Friday, May 22, 2020

कोरोनाफितुर

कोरोनाविरूद्ध अहोरात्र लढणार्‍या सर्व यंत्रणांना सलाम. ही वेळ निषेधाची नाही. आता राजकारण बाजूला ठेऊन सर्वांनी एकदिलाने लढण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे. जमेल तितकी यंत्रणा, पेशंट व पिडीतांना मदत करायला हवी. अशावेळी लढणारांचे मनोबल तुटावे असे गलिच्छ निषेधचाळे करणारांना सुज्ञ मतदार कधीही माफ करणार नाहीत.

मदतकार्यावर शक्ती केंद्रीत करण्याऎवजी जे करंटे आरडाओरडा, काळेझेंडे लावण्याला महत्व देताहेत ते महाराष्ट्रद्रोही आहेत. ऎन मोक्याच्या क्षणी अवसानघात, दगाबाजी, विश्वासघात आणि पळपळुटेपणा हाच या बाजारबुणग्यांचा कायमचा इतिहास आहे. पानीपतातून हे कोरोनाफितुर लढाई सोडून कसे पळाले होते त्याचे वर्णन करताना बखरकार म्हणतात, "इतुकिया वेगाने पळाले की झाडास बांधिलिया झाड उपटून पळाले."

एकदा एका जंगलात एका बौद्ध भिक्खूला शिकार्‍याचा बाण लागला. त्या जखमीला मदत करण्याऎवजी एकजण शिकार्‍याच्या शोधात निघाला. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, " ते काम नंतरही करता येईल. आता तातडीने या जखमीला उपचार कसे मिळतील ते आधी बघा." तेव्हा आता सगळी शक्ती उपचार आणि मनोबल वाढवणे याकामी एकत्रित करूयात.

-प्रा. हरी नरके, २२/५/२०२०

No comments:

Post a Comment