प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे महाराष्ट्रातले अव्वल दर्जाचे वक्ते, संपादक, लेखक नी सत्यशोधक होते.
त्यांचे समग्र वाड,मय राज्य सरकारने प्रकाशित करावे अशी लेखी मागणी मी तत्कालीन मुख्यमंत्री श्री. मनोहर जोशी यांच्याकडे केली. त्यांनी ती तात्काळ मंजूर केली.
राज्य शासनाने त्यांच्या साहित्याचे एकुण पाच खंड प्रकाशित केलेले आहेत.
पहिल्या खंडातील त्यांचे आत्मचरित्र अतिशय रोचक आहे.
महाराष्ट्रात आज होत असलेल्या सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे जनक प्रबोधनकार ठाकरे हे आहेत,
याबद्दलची माहिती त्यांनी आपल्या " माझी जीवनगाथा" या आत्मचरित्रात दिलेली आहे. त्यात ते म्हणतात,
"बहुजन समाजाला असा आकर्षक महोत्सव हवा होता की ज्यात अब्राह्मण शूद्रादी अस्पृश्यांनाही आपुलकीने नि मोकळ्या मनाने सहज भाग घेता यावा.याचा विचार करण्यासाठी रा.ब. बोल्यांच्या बंगल्यावर ताबडतोब मी काही स्नेही मंडळींची बैठक बोलावली.महाराष्ट्राची मुख्य देवता श्री मायभवानी.तिच्या दरबारात सगळ्यांना मुक्तद्वार.तिचा नवरात्र महोत्सव हाच वास्तविक महाराष्ट्राचा राष्ट्रीय महोत्सव. प्राचीन काळचा इतिहास सोडा, छत्रपती श्रीशिवरायांपासून हा नवरात्रौत्सव सबंध महाराष्ट्रात घरोघरी आणि गडोगडी थाटामाटाने साजरा होत असे.
पेशवाईच्या नि त्यांच्या गणेश दैवताच्या स्तोमामुळे, तो उत्सव माजी पडला. लो.टिळकांनी त्याला सार्वजनिक स्वरूप देऊन त्या स्तोमाचे पुनरूज्जीवनच केले.
आपण यापुढे नवरात्र महोत्सव साजरा करण्याचा परिपाठ चालू करून, बहुजन समाजाला एकत्र आणण्याचा म्हणजे जुन्या ऎतिहासिक परंपरेचे पुनरुज्जीवन करण्याचा आत्ताच, यंदाच { सन १९२६} प्रयत्न करावा, ही सुचना सर्वमान्य होऊन त्यासाठी " लोकहितवादी संघ "स्थापन केला. आणि १९२६ च्या पूर्वी मुंबईत किंवा महाराष्ट्रात कोठेही प्रघात नसलेला "श्री शिवभवानी नवरात्र महोत्सव" साजरा करण्याचा पहिला मान दादरने मिळवला. "
{पाहा : प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, माझी जीवनगाथा,
१९७३, पुनर्मुद्रण:
१९९७, म.रा. साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई,
मूल्य रू.१२५,
पृ.३०९}
No comments:
Post a Comment