Monday, May 25, 2020

फुगवलेला भोपळा फुटणारच! - संजय आवटे



२०१९ मधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला सोडून दोन्ही कॉंग्रेसकडे शिवसेना येत होती, तेव्हा ती अनैसर्गिक तिघाडी ठरेल, असे मी म्हटले होते. (अर्थात, असे तिघे एकत्र येणे मला हवे होते आणि हे सरकार टिकणार, हेही ठावे होते. निकाल लागला त्याचदिवशी तसे भाकीत मी केले होते. पण, ते सोडा.) मुळात, शिवसेनेने भाजपसोबत निवडणूक लढवली होती. मोदींचे 'पोस्टर' तिथे महत्त्वाचे होते आणि देवेंद्रांचे कथित वलयही. मतदारांनी शिवसेनेला मत दिले नव्हते, तर युतीला दिले होते. असे असताना, भाजपला सोडून उद्धव दोन्ही कॉंग्रेससोबत आले.

एक वेळ, २०१४ च्या निवडणुकीनंतर हे घडले असते, तर ते समजण्यासारखे होते. कारण तेव्हा सगळे पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. पण, आता युती विरुद्ध आघाडी असा सामना असताना आणि युतीला सुस्पष्ट बहुमत मिळालेले असताना, उद्धव यांनी युती तोडली. त्याला कारण मुख्यमंत्रिपदाचे असो अथवा शिवसेनेने घेतलेला अपमानाचा सूड असो, पण त्या क्षणी विश्वासघात भाजपचा झाला, हे खरेच होते.

असा विश्वासघात भाजपने बिहारमध्ये केला किंवा अन्य अनेक राज्यांत काय उद्योग केले, ते संदर्भ म्हणून ठीक आहेच, पण तरीही देवेंद्र फडणवीसांविषयी एका मोठ्या वर्तुळात सहानुभूती निर्माण होऊ शकली असती! खुद्द ठाकरेंनाही देवेंद्रांच्या डोळ्यांना डोळे भिडवताना कदाचित कसरत करावी लागली असती.

मात्र, 'ती' घटना घडली.

देवेंद्रांचं गाढव तर गेलंच होतं. पण, राजभवनातल्या पहाटेच्या शपथविधीनं त्यांचं उरलंसुरलं ब्रह्मचर्यही गेलं! शिवसेनेनं केलेली तिघाडी अनैसर्गिक होती. मात्र, ती अवैध नव्हती. देवेंद्रांनी जे केलं ते अवैध, अनैतिक, अनैसर्गिक असं सगळं होतं.

त्यानंतर देवेंद्रांचा खरा पोपट झाला. नव्या आघाडी सरकारचा जो भव्य शपथविधी सोहळा शिवाजी पार्कात झाला, तिथे देवेंद्र आल्यानंतर त्यांची जी जाहीर थट्टा लोक करत होते आणि 'मी पुन्हा येईन' असे चित्कार त्या अंधारात उमटत होते, तेव्हा याची खात्रीच पटली.

मात्र, तरीही देवेंद्र सावरतील, अशी आशा होती.

राज्यातला सगळ्यात तरूण महापौर, विरोधी पक्षात असतानाचा तडाखेबंद नेता, पाच वर्षे राज्यातली प्रत्येक निवडणूक जिंकणारा मुख्यमंत्री, सर्व भाषांमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांवर बॅटिंग करणारा हजरजबाबी 'परफॉर्मर' अशा रुपात ज्यांनी देवेंद्रांना पाहिले, त्यांना ती आशा होतीच.

मात्र, 'बुडत्याचा पाय खोलात'प्रमाणे देवेंद्र आणखी खोलातच जात राहिले. नव्या सरकारचे अभिनंदन करण्याऐवजी विधिमंडळातून सभात्याग करत राहिले. काही दिवस गेले आणि 'कोरोना'चे संकट आले. कोणतेही संकट ही विरोधकांसाठी सगळ्यात मोठी संधी असते. कारण, सरकार कोणाचेही असो, आपत्तीच मोठी असेल, तर लोकांमध्ये अस्वस्थता असतेच.

