Friday, May 22, 2020

कोरोना - भीती ते अनुभूती - Dr Sushma Gaikwad-Jadhav







By Dr. Sushma Gaikwad-Jadhav- कोरोना - भीती ते अनुभूती

किट घातल्यानंतर संपूर्ण ड्युटी संपेपर्यंत बाथरूमला जाता येत नाही किंवा साध घोटभर पाणीहि पिता येत नाही. ड्युटी संपल्यावर संपूर्ण किट व्यवस्थीत काढून, नखशिखांत शरीर व सर्व घातलेल्या कपड्यांना स्वच्छ करणे गरजेचे असते. सरासरी सहा तास ड्युटी करणाऱ्या व्यक्तीला डोंनिंग, डोफिगंच्या वेळा पकडून सात ते साडेसात तास खाण्या पिण्याविना व लघुशंकेविना रहावं लागतं. PPE मधे अतिशय उकाडा जाणवतो. घामाच्या धारा सगळी कडून ओघळत रहातात. एकावर एक दोन मास्क असल्यामुळे नीटसा श्वास घेता येत नाही व अधूनमधून तोंडानी श्वासोच्छवास घ्यावा लागतो. जास्त बोलताना व पायऱ्या चढताना थोडी धाप लागते. गॉगल व फेस शिल्डवर धुक्यासारखं सतत जमा होत रहात. दोनएक तासांनी मास्कची कडा, बांधलेल्या मास्कच्या दोऱ्या, गॉगल रुतायला लागतो, काय आणि कुठे दुखतंय तेच कळत नाही आणि हात लावून ते व्यवस्थितही करता येत नाही. नाकातोंडाच्या चित्रविचित्र हालचाली करून रुतणारा मास्क ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करावा लागतो. ओठ सुकले तर त्यांच्यावर जीभ फिरवायलाही भीती वाटते.

...................................

कोरोना व्हायरसचा संसर्ग नक्की कधी सुरु झाला, हे त्या चीनच्या जिवालाच माहित. पण आपल लक्ष साधारण जानेवारी-फेब्रुवारीपासून त्याच्याकडे गेल. बिचारे चीनचे लोक, बिचारे जर्मनीचे लोक म्हणता म्हणता आपणच कधी बिचारे झालो कळलंच नाही आणि रात्रीतून घडाव असं सगळं बदललं. शाळा, थेटर्स, हॉटेल, दुकाने ,रहदारीचे रस्ते सार ओसाड पडल. प्रत्येकाच्या मनात एक अगतिक भीती, मळभ निर्माण झाली. मास्क आणि सॅनिटायजर जीवनाचे अविभाज्य भाग बनले. लोक एकमेकांकडे,प्रत्येक वस्तूकडे संशयित नजरेने बघू लागली, सगळीकडे जाहिरातीमध्ये चित्रविचित्र हावभाव करून नाचणारा हिरव्या रंगांचा कोरोना व्हायरस दिसायला लागला.

क्लिनिक चालू होत पण नेहमीचा उत्साह वाटत नव्हता. पेशंट कमी झाले होते. येणारा दचकत, बिचकत यायचा. क्लिनिकमधून संशयित पेशंट कोरोना तपासणीसाठी पाठवत होतो पण पेशंट तसेच परत यायचे. अगदी सुरवातीला ठराविक देशातून आलेल्या लोकांचीच तपासणी केली जात होती, त्यामुळे संभ्रम निर्माण होत होता.

एके दिवशी curfew आणि लॉकडाऊन जाहीर झाला आणि अवसानच गळाल. आपल्याला होईल का? क्लिनिकमधे पसरेल का ? काळजी वाटत होती. क्लिनिकमधे प्रत्येक वस्तूला हात लावताना एक भीतीशी वाटायला लागली. एके दिवशी क्लिनिक स्टाफ यायचा बंद झाला आणि आठवड्याभरासाठी क्लिनिक बंद केल.

