Thursday, November 28, 2013

पुणे विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय योग्यच





http://ncp.org.in/stories/initiative/262....

'पुणे विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय योग्यच - प्रा. हरि नरके'
पुणे विद्यापिठाच्या अधिसभेने {सिनेटने} सर्वानुमते विद्यापिठाच्या नामविस्ताराचा निर्णय घेतला आहे. व्यवस्थापन परिषदेकडे हा निर्णय पाठवून त्याला मान्यता मिळाली की, सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाईल. विधिमंडळाच्या अधिवेशनात याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा उच्च तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी विद्यापीठाकडून प्रस्ताव आल्यास सरकार त्याबाबत जरूर विचार करेल, असे आश्वासन दिले होते. यावरून नामविस्ताराची प्रक्रिया सुरळीत पार पडत असल्याचे दिसते. ही आनंदाची बाब आहे.

दोन विरोधी सूर निघाले, हे खरे आहे, मात्र हे दोघेही विद्यापीठाबाहेरचे असल्याने आणि ती त्यांची व्यक्तिगत मते असल्याने त्याला लोकांचा पाठिंबा नाही. एकाचे म्हणणे असे होते की, विद्यापीठाची गुणवत्ता नामविस्ताराने वाढणार नाही किंवा भ्रष्टाचारही संपणार नाही, त्यामुळे नामांतराची गरज नाही. हा युक्तीवाद मुख्य विषयाकडून लोकांचे लक्ष दुसरी कडे वेधणारा आहे. त्यात फारसे तथ्य नाही. नामविस्ताराशी गुणवत्तेची सांगड घालून विरोध करणे, योग्य नाही.

नामविस्तार करताना विद्यापीठाच्या नावामध्ये पुणे शब्द नको, कारण पुण्याला पेशव्यांचा जातीयवादी इतिहास आहे. असा आक्षेप घेतला गेला आहे. तो अतिशय बालिश आणि तथ्यहीन आहे. पुणे शहर हे जिजाऊ माँ साहेब, छत्रपती शिवराय, थोरले बाजीराव, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, टिळक, आगरकर, रानडे, कर्वे, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे यांच्यापासून जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर, अनिल अवचट, बाबा आढाव अशा गुणवंतांचे आहे. पुणे हे शिक्षण, संस्कृती, कला, विज्ञान, उद्योग आणि व्यापार यांचे माहेरघर आहे. महात्मा गांधी यांनी पुण्याला ‘कार्यकर्त्यांचे मोहोळ’ म्हटले होते. हा वारसा पाहता पुणे या नावाला विरोध करणे आयोग्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि लोकसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अशी नामविस्ताराची गेल्या २० वर्षांची परंपरा आहे. तिला अनुसरूनच पुणे हा शब्द ठेवणे उचित होईल.

सावित्रीबाई फुले या भारतातल्या पहिल्या महिला शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांनी १५० वर्षांपूर्वी शाळा सुरू केली, तेव्हा त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण ते दाम्पत्य डगमगले नाही. सावित्रीबाई जोतिरावांकडे आधुनिक शिक्षणतज्ज्ञ म्हणून बघणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमाची आमुलाग्र फेररचना करणे, तंत्रशिक्षण आणि शेतीशिक्षणाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणे, शैक्षणिक गळतीची कारणे शोधून ती दूर करण्यासाठी उपाययोजना करणे, प्रौढ साक्षरता अभियान सुरू करणे, महिला व दलितांच्या शिक्षणासोबतच अल्पसंख्याकांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देणे, याबाबतचे सावित्रीबाई-जोतिरावांचे कार्य अतुलनीय आहे.

महिला आज शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी भरारी घेत आहेत. सावित्रीबाईंच्या नावामुळे महिलांच्या मानवी अधिकारांच्या चळवळीला फार मोठी ऊर्जा मिळेल, असा मला विश्वास वाटतो. हा नामविस्तार अतिशय सलोख्याच्या वातावरणात पार पडत असल्याचा आनंद आहे. मी पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळांचे अभिनंदन करतो.

'शिवरायांची समाधी शोधण्याचं श्रेय जोतिरावांचंच!'

http://ncp.org.in/stories/ourachievers/260
'शिवरायांची समाधी शोधण्याचं श्रेय जोतिरावांचंच!'

पोवाडारुपी ‘शिवचरित्र’ (Shivcharitra) लिहून आणि प्रकाशित करून महाराजांचा पराक्रमी वारसा घराघरांत पोहोचवण्याचं खरं श्रेय जातं ते महात्मा फुले यांनाच. जोतिरावांच्या या महान कार्यावर प्रकाश टाकलाय, प्रा. हरि नरके (Prof. Hari Narke)... यांनी

