Sunday, May 10, 2020

प्रा. राम बापट- मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक: प्रा. हरी नरके











प्रा. राम बापट- मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक: प्रा. हरी नरके

३१ वर्षांपुर्वी मी माझं पहिलं पुस्तक लिहिलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक प्रा. डॉ. बाळ गांगल यांनी हिंदुत्ववादी ग.वा.बेहरे यांच्या सोबत साप्ताहिकात महात्मा फुले यांची बदनामी करणारे, त्यांच्यावर गरळ ओकणारे  २ लेख लिहिले होते. त्या लेखातील भाषा आणि आरोप भयंकर विषारी होते. महाराष्ट्रभर सोबतच्या होळ्या झाल्या. मी तेव्हा पुणे विद्यापीठात शिकत होतो. एम.ए.मराठीला विशेष साहित्यिक म्हणून महात्मा फुल्यांचा अभ्यास केलेला होता. एम.फिल.साठी महात्मा फुले यांचे टिकाकार हा विषय घेऊन मी काम करीत होतो. इतक्यात गांगलांचे लेख आले. त्या दोन्ही लेखांमधले असत्यकथन, सत्यापलाप आणि नीचपणा उघड करणारे बरेच लेख मी त्यावेळी विविध वर्तमानपत्रात लिहिले. ते वाचून तू या विषयावर पुस्तकच लिही असे पुलंचे पत्र आले. टेल्कोची रात्रपाळी, चळवळीतले काम आणि विद्यापीठातील तास सांभाळून पंधरा दिवसात पुस्तक लिहून काढले.प्रा.विलास वाघ दररोज लेटर कंपोझिंग करून पुस्तक लवकर यावे यासाठी युद्धपातळीवर काम करीत होते.

पुस्तक लिहून झाल्यावर या पुस्तकाला मोठ्या विचारवंताची, समविचारी असलेल्या सुहृदाची प्रस्तावना घ्यावी असा विचार मनात आला. तसा उठलो आणि प्रा.राम बापटसरांना जाऊन भेटलो.त्यांनी प्रस्तावना लिहायचे ताबडतोब मान्य केले. या विषयावर रान पेटलेले असताना, सोबतची होळी करण्याऎवजी त्या लेखातील विचारांचा प्रतिवाद विचाराने करण्याचे काम पुस्तक लिहून तू केलेयस हे चळवळीतले पुढचे पाऊल आहे असं बरंचसं सर बोलले.मला विद्यापीठाच्या कॅंटीनमध्ये नेऊन चहा पाजला. मी उद्या हस्तलिखित घेऊन येतो सर, असे सांगून मी निघालो. टेल्कोत रात्रपाळीला पोचायचे होते.

दुसर्‍या दिवशी सरांना हस्तलिखित नेऊन दिले. बापटसरांनी ते बारकाईने चाळले. पुन्हा मला कॅंटीनला नेऊन चहा पाजला. २ दिवसांनी बापटसर स्वत:च माझ्या विभागात येऊन मला भेटले. मला म्हणाले, " हरी, अरे तू एकदम उत्कृष्ठ काम केलेयस. २२५ संदर्भ देऊन तू बाळ गांगल आणि संघपरिवाराचे महावस्त्रहरण केलेयस. तुझे काम ऎतिहासिक आहे. मला प्रस्तावना लिहायला मिळणे हा मी माझा सन्मान समजतो. मला विचारशील तर मला असं वाटतं की हे पुस्तक खूप गाजायला हवं. त्यासाठी तू माझ्यापेक्षा अधिक प्रसिद्ध असलेल्या,खूप जास्त नाव असलेल्या माणसाची प्रस्तावना घे. काही अडचण आली तर मी आहेच. पण मला माझ्या वर्तुळापलिकडे फारसं कोणी ओळखत नाही. हे पुस्तक मोठंय. तू याला य.दि.फडके यांच्यासारख्या मान्यवराची प्रस्तावना घेतली पाहिजेस. तुझी हरकत नसेल तर मी यदिेंशी स्वत: बोलतो."