घरी मुलांची दंगामस्ती चालायची, खाणपिण, जास्त झोपणं सार चालू होत पण अस्वस्थ वाटायचं. काय होतंय? का होतंय? तेच कळत नव्हत. उगीचच याला विचार, त्याला विचार, कि त्यांना काय वाटतंय ? अस माझ चालू होत. डॉक्टर असल्यामुळे भीती जास्त वाटते का कमी ते माहित नाही पण भीती वाटतं होती हे खरं. कधीचि TO DO लिस्ट बनवली होती. नवीन अप्लिकेशन डाउनलोड करून रंगबिरंगी अजून एक नवीन लिस्ट बनवली, रोज वाचायचे पण करत काहीच नव्हते. एका आठवड्यात हतबल वाटायला लागल. आठ दिवसांनी एक ऍडमीटेड पेशंट बघायला बाहेर पडले, घरी परत आल्यावर खूप दिवसांनी छान वाटल. तेव्हा लक्षात आल फक्त कामच आपल्या मनाला जिवंत ठेवू शकत आणि नेहमीपेक्षा कमी वेळ पण क्लिनिक सुरु झालं.

टिव्ही, इंटरनेटवर बातम्या दिसायच्या परदेशात डॉक्टर्स, पॅरामेडिक स्टाफ थकलाय, मास्क, PPE किटचा अभाव, विश्रांतीला वाव नाही, आश्चर्यकारक होत सगळं. ज्या देशामध्ये सुख, समृद्धी भरभरून आहे, सगळं काही ओसंडून वाहतंय तिथं हि अवस्था. पण हळूहळू आपल्या देशातील बातम्याही येऊ लागल्या. लोक मदतीसाठी बाहेर होती, त्यांच्या मुळे दैनंदिन थोडफार सुरळीत चालू होत.

पेशंटची संख्या रोज वाढत होती, सरकारी हॉस्पिटलमधे काम करणारी लोक अपुरी पडू लागली आणि खाजगी डॉक्टर्सनां कोरोनाबाधित रुग्णांसाठी असलेल्या हॉस्पिटल्सला येऊन काम कराव लागेल असं बातम्यात सांगीतल. एके दिवशी कलेक्टर ऑफिस मधून तसा फोनही आला " गरज पडल्यास तुम्हाला सेवा द्यायला याव लागेल" आणि आठवड्याभरात परत फोन आला, ससून हॉस्पिलला मिटिंगसाठी बोलावलं होत.

एक दिवस आधी Intensivist ची टीम तिथल्या ICU मध्ये कामासाठी रुजू झाली होती. मिटिंग झाली, फिजिशियनच्या काही टीम बनवल्या गेल्या, माझी ड्युटी एक आठवड्यानंतर होती. सुरुवातीला प्रशांत फार खुश नव्हता, काळजीत होता पण मी जायला तयार हे कळल्यावर तोहि तयार झाला. मुलांना सांगितलं, वेदांगला रडायला येत होत " तुला कशाला जायचंय ? ती लोक बाहेर गेली म्हणून त्यांना आजार झालाय, देव त्यांच्या कडे बघून घेईल, तुला आजार झाला तर? तू मरून गेलीस तर? " असं त्याचं दोनतिन दिवस अधूनमधून चालू होतं. थोड समजून सांगितलं आणि त्याला बहुतेक ते समजलं. विहानलाहि सांगितलं तर तो म्हणाला " मम्मा तू किती वर्षांनी वापस येणारे ? (त्याच्या साठी तास, दिवस सगळ्याचा हिशोब वर्षात असतो) दादा आणि माझ्यासाठी कुल्फी करून जाशील? " हसूच आल मला.

ससून हॉस्पिटल, दीडशे वर्षांपासून महाराष्ट्रातील लाखो लोकांवर उपचार करणार ठिकाण. रोज हजारो रुग्णांची ये जा असते. तितक्याच संख्येने काम करणारी डॉक्टर्स, नर्सेस व इतर लोकं. कोरोना व्हायरस पुण्यात आला आणि नायडू हॉस्पिटलसोबत ससून हॉस्पिटल कोरोना उपचारासाठीच अधिकृत ठिकाण बनवल गेलं. इतर रुग्णांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हॉस्पिटलच्या आवारातील अकरा मजली इमारत फक्त कोरोना उपचारासाठी राखीव ठेवण्यात आली. पेशंटसाठी खाट, मॉनिटर, टाचणी पासून ते व्हेंटिलेटरपर्यंत लागणाऱ्या सर्व गोष्टी, काम करणारी लोक, त्यांच्या कामाच, राहण्याच नियोजन, हजारो गोष्टी लागतात एक हॉस्पिटल चालवायला. थोड्या अवधीत इतकी मोठी यंत्रणा कार्यरत करण खरंच मोठ्या जोखमीचं काम आहे.