शिवजयंती सुरू करण्याचे श्रेय सामान्यपणे लोकमान्य टिळक यांना दिलं जातं. १८९५-९६ साली लोकमान्य टिळक शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला रायगडावर उपस्थित राहिले आणि त्यांनी या कार्यक्रमात सहभाग दिला. ही महत्त्वाची ऐतिहासिक घटना आहे. तथापि त्याआधी पंधरा वर्ष म्हणजे १८८० साली पुण्याचे महात्मा जोतिराव फुले हे रायगडावर गेल्याचे आणि तिथे त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढल्याचे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध झाले आहेत. १८६९ साली जोतिराव फुल्यांनी मराठी भाषेतील शिवचरित्र (पोवाडा रूपी) लिहून प्रकाशित केले आहे. आणि शिवाजी महाराजांचा अभिमानास्पद वारसा घराघरात पोहोचवला. छपाईची सुरूवात झाल्यापासूनचे मराठीतले हे पहिले शिवचरित्र आहे. जोतिरावांनी सत्यशोधक चळवळीच्या प्रेरणा सांगताना शिवरायांना महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. जोतिरावांच्या सगळ्या लेखनात, आणि भाषणांमध्ये शिवरायांचा प्राधान्याने उल्लेख आढळतो. त्यांच्या शिवचरित्राच्या आजवर २५ हून अधिक आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्याची भाषांतरंही विविध भाषांमध्ये झालेली आहेत. १८८० साली जोतिराव पुण्यातून चालत रायगडावर गेले. तिथे झाडा-झुडपात हरवलेली आणि पालापाचोळ्यात दिसत नसलेली शिवरायांची समाधी जोतिरावांनी मोठ्या कष्टाने शोधून काढली. त्याठिकाणी साफसफाई केली व शिवरायांच्या समाधीवर फुले वाहिली. ही माहिती जोतिरावांनी पुण्यात येऊन सारसबाग जवळ असलेल्या हिराबागेत आयोजित केलेल्या शिवसमाधी विषयक सभेत स्वतः सांगितल्याची नोंद मिळालेली आहे. या सभेत साफळकर स्वामी, गंगारामभाऊ म्हस्के आदी मान्यवर पुणेकरांची भाषणे झालेली होती. त्याच सभेत शिवजयंची उत्सव सुरू करण्याचा विचार जोतिरावांनी मांडला. आणि त्याला सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला. त्या बैठकीत शिवजयंतीसाठी लोकवर्गणी जमवण्याचा निर्णय झाला. एकूण २७ रूपये त्या सभेत जमले. त्यातील तीन रुपये स्वतः जोतिरावांनी दिले. १८८०साली पुण्यात आणि रायगडावर शिवजयंती उत्सवाची जोतिरावांनी सुरूवात केली. त्यांचे सहकारी कामगार नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईच्या लालबाग आणि परळ या गिरणी कामगारांच्या वस्त्यांमध्ये शिवजयंती उत्सव सुरू केला. हा उत्सव सत्यशोधक मंडळी अतिशय भव्य प्रमाणात करत असत. १८९३ साली गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देऊन टिळकांनी त्याचे चळवळीमध्ये रूपांतर केले. त्यांना शिवजयंतीचेही महत्त्व वाटत होते. म्हणूनच पंधरा वर्षे सुरू असलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमात टिळक जातीने उपस्थित राहिले. आणि आपला सहभाग देऊन त्यांनी हा उत्सव आणखी मोठा केला.

१८८२ साली टिळक-आगरकरांना शिवाजी महाराजांच्या वंशजाबद्दल केलेल्या लेखनासंदर्भात एका खटल्याला सामोरं जावं लागलं. त्यावेळी त्यांना डोंगरीच्या तुरुंगात राहावं लागलं. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचे खजिनदार रामशेठ बापुशेठ उरवणे यांना रूपये दहा हजार रोख घेऊन जामिनासाठी मुंबईला पाठविलं. आपल्या जामिनासाठी जोतिरावांनी ही धडपड केल्याचे खुद्द टिळक आगरकरांनी ‘केसरी’मध्ये नमूद केली आहे. टिळक-आगरकर तुरुंगातून सुटल्यावर सत्यशोधकांनी त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली, सत्कार करून मानपत्र दिले. हे मानपत्र ‘केसरी’मध्ये छापून आलं. उरवणे यांच्या मृत्युनंतर खुद्द टिळकांनी या आठवणींना उजाळा दिला. तेव्हा पोलिस खात्याचे अहवाल, सत्यशोधक चळवळीचे दस्तावेज, पुरावा लेखागारातील कागदपत्रे आणि सत्यशोधक माधवराव बागल यांनी १९३३ साली सत्यशोधक समाज हिरक महोत्सव ग्रंथात केलेले लेखन, हे सर्व दस्तावेज असे सांगतात की, जोतिरावांनी १८८० साली देशात सर्वप्रथम शिवसमाधी शोधणं, तिचे सुशोभिकरण करणं आणि शिवजयंती उत्सव सुरू करणं, अशी महत्त्वपूर्ण ऐतिहासिक कामे केलेली आहेत.

जामिन आणि मानपत्र याबाबतची नोंद तर खुद्द टिळकांनी केली आहे. तेव्हा आज आपण असे म्हटले पाहीजे की, शिवजयंती सुरू करणारे जोतिराव आहेत आणि ती मोठी करण्यात लोखंडे आणि लोकमान्य टिळक यांचा महत्त्वाचा वाटा आहे.


