"या ग्रंथाची रचना करण्याचे काम मी हाती घेतले तेव्हा मी आजारी होतो. आणि अद्यापही मी आजारीच आहे. गेल्या पाच वर्षात माझ्या तब्बेतीत अनेक चढउतार झाले. त्यातील काही टप्प्यांवर माझी प्रकृती इतकी चिंताजनक झाली होती की, डॉक्टर्स मी विझती ज्योत ( Dying Flame) असल्याचे बोलत असत. या मालवत्या ज्योतीला यशस्वीपणे प्रज्वलित ( Sucessfully rekindling ) करण्यात माझी डॉक्टर पत्नी व माझ्यावर उपचार करणारे डॉ. मालवणकर यांचे वैद्यकीयशास्त्रातील कौशल्य कारणीभूत आहे. मी त्यांचा अत्यंत कृतज्ञ आहे. ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या " द बुद्धा अॅण्ड हिज धम्मा" च्या प्रस्तावनेतून )
डॉ. माईसाहेब आंबेडकर या तत्वनिष्ठ, करारी बाण्याच्या आणि कुशाग्र बुद्धीमत्तेच्या लढवय्या नेत्या होत्या. त्यांची माझी पहिली भेट मुंबईत १५ ऑगष्ट १९८२ रोजी झाली. औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे यासाठी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या नामांतर परिषदेच्या त्या उद्घाटक होत्या. त्यांचे भाषण अतिशय कळकळीचे आणि जोशिले होते. कार्यक्रम संपल्यावर मी त्यांना भेटलो. त्यांना जयभीम केल्यावर त्यांनी माझ्याकडे बघत अतिशय खणखणीत आवाजात जयभीम असा प्रतिसाद दिला. कुठून आलास, काय करतोस असे त्यांनी जिव्हाळ्याने विचारले. मी तेव्हा बारावीला शिकत होतो. हे मी त्यांना सांगताच " अच्छा म्हणजे तू पुण्याचा आहेस तर, आलास कसा?" त्यांनी विचारलं. मी या परिषदेला डॉ. बाबा आढाव, डॉ. अनिल अवचट, गंगाधर आंबेडकर यांच्यासोबत आलो होतो. मी तसे सांगताच त्यांनी विचारलं, " घरी कोणकोण असतं? आईवडील काय करतात? राहतोस कुठे? "
" माझे वडील मी फार लहान असतानाच वारले, आई मजूरी करते, मी साडेसतरा नळीवरील दांगटवस्ती या झोपडपट्टीत राहतो. "
" सत्याग्रहात येणार असशील तर अटक होईल. तुरूंगात राहावे लागेल, तयारी आहे?" त्यांनी विचारले. मी हो म्हणालो. त्यांना कौतुक वाटले असावे. त्यांनी माझ्या पाठीवर थोपटले.
सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांनी व एसेम जोशी यांनी केले. पहिल्याच दिवशी सोळा हजार लोकांना अटक झाली. मी लहान असल्याने बहुधा मला नेत्यांच्या बराकीत ठाण्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले. त्याचा मला खूप फायदा झाला. रावसाहेब कसबे, शरद पाटील, बाबा आढाव, कुमार सप्तर्षी, अनिल अवचट, अरूण कांबळे, लक्ष्मण माने, अंकुश भालेकर, बाबूराव बागूल, ग.प्र. प्रधान, विजय मोरे, दिनकर साक्रीकर, महंमद खडस, सुभाष लोमटे आदी १०० मान्यवरांच्या सोबत सुमारे महिनाभर एकत्र राहता आले. आम्ही राजकीय कैदी असल्याने श्रमदान किंवा कष्टाचे काम काहीच नव्हते. मग काय झोपेचे ६/७ तास सोडले तर बाकी सगळा वेळ चर्चा, व्याख्यानमाला, प्रश्नोत्तरे, शाहीरी गाणी, गप्पाच गप्पा.
दररोज १७ ते १८ तास चर्चा. माईसाहेब आम्हा कैद्यांना भेटायला जेलवर यायच्या. मृणालताई, अहिल्या रांगणेकर, डॉ. नीलम गोर्हेही यायच्या. याच सत्याग्रहाने मला सुनिल तांबे, नितीन वैद्य असे जिवाभावाचे मित्र मिळवून दिले. ( सत्याग्रहाच्या या अनुभवावर पुन्हा कधीतरी विस्ताराने लिहायला हवे. )
आमची सुटका करताना जेलरने दिलेले प्रमणपत्र मी अतिशय जपून ठेवलेले आहे. मला तो फार मोठा पुरस्कार वाटतो.
