश इंदापूरकर, satish indapurkar, आळेफाट्याचे शिरिष भोर Shirish Bhor आणि मी सलग तीन रात्री गप्पांच्या पावसात भन्नाट भिजलो.

अफाट वाचन, श्रीमंत अभिरूची, स्वच्छ, साक्षेपी वैचारिक स्पष्टता, आणि कमालीचे तारतम्य यामुळे राजन सर आमचे हिरो आहेत. नेते आहेत. अक्षर मानवतर्फे त्यांनी शेकडो उत्तम पुस्तकं प्रकाशित केलीयत. अक्षर मानवचे इतके भन्नाट उपक्रम चालू असतात की एव्हढी क्रियाशील असलेली राज्यातली किंबहुना देशातली दुसरी संघटना, संस्था मला तरी माहित नाही.

इंदापूरला राजन सरांनी एका लेखकाच्या सोबत तीन दिवस हा उपक्रम केला. त्यासाठी माझी निवड केली. सलग तीन दिवस मी निवडक पण चोखंदळ साहित्यप्रेमींशी बोलत होतो. राजनसरांबद्दल आपुलकी नी आदर तर मुबलक आहेच. पण त्यांची नजर चोखंदळ असल्याने त्यांचा दराराही वाटतो. काही चुकलं तर सर सटकावायला बिलकूल कमी करणार नाहीत याची खात्री आहे. 

मित्रवर्य संजय आवटेंनी सकाळ, लोकसत्ता, लोकमत अशा अनेक वर्तमानपत्रांमध्ये पत्रकार, संपादक म्हणून दमदार कामगिरी केलीय. कृषीवल, पुढारी, मुंबई सकाळ, साम टिव्ही आणि आता दिव्य मराठीचे ते राज्य संपादक आहेत. त्यांनी अनेक नवोदितांना लिहिते केले. नवोन्मेशशाली प्रतिभांना वर्तमानपत्राचे व्यासपीठ पुरवले. त्यांच्या आग्रहामुळे मी कृषीवलमध्ये साप्ताहिक कॉलम लिहीला. या दिलदार संपादकाने अनेकदा माझा कॉलममधला लेख चक्क अग्रलेख म्हणून छापला आणि अतिथी संपादकीय लिहिण्याचा सन्मान माझ्यासारख्याला दिला. 

आवटे तुफान वक्ते आहेत. सोनाई व्याख्यानमालेला ते आलेले आहेत. तेव्हाचे त्यांचे घणाघाती भाषण आजही तळेगाव-शिक्रापूरचे श्रोते विसरलेले नाहीत. जे उत्तम वक्ते असतात ते चांगले लेखक असतातच असे नाही. दणकट लेखक अनेकदा फुसके वक्ते असतात. संजय आवटेंचा एक विशेष हा आहे की ते एकाचवेळी लोकप्रिय वक्ते आहेत आणि उत्तम लेखकही आहेत. त्यांचे अकरावे पुस्तक वाचायला मी उत्सुक आहे. आवटे उपक्रमशील संपादक आहेत. 

त्यांनी स्तंभ विचार परिषदांचा पाया घातला. कॉलमलेखकांच्या निवडक लेखांची पुस्तके काढली. स्तंभ विचार परिषदा आयोजित करणं हे खरं तर अवघड काम. पण अलिबाग, तारा, पुणे येथे त्यांनी मोजक्या सहकार्‍यांच्या मदतीने ह्या परिषदांचे झकास आयोजन केले.

विश्व मराठी साहित्य संमेलन कॅप्टन निलेश गायकवाड यांनी २०१६ ला भुतानला आयोजित केले होते. आवटेंमुळे मला या संमेलनाच्या उद्घाटनाचा सन्मान मिळाला. त्यांच्यासोबत केलेला सहकुटुंब 
भुतान दौरा केवळ अविस्मरणीय. संजय आणि अर्चना हे आमचे कौटुंबिक मित्र, सोयरे, सल्लागार आणि हितचिंतक आहेत. कोणत्याही अडीअडचणीला ते दोघेही धावून येतात. माझी पत्नी संगिता, मुलगी प्रमिती यांच्याशी त्या दोघांची दोस्ती माझ्यापेक्षा अधिक आहे. अर्चना नृत्यगुरू आहेत. उत्तम वाचक आहेत. अनेक पुस्तकं त्या आधी वाचतात आणि संजयला त्यातला निवडक भाग ब्रिफ करतात. त्यामुळे या दोघांचे सहवाचन आमच्यासाठी पथदर्शक ठरते.