राम बापट सर यांना मी बरीच वर्षे जवळून ओळखत होतो. त्यांची डझनावारी भाषणं ऎकलेली होती. कितीतरीवेळा त्यांच्याशी गप्पा मारलेल्या होत्या. त्यांच्या घरी जाणं येणं होतं. त्यांच्या मनाचा हा मोठेपणा बघून मी दिपून गेलो.

य.दि.सरांना मुंबईला जाऊन भेटलो. त्यांनी तात्काळ प्रस्तावना दिली. पु.ल.देशपांडे यांच्याहस्ते पुस्तक प्रकाशित झाले. पुस्तकावर गोविंद तळवलकरांनी म.टा.च्या रविवार पुरवणीत भरभरून लिहिले. एका महिन्यात पुस्तकाच्या तीन हजार प्रती संपल्या. राम बापट सरांना पुस्तकाची प्रत द्यायला गेलो तेव्हा त्यांनी कॅंटीनला नेऊन वडापाव आणि चहा दिला. चार दिवसांनी पुस्तक वाचून मला भेटायला बोलवून स्वत: काढलेल्या नोटसच्या आधारे तासभर पुस्तकाच्या गुणदोषांवर माझ्याशी बोलले. दोष अगदीच किरकोळ म्हणजे, छपाईतल्या चुका, वाक्यरचना आणि संदर्भातील काही उणीवा. बाकी बहुतेक बोलणे कौतुकाचे होते. एव्हढा मोठा माणूस आपल्यासारख्या नवख्या मुलाच्या पुस्तकावर भरभरून बोलतो, निरपेक्ष भावनेने
"आपला " म्हणतो, भेटत जा असं आवर्जुन सांगतो, हे सारंच मला उर्जा देणारं होतं. मनोबल वाढवणारं होतं.

त्यानंतर आठ वर्षापुर्वी २०१२ साली त्यांचं निधन झालं तोवर सरांचा माझा २३ वर्षे घरोबा होता. शेकडोवेळा भेटलो. घरी कित्येकवेळा गेलो. तासनतास बोललो. एकत्र जेवलो. त्यांच्या घरी चहा  ते स्वत: करून पाजायचे. सरांनी मला कितीतरी दुर्मिळ दस्तऎवज स्वत:हून अभ्यासाला दिले. कित्येक विषयातले बारकावे समजाऊन सांगितले. मी माझ्याकडची पुस्तकं त्यांना वाचायला द्यायचो. वाचून सर निगुतीनं ती परत करायचे.

राम बापट हे मी अगदी जवळून बघितलेले संपुर्ण डिकास्ट झालेले विचारवंत होते. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध यांच्या तत्वज्ञानावर अपार निष्ठा आणि आस्था असलेले प्राध्यापक होते. माझे तर ते मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शकच होते.

सरांच्या शेकडो आठवणी मला सांगता येतील. माझी त्यांच्याबद्दलची माहिती सांगोवांगी किंवा एकाददुसर्‍या उडत्या भेटीवर आधारलेली नाही.

ते गेले त्याच्या  आधीची गोष्ट. मी भेटायला गेलो तेव्हा सर म्हणाले, " मी आता दुसरीकडे शिफ्ट होतोय. डॉक्टर म्हणालेत, "एकटे राहू नका. कधी रात्रीबेरात्री काही मदत लागली तर जवळ मदतीला कुणीतरी असलेलं बरं. म्हणून माझ्या भाचीकडे राहायला जाणार आहे." माझा हात हातात घेऊन म्हणाले, "आता यापुढे फारशा भेटीगाठी व्हायच्या नाहीत. माझ्याकडची सगळी पुस्तकं मी वेगवेगळ्या ग्रंथालयांना देऊन टाकलीयत. तुम्हाला हवी असतील ती तुम्ही घेऊन जा. तुमच्याकडे ती सुरक्षित राहतील याची मला खात्री आहे."

मी माझी नवी दोन पुस्तकं त्यांना दिली. मी त्यावर त्यांचं नाव लिहायला लागलो तर म्हणाले, "थांब हरी, माझं नाव नको लिहूस. नाहीतरी मी ती वाचून इतर कुणाला तरी देणार. त्यापेक्षा पुढच्या आठवड्यात तुम्हीच परत येऊन ती घेऊन जा. नव्या, तरूण अभ्यासकाला ती द्या." माझे डोळे भरून आले. सरांचेही!

