एम.ए.एंटायर पॉलिटिक्सवाल्यांची मला फार भिती वाटते बुवा. मग ते दिल्ली विद्यापीठातले असोत की पुणे. भयावह विद्वत्ता! एका मिनीटाच्या मुद्द्याला ३४ मिनिटांचे भाषण ठोकणार! आणि मुद्याचं नाहीच सांगणार. "गांधी, नेहरू, आंबेडकर" या मित्रवर्य संजय आवटेंच्या पोस्टवर मी केलेल्या कमेंटवर एका एम.ए. एंटायर पॉलिटिक्सवाल्यांची मुक्ताफळं वाचून मी खतरनाक हादरलो. हे विद्वान, युपीएससी, एमपीएससीच्या, स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या नावावर गरिब विद्यार्थ्यांना लाखो रूपयांना गंडा घालणार्या पुण्यातल्या एका व्यापारी संस्थेत काम करतात म्हणे! एकदम ’ युनिक’ काम! त्यांचे म्हणणे असे की तथ्यांना [फॅक्ट्सना] काडीचेही महत्व नाही. सत्य भले काहीही असेल त्यांना त्याच्याशी घेणेदेणे नाही.
त्यांनी टाकलेल्या आणखी काही पिंका पुढीलप्रमाणे- "[हरी नरकेला] फक्त फॅक्ट दाखवता येतात. किंवा फॅक्टचे खेळ मांडता येतात. आपल्या माणसावर [बाबासाहेब] आपलीच मालकी असावी दुसऱ्यांनी कोणी त्यात लुडबूड करू नये अशी त्याची अपेक्षा. प्रक्रिया कशाशी खातात हे त्याला माहिती नसते. विचार-दृष्टिकोन हे तर खूपच लांबचे झाले. मला अशा लोकांची शंका आल्याने मी ऐतिहासिक घटनांमध्ये पडतच नाही. आमचा माणूस मोठा की तुमचा माणूस मोठा, आमचा चुकला का तुमचा चुकला याचेच रिंगण हा नरके घालत बसणार. अशा लोकांना काळ आणि विचार त्यांच्यातलं नातं कसं समजणार? त्यातून एक अखंड अशी प्रक्रिया जन्माला येते आणि त्या प्रक्रियेला पुढे दिशा देण्याचे, त्यास वाहते करण्याचे काम हे त्या त्या पिढीला करावे लागते. प्रक्रियेतून बघण्यामुळे कोणत्याही घटनेचा अभ्यास सुटासुटा करता येत नाही हे यांच्या गावीही नसते."
खरंय शेठ तुमचं. आम्ही काय बेअकली. आम्हा अडाण्यांना काय कळणार काळ, विचार, प्रक्रिया, त्यांचं नातं? आमच्या झोपडीत फक्त गावठीपणा सापडणार. विद्वत्ता ही फक्त तुमच्याच बापजाद्यांची खाजगी मालमत्ता. ज्ञानाच्या किल्ल्या तुमच्याच कंबरेला असं दस्तुरखुद्द तुमचे आजोबा, विष्णूशास्त्री चिपळूणकरच सांगून गेलेत ना. आम्हाला त्यातलं काय कळणार? विद्वत्ता फक्त तुमच्याच कोठीवर विकायला ठेवलेली चीजवस्तू!
किती अहंकार असावा या एम.ए. एंटायर पॉलिटिक्सवाल्यांना?
हे म्हणजे तुम्ही कसे पास होता, कॉपी करून की नकली माणूस परिक्षेला बसवून ते महत्वाचे नाही, महत्वाचे आहे ते फक्त पास होणे. ट्यूशनचा धंदा करणारे दुसरे काय सांगणार म्हणा?
राज्यशास्त्रातले अनेक दिग्गज माझे गुरू. प्रा. य. दि. फडके, प्रा. राम बापट, प्रा. राजेंद्र व्होरा, प्रा. यशवंत सुमंत, प्रा.रावसाहेब कसबे हे माझे मार्गदर्शक. पण त्यांना विद्वत्तेचा असा गर्व नव्हता. नाही. त्यांनी आम्हाला शिकवलं तथ्यं [ फॅक्ट्स ] चुकता कामा नयेत. मग त्यावर काय प्रक्रिया आणि सिद्धांतन करायचं ते करा.
इथे हे सोलापूर चादरीवाले मला सांगतात, तथ्यं गेली खड्ड्यात! असल्या भंपक आणि चंपथ भाडेवारांनी आमच्या वाट्याला न गेलेलेच बरे!
मी टेल्कोची रात्रपाळीची नोकरी करून चळवळीतील काम आणि वादविवाद स्पर्धा करीत बी.ए. आणि एम.ए. मराठीच्या परीक्षांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सुवर्णपदके मिळवलेली आहेत. तुमच्या बाजारू दुकानातली नाहीत. तुमच्याकडून प्रक्रिया, काळ आणि विचार शिकायची माझ्यावर वेळ आलेली नाही. मला शिकवायची तुमची अवकाद नाही. तुम्ही ज्या विद्यापीठात शिकलात तिथल्याच महात्मा फुले अध्यासनाचा मी दहा वर्षे प्रोफेसर आणि हेड होतो. आजवर माझी संशोधनपर ५४ पुस्तकं प्रकाशित झालीत. तुमच्यासारखी नवनीतसदृश्य फडतूस गायडं लिहून मी पोट भरीत नाही. तेव्हा भाडेवार, आपल्या मापात राहायचं.
-प्रा. हरी नरके, १३/५/२०२०
No comments:
Post a Comment