माझी ड्युटी ५ C म्हणजे सस्पेक्टेड वॉर्डमधे लावली होती, रोज सकाळी आठ ते दुपारी दोन, सहा तास. पहिल्या दिवशी सहाच्या सुमारास घरून निघाले. हॉटेलवर सामान ठेवून आठ वाजता ड्युटीला पोचायचं होत. हॉटेल जहांगीर हॉस्पिटलजवळ, ससून हॉस्पिटलपासून दोनेक किलोमीटर असेल. रोजच्याएवढा नाष्टा केला, दुपारपर्यंत भूक लागू नये म्हणून जबरदस्तीने जास्तीची दोन चार बिस्कीट खाल्ली पण पाणी पिताना घोट घोट ठरवून पित होते, बाथरूमला तर किती वेळा गेले माहित नाही, ब्लॅडरमधला प्रत्येक थेंब न थेंब बाहेर काढायचा प्रयत्न चालू होता. पोचले ससूनला, कॉलेजच्या पहिल्या दिवशी असते तशी धाकधुक वाटत होती. पाचव्या मजल्यावर पोचले. तिथे A ,B ,C असे वॉर्ड, सगळीकडे एक चक्कर मारली आणि C वॉर्ड मध्ये घुसले. डोंनिंगसाठी सामान शोधल, आजूबाजूला सगळा पसारा, काहीच सापडेना. ड्रेस होता पण मास्क, गॉगल, ग्लोव्हस काहीच नाही. क्षणभर माझ तर अवसानच गळालं, वाटलं आता आपल काही खरं नाही, पळून जाव परत. दहापंधरा मिनटं लागली सगळ्या गोष्टी गोळा करायला. यायच्याआधी बघितलेला डोंनिंगचा व्हिडीओ आठवून आठवून PPE किट घातली आणि पोचले कर्मभूमीवर.

PPE म्हणजे personal protective equipment ,कोरोनाबाधित पेशंटला तपासताना, त्यांच्यावर उपचार करताना इंन्फेकशनपासून बचाव करण्यासाठी घातला जाणारा ड्रेस. डोक्यापासून पायापर्यंत अखंड ,प्लास्टिकसारख्या कापडापासून बनलेला असतो. त्यासोबत डोक्याला केस बांधण्यासाठी एक वेगळी कॅप, N ९५ व सर्जिकल अशे दोन मास्क, गॉगल, फेस शिल्ड, दोन ग्लोव्हस, चप्पल वा बुटावरून घालण्यासाठी वेगळं कव्हर असं सगळं घालाव लागतं. हे सगळं घालण्याची व काढण्याची विशिष्ट अशी पद्धत असते. किट घातल्यानंतर संपूर्ण ड्युटी संपेपर्यंत बाथरूमला जाता येत नाही किंवा साध घोटभर पाणीहि पिता येत नाही. ड्युटी संपल्यावर संपूर्ण किट व्यवस्थीत काढून, नखशिखांत शरीर व सर्व घातलेल्या कपड्यांना स्वच्छ करणे गरजेचे असते. सरासरी सहा तास ड्युटी करणाऱ्या व्यक्तीला डोंनिंग, डोफिगंच्या वेळा पकडून सात ते साडेसात तास खाण्यापिण्याविना व लघुशंकेविना रहावं लागतं. PPE मधे अतिशय उकाडा जाणवतो.

घामाच्या धारा सगळी कडून ओघळत रहातात. एकावर एक दोन मास्क असल्यामुळे नीटसा श्वास घेता येत नाही व अधूनमधून तोंडानी श्वासोच्छवास घ्यावा लागतो. जास्त बोलताना व पायऱ्या चढताना थोडी धाप लागते. गॉगल व फेस शिल्डवर धुक्यासारखं सतत जमा होत रहात. दोनएक तासांनी मास्कची कडा, बांधलेल्या मास्कच्या दोऱ्या, गॉगल रुतायला लागतो, काय आणि कुठे दुखतंय तेच कळत नाही आणि हात लावून ते व्यवस्थितही करता येत नाही. नाकातोंडाच्या चित्रविचित्र हालचाली करून रुतणारा मास्क ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करावा लागतो. ओठ सुकले तर त्यांच्यावर जीभ फिरवायलाही भीती वाटते.