त्यादिवसात काही कृतघ्न संघटनांनी माझ्या बदनामीची मोहीम चालवलेली होती. मी आयुष्यात कधीही त्यांचा सभासद नव्हतो. त्यांनी बोलवलं तर व्याख्यानाना जात असे इतकेच. पण त्यांनीच मला मोठं केलं असा गाजावाजा ते करीत होते. त्यांच्या लंगोटी पेपरातून गलिच्छ लिहित होते. मी त्यावर बोललो तेव्हा सर म्हणाले, मला त्याचं दु:ख वाटतं. हरी, ज्यांच्यासोबत आपण एव्हढी वर्षे विधायक विचारांचं, परिवर्तनाचं काम केलं, तीच माणसं काही मतभेद होताच इतकं विखारी कसं लिहू शकतात?  तुमच्या पहिल्या पुस्तकाच्या आधीपासून मी तुम्हाला ओळखतो.

अहो, जे तुम्हाला मोठं केल्याच्या आवया उठवताहेत त्यांच्यापैकी एकानेही तुमच्या पहिल्या पुस्तकाच्या आधी किंवा आसपास असं काम सोडा, त्याच्या तिसर्‍या चौथ्या श्रेणीचंही काम केलंलं नाही. तुम्ही व्यथित होऊ नका. काळावर आणि समाजाच्या विवेकबुद्धीवर सोडा. लोकांना तुमचं योगदान बरोबर कळतं. काही व्यक्ती कृतघ्न असतात. समाज नाही. समाजाच्या सामुदायिक शहाणपणावर विश्वास ठेवा. तुम्ही दुबळ्या लोकांसाठी लढलात याचं समाधान मनात बाळगा. स्पर्धाभावनेने बरबटलेले काही छटाकभर लोक काहीबाही बोलतात, लिहितात, त्या विकृतीकडे लक्ष देऊ नका. तो इगो, ती स्पर्धाभावना, ते मनाचे कुजलेपण असायचेच. माणसं आहेत. माणसांसारखीच वागायची ती. त्यांनी कितीही गलिच्छ लिहिलं तरी त्याला अनुल्लेखाने मारा.


आपलं सोडा, लोकांनी जिथं बुद्ध, फुले, भीमरावांना सोडलं नाही, तिथं आपण किस झाडकी पत्ती? मार्क माय वर्डस, जे आज तुमची बदनामी करताहेत त्यांना माहीत नाही ते काय करताहेत ते! इग्नोर देम ! माझे हे शेवटचे दिवस आहेत. माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा. लोकांना भलंबुरं कळतं. हेही दिवस जातील. आशावादी राहा. मनोबल गमावू नका. माझ्या शुभेच्छा कायम तुमच्या सोबत असतील. मन दु:खी झालं की बुद्ध वाचा. फार मोठे मानसशास्त्रज्ञ होते बुद्ध. माझा याकाळातला सर्वात मोठा आधार मला बुद्ध देतात, हरी! " पुढच्या आठवड्यात सरांचा फोन आला. पुस्तकं वाचून झालीयत. मी नोटस काढल्यात. येऊन जा. मी गेलो. सर थकलेले होते. तरिही सुमारे तासभर माझ्या पुस्तकांवर बोलले. हातात नोटस होत्या.

पुस्तकं माझ्या हातात परत देत म्हणाले, " अधूनमधून भेटत जा. बरं वाटतं. "खिश्यातून काहीतरी त्यांना हवं होतं. सगळे खिसे पालथे केले सरांनी. बेचैन होते. मी म्हटलं, "काय शोधताय सर? " म्हणाले, "थोडे पैसे द्यायचे होते तुमचे." मी म्हटलं, "कसले?" म्हणाले, "तुमच्या पहिल्या पुस्तकाचे २५ रूपये, शिवाय  तुम्ही महात्मा फुले समग्र वाड्मय १९९१ साली  मला आणून दिलंत त्याचे १० रुपये."

मी म्हटलं, "सर तुम्ही मला लाजवताय, " म्हणाले, "नाही हो, परवा डायरीत नोंदी दिसल्या तुमचे पैसे दिलेलेच नाहीत. घ्या हे ३५ रुपये. मला बरं वाटेल."

