Thursday, September 25, 2014

सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे जनक प्रबोधनकार ठाकरे





प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे  हे महाराष्ट्रातले अव्वल दर्जाचे वक्ते, संपादक, लेखक नी सत्यशोधक होते.
त्यांचे समग्र वाड,मय राज्य सरकारने प्रकाशित करावे अशी लेखी मागणी मी तत्कालीन मुख्यमंत्री श्री. मनोहर जोशी यांच्याकडे केली. त्यांनी ती तात्काळ मंजूर केली.
राज्य शासनाने त्यांच्या साहित्याचे एकुण पाच खंड प्रकाशित केलेले आहेत.
पहिल्या खंडातील  त्यांचे आत्मचरित्र अतिशय रोचक आहे.

महाराष्ट्रात आज होत असलेल्या सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे जनक  प्रबोधनकार ठाकरे हे  आहेत,
याबद्दलची माहिती त्यांनी आपल्या " माझी जीवनगाथा" या आत्मचरित्रात दिलेली आहे. त्यात ते म्हणतात,

"बहुजन समाजाला असा आकर्षक महोत्सव हवा होता की ज्यात अब्राह्मण शूद्रादी अस्पृश्यांनाही आपुलकीने नि मोकळ्या मनाने सहज भाग घेता यावा.याचा विचार करण्यासाठी रा.ब. बोल्यांच्या बंगल्यावर ताबडतोब मी काही स्नेही मंडळींची बैठक बोलावली.महाराष्ट्राची मुख्य देवता श्री मायभवानी.तिच्या दरबारात सगळ्यांना मुक्तद्वार.तिचा नवरात्र महोत्सव हाच वास्तविक महाराष्ट्राचा राष्ट्रीय महोत्सव. प्राचीन काळचा इतिहास सोडा, छत्रपती श्रीशिवरायांपासून हा नवरात्रौत्सव सबंध महाराष्ट्रात घरोघरी आणि गडोगडी थाटामाटाने साजरा होत असे.

पेशवाईच्या नि त्यांच्या गणेश दैवताच्या स्तोमामुळे, तो उत्सव माजी पडला. लो.टिळकांनी त्याला सार्वजनिक स्वरूप देऊन त्या स्तोमाचे पुनरूज्जीवनच केले.

आपण यापुढे नवरात्र महोत्सव साजरा करण्याचा परिपाठ चालू करून,  बहुजन समाजाला एकत्र आणण्याचा म्हणजे जुन्या ऎतिहासिक परंपरेचे पुनरुज्जीवन करण्याचा आत्ताच, यंदाच { सन १९२६} प्रयत्न करावा, ही सुचना सर्वमान्य होऊन त्यासाठी " लोकहितवादी संघ "स्थापन केला. आणि १९२६ च्या पूर्वी मुंबईत किंवा महाराष्ट्रात कोठेही प्रघात नसलेला "श्री शिवभवानी नवरात्र महोत्सव" साजरा करण्याचा पहिला मान दादरने मिळवला. "  

{पाहा : प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, माझी जीवनगाथा,
१९७३, पुनर्मुद्रण:
१९९७, म.रा. साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई,
मूल्य रू.१२५,
पृ.३०९}

