Monday, May 18, 2020

रत्नाकर मतकरींची भेट राहूनच गेली- प्रा. हरी नरके









शाळकरी वयात रत्नाकर मतकरींचे "अश्वमेध" नाटक बघून मी खूप भारावून गेलो होतो. त्यांचे "लोककथा ७८" हे जबरदस्त नाट्यानुभव देणारे, हादरवणारे, समकालीन नाटक होते.
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला त्यांचा चित्रपट ‘इन्वेस्टमेन्ट’, मला आवडला होता. मतकरी १९५५ पासून गेली ६५ वर्षे सातत्याने लिहित होते.

त्यांची साहित्यसंपदा अफाट आहे. त्यांनी मोठ्यांसाठी सत्तर तर मुलांसाठी बावीस नाटकं, तसेच अनेक एकांकिका लिहिल्या. त्यांचे वीस कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, बारा लेख संग्रह प्रकाशित झालेत. आपल्या रंगभूमीवरल्या कामाचा लेखाजोखा मांडणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग’ महत्वाचा आहे. त्यांची "खेकडा" ही गूढकथा वाचताना आजही अंगावर काटा येतो. संगीत नाटक अकादमी आणि साहित्य अकादमी या दोन्ही संस्थांचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले मतकरी प्रतिभावंत लेखक होते.

माझे मित्र आनंद अवधानी हे त्यांचे निकटवर्तीय. मला मतकरींना भेटायची तीव्र इच्छा होती. आनंद त्यांच्याशी बोलला. त्यांनी तात्काळ भेटीचा दिवस, वेळ कळवला. आम्हाला त्यांच्या घरी जेवायलाच बोलावले. चारपाच तास काढूनच या असे ते म्हणाले.

त्यांनी माझं वाचलेलं होतं असं ते आनंदकडे म्हणाले, तेव्हा माझा विश्वास बसू नये इतका आनंद मला झाला. आम्ही तिघे मिळून एक वेगळा, हटके असा ग्रंथसंस्कृती, वाचनवेड वाढवणारा उपक्रम करणार होतो. त्याचं लेखन मतकरीसर करणार होते. कल्पना आनंदची आणि सादर मी करणार असं ठरलं होतं.

आता तो हटके उपक्रम बहुधा कधीच व्हायचा नाही. ज्या दिवशी आम्ही भेटणार होतो त्याचदिवशी मुंबईत तुफान पाऊस झाला. सारी मुंबई तुंबई झाली. गाड्याघोड्या बंद पडल्या. प्रवास करणेच शक्य नव्हते. मी फक्त त्यांना भेटायलाच मुद्दाम मुंबईला जाणार होतो. ते म्हणाले, हरकत नाही, आपण दुसरा दिवस लवकरच ठरवू.

यंदा पावसाळा बराच लांबला. त्यानंतर माझ्या आणखी तीन सिरियलची कामं सुरू झाली. फुल धावपळ. धावतं भेटायचं नाही, किमान पाचतास हवेत असं ठरवल्यानं भेट लांबत गेली. मार्चमध्ये कोरोना आला. आणि आज मतकरी गेले. आता भेट होणे नाही. मतकरी वयाच्या ८१ व्या वर्षी गेले पण चटका लावून गेले. त्यांचा मुलगा गणेश माझा मित्र आहे. मतकरी कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे.

मराठीतला एक श्रेष्ठ, बहुप्रसवा आणि सामाजिक चळवळींबद्दल विलक्षण आस्था असणारा दुर्मिळ लेखक होते मतकरी! विनम्र आदरांजली.
-प्रा. हरी नरके, १८/५/२०२०


No comments:

Post a Comment