Saturday, May 30, 2020

रसाळ आणि लोभस ग. प्र. प्रधान --प्रा. हरी नरके


महाराष्ट्र विद्यालयात शिकत असताना लिहिलेला पुणे दर्शन हा प्रबंध दाखवायला मी प्रा. ग. प्र. प्रधान यांना त्यांच्या घरी जाऊन भेटलो. तेव्हा ते विधान परिषदेवर आमदार होते. त्यांनी व त्यांच्या पत्नीने अतिशय मायेनं स्वागत केलं. पाणी, सरबत आणि सोबत एक केळी त्यांनी माझ्या समोर आणून ठेवली. माझा प्रबंध आस्थेवाईकपणे चाळला. २ दिवसांसाठी माझ्याकडे ठेव मी वाचून त्यावर तुला अभिप्राय देतो असं म्हणाले.


मी २ दिवसांनी गेलो तेव्हा त्यांनी २०० पृष्ठांचा प्रबंध वाचून त्याच्यावर अभिप्राय लिहून ठेवलेला होता. एका शाळकरी विद्यार्थ्याने केलेल्या या संशोधनपर लेखनाचे त्यांनी अभिप्रायात मनापासून कौतुक केलेले होते.


त्यांचे हाजीपूर हे युद्धकथांचे पुस्तक त्यांनी मला भेट दिले. माझी माहिती घेतली आणि मी एका कबरस्थानात काम करुन शाळा शिकतो हे ऎकल्यावर ते म्हणाले, "कसलीही मदत लागली तर संकोच न करता मला सांगायला ये. तुला दरवर्षी वह्या-पुस्तकांची मदत करायला मी माझ्या घराशेजारच्या मंडई मंडळाला सांगतो." त्यांनी मंडळाच्या अध्यक्षांना माझ्यासमोरच तसा फोनही केला.


त्यानंतर अधूनमधून त्यांच्याकडे जात असे. त्यांचे बोलणे अतिशय रसाळ आणि लोभस होते. दरवेळी एक नविन पुस्तक ते मला द्यायचेच.


नामांतर आंदोलनात त्यांच्यासोबत तुरूंगात मला राहायला मिळाले. सगळेच त्यांना मास्तर म्हणायचे. मास्तर चहाचे शौकीन होते. मात्र इतर कसलेही व्यसन त्यांना नव्हते. आजकाल कार्पोरेटरसुद्धा किती भाव खातात. मास्तर मात्र आमदार असूनसुद्धा इतके साधे, प्रेमळ आणि विनयी होते की ते आमदार आहेत यावर विश्वासच बसू नये. ते साधनेचे संपादक असताना त्यांनी माझ्याकडून काही लेख लिहून घेतले. ते ठळकपणे छापले. ‘मी भोळाभाबडा, प्रसंगी काहीसा बावळट आहे असे लोकांना वाटते. खरं तर त्यांचा हा समज कायम ठेवण्यात फायदा समजलेला मी एक धूर्त माणूस आहे’ असे ते म्हणत. वाचन, लेखन आणि वाचलेल्यातील जे आवडले ते इतरांना सांगणे, हा मास्तरांचा परिपाठ होता.


त्यांना मी महात्मा फुले यांच्या कवितांचे इंग्रजी भाषांतर करायला सांगितले. त्यांनी त्या कविता (अखंड) परत वाचल्या आणि मला भेटायला बोलावले. मला म्हणाले, " अरे ह्या कविता म्हणजे आग आहे आग. मला त्यांचा अनुवाद करायला मिळणे हा माझा सन्मान आहे. मात्र माझा पिंड मवाळ आहे. समन्वयवादी आहे. मी या जहाल कवितांना न्याय देऊ शकणार नाही. मुळात मला ही आग झेपणार नाही. त्यासाठी तसाच कणखर माणूस हवा." त्यांनी मला त्यासाठी एक नावही सुचवले. मी त्यांच्याशी संपर्क केला मात्र त्यांना वेळ नसल्याने ते अनुवाद करू शकले नाहीत. त्यानंतर मी भालचंद्र नेमाडे सरांना ह्याकामी विनंती केली.


आपल्या भाषांतरविषयक मर्यादा इतक्या नेमकेपणाने समजलेले किती लोक असतात? प्रधानमास्तर म्हणजे नितांत सोज्वळ, पवित्र आणि सौम्य प्रकृती. साक्षात शुचिता, आस्था आणि करूणेचं प्रतिकच! दहा वर्षांपुर्वी मास्तर गेले. २९ मे २०१० रोजी त्यांचे निधन झाले, ते ८८ वर्षांचे होते.






-प्रा. हरी नरके, ३०/५/२०२०

No comments:

Post a Comment