Wednesday, September 24, 2014

परिवर्तन आणि प्रसिद्धी

बर्ट्राड रसेल म्हणतात,"शोषितांकडे सत्ता नसल्याने स्वार्थपुर्तीचे मार्ग त्यांना उपलब्ध नसतात, आणि म्हणून जुलूम, अन्याय, अत्याचार,भ्रष्टाचार,हिंसाचार यांचे प्रदर्शन करण्याची संधीही त्यांना मिळत नाही.पर्यायाने नीतिमानतेबाबत त्यांची मूठ झाकली राहते. याच शोषित घटकांना जेव्हा स्वातंत्र्य आणि सत्ता मिळते, तेव्हा यथावकाश त्यांच्यामधील दुर्गुण वर उफाळून येतातच. सचोटी, नीति, लोभ, मत्सर, सहृदयता हे गुणविशेष व्यक्तीनिष्ठ असतात, त्यांचा लिंग, वंश, वर्ग यांच्याशी फारसा संबंध नसतो, हे लक्षात घेतले, की माणूस भाबडेपणाने निराधार समजुतींना कवटाळून बसत नाही."{ ”अनपो‘प्युलर एसेज” चे मराठी भाषांतर, ’नाही लोकप्रिय तरी उदारमतवादाची कास धरी’, अनु. डा. करूणा गोखले, मेनका प्रकाशन, पुणे ३०, पृ.१०४} आज दलित, बहुजन, कष्टकरी, स्त्री चळवळींना अर्थाजनाची रोजगार हमी योजना समजणारे काही लोक पाहिले, मोठ्या कष्टाने मिळालेल्या हक्कसंरक्षक कायद्यांचाही दुरूपयोग करणारे काही लोक पाहिले की, रसेलचे हे मत पटू लागते काय?
माणूस आणि माणसाचा पूर्वज लाखो वर्षे जंगलात राहिला असून त्याच्यातले हिंस्त्र श्वापद आजही कायम आहे काय?
सत्ता मिळाल्यावर माणसे भ्रष्ट होतात, पण सत्ता मिळण्याची शक्याता जरी निर्माण झाली तरी सगळीच माणसं अंगात सत्ता आल्यासारखेच वागू लागतात काय?
लिंगभाव, वर्ग, जात, धर्म, वंश यावरून पक्षपात केला जातो. ज्यांना ते व्यवस्थेचे बळी असल्याने न्यायासाठी संघर्ष करावा लागतो, ते आणि त्यांचे नेते सत्याची कास धरून प्रामाणिकपणे झुंज देत असतात हे विधान सर्वांनाच लागू करता येईल काय? की त्यांचेही प्रयत्न प्रसिद्धी, पैसा, हितसंबंध सांभाळणे यातच गुंतलेले असतात असतात?
जे चिकित्सा, विवेकवाद, यांच्याबद्दल आग्रही असतात त्यांनाही कोणी जर याबाबत अडचणीचे प्रश्न विचारायला लागले तर त्यांच्यातला हिंस्त्रपणा उफाळून येतो आणि तेही "गप्प बसा" संस्कृतीचे पाईक बनतात काय?
विषमता निर्मुलनासाठी जे वंचित, शोषित, अन्यायग्रस्त आहेत त्यांच्या संरक्षणासाठी विशेष कायदे करावे लागतात. या कायद्यांचा उचित वापर होणे अभिप्रेत नी अपेक्षित असते. त्यांचा गैरवापर होतच नाही असे म्हणण्याजोगी आज खरेच परिस्थिती आहे काय?
परिवर्तन आणि प्रसिद्धी, मुल्ये आणि हितसंबंध असा झगडा असतो तेव्हा बांधिलकीवाले/चळवळवाले कशाला जास्त महत्व देतात?
भिकेची वृत्ती, गुन्हेगारी मानसिकता यातून आयते खाण्याची, दुसर्‍याचे पळवण्याची / चोरण्याची जी मानसिकता हाडीमाशी भिनते त्यातून कष्ट करण्याची वृत्ती नष्ट होते काय? त्यातूनच फुकटेपणाचे / भिक मागण्याच्या वृत्तीचे समर्थन करण्याचे तत्वज्ञान जन्माला येते काय?
एव्हढ्या लांबपल्ल्याच्या मानवी प्रवासानंतरही माणसं मानवनिर्मित दु:खं, विकृती, विकार, लुटणे, झडप घालणे यातून एकुणच कितपत बाहेर पडू शकलीत? त्यासाठीचे चालू असलेले प्रयत्न कितपत गंभीर नी प्रामाणिक आहेत? की तोही बराचसा देखावाच आहे? या कामांचे जेव्हा ढोल वाजवले जातात तेव्हा तोही मार्केटिंगचा एक भाग असतो की की त्यात खरेच तथ्य असते?
..................................

Friday, September 19, 2014

अवधूत डोंगरे ---बंदेमें दम है.



अवधूत डोंगरे या तरूण लेखकाची साहित्य अकादमी पुरस्कारामुळे सध्या चर्चेत असलेली कादंबरी " स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट " ही वाचली. "अक्षर मानव, पुणे " चे हे प्रकाशन आहे. पुस्तकाला संजय साठे यांचे कलात्मक मुखपृष्ठ असून क्राऊन आठ या आकारातील अवघी ९२ पृष्ठांची ही छोटीशी कादंबरी / कादंबरिका. ज्याक केरूअ‘कला ती अर्पण केलीय.

पुस्तकाची किंमत ८० रुपये असली तरी ती प्रकाशकांकडे अवघ्या ४०रुपयाला मिळते. त्वरा करा.

 "जगाच्या तुलनेत देश लहान. देशाच्या तुलनेत माणसांचा समूह लहान.समुहांच्या तुलनेत एकटा माणूस लहान. या लहान एकटेपणातून आलेल्या फालतूपणाचं काय करायचं?
मुंगी आकारानं छोटी असते पण ती तुमच्या ढुंगणाला चावू शकते. तुम्ही तिच्या ढुंगणाला चावू शकता का?
नाही ना?

म्हणून कोणालाही कमी लेखू नये." असं या पुस्तकाच्या मलपृष्ठावरील मजकूरात सांगितलेलं पुस्तकाच्याबद्दल बरंच काही सांगून जातं.

या विश्वाच्या अफाट पसार्‍याची आणि अनंत काळाची जाणीव झाली की माणुस त्यात किती छोटा आहे याचं भान येतं.

राज्य पातळीवरच्या मुळच्या मुंबईच्या असलेल्या पेपरच्या पुणे आवृत्तीत ट्रेनी रिपोर्टर म्हणुन काम करणारा नायक. त्याच्या भोवतीची समकालीन पत्रकारिता.

आजुबाजूला बरंच काही घडतय. सचिनच्या २०० धावा, ए.आर.रेहमानचं ओ‘स्कर. अभिनव बिंद्राचं ओ‘लिंपिकमधलं सुवर्णपदक, नक्षली नेता कनू संन्याल याची आत्महत्या. त्याच वेळेला बराक ओबामांचा शपथविधी, कोसोवोची निर्मीती, सुदानमध्ये घडलेलं दार्फर प्रकरण असं बरच काही.

