Friday, May 15, 2020

तव्याचा जाय बुरसा, मग तो सहजच होय आरसा

"महात्मा जोतीराव फुले यांना मी आपला गुरू मानतो. माळी समाजात त्यांचा जन्म झाला. पुष्कळ मराठे त्यांचे शिष्य होते. परंतु आजची परिस्थिती मोठी चमत्कारिक झालेली आहे. जोतीरावांचे नाव आज कोणीच घेत नाही. आम्ही घेतो. घेणारच. आम्ही चळवळ करतो म्हणून इतर लोक आमच्याकडे खुनशीपणाने पाहात आहेत.

शिकलेली माणसे नुसती पोटभरू असून भागणार नाही. "

"तव्याचा जाय बुरसा, मग तो सहजच होय आरसा." शिक्षणाचा उपयोग असा झाला पाहिजे. आपण आपले मन पवित्र केले पाहिजे. आपला सद्गुणांकडे ओढा असला पाहिजे. शिक्षणाबरोबर माणसाचे शीलही सुधारले पाहिजे. शीलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे.

" कबीर कहे कुछ उद्द्यम किजे, आप खाये और औरनको दिजे," या कबीराच्या दोह्याप्रमाणे उद्योग करा. आपण खा, दुसर्‍यांनाही द्या. स्वत:चे घर प्रथम सांभाळा, मात्र समाज कार्यालाही मदत करा. ज्ञान हे काही केवळ रोजगाराचे साधन होऊ शकत नाही. ज्ञान जीवनाच्या समग्र उन्नतीचे हत्त्यार आहे.

नाशिक सत्याग्रहाचा अनुभव तुम्हाला सांगतो. प्रथम माझ्यासोबत भाऊराव गायकवाड व अवघे पाचसहाजणच होते. आम्ही रात्रभर वाट पाहिली. सकाळपर्यंत एकही गडी सत्याग्रहाला आला नाही. सकाळी आम्ही पाच-सहा जणांनी मिरवणूक काढली. आमच्यावर दगडफेक झाली. नंतर आम्हाला १५ ते २० सत्याग्रही मिळाले. नंतर लोक वाढत गेले. इतके वाढले की आम्ही पाच वर्षे सत्याग्रह करू शकलो....

लहाणपणी मला माझी आई सांगायची मोठ्या माणसांना मामा म्हणत जा. मी पोस्टमनला मामा म्हणायचो. [ हशा आणि टाळ्या ] ...

प्रत्येकाने आपल्या घरात बुद्धाचा फोटो लावला पाहिजे. बुद्ध मार्गदाता आहे."

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ३ जून १९५३, मुंबई, रावळी कॅंप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे, खंड १८/३, पृ. ३५७/५८

No comments:

Post a Comment