ही तर जागतिक महामारी. अशावेळी देवेंद्र लोकांसोबत उभे राहिले असते, जनआंदोलनांसोबत उभे ठाकले असते, तर त्यांना जनाधार खरोखरच मिळू शकला असता. त्यांची 'संघ'टना स्वतःची नेहमीच ख्याती सांगत असते की, आपत्ती व्यवस्थापनासाठी ती नेहमी सज्ज असते. मग, देवेंद्रांनी काहीच कसे केले नाही! पुणे, पिंपरी, नागपूर, पनवेलसह ज्या महानगरपालिका त्यांच्याकडे आहेत, त्यांनी 'कोरोनामुक्ती'चे मॉडेल का नाही सिद्ध केले? ही अशी संधी होती की लोकांनी देवेंद्रांचे सगळे अपराध माफ करत त्यांना पुन्हा किमान 'नॉर्मल' स्थान तरी दिले असते.

पण, ज्या राजभवनाने त्यांना बदनाम केले, त्याच राजभवनाच्या अंगणात त्यांनी आपले रणांगण सुरू केले. 'राजभवन' आणि देवेंद्र यातच एक थट्टेचे सूत्र होते. देवेंद्र त्यात पुन्हा अडकत राहिले. मग, ठाकरेंच्या आमदारकीमध्ये मोडता घालणे असो की राजभवनातून मुख्यमंत्र्यांना त्रास देणे असो. त्यामुळे, उलटेच झाले.

लोकांना उद्धव यांच्याबद्दल सहानुभूती वाटायला लागली. तीन वेळा उद्धव यांच्या हातातोंडाशी आलेले मुख्यमंत्रिपद संकटात आले, पण अखेर ते सहीसलामत सुटलेच. पहिल्यांदा तेव्हा, जेव्हा शिवसेनेला सरकार बनवण्यासाठी राज्यपालांनी बोलावले आणि सेना तोंडावर आपटली. दुस-यांदा, उद्धव यांचे मुख्यमंत्री म्हणून नाव खुद्द शरद पवारांनी घोषित केले आणि तिकडे राजभवनात रातोरात हा खेळ झाला. आणि, तिस-यांदा म्हणजे आता, जेव्हा मुख्यमंत्र्यांची आमदारकीच अवघड झाली होती. पण, उभा महाराष्ट्र उद्धव यांच्यासोबत उभा राहिला आणि निर्विघ्नपणे ते मुख्यमंत्री झाले.

खरे तर, केंद्रातल्या सत्तेचा पुरेपूर वापर करत, 'कोरोना'च्या काळात देवेंद्रांनी लोकांच्या सोबत उभे राहायला हवे होते. पक्षीय राजकारणाला बाजूला ठेवत लोकांशी नाते जोडायला हवे होते. तसे करणे तर दूरच, उलट देवेंद्र वरचेवर अधिकच हास्यास्पद होत गेले. शिवाय, देवेंद्र, चंपा वगैरे मोजके वगळले तर बाकी भाजपचा कोणीही नेता चकार शब्द बोलत नाहीए.

सोलापूरचे सुभाष देशमुख यांच्यासारखा माजी मंत्री असो किंवा देवेंद्रांचे लाडके सदाभाऊ खोत किंवा देवेंद्रांच्या नादात आपले सगळेच गमावलेले महादेव जानकर असे मित्र असोत. रावसाहेब दानवेंसारखा हास्यनेताही चार हात दूर आहे.

नितीन गडकरी तर यात पडूही इच्छित नाहीत. उलट, रविवारी महाविकास आघाडीतील मंत्री नागपुरात गडकरींच्या अंगणात, म्हणजे घरी गेले. आणि, त्यांनी मिळून शेतक-यांशी ऑनलाइन संवाद साधल्याच्या बातम्या आहेत.