याच काळात आपल्याकडं ’पेड न्यूज’ प्रकरण  उजेडात येतं. पी.साईनाथचा ’हिंदू’मध्ये लेख येतो. दोनेक महिने गाजतो. नको तेव्हढ्या चर्चा रंगतात. या चर्चाखोरपणाचं पुढे काय होतं? लेखक म्हणतो, "चर्चेत चर्चा, चर्चेवर चर्चा, चर्चेखाली चर्चा, चर्चाळ सगळं...निवडणुकीत  माध्यमांमध्ये उघडपणे पे‘केजेस चालतात. त्यामुळे जरा पत्रकारितेबद्दल सुद्धा चर्चा होते. पैशांच्या देण्याघेण्याचं जुनंच आहे. अगदीच ओ‘र्गनायझेनल लेव्हलला झालं हे जरा गंभीर..एव्हढंच. "
"चोवीस तास कलकलाट करणारे टिव्ही च्यानेल्स. चिफ रिपोर्टर, चिप रिपोर्टर... एक पुस्तिका वाचून शंभर मतं देणारे, एक पुस्तक वाचून सहा महिने मतं देणारे, काहीच न वाचता प्रामाणिक मतं देणारे, नि अप्रामाणिक मतं देणारे, बरंच वाचून अप्रामाणिक मत देणारे म्हातारे ह्यांच्या चर्चा. अडाणचोट चर्चांचा जुलाब....पोट भरलेल्या रिकाम्या चर्चा. कुजलेल्या वैचारिकपणाचा घाण घाण घाण वास."

फेसबुकवरची आणखी फेसबुक जनरेशनवरची लेखकाची बोचरी टिकाही विचार करायला लावणारीय. "सोशल नेटवर्कींग, त्यात खर्‍या माणसांचे खोटे प्रोफाईल..रोजरोजचा सोशल खोटेपणा. दुनिया एव्हढी चांगली चांगली, रोजचा समारंभ, बजाव ताली. जागा नविन गोष्टी जुन्याच. उद्या आणखी नवीन जागी, गोष्टी आणखी जुन्याच. त्यावर काय फार वेळ घालवण्यात पो‘ईंट नव्हता." माहितीच्या स्फोटात ज्ञान मेलं, तरी पुन्हा कुठं तरी इंटरनेटवर ज्ञानाची माहिती राहणार. ओव्हर सेंटीमेंटल, झिरो सेंटीमेंटल....

तुकड्या तुकड्यात समोर येणारं गरगरवून टाकणारं गुंतागुंतीचं वास्तव, सामान्य माणसाची हतबलता, अगतिकता, असहाय्यता, लेखकानं मजबुतीनं पकडलीय.

लेखकाची कथन शैली कवितेच्या अंगानं जाणारीय. "धूळ होती. मागं पिंपळाचं झाड होतं काळोखं.
तो तथदधनला.
दबला.
उठला.
पुन्हा डावीकडं वळला. पुलाखालून रस्ता गेलेला. काळी नदी केलेली. हिरव्या गवताचा पट्टा गेलेला. वारा आला मध्येच. वर काळं आकाश."
हे सारं मुळातूनच वाचायला हवं.

पत्रकारितेत कुत्रा माणसाला चावला ही बातमी नाही , तर माणूस कुत्र्याला चावला ही बातमी असं शिकवलं जातं. पण खरंतर कुत्रा माणसाला चावला , यालाच बातमी म्हणुन प्रसिद्धी मिळते.आणि अशाच पातळीवरच्या बहुतेक बातम्या होतात, वाचायला सोपी, पचायला सोपी, संडास साफ.

कादंबरी छोटीय पण ऎवज मजबूत आहे. अपेक्षा उंचावणारा हा लेखक आहे.

बंदेमें दम है.



