मी महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल २०१८ च्या साधनाच्या दिवाळी अंकात विस्ताराने लिहिले होते.
काल सेलिब्रिटी वक्ते, संपादक, लेखक श्री संजय आवटे यांनी " गांधी+नेहरू+आंबेडकर= भारत! आता हे घ्या वस्तुनिष्ठ पुरावे ... " अशी पोस्ट त्यांच्या वॉलवर
लिहिलेली आहे. त्या पोस्टवरची माझी प्रतिक्रिया आपल्या अवलोकनार्थ खाली दिली आहे. संजय आवटे यांच्या पोस्टची लिंक शेवटी दिलेली आहे.
आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.
"प्रिय संजय, तुमच्या या मांडणीमागील सद्भावनांचा मी आदर करतो. देशात धर्मनिरपेक्ष शक्तींविरूद्ध विखार पेरला जात असताना, लोकशाही जीवनमुल्ये धोक्यात असताना, गांधी,नेहरू,आंबेडकर यांना मानणार्यांनी एकत्र असण्याची तीव्र गरज मला पटते. त्यामुळे माझा तुमच्या मांडणीमागील ध्येयवादाला विरोध नाही. तुमची मांडणी समयोचित आणि मौलिक आहे. तुमची सात विधाने वस्तुस्थितीला धरून नाहीत हे तुमच्या निदर्शनाला आणून देऊ इच्छितो.
१} " सायमन कमिशनसमोर बोलताना, बाबासाहेबांनी अल्पसंख्य समुदायांसाठी स्वतंत्र मतदारसंघ नकोत अशी मागणी का केली?"
वस्तुस्थिती- सायमन कमिशनसमोर व गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघ मागितलेले होते. पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे, खंड २, [ डॉबाआंलेभा ] पृ.४४१,४६५,५३३,
२} " संविधान तयार करत असताना, अशा स्वरूपाची मागणी बाबासाहेबांनी का केली नाही?"
वस्तुस्थिती- २. संविधान सभेत बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी करणारा ठराव आणलेला होता. [ पाहा- घटना सभेचा वृत्तांत, भारत सरकार, नवी दिल्ली, खंड १ ते १२]
३] " 'जातीय निवाडा' बाबासाहेबांनाही नको होता."
वस्तुस्थिती- गांधीजींच्या उपोषणामुळे देशभरातून बाबासाहेबांवर त्यांचा जीव वाचवण्यासाठी अभुतपुर्व दबाव आला, म्हणून बाबासाहेबांनी तडजोड म्हणून पुणे करार केला. पण १९३७ च्या निवडणुकीत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ते पुन्हा आपल्या मूळच्या भुमिकेवर गेले. [ पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांचे काय केले?]
४] " गांधींनी अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाला विरोध केला असला तरी दलितांना प्रतिनिधित्व मिळण्याला कधीही विरोध केला नव्हता, हेही लक्षात घेतले पाहिजे."
वस्तुस्थिती- दलितांना प्रतिनिधित्व द्यायला महात्मा गांधीजी उपोषणाच्या दिवसापर्यंत तयार नव्हते. [ पाहा- अस्पृश्यांना राखीव जागा द्यायलाही गांधीजींचा विरोध होता, दि. १९ सप्टेंबर, १९३२, डॉ. य. दि.फडके, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मारेकरी: अरूण शौरी, मुंबई, १९९९,पृ. ७२, ९०, [ब] अलिम वकील, महात्मा आणि बोधिसत्व, संगमनेर, १९९०, पृ.१२,१३ [क] वसंत मून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नॅशनल बुक ट्रस्ट, नवी दिल्ली, १९९१, पृ.६२,
५] " डॉ. आंबेडकरांनीही १९३०च्या दशकात दबावतंत्र म्हणून स्वतंत्र मतदारसंघाची भूमिका घेतली, पण पुढे संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत स्वतंत्र मतदारसंघाच्या भूमिकेचा आग्रह धरला नाही. राखीव जागांचा पर्याय बाबासाहेबांना मान्य होता. आणि, १९३२ पासून गांधींचीही भूमिका तीच होती."
वस्तुस्थिती- [ डॉबाआंलेभा २ ] पाहा-पृ.४४१, ४६५, ५३३, व घटना सभेचा वृत्तांत, भारत सरकार, नवी दिल्ली, खंड १ ते १२
६] " त्यामुळे 'पुणे करार' झाल्यानंतर बाबासाहेबांनीही गांधींचा आदराने उल्लेख केलेला दिसतो."
वस्तुस्थिती- तुम्ही बाबासाहेबांचे गांधीजी व काँग्रेसविरुद्धचे २ ग्रंथ पुर्ण दुर्लक्षित केलेत. पुणे करारानंतर सुरुवातीचे काही दिवस काँग्रेसवाले बरे वागले, पण लवकरच त्यांनी बाबासाहेबांना अपमानित करण्याचा सपाटा लावला. त्यामुळे नव्याचे नऊ दिवस संपताच बाबासाहेब काँग्रेस व गांधींजींबद्दल पुन्हा अतिशय कटवटपणे लिहू लागले. पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांचे काय केले?
७] " महिलांना मानवी अधिकार मिळावेत, या एकमेव कारणासाठी बाबासाहेबांनी आपल्या केंद्रातल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. "
वस्तुस्थिती- बाबासाहेबांच्या कायदा मंत्रीपदाच्या राजीनाम्याची एकुण ५ कारणे होती. पाहा- डॉबाआंलेभा,खंड १४ वा, भाग २, पृ. १३१९
-प्रा.हरी नरके, १२/५/२०२०
संजय आवटे यांच्या पोस्टची लिंक https://www.facebook.com/sunjay.awate11?epa=SEARCH_BOX
No comments:
Post a Comment