काय बोलणार? मी खाली वाकलो.त्यांनी मला आडवलं, छातीशी धरलं. मी म्हटलं " सर, तुमचे माझ्यावर अनेक उपकार आहेत, कुठे आणि कसे फेडनार मी ते?"

म्हणाले,  "सोप्पय. गरजू, होतकरू आणि गावखेड्यातला कुणी मुलगा, मुलगी भेटले तर त्यांना मदत करा, मला पावली म्हणून मी आजच सांगतो."

घरात पुस्तकं नसल्यानं घर ओकंबोकं वाटत होतं. घरात कसलाही फोटो नव्हता की देव्हारा नव्हता. सर, परिहार चौकापर्यंत मला सोडायला आले.

तिसर्‍याच दिवशी त्यांचा फोन आला. अभिनंदन करीत होते. माझी केशवनगरच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची बातमी वाचून बापटसर खूप खूश झालेले होते.  बराच वेळ बोलत होते. फोन ठेवताना म्हणाले, "एक विनंती होती." मी म्हटलं, " सर, विनंती नाही, आज्ञा करा." म्हणाले, "संमेलनाचं तुमचं भाषण लिहून झालं की मला नक्की पाठवा. मला वाचायचं आहे. संमेलनाच्या काळात बहुधा मी पुण्यात नसेन नाहीतर नक्की आलो असतो तुमचं भाषण ऎकायला."

पण माझं हे भाषण लिहून व्हायच्या आतच सर गेले.

भगवान बुद्ध म्हणतात, "कृतज्ञता हे पृथ्वीतलावरचं सर्वात मोठं मूल्य आहे." मोठा माणूस गेल्यावर त्याचे उपकार, विवेकी संस्कार, सामाजिक योगदान हे सारं विसरून काही लोक जेव्हा मरणोत्तर कंड्या पिकवित राहतात, कुचाळक्या आणि टवाळीचा आनंद घेतात तेव्हा वेदना होतात.

मनात येतं, यांना बुद्ध समजलेलेच नाहीत!

वर्तुळाबाहेरच्या भल्या नी विवेकी माणसांची टवाळी करण्याला हे लोक कसं काय प्राधान्य देतात?


यांना प्रतिगाम्यांची चीड येत नाही. त्यांचा आकस आणि वैरभाव असतो तो बापटांसारख्या पुरोगाम्यांशी. विवेकवाद्यांशी. त्यांना हे हसणार!


त्यांना वाटते, पुरोगामी चळवळ ही तर आमचीच खाजगी मालमत्ता. आम्हा जन्मसिद्ध हक्कदारांशी, बापटसर स्पर्धा करतात काय? तेव्हा आत्ताच त्यांच्या टवाळ्या सुरू करा. अफवागॅंग!
कोणाबद्दल बरं बोलण्यापेक्षा असली गॉसिप्स करणं यांना जास्त आवडतं!


सरांच्या भाषेत शेवटी माणसंच ती.

पण आकसबुद्धी असलेले हे लोक म्हणजे समाज नव्हे.

प्रा.राम बापट, प्रा. य. दि.फडके, प्रा. गं. बा. सरदार, विनायकराव कुलकर्णी, विद्या बाळ, गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर, मल्लेशाप्पा कलबुर्गी यांच्यासारख्या विवेकवादी, पुरोगामी, सत्शील, साक्षेपी लोकांमुळेच समाजाची बौद्धिक आणि नैतिक उंची वाढत असते. अर्थात हे बुटक्या, जळक्या लोकांना कळावे कसे? यांचे तर कुचाळक्या करण्यात बोन्झाय झालेले असतात ना!

राम बापटसरांप्रमाणेच समाजाच्या विवेकबुद्धीवर माझाही पूर्ण विश्वास आहे. त्यांची दिशाभूल होणार नाही.

-प्रा. हरी नरके, १०/५/२०२०

.......संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://harinarke.blogspot.com/…

https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR2YEX3mlEWSgFJTh5WBFtG0eZFUc6G2BJuRIQk26J7PUbJfFpThtGfIlcE

No comments:

Post a Comment