......................................
..पुस्तकासाठी संपर्क: ०२०- ३०४२६६७९

Tuesday, September 16, 2014

महाराष्ट्रातील कर्तबगार लोकांची यादी






लंडन मध्ये मी ब्रिटीश म्युझियम लायब्ररी या ग्रंथालयात बसून अभ्यास करीत असे. यु.के. {युनायटेड किंगडम} या देशात गेल्या दोन हजार वर्षात विविध क्षेत्रात होऊन गेलेल्या नामवंत लोकांचा कोश त्यांनी प्रकाशित केलेला आहे. {ओ‘क्सफर्ड डिक्शनरी   ओ‘फ नेशनल बायोग्राफी} शेती, व्यापार, उद्योग, साहित्य, शिक्षण, संगित, कला, राजकारण, समाजसेवा, विज्ञान, संशोधन आदी महत्वपूर्ण क्षेत्रात समाजाची उंची आणि श्रीमंती वाढवणार्‍या कर्तबगार लोकांची  माहिती या कोशात दिलेली आहे. या कोशाचे एकुण साठ खंड असून त्यात एक लाख वीस हजार कर्तबगार लोकांची माहिती दिलेली आहे.
असाच एक प्रयत्न आपल्याकडे बरोबर १०० वर्षांपुर्वी इतिहासकार विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी केला होता. त्यांचा हा लेख लोकशिक्षण या मासिकाच्या {भाद्रपद शके १८३५ च्या } अंकात प्रकाशित झाला होता.
राजवाड्यांनी "महाराष्ट्रातील कर्त्या लोकांची मोजदाद" करताना विशेष प्रसिद्ध असलेल्या, बुद्धीमान आणि कर्तबगार लोकांचा परिश्रमपुर्वक धांडोळा घेऊन १५० लोकांची यादी केली होती. प्रामुख्याने समाजासाठी वाहून घेतलेल्या, काळावर आपली मोहर उमटवणार्‍या  द्रष्ट्या, बुद्धीमान आणि कर्तबगार लोकांचा समावेश राजवाडे या यादीत करतात.
शतकापुर्वी आपल्याकडे प्रसिध्द असणार्‍या लोकांमध्ये संस्थानिक, शासकीय अधिकारी, स्वातंत्र्य चळवळीतील नेते, समाज सुधारक, संपादक, लेखक, इतिहासकार, वैद्य, वक्ते, उद्योजक, मुर्तीकार, व्यापारी, गणितज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, अबिनेते, गायक, वकील, ज्योतिष विद्देतील जाणकार, शिक्षणतज्ञ अशा नानाविध क्षेत्रातील जाणकारांचा समावेश या यादीत करण्यात आलेला आहे.
यात एकूणच महिला खूप कमी आहेत. रमाबाई रानडे, डा.आनंदीबाई जोशी, पार्वतीबाई आठवले, बायजाबाई शिंदे, जमनाबाई गायकवाड,  एव्हढीच नावे त्यात आहेत. यात सावित्रीबाई फुले, पंडीता रमाबाई, ताराबाई शिंदे, तान्हुबाई बिर्जे, सावित्रीबाई रोडे आदी नावे असायला पाहिजे होती.
महर्षी वि.रा.शिंदे, गंगाराम भाऊ म्हस्के यांच्यासोबत या यादीत सयाजीराव गायकवाड, तुकोजीराव होळकर, जयाजीराव  शिंदे, आणि इतर अनेक संस्थानिकांना आवर्जून स्थान देण्यात आलेले आहे. {मात्र या यादीत छ.शाहू महाराज नाहीत.}
महर्षी कर्वे, न्या. म.गो.रानडे,सार्वजनिक काका, पैसाफंड काळे,  नारायण गणेश चंदावरकर, गोपाळ हरी देशमुख, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, गोपाळ गणेश आगरकर, राजारामशास्त्री भागवत, गोपाळ कृष्ण देवधर, आदी सामाजिक सुधारक आणि सामाजिक विचारवंतांची या यादीत नोंद आहे. {या यादीत महात्मा फुले, वस्ताद लहुजी साळवे आदींना मात्र स्थान दिलेले नाही.}
या कर्तबगार लोकांमध्ये प्रामुख्याने अग्रस्थानी आहेत, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ कृष्ण गोखले.
नामवंत साहित्यिक आणि इतिहासकार म्हणून हरी नारायण आपटे, न.चिं. केळकर, कृ.प्र.खाडीलकर, शि.म.परांजपे, वि.गो.विजापूरकर, विनायक कोंडदेव ओक, म.मो.कुंटे, चिंतामणराव वैद्य, मोरो केशव दामले, म.शि.गोळे, कृष्णशास्त्री चिपळूणकर, का.त्र्यं. तेलंग, वासुदेवशास्त्री खरे, द.ब.पारसनिस, भाऊ दाजी लाड, का.ना. साने, अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंदराव देवल, ल.रा.पांगारकर, शं.श्री.देव, रघुनाथशास्त्री गोडबोले, गो.स.सरदेसाई, शं. तु. शाळीग्राम, का.र. मित्र, आदींचा नामोल्लेख करण्यात आलेला आहे.
याशिवाय या यादीत अक्कलकोटकर स्वामी, नृसिंह सरस्वती, नारायण महाराज केडगावकर, अशा काही साधूंचाही समावेश आहे.
बालगंधर्व, गणपतराव जोशी, गोपाळराव दात्ये, भाऊराव कोल्हटकर, वि.दि.पलुस्कर, आदी कला क्षेत्रातील नामवंतांनाही उचित स्थान देण्यात आलेले आहे.
गणिततज्ञ रे‘न्गलर र.पु.परांजपे, केरो लक्ष्मण छत्रे, दि.आ.दळवी, नेते नाना शंकरशेठ, व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर, अशा विविध प्रतिभावंतांना आवर्जून जागा देण्यात आलेली आहे.
हि यादी अतिशय परिश्रमपुर्वक बनवण्यात आलेली आहे. त्या काळातील प्रसिद्धीचा झोत कोणावर होता हे कळायला यातून मदत होते. त्याकाळात फारसे प्रसिद्ध नसलेले किंवा उपेक्षित असलेले पण नंतर काळाच्या ओघात पुढे आलेले लोक समजून घ्यायला ही यादी उपयोगी पडते.
राजवाड्यांनी एकुण २३ शास्त्रांची यादी देऊन त्यातल्या १९ मध्ये समावेश करावा असा एकही माणूस महाराष्ट्रात असू नये या बद्दल खंत व्यक्त केलेली आहे.
कोणत्याही समाजाची उंची त्यातल्या प्रतिभावंतांवरून मोजायची असेल तर आपला समाज कोठे पुढे नी कोठे मागे होता हे समजून घ्यायला ही यादी मदत करते.

ही यादी फक्त इ.स.१८१५ ते १९१४ या शंभरच वर्षांची असल्याने त्यात त्या आधीची छ.शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर अशी नावे नाहीत. आणि नंतरचे डो‘.बाबासाहेब आंबेडकरही त्यात नाहीत.

राजवाड्यांच्या व्यक्तीगत आवडीनिवडी अतिशय सशक्त होत्या. त्यामुळे ते फुले, शाहू,सावित्रीबाई, पं.रमाबाई आदींना या यादीत जागा देत नाहीत हा मोठा दोष सोडला तर ही यादी खरोखरच शतकानंतरही मार्गदर्शक आहे.

