Wednesday, May 27, 2020

माझा कोविड-१९ चा अनुभव- By Sayali Rajadhyaksha


लॉकडाऊन काळात खाली व्यायाम करायलाही परवानगी नसल्यानं मी घरात स्टेशनरी सायकलवर व्यायाम करते. १६ मेला सकाळी सायकल करायला घेतली तेव्हाच मनातून कराविशी वाटत नव्हती. मी म्हटलं आपल्याला कंटाळा आलाय दुसरं काही नाही. मी तसंच स्वतःला ढकलत १५ किलोमीटर केले. शेवटचे ५ किलोमीटर अगदी नको वाटत असताना केले. दुपारी झोपले तेव्हा चेहरा आणि मान गरम लागत होतं. संध्याकाळी बाजूच्या बिल्डिंगमध्ये असणा-या सासुबाईंना भेटून येऊ असा विचार केला आणि जागची उठले तेव्हा चक्कर आली. अंगही गरम होतं. थर्मामीटरवर बघितलं तेव्हा १०० ताप होता.

एकतर मला ताप कधीच येत नाही. कसलंही इन्फेक्शन झालं तरीही ताप येत नाही. ताप आला तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. क्रोसिन घेतलं आणि ताप उतरला. दुस-या दिवशी इतका थकवा होता की संपूर्ण दिवस मी झोपून काढला. तिस-या दिवशी मी बरी होते पण दुपारी निरंजनला ताप आला. तेव्हाच माझ्या मनानं नोंद घेतली की हा कोविडचा ताप आहे. कारण दोघांना पाठोपाठ ताप यायचं काहीच कारण नव्हतं. त्याच दिवशी आमच्या कॉलनीतले एकाच कुटुंबातले ४ जण पॉझिटिव्ह असल्याचं कळालं होतं.

त्या मित्राला फोन केला तेव्हा त्यानं त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या टेस्टसाठी मेट्रोपोलिसवाल्यांना बोलावणार असल्याचं सांगितलं. आम्हाला लक्षणं होतीच, त्यामुळे आमच्या डॉक्टर मित्रानं प्रिस्क्रिप्शन दिलं. संध्याकाळी आम्हा चौघांची टेस्ट झालीही.

त्यानंतरच्या दिवशी मला १०० ताप येतच होता. माझी वास आणि चवीची जाणीव पूर्ण गेली होती. निरंजनला प्रचंड थकवा होता. बुधवारी दुपारी टेस्ट रिझल्ट आले. मुली निगेटिव्ह होत्या आणि आम्ही दोघे पॉझिटिव्ह होतो. लगोलग मुलींची रवानगी आजीकडे केली आणि आम्ही दोघे घरातच आयसोलेट झालो. खरं सांगायचं तर घरातच होतो त्याआधीही कित्येक दिवस. फक्त भाजी आणायला बाहेर पडायचो ते सोडलं तर.

संध्याकाळी बांद्रा इस्टमधल्या कोविड पेशंट बघणा-या एकमेव जीपीकडे गेलो. त्यांनी सगळी हिस्टरी घेतली. दोघांनाही डायबेटिस आणि ब्लडप्रेशर काहीही नाही. ऑक्सिजन सॅच्युरेशन चांगलं होतं. त्यामुळे सरकारी प्रोटोकॉलप्रमाणे त्यांनी औषधं लिहून दिली. आम्ही घरी आलो. त्या दिवसापासून माझ्या तापानं चांगलाच जोर धरला. त्यानंतरचे पाच दिवस रोज १०१-१०२ असा ताप येत राहिला. थकवा प्रचंड होता. पोट खराब झालं. वास आणि चवीची जाणीव आधीच गेलेली होती. निरंजनला ताप नव्हता पण थकवा होता. दोघेही गलितगात्र झालो होतो.

घरात दोघेच. कुणाला प्रत्यक्ष मदत करायची परवानगी नाही त्यामुळे जसं जमेल तसं चहा करणं, पाण्याच्या बाटल्या भरणं हे करत होतो. सुदैवानं आमच्या सोसायटीतले लोक सुबुद्ध आहेत. माझ्या मैत्रिणींनी आपापसात बोलून रोज नाश्ता आणि जेवण पाठवायला सुरूवात केली. त्यातल्या बहुतांश साठीच्या वरच्या आहेत. सध्या घरात कुणालाही मदत नाहीये, पण आमची परिस्थिती जाणून घेऊन त्यांनी डबे पाठवणं सुरू केलं ते अजूनही सुरू आहे.

मला दोन दिवसांपासून आता ताप नाही. वास आणि चव परत यायला लागलंय. दोघांनाही थकवा आहे पण बाकी काही नाही. रोज ऑक्सीमीटरवर ऑक्सिजन मोजत असल्यानं बाकी काळजी नव्हती. ऑक्सिजन सॅच्युरेशन नॉर्मल असणं हे कोविडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते बिघडलं की न्युमोनियासदृश परिस्थिती निर्माण झालीय अशी शक्यता असते. निरंजनला दम्याचा त्रास आहे त्यामुळे ती काळजी आम्ही घेत होतो.