असो मी, पेशंट विभागात गेले, मोठ्ठा हॉल आणि दोन्ही बाजूला ४ - ५ फिट अंतराने वीस पेशंटचे कॉट. सर्व सिस्टर, डॉक्टर PPE मुळे सारखेच दिसत होते. PPE घालून चाल मंदावते आणि बदलतेहि, अंतराळात काम करणाऱ्या लोकांसारखी. सगळ्यांनी ड्रेसवर पेनाने आपापली नाव लिहिली होती पण प्रत्येक वेळेला त्यांच्याजवळ जाऊन, त्यांचं नाव वाचून बोलावं किंवा काम सांगाव लागायचं. सगळे कॉट भरलेले, जवळजवळ सगळेच रुग्ण गंभीर. एक तास गेला जागेच आणि सर्व गोष्टींचं भान यायला.

अकराच्या सुमारास अचानक थकवा आला, हातापायात अवसानच नव्हतं, तहान लागली होती. मटकन खुर्चीत बसले. थोड्या वेळात बरं वाटलं आणि काम परत सुरु झालं. घड्याळात दोन वाजले, ड्युटी संपली. मन शरीर फार दमलं होतं. रूममध्ये आल्यावरही तोंड सतत कोरड पडायचं, संपूर्ण दिवस कमालीचा थकवा जाणवत होता.

रोज रुग्णांची भर पडत होती. ताप, खोकला, दम लागणे हि लक्षणं व गंभीर स्वरूपाचा आजार असलेले, वेगवेगळ्या व्यधिनीं ग्रासलेले व कोरोना चाचणीच्या रिपोर्टची वाट बघणारे सारे रुग्ण संशयित वॉर्डमधे यायचे. तपासणी पाठवल्यापासून रिपोर्ट यायला साधारण चोवीस तास लागत होते. वार्डमधल्या सरासरी वीस ते तीस टक्के रुग्णांचे रिपोर्ट्स पॉसिटीव्ह यायचे. रिपोर्ट आल्यानंतर त्यांना कोरोना संक्रमित किंवा साध्या वॉर्ड मध्ये हलवल जायचं पण तोपर्यंत त्यांच्या आजाराच्या सर्व शक्यता लक्षात घेणं आणि आहे त्या सुविधांमधे योग्य उपचार देणं एक मोठं आव्हानं होत. सोबत इतर डॉक्टर्सही होते. पेशंटचं रक्त तपासायला पाठवणं, Xray करून घेणं, रिपोर्टस गोळा करणं, आवश्यकतेनुसार कृत्रिम श्वास देणं, पोटावर झोपवणं, समजून सांगणं यात सतत सगळे व्यस्त असायचे.

जिवन मरणाची रस्सीखेच सतत चालू असायची, कधी आम्ही जिंकायचो तर कधी काळ. यात कित्येक वेळेला हे विसरायला व्हायचं कि यात कोरोना रुग्णही आहेत. संक्रमणाची शक्यता लक्षात घेता, नातेवाईकांना रुग्णाला भेटू दिल जात नव्हतं पण फोनवरून तब्येतीची माहिती दिली जायची, एखादा गेला तरीही फोनचं.

मी काम करत असलेला ५ c विभाग कोरोना संशयित सिरीयस पेशंट वार्ड पासून संशयित ICU बनला होता. ICU साठी लागणाऱ्या अजून बऱ्याच गोष्टीं गरजेच्या होत्या. मी आणि सोबत काम करणाऱ्या डॉक्टर्सनी, तिथं काम करणाऱ्या स्टाफ व इंचार्जच्या मदतीनं ICU साठी लागणाऱ्या गोष्टींची जमवाजमव केली. करण्यासारखं खूप काही होतं पण तितक्याच अडचणीही होत्या. एका आठवड्यात काही गोष्टी मार्गी लागल्या आणि पुष्कळ राहील्या. रोज वाढणारी संख्या, मरणारे पेशंटस, सगळं भीतीदायक होत तर दुसऱ्या बाजूला आजारतून ठणठणीत बरे होउन घरी जाणाऱ्यांची संख्याहि मोठी होती आणि तेच सगळ्यांना काम करण्यासाठी प्रवृत्त करायला पुरेसं होत.

मला तिथे सगळ्यात जास्त प्रोहत्सानं कोणाकढुन मिळालं माहितेय? तिथे काम करणारे निवासी डॉक्टर्स. हाडाच्या कलाकाराला प्रेक्षक कोण? रंगमंच कुठला याने फरक पडत नाही, नाटक सुरु झालं कि तो आपल्या भूमिकेत हरवतो. अगदी तसंच, अजून कित्येक दिवस कोरोना वार्डमधे काम करावं लागेल हे माहित असतानाही अगदी जिव तोडून ती सारी काम करत होती. कामात, डोळ्यात कुठेही संकोच, भीतीचा लवलेशही नव्हता. त्यांची बरोबरी कदाचित शक्य नाही पण जमेल तितकं करायला मी नक्कीच तयार होते.