आजच्या काळातील { इ.स.१९१५ ते २०१४ } यादी करायची झाली तर तुम्ही त्यात कोणती नावे समाविष्ट कराल?

{संदर्भासाठी पाहा : राजवाडे लेखसंग्रह भाग ३, संपादक- शं.ना.जोशी, भारत इतिहास संशोधक मंडळ पुरस्कृत ग्रंथमाला क्र.१४,चित्रशाळा प्रकाशन,पुणे , १९३५,किंमत २रूपये. }
.....................................................................
भाग २--- प्रा. हरी नरके

१९१५ ते २०१४ या शंभर वर्षातील सुप्रसिद्ध, कर्तबगार, प्रतिभावंत आणि बुद्धीमान महाराष्ट्रीयन लोकांमध्ये माझ्यामते पुढील व्यक्ती असतील... नमुन्यादाखल ही काही नावे ... कृपया ही यादी आणखी वाढवावी....
राजकारण : डो‘. बाबासाहेब आंबेडकर, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, स्वातंत्र्यवीर सावरकर, यशवंतराव चव्हाण, एस.ए.डांगे, एसेम जोशी, दादासाहेब गायकवाड, वसंतराव नाईक, स्वामी रामानंद तीर्थ, मा.स. गोळवलकर, बाळासाहेब ठाकरे,प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे,
साहित्य: केशवसुत, लक्ष्मीबाई टिळक, अण्णाभाऊ साठे, नरहर कुरूंदकर, बहिणाबाई चौधरी, मालती बेडेकर, साने गुरूजी, आचार्य अत्रे, वि.स.खांडॆकर, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, जी.ए. कुलकर्णी, विजय तेंडुलकर, पु.ल. देशपांडे, शिवाजी सावंत, नामदेव ढसाळ, भालचंद्र नेमाडे,
चित्रपट: दादासाहेब फाळके, व्ही. शांताराम, देवानंद, पृथ्वीराज कपूर, राज कपूर, मधुबाला, गुरूदत्त, दिलीप कुमार, निळू फुले, स्मिता पाटील, अमिताभ बच्चन, अमिर खान,
संगित : किशोर कुमार, महमद रफी, भीमसेन जोशी, लता मंगेशकर, किशोरी अमोणकर, आशा भोसले,
अर्थ : धनंजयराव गाडगीळ, वैकुंठलाल मेहता,
सहकार : विठ्ठलराव विखे, रावबहादूर नारायणराव बोरावके,
शिक्षण : कर्मवीर भाऊराव पाटील, बाबूराव घोलप,
उद्योग : जमशेदजी टाटा, जे.आर.डी.टाटा, शंतनूराव किर्लोस्कर, धीरूभाई अंबानी, रतन टाटा,
संशोधन : पांडुरंग वामन काणे, रा.ना.दांडेकर,
प्रबोधन : संत गाडगे बाबा, गोदावरी परूळेकर, हमीद दलवाई, नरेंद्र दाभोळकर,
विज्ञान : होमी भाभा, वसंतराव गोवारीकर, जयंत नारळीकर, विजय भटकर, रघुनाथराव माशेलकर,
क्रिडा : खाशाबा जाधव, सुनिल गावसकर, सचिन,
सामाजिक : विनोबा भावे, बाबा आमटे,
................................................

मी  फेसबुकवर १९१५ ते २०१४ याकाळातील महाराष्ट्रातील कर्तबगार लोकांची नमुना यादी टाकली होती. नावे सुचवण्याच्या माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन माझ्या फेसबुकवरील राजेंद्र गाडगीळ, गार्गी फुले-थत्ते, प्रसाद कुलकर्णी, विवेक धर्म आदी मित्रांनी पुढील नावे सुचवली आहेत....

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, क्रांतिसिंह नाना पाटील, शंकरराव चव्हाण, नाथ पै, केशव बळीराम हेडगेवार, राहुल बजाज, अण्णासाहेब चिरमुले, भाऊसाहेब फिरोदिया, शेठ वालचंद हिराचंद, श्रीराम लागू, प्रबोधनकार ठाकरे, बापुजी साळुंखे, तुकडोजी महाराज शाहीर अमर शेख, सलीम अली, य.दि.फडके, शिवाजीराव पटवर्धन, अहिल्या रांगणेकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, कॉम्रेड शरद पाटील, बाबा आढाव, नानासाहेब परूळेकर , सी. रामचंद्र, शिल्पकार राम सुतार, बाबुराव पेंटर, पं. सत्यदेव दुबे, गिरिश कर्नाड, रतन थिय्याम, मणीरत्नम, बी.व्ही.कारंथ, पं. जितेंद्र अभिषेकी .....

तुम्हाला काय वाटते?