महात्मा जोतीराव फुले हे आद्य भारतीय समाजशास्त्रज्ञ



















कुमार केतकर, शारदा साठे, छगन भुजबळ, हरी नरके, कृष्णकांत कुदळे व इतर मान्यवर
......................
महात्मा फुले पुण्यतिथी -- फोटो - समता भूमी . . . .फोटो-- महेश जांभुळकर - 98600 88820
.......................................


महात्मा जोतीराव फुले हे आद्य भारतीय समाजशास्त्रज्ञ- कुमार केतकर
पुणे: दि.२८ नोव्हें. "डा. जी.एस.घुर्ये आणि एम.एन.श्रीनिवासन यांच्या अनेक वर्षे आधी महात्मा जोतीराव फुले यांनी भारतीय समाजाचे विशेषत: जातीव्यवस्थेचे ज्या पद्धतीने शास्त्रीय विश्लेषण केले होते ते पाहता, जोतीराव हेच आद्य भारतीय समाजशास्त्रज्ञ ठरतात.त्यांचे हे लेखन आंतरराष्ट्रीय दर्जाचे होते. त्यांच्या साहित्यातील हा वैचारिक भाग एकत्र करून त्याची मांडणी करण्याचे काम नव्या पिढीतील अभ्यासकांनी हाती घ्यावे" असे प्रतिपादन दिव्यमराठीचे प्रमुख संपादक कुमार केतकर यांनी आज येथे केले. अ.भा.महात्मा फुले समता परिषदेतर्फे देण्यात आलेला "महात्मा फुले समता पुरस्कार" स्विकारताना ते बोलत होते. राज्याचे सार्व. बांधकाम तथा पर्यटन मंत्री आणि समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी स्त्रीमुक्ती चळवळीच्या नेत्या शारदा साठे,खासदार समीर भुजबळ, आमदार गिरीष बापट, जयदेव गायकवाड, उल्हास पवार, जयंत जाधव, दिप्ती चवधरी, महापौर चंचला कोद्रे, कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे, महिला अध्यक्ष पार्वती शिरसाठ,सुधीर गाडगीळ व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्यभरातून समतासैनिक प्रचंड मोठ्या संख्येने अभिवादनासाठी उपस्थित होते.
केतकर पुढे म्हणाले, "अमेरिकन यादवी युद्धात अब्राहम लिंकन यांनी कृष्णवर्णीयांच्या मुक्तीसाठी सर्वस्व पणाला लावले. त्याचकाळात जोतीरावांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ या चळवळीला अर्पण करून जागतिक दृष्टीचा प्रत्यय दिला.विचारांचे असे जागतिकीकरण करणारे जोतीराव जातीनिर्मुलनाची चळवळ रुजवून गेले. आपल्याकडे विचारवंत आणि सक्रीय कार्यकर्ते अशी विभागणी झालेली आहे.जोतीराव सक्रीय कार्यकर्ते होतेच पण ते विद्वानही होते. त्यांनी लोकशाही विचारांचा पाया घातला. आज अनेक फ्रेंच आणि जर्मन विचारवंत जोतीरावांचा अभ्यास करीत आहेत. देशातील ६ हजार जातींच्या अस्मिता कुरवाळत न बसता त्यांच्या काचातून समाज बाहेर यावा यासाठी त्यांनी सत्यशोधक चळवळ केली. आज देश संकटातून जात असताना आणि १५-२० वर्षांनी आपला देश कुठे असेल याचा विचार करताना थरकाप उडतो.माओ आणि महात्मा गांधी यांच्या विचारातील अनेक मौलिक सुत्रे आपल्याला शतकभर आधीच जोतीराव देऊन गेले होते."
रुपये एक लक्ष, फुलेपगडी.मानपत्र, स्मृतीचिन्ह, उपरणे आणि फुले समग्र वाड्मय यांचा पुरस्कारात समावेश होता.
यावेळी शारदा साठे, छगन भुजबळ यांची भाषणे झाली. कृष्णकांत कुदळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.प्रीतेश गवळींनी आभार मानले. सुत्रसंचालन विजय लडकत यांनी केले.
कार्यक्रमाला समता परिषदेचे राज्य पदाधिकारी, बापू भुजबळ, डा. कैलास कमोद, डा.संजय गव्हाणे, जयराम साळुंखे, सुशील जाधव, अंबादास गाडेकर, दत्ता घाटगे, मकरंद सावे, बाळासाहेब माळी, आबा खोत, सुभाष राऊत, राजेश मनोरे, पत्रकार अरूण खोरे, संजय शिंदे, अद्वैत मेहता, शैलेंद्र परांजपे उपस्थित होते.


........................................................................................