त्यामुळे, 'कॉमेडियन ऑफ द डिकेड' असा किताब एकट्या देवेंद्रांनाच मिळेल, अशी सगळी व्यवस्था झाली आहे. ('विनोद' नाव असलेल्यांनाही ती संधी नाही!) त्यांचे वर कोणी ऐकत नाही, असे म्हणावे तर, विधान परिषदेची उमेद्वारी आपल्याला हवी त्याला देवेंद्र देऊ शकतात. खडसे, पंकजा, बावनकुळे, तावडेंचा काटाही ते काढू शकतात.

पण, वाल्याचा वाल्मिकी करणा-या या पक्षात, या वाल्याला त्याच्या पापात सहभागी होणारा वाटेकरी मिळत नाहीए!

एकचालकानुवर्ती सत्तेच्या नशेत शत्रू, स्पर्धक, स्पर्धक ठरू पाहाणारे मित्र, टीकाकार असे सारेच संपवताना, भयाण संपलेपण स्वतः देवेंद्रांच्या वाट्याला आले आहे.

हेच ते देवेंद्र, जे अजिंक्य नव्हते केवळ, तर 'यशवंतराव चव्हाणांनंतरचा महाराष्ट्राचा सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री' अशा थाटात त्यांची वर्णने केली जात होती.

वसंतराव नाईकांनंतर, आपली टर्म पूर्ण करणारा एकमेव आणि मुख्यमंत्रिपदाची टर्म पूर्ण करणारा सर्वात तरूण असा मुख्यमंत्री तर देवेंद्र ठरलेच. पण नरेंद्रनंतर दिल्लीत देवेंद्रच अशी वल्गना सुरू झाली. (अमित शहांनी काय करायचं मग!) महाराष्ट्र हे काही छोटे राज्य नव्हे.

मोदी- शहांच्या गुजरातपेक्षाही मोठे. देवेंद्रांची प्रतिमानिर्मिती त्यामुळे आणखी जोरकसपणे होत होती. माध्यमे त्यासाठी दिमतीला होतीच. लोकांचा काय संबंध? 'इमेज मेकिंग' कंपन्या आणि माध्यमंच तर आता नेता उभा करतात! मग, स्वतःच्या प्रतिमेच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या देवेंद्रांच्या चुकांविषयी तेव्हा कोण कसा जाब विचारेल? महापुरात माणसं मरत असताना जनादेश यात्रा काढणा-या महापुरूषाला कोण बोलेल?

जो या प्रतिमेच्या विपरित बोलेल, तो वैरी!

'आपलीच प्रतिमा होते आपलीच वैरी' हे त्यांना तेव्हा समजले नाही. पण, त्यांची फुगवलेली ही प्रतिमाच त्यांचा कर्दनकाळ ठरली.
'मनी, मीडिया, मॅनेजमेंट आणि मार्केटिंग' या चार गोष्टींनी तुमची प्रतिमा भोपळ्यासारखी फुगेलही, पण कधीतरी भ्रमाचा हा भोपळा फुटल्याशिवाय राहात नाही.

मला विचाराल तर, गेल्या पाच वर्षांतले देवेंद्रांचे जे थोर 'पोर्ट्रेट' रंगवले गेले, ते तद्दन खोटे होते. पण, तेवढेच आज रंगवले जाणारे त्यांचे 'व्यंगचित्र'ही खरे नाही. 'नॉर्मल' देवेंद्र फडणवीस हा सरासरीपेक्षा अधिक क्षमता असणाराच राजकीय नेता आहे. फुगवल्यामुळे ही वेळ त्यांच्यावर आली असेलही, पण अद्यापही वेळ गेलेली नाही. वेळ कधीच जात नसते. देवेंद्रांच्या संघटनेला आणि त्यांच्या त्या आदर्शवादाला माझा कायम विरोध असला, तरीही देवेंद्रांसारखा नेता राजकारणाच्या पटलावर असला पाहिजे, या मताचा मी आहे.

स्वतःला न फुगवता, न किंचाळता, त्यांनी 'नॉर्मल' व्हावे. माणसासारखे बोलावे. माणसांच्या भाषेतले, माणसांचे राजकारण करावे.
देवेंद्रांच्या हातात आणखी वय आहे...!

No comments:

Post a Comment