Saturday, September 13, 2014

देशीवादावर बेफाम आरोप, शेरे आणि ताशेरे

.सतिश वाघमारे यांनी देशीवादाबद्दल काही प्रश्न उपस्थित करून चर्चा सुरू केलेली आहे. त्यांच्या भिंतीवर ही चर्चा जोरदार रंगलेली आहे.
हरी नरके: प्रा.सतिश वाघमारेजी : चर्चा वाचली. धन्यवाद. माझ्या माहितीप्रमाणे प्रा. भालचंद्र नेमाडे आणि प्रा. राजन गवस फेसबुकवर नाहीत. त्यामुळे ते फरार झाले म्हणजे कुठून फरार झाले? पुस्तकांमधून ते गेले अनेक वर्षे मांडणी करीत आहेत. त्यांच्या भुमिकेची झाडाझडती जरूर घ्यावी, त्यातल्या विसंगती, उणीवा किंवा फोलपणा जरूर मांडावा. हेत्वारोप करू नयेत. नेमाडेंची कौटुंबिक पार्श्वभुमी शोधून चर्चा करायची असेल तर चर्चेचा स्तर घसरेल. मला वाटते, इकडे त्यांच्या भुमिकांचेही फार मोठ्या प्रमाणात सुलभीकरण केले जात आहे. { तुम्ही नाही } हे लोक { देशीवादी } संपूर्ण फुली मारून बाद करावेत असे लोक आहेत काय? त्यांच्या विचारांवर आक्षेप घेणारे तसे करू इच्छितात असे प्रथमदर्शनी तरी वाटते. फुले-शाहू-आंबेडकर वादावरील चर्चेत मी आता जात नाही. तिचा जो धागा देशीवादाशी संबंधित असेल किंवा विरोधी असेल तेव्हढे जरूर बोलू या. नेमाडॆंनी ज्या जातीव्यवस्थेचे आणि सामंतशाहीचे कायम वाभाडे काढले त्यांनाच आम्ही जातीव्यवस्थेचे समर्थक ठरवणार असू तर मग ही चर्चा खूपच सवंग आणि सरधोपट होईल. नेमाडे, गवस यांच्यावर ज्यांचा व्यक्तीगत राग असेल { तुम्ही नाही } त्यांनी आपली खाजगी धुणी या घाटावर कृपया धुवू नयेत. {वि.सु. एखाद्या लेखकाला ज्ञानपिठ मिळायला हवे असे म्हणणे आणि त्याच्या लेखनावर टिका करणे यात काहीही विसंगती नाही. एकतर ही मते कोणत्या काळातील आहेत ते पाहिले पाहिजे. ती वेगवेगळ्या काळातील असू शकतात. भुमिकांचा विकास होऊ शकतो.एकाच काळातील असतील तरी उणीवा असूनही ज्ञानपिठ द्यावे असे म्हणणे चुक ठरत नाही.निर्दोष लेखन आनि लेखक कुठून आणायचे सतिषराव?}

हरी नरके: जातीव्यवस्थेचे चटके ज्यांना बसलेत त्यांच्या भावना स्वाभाविकच त्याबाबतीत कठोर असतात. असणार. ते योग्यच आहे. तथापि जातीव्यस्थेवर हल्ला करताना एक गोष्ट विसरून चालणार नाही की, ’भारतात प्रत्येक जात हे एक स्वतंत्र राष्ट्र आह” असे बाबासाहेब म्हणाले होते. जाती-वर्ण व्यवस्थेचे लाभार्थी ज्या पद्धतीने तिचे समर्थनपर तत्वज्ञान मांडतात त्या प्रकारचे नेमाडे तिचे समर्थक नाहीत. त्यांची भुमिका वेगळी आहे. त्या दोन्हींची सरमिसळ किंवा गल्लत करणे म्हणजे या गोष्टीतली गुंतागुंत विसरून सब घोडे बारा टक्के अशी भुमिका घेणे होय.
भारतीय संस्कृती असे काही म्हटले की काही लोक थेट अंगावरच येतात.त्यांनी कृपया ताज्या साधनाच्या अंकातील दिवंगत यु.आर. अनंतमुर्ती यांची प्रदीर्घ मुलाखत वाचावी. नेमाडॆंनी फुल्यांवर जे लिहिलेय ते वाचले की त्यांची भुमिका फुलेवादाची समर्थक असल्याचे स्पष्ट व्हावे. वेगवेगळ्या स्कूलची दृष्टी वेगवेगळी असली तरी देशीवाद्यांना थेट संघवाले ठरवणे म्हणजे फारच झाले. टिका करा. वाभाडेही काढा. मात्र थेट शत्रूच्या छावणीत ढकलू नका. बाबासाहेब म्हणाले होते, {पाहा: रानडे ,गांधी आनि जिना } "जे चुका करतात पण चुकीच्या बाजूला {तत्वज्ञान म्हणुन}उभे नसतात ते मला माझे वाटतात. मात्र जे चुकीच्या बाजूलाच उभे असतात त्यांनी मी आपले म्हणणार नाही." नेमाडेंना {पठारे, आदींना} आपण कोठे बसवणार आहोत?
September 13 at 7:59pm · Like · 8.....