Wednesday, November 27, 2013

महात्मा फुले समता पुरस्कार मानपत्र

ज्येष्ट विचारवंत आणि संपादक श्री. कुमार केतकर-"महात्मा फुले समता पुरस्कार मानपत्र"







Monday, November 25, 2013

पेपरबॅक : उत्कंठावर्धक व प्रेरणादायी

LOKSATTA,saturday,23 Nov 2013,edit page
http://www.loksatta.com/sampadkiya-news/yes-i-am-the-malala-malala-yousafzai-272664/






विशेष लेखपद्माकर कांबळे - padmakar_kamble@rediffmail.com
Published: Saturday, November 23, 2013
मलाला युसुफझाई आज आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आहे. एवढय़ा लहान वयात शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी नामांकन मिळालेली ही पहिलीच मुलगी. तिचं 'आय अ‍ॅम मलाला' हे पुस्तक वाचकांना तिच्या अनुभवांचं, तिनं पाहिलेल्या स्वप्नांचं सरळ सोप्या भाषेत ओळख करून देतं. 
एका कुमारवयीन मुलीचं हे आत्मकथन म्हणजे आपल्या वडिलांच्या बरोबरीनं मुलींच्या शिक्षणाच्या हक्कासाठी झगडणाऱ्या एका 'कार्यकर्ती'चे अनुभव आहेत.  पाकिस्तानी तालिबान्यांनी तिला 'लक्ष्य' का केलं, त्यामागील कारणही सर्वाना माहीत आहे. तो सर्व तपशील या पुस्तकात येतोच. पण त्याहीपेक्षा स्वात खोऱ्यासारख्या दुर्गम भागात राहून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत धार्मिक मूलतत्त्ववाद अन् जहालपणा व त्यातून होणारी हिंसा यांच्या कचाटय़ात सापडूनसुद्धा आपल्या मार्गावरून चालू पाहणाऱ्या एका जिद्दी मुलीची कहाणी आहे.
मलाला जे सांगू पाहतेय ते गेल्या दशकभरातलं पाकिस्तानचं वास्तव आहे. जोडीला पाकिस्तानच्या इतिहासातील काही घटनांची उजळणी आहे. पण मलालाची पाश्र्वभूमी पाहता परंपरावादी-धार्मिक पगडा असलेल्या सामान्य कुटुंबात जन्मलेली एक मुलगी या सर्व घटनांकडे कशी पाहते, त्याचा काय अर्थ लावते, हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे. मलाला-स्वात-पाकिस्तान असा हा त्रिकोण आहे.
मलालाची कहाणी तिच्या जन्मापासून सुरू होते. हा कालखंड फारच अलीकडचा म्हणजे सोळा वर्षांपूर्वीचा.. स्वात खोऱ्यातील 'पश्तुन' कुटुंबात तिचा जन्म झाला. मुलीचा जन्म ही 'साजरी' करण्यासाखी घटना नाही अशी 'पश्तुनी' परंपरा. पण वडील झियाउद्दीन या परंपरेला फाटा देत आपल्या अपत्याच्या जन्माचं स्वागत करतात. कारण ही मुलगी भविष्यात वेगळं काहीतरी करेल असा त्यांना आशावाद असतो. पुढे हेच वडील तिचं प्रेरणास्थान बनतात. पश्तुन परंपरेत मानाचं स्थान असलेल्या शूर 'मलालाई' या स्त्रीवरून झियाउद्दीन आपल्या कन्येचं नाव मलाला ठेवतात. परंतु गावातल्या मौलानाला ते आवडत नाही. तो म्हणतो, या नावाचा अर्थ वाईट आहे. म्हणजे 'दु:खाने ग्रासलेली'. इथं मलालाच्या बरोबरीनं तिच्या वडिलांचा भूतकाळ अन् स्वातचा इतिहास समोर येतो. 
मलालाला स्वात खोऱ्याविषयी भरपूर प्रेम आहे. 'मी पहिली 'स्वाती', नंतर 'पश्तुनी' व शेवटी पाकिस्तानी आहे' असं ती म्हणते. निसर्गसंपन्न स्वात खोरे, हिमशिखरे, प्राचीन बौद्ध संस्कृतीच्या पाऊलखुणा अन् शांतता हा स्वातचा हजारो वर्षांचा वारसा आहे. लहान मलालाचं हेच जग आहे. त्यापलीकडील पाकिस्तान तिला माहीत नाही.
