Thursday, May 28, 2020

काळीज पिळवटून टाकणारे मजूरांचे लोंढे - प्रा. हरी नरके












गेला महिनाभर प्रवासी मजूरांचे होत असलेले हाल बघताना काळीज पिळवटून जाते. किती भयंकर यातनांमधून जाताहेत हे बांधव. खरं तर ज्यांना ज्यांना काळीज आणि मेंदू आहेत त्या सर्वांनी अस्वस्थ व्हावं असं हे भयकारी वास्तव आहे. पण एन.डी.टि.व्ही.चा अपवाद वगळता इतर वाहिन्यांना हे हाल, हे जगणं का दिसत नाहीत? का भिडत नाही? तो बातम्यांचा ठळक आणि मुख्य विषय का होत नाही? भारतीय माध्यमांचा हा बधीरपणा संतापजनक आहे. लाजिरवाणा आहे. माध्यमांचा इतका सरकारधार्जिणेपणा तर १९७५ च्या आणीबाणीतही नव्हता.


दुसरीकडे सामान्य माणसाला दहशत बसावी, रोज धडकीच भरावी अशा बेजबाबदार पद्धतीनं याच वाहिन्या कोरोनाच्या बातम्या दाखवत आहेत. बातम्या देणारांचे किंचाळणारे आवाज जणू काही तरी वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचा भास निर्माण करताहेत. इतका बथ्थडपणा का? यांना कुणालाच संवेदना नाहीत? हे अपार हाल सोसणारे, तडफडून मरणारे लोक यांचे कुणीच नाहीत? यात ह्युमन व्हॅल्यू असलेले बातमीमूल्य नाही? सरकारचे व भारतीय माध्यमांचे हे संवेदनाशून्य वर्तन बघताना शरम वाटते. त्यांना असे वाटते की हे मजूरलोक भारतीय नाहीतच. कुठून आणत असतील हे सरकारी दलाल एव्हढे बधीरपण?

हे सरकार गरिबांचे कधीच नव्हते. ज्या तुघलखी बाण्याने नोटाबंदी, जीएसटी आणि कोणतेही नियोजन न करता अचानक केलेला लॉकडाऊन हे गरिबविरोधी निर्णय घेतले गेले त्यावरून सरकारचे वर्तन माणूसघाणे आणि निर्दयपणाचेच ठरते. सरकारला आणि त्यांच्या मातृसंघटनेला फक्त उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत आणि अब्जाधीश यांचेच हित बघायचे आहे. कारण तेच त्यांचे लोक आहेत. गरिबांचे कर्दनकाळ म्हणूनच या तथाकथित ५६ इंचाची नोंद इतिहासाला करावी लागेल.

एकाचढ एक माथेफिरू भरलेत युपी, एम.पी. बिहार राज्यात आणि पीएमओ, रेल्वे आणि अर्थखात्यात. इतके लोभस आणि खोटे चित्र रंगवतात हे नीच ट्विटरवर! कुठे फेडाल ही पापं? गरिबांची हाय तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही मुर्दाडांनो.

रस्त्यावरील भिकार्‍यांचे पुनर्वसन करणार्‍या डॉ. सोनावणे यांची मुलाखत बघत होतो. ते म्हणाले, भिकार्‍यांमध्ये दोन प्रकारचे गट कार्यरत आहेत. एक ज्यांना कामधंदा न करता आयते खायची सवय लागलेली आहे, असे सराईत, धंदेवाईक, जातीगत भिकारी आणि दुसरा ज्यांना वृद्धत्व, अपंगत्व किंवा गंभीरस्वरूपाचे आजारपण यांच्यामुळे काम करणे शक्य होत नाही असे मजबूर लोक.

मला यातली पहिल्या प्रकारची मानसिकता गुन्हेगारी स्वरूपाची वाटते. दुसर्‍या प्रकारातील लोकांसाठी कल्याणकारी भुमिकेतून समाज आणि सरकारने काम करायला हवेच. मात्र पहिल्या प्रकारच्या लोकांना ठोकून काढून सक्तीने कामाला जुंपले पाहिजे.

आपल्या देशात भिक मागण्याचेही धार्मिक उदात्तीकरण केले गेलेले आहे. कधी ते भिक्षुकीच्या तर कधी दक्षिणेच्या नावावर. लक्षावधी साधू, संन्याशी, मठपती यांचे त्यामुळेच तर फावले असून भिकारचाळे करणारे हे लोक ही त्यांचीच निर्मिती आहे. शारिरिक वा बौद्धिक श्रम न करता निव्वळ आयते खाणारे लोक हे देशावरचा बोजा आहेत. असे समुहच्या समुह असणे हे देशावरचे संकट मानायला हवे. का पोसायचे या बाजारबुणग्यांना? असे कोट्यावधी वळू पोसणारा देश कसा प्रगती करणार?

मी स्वत: झोपडपट्टीतून आलोय. बालमजुरी करीत शिकलोय. टोकाची गरिबी मी अनुभवलीय. कोणतीही शासकीय सवलत न घेता मी इथवर आलोय. मला गरिबांविषयी, श्रमिकांविषयी कळवळा वाटतो. पण तो आंधळा नाही.

त्यामुळे काही गरिबांची खटकणारी एक गोष्ट नोंदवायलाच हवी. शंभर वर्षे झाली, र.धों.कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जे. आर. डी. टाटा यांनी कुटुंब नियोजनाचे महत्व सांगून. भयावह गरिबी असताना २०२० मध्येही जेव्हा पोराबाळांचे लेंढार वाढवणारे काही लोक मला दिसतात तेव्हा डोक्यात तिडीक उठते. आणीबाणीत कुटुंबनियोजनाचा कार्यक्रम बूमरॅंग झाला आणि १९७७ पासून लहान कुटुंबाचा बोजवारा उडाला.


झोपडपट्टीत राहणारी, फूटपाथवर राहणारी ही कोट्यावधी गरिब जनता कधीतरी स्वत:च्या उत्कर्षासाठी कुटुंबनियोजनाकडे वळणार की नाही? छोटे कुटुंब हा पॅटर्न आजही का आपलासा होत नाही? जन्माला येणारे प्रत्येक गरिब मूल बाळूत्यावरून ( पाळण्यातून ) उठते आणि थेट बालकामगार बनते. कमावता हात बनते. हे कधीतरी थांबल्याशिवाय ही उपासमार, हे हालाखीचे दिवस, कसे टळणार?

सावित्रीबाईंनी - जोतीरावांनी मुलींच्या, मागासवर्गियांच्या, बहुजनांच्या शिक्षणाचे काम सुरू केले त्याला पाऊणेदोन शतके उलटली. छ. शाहू, सयाजीराव, कर्मवीर भाऊराव, बाबासाहेबांनी शिक्षणाचे महत्व आमच्या कानीकपाळी ओरडून सांगितले. तरिही अद्याप आमच्यात ज्ञानाची आच निर्माण होत नसेल तर कसे थांबणार आमचे हे नष्टचर्य?

राज्यकर्त्यांच्या नियोजनशून्यतेवर जरूर बोललेच पाहिजे.आसूडा मारलेच पाहिजेत. पण आमच्या गरिबांच्या चुकांचेही आत्मपरीक्षण केले तरच या आपत्तीमधून आम्ही काही तरी शिकलो असे म्हणता येईल. येरे माझ्या मागल्या आणि पुढले पाढे पंचावन्न!

- प्रा. हरी नरके, २८/५/२०२०

No comments:

Post a Comment