हरी नरके: आरोप झाले. शेरे आणि ताशेरे झाले. तुमची मते मांडून झाली. आता जरा सज्जड पुरावेही देऊ या.१..२..३..४.. चला सुरू करा.
मी देशीवादाचा प्रवक्ता नाही. मी या विचारसरणीचा कट्टर समर्थकही नाही. मात्र मला त्या विचारातली काही सामर्थ्यस्थळे मोलाची वाटतात. ती एक भोंगळ आणि जातीय विचारधारा आहे अशी तोफ सर्वसाधारणपणे सर्व बड्या मंडळींनी डागलेली आहे. मला त्यांचा प्रतिवाद करायचा नाही.
सहजपणे नजर टाकली तर आरोपपत्रातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे दिसतात.
१.देशीवाद एक बेगडी आणि निव्वळ तकलादू संकल्पना आहे. देशीवादाची नेमकी आणि सुस्पष्ट अशी कुठलीही व्याख्या नाही. कोणत्या परंपरा , मूल्ये देशीवादाच्या मुळाशी आहेत ? २.वैचारिक सामाजिक दृष्टीकोनातून पाहताना ती मुल्ये चिरंतन शाश्वत म्हणून कितपत टिकणारी आहेत ? भारतीय ग्रामीण समाजव्यवस्थेतील लाभार्थी घटक विशेषतः सरंजामदार या देशीवादी भोंगळ कल्पनेचा जोरकस पुरस्कार करताना दिसतात. ही सरंजामी मानसिकता आहे.
३.फुले शाहू आंबेडकर परंपरेची विचारधारा न झेपणारे न मानणारे या देशीवादी गोलमोल कल्पनेच्या भोवती पिंगा घालतात.
४.देशीवाद संस्कृती आणि परंपरा यांना केंद्रबिंदू मानतो. प्रचलित व्यवस्था प्रमाण मानूनच जगणारा माणूस देशीवाद विचारात घेतो. या पलीकडच्या माणसाला देशीवाद मान्यता देत नाही . कारण सनातनी परंपरा. वैदिक परंपरा, सनातन धर्म, वर्णाश्रम धर्म या परिप्रेक्षात देशीवाद विसावला आहे. सामाजिक प्रतिष्ठा आणि सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेच्या आड देशीवादी मुल्ये येतात. देशीवादी लेखकांच्या कादंबऱ्यातला दलित वर्गविषयक तुच्छ दृष्टीकोन त्या अंगाने पाहता येईल.
५.जात-धर्म आणि लिंगभेदाची विचारधारा देशीवाद स्वीकारतो. तिचे समर्थन करतो.
६.वस्तुतः आज महार मांगांचीच भाषा खर्‍या अर्थाने सतेज आहे. (पृ. ३४४) असा निर्वाळा देणारे नेमाडे चांगल्या भाषेची उदाहरणे देताना मात्र गोडसे भटजी, लोकहितवादी, लक्ष्मीबाई टिळक, साने गुरुजी, चिं. वि. जोशी, माडगुळकर, भाऊ पाध्ये इत्यादी बहुतांशी ब्राह्मण लेखकांच्या भाषेचाच दाखला देतात यावरून ते ब्राह्मणीविचारसरणीचे समर्थक ठरतात?
७. देशीवाद हा सौम्य अर्थाने हिंदुत्ववाद आहे...क्रमश: {पाहा भाग २..}
८.देशीवादी झूल ही प्रतिगामी, स्थानिक परंपराप्रधान सांस्कृतिक मूल्यं जपण्याच्या ओढीतुन निपजलेली निरर्थक संकल्पना आहे.ती बदलविरोधी नि न्यूनगंडग्रस्त मानसिकता आहे.
९.थोडक्यात संरजामी जातीवर्चस्वाचे तथाकथित राष्ट्रवादी सांस्कृतीक तत्वज्ञान परिभाषित करणारे ही विचारधारा आहे.ती या देशातील मूल आणि मूलतत्ववादी प्रवृती आहे.या देशीवादाची भूमिका संरजामी आणि ब्राह्मणी दोन्ही व्यवस्थेला पोषकच आहे.
या आरोपपत्राचे सार एका अभ्यासकाने पुढीलप्रमाणे दिलेले दिसते."देशीवाद हा लोकार्थाने जातीयव्यवस्थाच आहे.
बलूतेदारी आणि सरंजमशाहीची यांचे नेमाडे समर्थक आहेत. ते सधन कुटुंबातून आलेले असल्यामुळे त्यांना देशीवादाचे चटके आणि त्याचे उपद्रवमुल्ये याच्याशी देणे-घेणे नाही
उलट हा वाद आजही टिकला जावा आणि आपली सुभेदारी पुर्वीसारखीच अबाधित रहावी हाच या मंडळींचा खरा अट्टाहास आहे."
या सगळ्यांना उत्तरे देणे हे माझ्या कुवतीबाहेरचे काम आहे. मी ते करू शकणार नाही.
"देशीवाद हा लिंगभाव आणि जातीव्यवस्थेचा समर्थक आहे. तो सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेच्या आड येतो. तो दलित वर्गविषयक तुच्छतेचा दृष्टीकोन मांडतो." हा करण्यात आलेला आरोप जर खरा असेल तर देशीवाद सर्वथा टाकाऊ मानायला हवा.
मात्र याबद्दलचे पुरावे देऊन ही चर्चा सप्रमाण आणि टोकदारपणे करावी अशी आक्षेपकांना नम्र विनंती आहे........

Wednesday, September 10, 2014

मराठी भाषा धोरणाला मुहुर्त केव्हा मिळणार?