पुढे मित्रवर्य विजय सुरवाडे यांच्यामुळे ( ते माईंचे सेक्रेटरी होते. त्या विजयला मानसपुत्र मानायच्या ) माईसाहेबांच्या खूप भेटीगाठी झाल्या. एकतर दरवर्षी आम्ही माईंसोबत ६ डिसेंबरला चैत्यभुमीवर जायचो. दरवर्षी जयंतीच्या कितीतरी कार्यक्रमात त्यांच्यासोबत मला स्टेजवर बसता आले, भाषण करता आले, त्यांचे भाषण ऎकता आले याचा मला अभिमान वाटतो.
याचकाळातला त्यांच्यासोबतचा एक फोटो विजयरावांमुळे उपलब्ध झाला. त्यात माईसाहेबांसोबत मी, विजय सुरवाडे, देवचंद अंबादे व वसंत मून दिसत आहेत. " डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे" खंड १ ते १६ यासाठी मूनांचे अफाट योगदान आहे. मी मूनांसोबत ११ वर्षे काम केले. त्यांचा माझ्यावर फार जीव होता.
त्यांचे प्रत्येक पुस्तक ते मला भेट द्यायचे. आज त्यांच्या या पुस्तकांवरच्या सह्या बघताना अनेक आठवणी दाटून येतात. मून अभ्यासू, जिगरबाज आणि तत्वनिष्ठ होते. पण ते गवई गटाचे असल्याने बहुधा त्यांच्या मनात माईंबद्दल एक अढी होती. माई हयात असेपर्यंत मूनांनी रायटिंग्ज अॅण्ड स्पीचेसच्या रॉयल्टीची सरकारी फाईल सतत फिरती ठेवली आणि बाबासाहेबांच्या पत्नी म्हणून त्यांना या रॉयल्टीचा एक रूपयाही मिळू दिला नाही. मूनांच्या मृत्यूनंतर त्यांचे पद माझ्याकडे आले.
तेव्हा तहसीलदार मूनांनी फाईल ( नस्ती ) कशी दाबून किंवा फिरती ठेवून माईंना कपरदीकही मिळू दिली नाही ते कळले आणि खेद वाटला. मी ताबडतोब सगळ्या पुर्तता करून घेऊन रॉयल्टीचा पहिला चेक काढला, पण तोवर २९ मे २००३ ला माई गेलेल्या होत्या. तो पहिला धनादेश प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांना सुपुर्द करतानाचा क्षण आजही माझ्यासाठी ताजा आहे.
माईंच्या अनेक आठवणी आहेत. त्यातल्या किमान २ तरी इथे द्यायलाच हव्यात. मित्रवर्य अरूण खोरे यांनी आम्हा काही मित्रांच्यासोबत "दलित साहित्य संशोधन संस्था" स्थापन करायचे ठरवले. उद्घाटनाला उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांना निमंत्रण द्यायला आम्ही दिल्लीला गेलो. आमच्या भेटीत त्यांनी निमंत्रण स्विकारताना माईसाहेबांबद्दल अतिशय आपुलकीचे उद्गार काढले.
आमच्या व माईंच्या अशा दोन्ही कार्यक्रमांसाठी ते पुण्याला आले. आमचा कार्यक्रम बालगंधर्वला झाला. दुसर्या दिवशी सकाळी माईंचा कार्यक्रम होता. सिंबॉयोसिसने उभारलेल्या आंबेडकर मेमोरियलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या स्मारकाच्या टेकडीवरील सरकारी जागेच्या हस्तांतराचे काही सोपस्कार बाकी राहिलेले होते. त्यावेळी बोलताना माईंनी स्टेजवर बसलेल्या मुख्यमंत्री मनोहर जोशींना अधिकारवाणीने त्याबद्दल फटकारले. जोशीबुवा गोरेमोरे झाले. माई जरा जास्तच कडक बोलल्या होत्या.