दररोज डोंनिंग करून वार्डात आल्यावरही बरीचशी लोक बाहेर आलेले केस, नीट न बसलेला मास्क, कपडे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करायचे. एके दिवशी PPE किट देणाऱ्या मुख्य सिस्टरांना जाऊन भेटले व बोलले " खरं तर डोंनिंग करताना एक मार्गदर्शक हवा पण ते शक्य नसेल तर डोंनिंग रुममधे आरसा लावावा जेणेकरून डोंनिंग नीट केलं जाईल कारण आरोग्य कर्मचाऱ्यांना संक्रमणापासून वाचवण्यासाठी ती महत्वाची गोष्ट आहे".

कामाच्या शेवटच्या दिवशी दहा बाय दहाच्या मोठ्या आरश्यात बघून मी डोंनिंग केलं.माझं बक्षीस होत ते.

संकट मोठंय, अचानक बांध फुटावा आणि काही कळायच्या आत सगळं पाण्याखाली जावं अशी काहीशी परिस्थिती आहे. कुठलीच योजना, नियोजन शंबर टक्के प्रभावी व अचूक ठरेल असं नाही. परंतु वेळेनुसार आणि गरजेनुसार त्यात बदल करून उद्देश साध्य होईल. डॉक्टर्स, नर्सेस, हॉस्पिटलमधील मामा, मावशी, फार्मासिस्ट, वैद्यकीय व सरकारी अधिकारी, पोलीस, कचरा उचलणारी माणसं, सिक्युरिटी गार्ड, जेवण पुरवणारी, कधी प्रकाश झोतात न आलेली, हातभार लावूनही आपल्याला कधीच माहित न होणारी असंख्य लोकं आपल्या शाररिक, आर्थिक, मानसिक अडचणींना तोंड देऊन, मजबुतीने पाय रोखून उभी आहेत.

या सर्वांप्रति मी कायम कृतज्ञ राहील.

या सगळ्या प्रवासात मला स्वतःला काय वाटलं ???

सुरुवातील काही लोक स्वइच्छेने, कोरोना बाधितांसाठी काम करण्यासाठी नाव देत होती, तेव्हा नव्हतं झालं धाडस.परंतू कलेक्टर ऑफिसमधून फोन आलेल्या क्षणापासून मी मानसिक द्रुष्ट्या पूर्णपणे तयार होते. एक जबाबदारी आली होती माझ्यावर आणि ती मी अगदी आंनदाने स्वीकारली. लढायला जाणाऱ्या सैनिकासारखं वाटत होतं. शिक्षणाबद्दल अभिमान वाटत होता. त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आदर वाटत होता ज्यांनी मला इथं पर्यंत यायला हातभार लावला व ज्यांच्यामुळे मी हे काम करू शकणारं होते.

मी एक स्त्री आहे किंवा घरात लहाण मुलं, म्हातारी माणसं आहेत म्हणून हि जबाबदारी मी नाकारणार नव्हते. पाण्यात दगड टाकल्यावर काहीवेळासाठी वलय निर्माण होतात तस माझ्याही मनात काही वेळेला मृत्यूच्या भीतीचे वलय उठले आणि विरले.

इथे शब्दात मांडलाय त्यापेक्षाही कितीतरी मोठा अनुभव, वेगळा दृष्टिकोन मला मिळाला. बांधल्या जात असलेल्या रामसेतूमधला मी फक्त एक वाळूचा कण होते. रुग्णांना बर करणं, माझ्या मागाहून येणाऱ्या सहकाऱ्यांना सोबत देणं, आजूबाजूच्या लोकांची थोडी भीती कमी करणं, आई म्हणून मुलांवर सामाजिक जबाबदारीचे संस्कार घडवणं यापैकी माझ्या कामातून काय साध्य होईल माहित नाही पण मनात एक समाधान असेल, गरजेच्या वेळी मी तिथे होते. - डॉ. सुषमा जाधव/गायकवाड,फिजिशीयन,पुणे.

#Doctorsdiary #Corona



No comments:

Post a Comment