निवडणूक आचारसंहिता लागण्यापुर्वी शासनाने निर्णय घेण्याचा धडाका लावलेला आहे.गेल्या महिन्याभरात हजारो नवे निर्णय घेण्यात आले.मतब्यांका विचारात घेऊन झालेल्या या निर्णयांमध्ये मंत्रालयाच्या दारात फाटकी वस्त्रे घालून उभी असलेली मराठी आपला नंबर लागणार का? असल्यास कधी याची प्रतिक्षा करीत आहे.
मराठी भाषेच्या पुढील पंचवीस वर्षाचे धोरण तयार झाले आहे. हे धोरण राज्य सरकारकडे महिन्यापुर्वीच पाठवण्यात आले असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्याधामधुमीत त्याला आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजुरी मिळणार का हाच प्रश्न आहे.
मराठी भाषेचे संवर्धन, प्रसार आणि प्रचारासाठी पुढील पंचवीस वर्षांत सरकारने काय करायला हवे, हे ठरवण्यासाठी मराठी भाषा सल्लागार समिती २०१० मध्ये स्थापन करण्यात आली. या समितीने गेल्या वर्षभरात राज्याच्या वेगवेगळ्या भागांत जाऊन अभ्यास केला. भाषातज्ज्ञ, लेखक, पत्रकार, अभ्यासकांबरोबर सामान्य नागरिकांच्याही सूचना समितीने विचारात घेतल्या. त्यावर चर्चा करून धोरणाचा अभ्यासपूर्ण मसुदा लिहिण्यात आला.धोरणाच्या या मसुद्याचे लेखन डा. नागनाथ कोत्तापल्ले, {अध्यक्ष}, प्रा.हरी नरके, प्रा.माधवी वैद्य,प्रा.विलास खोले, प्रा.दत्ता भगत, प्रा. विश्वनाथ शिंदे यांच्या मसुदा उपसमितीने केले आहे.
हा मसुदा राज्यसरकारकडे महिन्यापुर्वीच सादर केला आहे.
मराठी भाषेच्या धोरणाविषयी विशेषत्वाने सांगायची गोष्ट म्हणजे, जीवनाच्या सर्व क्षेत्रात मराठीचा विचार कसा वाढेल याचा विचार या धोरणात केलेला आहे. खरेतर हे धोरण तयार करायला साधकबाधक चर्चेचा अवलंब केल्याने थोडा जास्त वेळ लागला. राज्यातील व बाहेरील मराठीप्रेमी अशा पाचशेहून अधिक लोकांच्या सूचनांचा विचार त्यात करण्यात आला आहे. दीड वर्षांत मसुदा लेखन पूर्ण करून ते धोरण सरकारला सादर केलेले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, या धोरणाला लवकरात लवकर मान्यता मिळाल्यास चांगली गोष्ट आहे.
धोरणातील महत्त्वाच्या सूचना---
राज्यात मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यात यावे.
तरुणांना मराठी भाषेतून रोजगार निर्मिती व्हावी.
बॉम्बे हायकोर्टाचे नामकरण 'महाराष्ट्र व गोवा न्यायालय करावे'.
न्यायालय, बँका, सरकारी कार्यालयांमधील व्यवहार मराठीतूनच व्हावेत.
सरकारी, खासगी औद्योगिक संस्थेत पन्नास टक्के मराठी भाषक नेमण्यात यावेत.
परकीय भाषा मराठीतून शिकण्याची केंद्रे राज्यात ठिकठिकाणी उभारली जावीत.
विमानतळ आणि विमानांमध्येही मराठी बोलले जावे. तेथे सर्व मराठी वृत्तपत्रे मिळावीत.
तुम्हाला या धोरणाबद्दल काय वाटते?आणि शासनाच्या मराठी धोरणाला विलंब लावण्याच्या धोरणाबद्दल काय वाटते?
...........................................................................................

Tuesday, September 9, 2014

महातीर्थ के अंतिम यात्री - एका भिक्षुकाची दैनंदिनी




बिमल डे या जगप्रसिद्ध साहसी प्रवाशाचे "महातीर्थाचा अखेरचा यात्रिक" हे भन्नाट प्रवासवर्णन वाचतोय. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी ते घर सोडून पळाले. बौद्ध भिक्षूंच्या एका गटाबरोबर मौनी बाबा बनून त्यांनी तिबेटचा पायी प्रवास केला. १९५६ साली जेव्हा परदेशी लोकांसाठी तिबेटचे दरवाजे बंद होते, ह्याच काळात तिबेटने भारताबरोबरचे आपले राजकीय संबंध पूर्णपणे तोडलेले होते, अशाकाळात हा बंगाली मुलगा तिबेटला गेला. ल्हासापर्यंत आपल्या बौद्ध गुरूजी "गेशे रेपतेन" यांच्यासोबत त्याने हा कष्टाचा सहप्रवास केला. नंतर तो एकटाच कैलास पर्वताकडे निघाला. अनंत अडचणींना सामोरे जात, मानवी जगाची आणि निसर्गाची, मनोहारी हिमालयाची  नानाविध रुपे न्याहाळीत त्यांनी केलेला हा प्रवास अतिशय गूढ , अद्भुत व रोमांचकारी आहे.चित्रशैलीतील हे कथन प्रवाही,पारदर्शक आणि मनाची पकड घेणारे आहे. या "एका भिक्षुकाची दैनंदिनी " चे उत्तम मराठी भाषांतर केलेय, विजय हरिपंत शिंदे यांनी. या पुस्तकाचे दर्जेदार प्रकाशन केलेय, अरूण जाखडे यांच्या पद्मगंधा प्रकाशनाने. ४००पृष्ठांच्या या पुस्तकाची किंमत आहे, रुपये ४००/- { पद्मगंधा प्रकाशन, १९६६, सदाशिव पेठ, माडीवाले को‘लनी, पुणे, ३०, प्रथमावृत्ती, १९ मार्च, २०१४,  दूरध्वनी: २४४५०२६०}