त्यांना जोशींचे नावच आठवत नव्हते. त्या फटकळपणे म्हणाल्या, "मी मुख्यमंत्र्यांना सांगते, उगीच फाईल लांबवू नका. नाही तर मी बाळला ( बाळासाहेब ठाकरे ) सांगून काम करून घेईन. बाबासाहेबांच्या स्मारकाला नाही म्हणता म्हणजे काय?" आणि आपल्या एका मैत्रिणीकडे वळून त्या म्हणाल्या, " कोण ग तो मुख्यमंत्री? मला त्याचे नावच आठवत नाही बघ, वय झालं ना!"
आणि स्टेजवरील मुख्यमंत्र्यांकडे बघत त्यांनी विचारले, "काय हो मि. सीएम, नाव काय तुमचे?" हशा आणि टाळ्यांचा गजर झाला.
मनोहर जोशी तुपटपणे आणि खोट्या विनयाने म्हणाले, " मॅडम, मी मनोहर जोशी." "हा तर मि. जोशी, ताबडतोब आदेश काढा नाहीतर गाठ माझ्याशी आहे. माहित आहे ना मी कोण आहे ते? मी मिसेस आंबेडकर आहे म्हटलं!" पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. कदाचित माईंनी प्रोटोकॉल पाळला नसेल पण सीएमचेही कान अधिकारवाणीने उपटणारे कुणीतरी आहे याचा आम्हाला सॉलीड आनंद झालेला.
माझी माईंशी जवळीक आहे म्हणून मला बरीच बदनामीही सोसावी लागली. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर माईंबद्दल काही नतद्रष्टांनी अफवांचे अभियान चालवून आंबेडकरी समाजाचे मत त्यांच्याबद्दल कलु्षित केले. त्यामुळे माईंना २५ वर्षे अज्ञातवास सोसावा लागला. त्या आर्थिक हालाखीत जगल्या. हालाखीतच गेल्या. त्यांनी मानहानी आणि बदनामी झेलली. पण आंबेडकर म्हणूनच जगल्या आणि आंबेडकर म्हणूनच गेल्या.
माझा माईंच्या बरोबरचा फोटो बघून एका मनोरूग्ण कार्यकर्त्याने त्याच्या गलिच्छ चोपड्यात मलाही गोवले. माईसाहेबांनी म्हणे बाबासाहेबांची कथित हत्या केली तेव्हा मी त्यांना मदत केली होती. आत्ता यात एक छोटीशी अडचण इतकीच आहे की, बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर ७ वर्षांनी माझा जन्म झालेला आहे. तेव्हा मी त्यावेळी दिल्लीला कसा असेन असा प्रश्न त्या माथेफिरूला पडला नाही.
असो. माईंच्यामुळे बाबासाहेबांना काही ऎतिहासिक कामं करायला आयुष्य मिळालं असं स्वत: बाबासाहेबांनी नमूद केलेलं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. माईंचे आत्मकथन अतिशय महत्वाचे आहे. विजय सुरवाडे आणि देवचंद अंबाडे यांचे या ऎतिहासिक ग्रंथाबद्दल मन:पुर्वक आभार. ते आवर्जून वाचा. वाल्मिका एलिंजे- अहिरे यांनी अलिकडेच माईंवर एक पुस्तक लिहिलेय. तेही वाचा.
माईसाहेबांच्या ऎतिहासिक योगदानाला कृतज्ञतापुर्वक जयभीम!
............................................................
डॉ. माईसाहेब उर्फ सविता भीमराव आंबेडकर
माहेरचे नाव- शारदा कृष्णराव कबीर
जन्म- २७ जाने. १९०९, जन्मस्थळ- दादर, मुंबई,
परिनिर्वाण- २९ मे २००३, जे. जे. हॉस्पीटल, भायखळा, मुंबई.
डॉ. आंबेडकरांच्या सहवासात, आत्मचरित्र,
लेखनसहाय्य व संपादन, विजय सुरवाडे,
प्रकाशक- देवचंद वि. अंबादे, तथागत प्रकाशन, तिसगाव, कल्याण पूर्व, जि. ठाणे, ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन, मुंबई करिता )
प्रथमावृत्ती-२४ मार्च १९९०, सुधारित आवृती, मे २०१३,
किंमत रू.५००/-
एकुण पृष्ठे-४८६+३२+६४= ५८२,
पुस्तकासाठी संपर्क-९७६ ९२९ ८६ १९
- प्रा.हरी नरके, २९/५/२०२०
No comments:
Post a Comment