या काळात महानगपालिकेकडून रोज तीनदा फोन येत होता. लक्षणं काय आहेत, ती किती तीव्र आहेत हे विचारण्यासाठी. या टीममधल्या डॉक्टरांनी स्वतःचे वैयक्तिक नंबर दिले होते आणि २४ तासांत कधीही फोन केलात तर चालेल असं सांगितलं होतं. परवा डॉक्टरांची एक टीम घरी येऊन आम्हाला तपासून गेली. झिंकच्या गोळ्या देऊन गेली. महानगरपालिका उत्तम काम करते आहे याबद्दल शंकाच नाही. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.

मुळात मला कोविडची साथ सुरू झाली तेव्हापासूनच हे आपल्यालाही कधी ना कधी होणार आहे याची जाणीव होतीच. कारण येत्या काही महिन्यांमध्ये सगळ्यांनाच यातून जावं लागणार आहे. त्यामुळे मला भीती अजिबातच नव्हती. झाल्यावरही मला क्षणभरही काळजी वाटली नाही. डॉक्टर फारोख उदवाडियांचा व्हॉट्सएपवर आलेला मेसेज अनेकांनी वाचला असेल त्यांनी त्यात तपशीलवार कोविड झाल्यावर काय काय होईल हे लिहिलेलं होतं. मला अगदी डे बाय डे तसंच झालं. मी डॉक्टर बडवेंना मेल केली की मी कोविड पॉझिटिव्ह आहे. त्यावर त्यांची – काळजी करू नका, काहीही गंभीर नाही, गरम पाणी प्या, सात दिवस आयसोलेशन करा आणि आराम करा अशी मेल आली. मग तर मी निश्चिंतच झाले.

हा व्हायरस नवीन आहे त्यामुळे तो कसा वागेल याची अजूनही कुणालाच पूर्ण माहिती नाही. मला वाटलं होतं की मला संसर्ग होईल तेव्हा लक्षणं नसतील इतका माझा स्वतःच्या इम्युनिटीवर विश्वास होता. पण तसं झालं नाही मला त्यानं चांगला दणका दिला. उलट निरंजनला नेहमी ताप येतो तर त्याला फक्त दोन दिवस आणि तोही १०० ताप आला. आमच्या कॉलनीत १३ लोक पॉझिटिव्ह आहेत. त्यातल्या फक्त ६ जणांना लक्षणं आहेत बाकीच्यांना लक्षणं नाहीत. आता कॉलनीत कुणीतरी सुपरस्प्रेडर असणार. आम्हाला निरंजनच्या आईकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता, तिथे सोडलं तर बाकी आम्ही कुठेच जात नव्हतो.

माझ्या अनुभवातून एक सांगते, लक्षणांकडे लवकर लक्ष दिलं, योग्य काळजी घेतलीत तर आठ दिवसात बरं होता. नाही नाही मी कोरोनाला हरवण्याचा कानमंत्र देत नाहीये (त्यासाठी उघडा डोळे, बघा नीट!), ना मी कोरोनाबरोबरचं युद्ध जिंकल्याचं ऐलान करतेय. कारण मुळात हे ना युद्ध आहे ना आपल्याला कुणावर मात करायचीय. हे एका नवीन विषाणूनं होणारं इन्फेक्शन आहे. विषाणूचं नाव नॉवेल करोना आहे आणि त्यामुळे होणा-या आजाराचं नाव कोविड-१९ आहे.

हे इन्फेक्शन कुणालाही होऊ शकतं. त्यातून बहुतांश लोकांना बरं वाटतं. काही दुर्दैवी लोकांना कठीण परिस्थितीतून जावं लागतं किंवा जीव गमवावा लागतो. पण ही शक्यता सगळ्याच संसर्गांमध्ये असते. तेव्हा घाबरू नका. परवा एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं की भारतात फार कमी लोकांना वेंटिलेटर लागताहेत. ही बातमीही आश्वासकच नाही का?

मराठी वृत्तवाहिन्यांचं वाईट रिपोर्टिंग बघू नका. इथे 12 रूग्ण सापडले अशा बातम्यांकडे लक्ष देऊ नका. कारण ते ना दहशतवादी आहेत ना कुणाचा जीव घ्यायला आलेत. ते आजारी पडलेत.

सोशल डिस्टंसिंग पाळाच, सॅनिटायझरचा वापर करा, सतत साबणानं हात धुवत राहा, गरज नसताना गर्दीत जाऊ नका. मास्क वापरा. इतकं करूनही संसर्ग झालाच तर मात्र घाबरू नका. आणि कृपया ज्यांना संसर्ग झालाय त्यांना वाळीत टाकण्याचे फालतू प्रकार करू नका. ही वेळ उद्या आपल्यावरही येणार आहे हे पक्कं ध्यानात असू द्या.

आमच्या इन्फेक्शनचे दहा दिवस उलटून गेलेत आणि आम्ही दोघेही आता दुस-यांना संसर्ग न देण्याच्या स्टेजमध्ये आलो आहोत. आम्ही दोघेही उत्तम आहोत! 😊

#कोरोनाचेदिवस #कोरोनाडायरीज #कोरोनाचेअनुभव #माझाकोविडअनुभव

- सायली राजाध्यक्ष





No comments:

Post a Comment