मलाला चार वर्षांची असताना अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरचे मनोरे उद्ध्वस्त होतात अन् सगळेच भू-राजकीय संदर्भ झपाटय़ानं बदलतात. जगाच्या नकाशावर न्यूयॉर्क-अमेरिका नेमके कुठे आहेत हे कळण्याचं मलालाचं वय नव्हतं, पण तिचे वडील या घडामोडींनी चिंताग्रस्त होतात. अखेर अमेरिका अफगाणिस्तानवर हल्ला करते व मोठय़ा प्रमाणावर तालिबानी दहशतवादी 'सुरक्षित' आसऱ्यासाठी अफगाण-पाकिस्तानच्या सीमेकडील प्रदेशांकडे आपला मोर्चा वळवतात. हा स्वायत्त प्रदेश आहे व पाकिस्तान सरकारचं यावर 'दुरून'च नियंत्रण आहे, पण ते सांगण्यापुरतं वा नावापुरतंच आहे. 
मलालाची शाळा, शाळेतील तिची खास मैत्रीण मोनिबा, मलालाच्या आवडत्या शिक्षिका मरयम अन् स्वातची शांतता हे सर्व मलालापासून लवकरच हिरावून घेतलं जाणार याची लहान मलालाला कल्पना नाही. अखेर स्वातच्या खोऱ्यात तालिबान्यांचा वावर दिसू लागतो. धार्मिक मूलतत्त्ववादाच्या कचाटय़ात सापडलेल्या पाकिस्तानसाठी हे नवीन आव्हान उभं राहतं. उजवा पाय पोलिओग्रस्त असलेला मुल्ला फझलुल्लाह हा त्यांचा म्होरक्या. स्वातमध्ये तो अनधिकृत एफएम रेडिओ केंद्र स्थापन करतो व त्यावरून जहाल भाषणं करू लागतो. थोडय़ाच काळात 'रेडिओ मुल्ला' या नावानं ओळखला जाऊ लागतो. या रेडिओ मुल्लावर या आत्मकथनात एक स्वतंत्र प्रकरण आहे. यानंच पहिल्यांदा स्वात खोऱ्यातील मुलींच्या शाळेवर बॉम्बहल्ले करायला सुरुवात केली. पुढे यानंच मलालाच्या हत्येची 'सुपारी' दिली.
मलालाचा टी.व्ही, त्यावरील तिचे आवडते बॉलीवूडचे कार्यक्रम बंदीच्या वावटळीत सापडतात. पण शेवटी तिच्या शाळेवरच बंदीची वेळ येते, त्या वेळी मात्र ती गप्प बसत नाही. 'स्वात'मधील वास्तव परिस्थिती बाहेरील जगाला कळावी म्हणून अखेर मलाला वडिलांच्या पत्रकार मित्राच्या मदतीनं 'गुल मकाई' या टोपणनावानं बीबीसी उर्दूच्या संकेतस्थळासाठी लिखाण करू लागते. परंतु शेवटी 'शाळा' बंद पडतेच, पण लष्करी कारवाईमुळे 'स्वात'पण मलाला व तिच्या कुटुंबाला सोडावं लागतं. तीन महिने मायदेशातच 'देशांतर्गत निर्वासित' म्हणून राहण्याची वेळ येते. स्वात तालिबानमुक्त केल्याची घोषणा लष्करानं केल्यानंतर तीन महिन्यांनंतर मलाला परतते, तेव्हा ती 'रक्ताळलेले' स्वात पहिल्यांदाच पाहते. 
'थांबणं' मलालाला पटत नाही. स्वातमध्ये परतल्यानंतर 'शाळा' पुन्हा सुरू होते. मलालाच्या जन्माआगोदर तिच्या वडिलांनी एक छोटी भाडय़ाची इमारत, सहा शिक्षक व जवळपास शंभर मुलांना घेऊन सुरू केलेल्या शाळेचा विस्तार आता तीन इमारती, हजार मुलं-मुली, सत्तर शिक्षक-शिक्षिकांपर्यंत विस्तारतो. साहजिकच पुन्हा डोके वर काढू पाहणाऱ्या पाकिस्तानी तालिबान्यांकडून मलालाच्या वडिलांना धमक्या येऊ लागतात. 'मुलींना शिक्षण देणं थांबवा!' पण मलालाला ते 'लक्ष्य' करतील असं वडिलांना मात्र वाटत नाही. 
मलाला, तिचे वडील, तिची आई या तिघांचाही 'इस्लामवर गाढ विश्वास' आहे. आपण जे काम करतोय ते इस्लामच्या विरोधात नाही यावर मलाला व तिचे वडील ठाम आहेत.
या आत्मकथनातला वाचनीय भाग म्हणजे ९\११ नंतरचं मलालाचं आयुष्य.. स्वात ते बर्मिगहॅम रुग्णालयापर्यंतचा तिचा प्रवास.. या सगळ्यात एक 'नाटय़' आहे. म्हणूनच ते अधिक उत्कंठावर्धक आहे. 
आय अ‍ॅम मलाला : मलाला युसुफझाई
प्रकाशक : वेडेनफेल्ड अँड निकोलसन
पाने : २७६, किंमत : ३९९ रुपये.