२००६ साली संजय अकोल्याला लोकमतचे संपादक होते. तेव्हा त्यांनी एका परिषदेला अकोल्याला आलेल्या मला व आ. ह. साळुंखेसरांना लोकमत कार्यालयात निमंत्रित केले. स्टाफबरोबर गप्पा घडवून आणल्या. हाच पायंडा त्यांनी माझ्याबाबतीत कृषीवल, पुढारी, साम आणि दिव्य मराठीत कायम ठेवला. त्यांनी साम टिव्ही नावारूपाला आणला. त्यापुर्वी असे काही चॅनल असल्याचे लोकांना माहितच नव्हते.  संजय आवटॆंमुळे आधीचा " सामसुम टिव्ही" चक्क आघाडीचा चॅनल बनला. संजय प्रतिभावंत कॉपीरायटरही आहेत. सकाळची " उदय भविष्यपत्राचा " ही जाहिरात संजयने लिहिलेली आहे.

संजय अतिशय हरहुन्नरी आहे. त्यांचा स्वभाव अतिशय लाघवी आहे. ते गुणी संपादक, भन्नाट वक्ता आणि खमक्या विचारवंत आहेत. असा संजय आमचा सोयरा आहे याचा मला अभिमान वाटतो.

आचार्य अत्रे हे मराठीतले अफाट व्यक्तीमत्व. अत्र्यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वावर स्वतंत्रपणे लिहायला हवे. सासवडचे मित्रवर्य विजय कोलते आणि रावसाहेब पवार त्यांच्या नावाने गेली अनेक वर्षे हा पुरस्कार देत असतात. दहाएक वर्षांपुर्वी हा पुरस्कार मला मिळालेला आहे. तेव्हा माझ्या एका ऑस्ट्रेलियन मित्राने मला फोन करून एका बामणाच्या नावाचा पुरस्कार तू कसा काय स्विकारलास? असा मला जाब विचारला होता. त्याला मी सटकावले होते. अत्रेंनी महात्मा फुले हा राष्ट्रपती पुरस्कार विजेता चित्रपट काढला. त्याचा चित्रीकरण प्रारंभ बाबासाहेबांच्या हस्ते ३१ जाने १९५४ ला करवला. त्याला कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा, प्रबोधनकार ठाकरे, शाहीर अमर शेख, केशवराव जेधे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. हा चित्रपट त्यावेळी फारसा चालला नाही.

कारण " महात्मा फुले यांच्या जीवनावरचा म्हणून ब्राह्मणांनी बघितला नाही आणि एका ब्राह्मणाचा चित्रपट म्हणून बहुजनांनीही बघितला नाही," असे आचार्य अत्रे म्हणत असत. अत्र्यांचा शामची आई हा चित्रपट देशातल्या पहिल्या राष्ट्रपती सुवर्ण कमळ पदकाचा मानकरी ठरलेला. अत्र्यांनी पुणे नगरपालिकेत काम करताना पुण्याच्या रे मार्केटचे नामांतर महात्मा फुले मंडई असे केले. १९४१ साली बाबासाहेबांच्या वयाला ५० वर्षे झाली म्हणून अत्र्यांनी त्यांच्या नवयुगचा आंबेडकर विशेषांक काढला. ज्याकाळात सगळी मध्यवर्ती पत्रकारिता बाबासाहेबांना खलनायक म्हणून वाळीत टाकून होती, तेव्हा अत्र्यांनी केलेली ही कामगिरी मोलाची आहे. अत्र्यांचे बाबासाहेबांवरच्या मृत्यूलेखांचे आपले बाबा हे पुस्तक वाचनीय आहे.

अशा अत्र्यांचा नावाचा पुरस्कार मी मोलाचा मानतो.

संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR1X8BbmdkIc29QHNGeQhTBeoUUwE48xrLT_hKC-RL6zUAELRlkywFEehSA

-प्रा.हरी नरके, १८/५/२०२०

No comments:

Post a Comment