मानवी जगण्याची समर्थ भाष्यकार

LOKSATTA, Saturday, 2013,Edit Page
http://www.loksatta.com/sampadkiya-news/capable-of-living-human-annotator-272668/...

विशेष लेखमीना वैशंपायन -meenaulhas@gmail.com
Published: Saturday, November 23, 2013
नुकत्याच निधन पावलेल्या डोरिस लेसिंग या नोबेल विजेत्या ब्रिटिश लेखिकेला दक्षिण ऱ्होडेशियात (आताचा झिम्बाब्वे) घालवलेली संस्कारक्षम वयातील वर्ष, पहिल्या महायुद्धाचं तांडव आणि युद्धोत्तर विध्वंस यांचा अनुभव आणि तशा स्थितीतही सोबतीला असणारं जागतिक, अभिजात साहित्य या आपल्या लेखनप्रेरणा आहेत असं वाटे. एका शतकाची, दोन महायुद्धांची साक्षीदार असणाऱ्या लेसिंग मानवी जीवनाबद्दल आस्थेनं आणि सकारात्मकतेनं लिहीत.
'लेखन हा माझा श्वास आहे आणि त्यामुळे त्याशिवाय जगणं मला अशक्य आहे,' असं एकीकडे गंभीरपणे म्हणत दुसरीकडे 'लेखनाची माझी ही जित्याची खोड मेल्यावरही जाणार नाही, माझ्या थडग्यावरही मी काही तरी खरडेन' अशी मिस्कील पुस्ती जोडत जाणाऱ्या नोबेलविजेत्या ब्रिटिश लेखिका डोरिस लेसिंग यांचं १७ नोव्हेंबर रोजी निधन झालं. जगभरातील त्यांच्या चाहत्यांना आपल्या आवडत्या लेखिकेच्या निधनानं हळहळ तर वाटली असेलच, पण तिनं वाचकांसाठी मागे ठेवलेल्या दर्जेदार साहित्याची सोबत आहे असं समाधानही असेल. लेसिंग यांच्या कारकिर्दीत त्यांच्या नावावर साठेक पुस्तकं आणि विविध पुरस्कार असूनही तिला नोबेल मात्र वयाच्या ८८व्या वर्षी मिळालं. तेव्हा लेसिंग यांच्या काहीशा वळणावळणाच्या, टीका, चर्चा यांनी युक्त अशा जीवनप्रवासाशी ही बाब सुसंगत आहे असं त्यांच्या हितचिंतकांचं म्हणणं होतं.
लेसिंग आणि 'गोल्डन नोटबुक' असं समीकरण वाचकांच्या मनात इतकं पक्कं आहे की, त्यांच्या इतर पुस्तकांपेक्षा याच पुस्तकाचा निर्देश नोबेल समितीनं केला. १९६२ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीला पन्नास र्वष झाली तरी तिची वाचकप्रियता इतकी आहे की प्रत्येक पिढीला ती आपलीच गोष्ट वाटते. समकालीन लेखनात लेसिंगचं सामथ्र्य यात प्रकर्षांनं जाणवतं. वाचकाशी नाळ जोडणारं असं वास्तववादी लेखन करणाऱ्या लेसिंगनं स्वयंशिक्षणातूनच आपलं वाङ्मयीन व्यक्तित्व घडवलं. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी औपचारिक शिक्षणाला रामराम ठोकून अभिजात साहित्याच्या मदतीनं तिनं आपल्या मनाची मशागत केली. दक्षिण ऱ्होडेशियात (आताचा झिम्बाब्वे) घालवलेली संस्कारक्षम वयातील र्वष, पहिल्या महायुद्धाच्या तांडवाचा आणि युद्धोत्तर विध्वंस यांचा अनुभव आणि तशा स्थितीतही सोबतीला असणारं जागतिक, अभिजात साहित्य या आपल्या लेखनप्रेरणा आहेत असं तिला वाटे. ऱ्होडेशियातील ब्रिटिश वसाहतींमध्ये दिसणाऱ्या वसाहतवादी जीवनाचा, वर्णभेदमूलक तीव्र संघर्षांचा व जाणवणाऱ्या आर्थिक दरीचा विलक्षण परिणाम तिच्या मनावर झाला. त्यामुळेच वयाच्या ९४ वर्षांपैकी ६४ र्वष ब्रिटनमध्ये घालवूनही तिच्या मनोविश्वाचं केंद्रस्थान ती पहिली तीस वर्षेच राहिली आणि विविध प्रकारे तिच्या लेखनातून त्या अनुभवांचा आविष्कार होत राहिला.
स्वानुभवातून चुका सुधारत राहण्यानं, स्वयंशिक्षण, स्वयंमार्गदर्शन करत राहिल्यानं तिची किती तरी मतं वेगळी, वैशिष्टय़पूर्ण ठरली. स्वतंत्र विचार व वृत्ती, परखड भाष्य आणि जीवनाबद्दलचं लसलसतं, जिवंत कुतूहल यामुळे तिचं लेखन आगळं, ताजं, उत्स्फूर्त वाटत राहिलं.
लहानपणी आपल्यात कोणतीच क्षमता नसल्याची जाणीव इतरेजन करून देत राहिल्यानं आपण वैफल्यग्रस्त झालो आणि म्हणून लेखनाकडे वळलो असं ती म्हणत असली तरी वाचन व लेखन यांची उपजतच आवड तिला होती असं तिच्या आत्मचरित्रात्मक आठवणींमधून लक्षात येतं. लेखक होण्यासाठीच आपला जन्म आहे असं मनोमन वाटत असल्यानं तिनं १८ व्या वर्षांपासूनच कादंबरीलेखनाला आरंभ केला. दोन-चार सुमार दर्जाच्या कादंबऱ्या लिहिल्यावर २६-२७ व्या वर्षी 'द ग्रास इज सिंगिंग' (१९५०) या कादंबरीपासून तिला सूर गवसला. या पहिल्याच प्रकाशित कादंबरीतील कथानक, पात्रचित्रण, भाषा यांचा प्रभाव वाचक, समीक्षक यांच्यावर पडला. गोरी ब्रिटिश तरुणी आणि कृष्णवर्णीय शेतमजूर यांच्यातील असफल प्रेमकहाणी व तिचा शोकपूर्ण शेवट दाखवतानाच लेसिंग स्त्रीचं भावनिक परावलंबन आणि कृष्णवर्णीयांच्या गुलामी मनोवृत्तीत घडत जाणारा बदल यांचा वेध घेताना दिसते.
त्यानंतर कथा-कादंबरी या वाङ्मय प्रकारांत तिचं बहुतेक लेखन मोडत असलं तरी आरंभी तिनं काही कविता केल्या होत्या. 'फोर्टीन पोएम्स' (१९५९) हा कवितासंग्रह, काही एकांकिका, नाटुकली आणि 'इच हिज ओन वाइल्डरनेस', 'प्ले विथ अ टायगर' अशी नाटकंही तिच्या नावावर आहेत. याशिवाय 'अंडर माय स्किन' (१९९५) व 'वॉकिंग इन शेड' (१९९८) हे तिच्या आत्मचरित्राचे दोन खंड प्रकाशित झाले. त्यात १९६२ पर्यंतचाच जीवनप्रवास चित्रित झाला. याशिवाय 'आफ्रिकन लाफ्टर' व 'लंडन ऑब्झव्‍‌र्हर' हे ललितसंग्रह, काही समीक्षापर व डॉक्युमेंटरीवजा लेखन यांचाही समावेश आहे.
१९५० मधील पहिल्या कादंबरीपासूनच तिच्या लेखनाची वैशिष्टय़ं कधी स्पष्टपणे, तर कधी अस्पष्टपणे दिसून येतात. तिच्या वैचारिक प्रवासाचे टप्पेही दिसतात. लेसिंगच्या वाङ्मयाचे आशयानुसार स्थूलमानानं चार भाग करता येतात- समकालीन समाजवास्तवाशी निगडित कथा-कादंबऱ्या, अवकाशविज्ञानावर आधारित कादंबऱ्या, गूढ-अध्यात्मदर्शी लेखन आणि इतर संकीर्ण लेखन. हे पाहिलं की लेखिका म्हणून आणि व्यक्ती म्हणूनही तिचं मन किती तरी वेगवेगळ्या पातळ्यांवर भ्रमण करत होतं आणि आपल्या लेखनातून त्या अनुभवांचा धांडोळा घेत, त्यांचा अन्वयार्थ लावत ती समाजवास्तवाची विविध परिमाणं वाचकांपुढे मांडत होती. तिच्या कादंबऱ्यांमध्ये परस्परसंबंधित सूत्रं आहेत तशीच पुढच्या कादंबऱ्यांची सूचना आहे. चित्रपटांचे सीक्वेल हा प्रकार तिनं चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीच आपल्या लेखनात वापरला होता. 'गोल्डन नोटबुक'मधून मुक्त स्त्रीचं तपशीलवार वर्णन दाखवताना एकविसाव्या शतकातील आधुनिक स्त्रीचं चित्रण ती 'अ‍ॅना वुल्फ' या नायिकेच्या रूपानं करते आहे असं दिसतं. (जाता जाता १९६२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीत संततिनियमन साधनं व त्यामुळे स्त्रीला मिळणारं स्वातंत्र्य यांचं चित्रण आहे. १९६३ मध्ये त्यासंबंधीची सोपी साधनं बाजारात आली आहेत.) तिच्या लेखनातील अशी भविष्यवेध घेण्याची क्षमता अपूर्व आहे.
'चिल्ड्रेन ऑफ व्हायोलन्स' या पाच कादंबऱ्यांतील तिच्या काही व्यक्तिरेखा समान आहेत, पण कथानकात त्या त्या व्यक्तिरेखांचा विकास झाला असावा याचं भान तिनं ठेवलं आहे. मानवी जीवन व समाज सतत परिवर्तनशील असतो. तो स्थितिप्रिय आहे असं म्हटलं तरी आजूबाजूच्या वातावरणाचा, घटनांचा परिणाम समाजात झिरपत राहतो. माणसं बदलतात असं तिचं सूत्र आहे. ही कादंबरी मालिका वीस वर्षांच्या काळात लिहिली गेली. मध्ये मध्ये इतर कादंबऱ्याही तिनं लिहिल्या, पण मार्था क्वेस्ट या नायिकेमध्ये पहिल्या कादंबरीपासून शेवटच्या 'द फोर गेटेड सिटी'पर्यंत कसा बदल होत गेला ते तिनं दाखवलं आहे. त्याच वेळी त्या वीस वर्षांत घडलेले सामाजिक बदल, घटना यांचाही ताजा संदर्भ आहे. 'द फोर गेटेड सिटी'मधून गूढवादाची सूचना मिळते आणि पुढे 'ब्रिफिंग फॉर अ डिसेंट इनटू हेल' या अंतर्मनाच्या अवकाशाचा शोध घेणाऱ्या कादंबरीची निर्मिती होते.
आपल्या लेखनाबद्दलची केलेली योजनानिश्चिती आणि वाचकांना काय सांगायचं आहे याची स्पष्ट कल्पना देण्यात लेसिंग यशस्वी होते. जीवनातील कुरूपतेकडे ती पाठ फिरवत नाही तसेच विचारप्रणालीचा स्वीकार केल्यानंतर जर भ्रमनिरास झाला, तर त्याबद्दल स्पष्टपणे सांगण्यासही ती कचरत नाही. तिचा स्वत:चा कम्युनिझम ते सुफीझम असा झालेला वैचारिक प्रवास, आधुनिक जगातील नव्या जीवनशैलीमुळे वाढणारे मानसिक गुंते ('द गोल्डन नोटबुक', 'द गुड टेररिस्ट') आणि उभ्या राहणाऱ्या शारीरिक समस्या ('द फिफ्थ चाइल्ड', 'बेन कम्स टू द वर्ल्ड') यांनी ती अस्वस्थ होई आणि त्यावरील खात्रीशीर उपाय सांगणं शक्य नसलं तरी त्यांची जाणीव करून देणं शक्य आहे, ते आपण करावं अशी तळमळ तिच्या मनात असे.
'कॅनॉपस इन अ‍ॅरगॉस - अर्काइव्हज' ही पाच कादंबऱ्यांची मालिका तिच्या अफाट कल्पनाशक्तीचा प्रत्यय देते. मानवी समाजाच्या आरंभापासूनचा इतिहास सांगत, रूपकांच्या आश्रयानं व्यवस्थेवर उपहासात्मक शैलीत ताशेरे झोडणाऱ्या मालिकेनं आणि तिच्या सखोल, परिश्रमपूर्वक संपादनानं वाचक चकित झाले. 
मानवी नातेसंबंध, त्यातही स्त्री-पुरुष संबंध, त्यांचे वर्तनविषयक प्रश्न, याविषयी लिहिताना तिची मिस्कील पण स्पष्ट शैली आणि आकृतिबंधातली प्रयोगशीलता वेधक ठरते. लेसिंगच्या अशा विपुल ग्रंथसंपदेची व वैशिष्टय़ांची झलक देणंच शक्य आहे.
एका शतकाची, दोन महायुद्धांची साक्षीदार असणारी लेसिंग मानवी जीवनाबद्दल ज्या आस्थेनं लिहिते आणि जो सकारात्मक दृष्टिकोन दाखवते तो पाहून या प्रतिभाशालिनीबद्दल आदरच वाटतो. ब्रिटिशांनी तिला देऊ केलेला 'डेम' हा किताब (त्यांच्या वसाहतवादी वृत्तीचा निषेध म्हणून) नाकारताना 'आता एम्पायर आहेच कुठे मी 'डेम' व्हायला?' असे म्हणणाऱ्या लेसिंगचा हाही पैलू तिच्या कादंबऱ्यांएवढाच मनाला भावतो.



Saturday, November 23, 2013

कुमार केतकर म.फुले समता पुरस्काराचे मानकरी



कुमार केतकर म.फुले समता पुरस्काराचे मानकरी
ख्यातनाम विचारवंत, संपादक आणि वक्ते कुमार केतकर यांना यावर्षीचा महात्मा फुले समता परिषदेचा "महात्मा फुले समता पुरस्कार" घोषित करण्यात आला आहे. पुरस्कारात रुपये एक लाख, मानपत्र, फुले पगडी आणि  स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे. निवड समितीचे निमंत्रक प्रा. हरी नरके आणि कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
केतकर यांनी गेल्या ४० वर्षात आपल्या निर्भीड आणि व्यासंगी लेखणीद्वारे व प्रखर वक्तृत्वाद्वारे केलेल्या समाजजागृतीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे निवड समितीने म्हटले आहे. देशातील लोकशाही आणि समता,स्वातंत्र्य,बंधुता,सामाजिक न्याय,धर्मनिरपेक्षता यांच्या बाजूने प्रभावीपणे जागरण करण्यात केतकर अग्रभागी आहेत. त्यांचे ग्रंथ आणि वृतपत्रीय लेखन यातील त्यांचे सर्व प्रतिपादन या मुल्यांच्या रक्षणासाठी आग्रही भुमिका घेणारे आणि आक्रमक असते.त्यातील जागतिक संदर्भ आणि समकालीनता यासाठी अपार व्यासंग, युक्तीवाद आणि कमिटमेंट यांच्याद्वारे केतकर  व्यक्त होत असतात.
फुले-आंबेडकरांचा विचार पुढे नेण्यात केतकरांचा फार मोठा वाटा आहे. लोकसत्ता,लोकमत आणि म.टा.यांचे प्रमुख संपादक राहिलेले केतकर सध्या दिव्य मराठीचे मुख्य संपादक आहेत. ते अनेक पुरस्कारांचे मानकरी असून त्यांना पद्मश्री सन्मान मिळालेला आहे.
यापुर्वी रावसाहेब कसबे, आ.ह.साळुखे,बाबा आढाव,भालचंद्र मुणगेकर,प्रा.हरी नरके आणि विरप्पा मोईली यांना हा पुरस्कार देण्यात अलेला आहे. येत्या २८ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता पुण्यात म.फुलेवाड्यावर पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.