Saturday, September 6, 2014

मी क्रिटीकल इनसायडर असेन









साप्ताहिक साधनाचा शनिवार दि.१३ सप्टेंबर, २०१४ चा अनंतमुर्ती विशेषांक सर्वांनी वाचायलाच हवा. या अंकात ज्ञानपिठ विजेते दि. यु.आर. अनंतमुर्ती यांच्यावरचा विनय हर्डीकर यांचा "आहे मूळचाचि खरा..." हा अभिवादनपर लेख अफलातून जमलेले रसायन आहे. विनयने अनंतमुर्ती हुबेहुब आणि तंतोतंत उभे केलेले आहे. विलक्षण अनुभुती देणारा हा  श्रेष्ठ  लेख आहे. या अंकात विनयने त्यांची घेतलेली एक प्रदीर्घ मुलाखत देण्यात आलेली आहे. अनंतमुर्तींच्या प्रतिभेचे आणि व्यासंगाचे  स्तिमित करणारे अवकाश या मुलाखतीतून उलगडत जाते. त्यांची जागतिक उंची, दूरदृष्टी आणि  भारतीय लोकशाही जीवनाचे भाष्यकार म्हणून असलेले अजोड स्थान ही मुलाखत अधोरेखित करून जाते. ...ही मुलाखत २००३ मधली असली तरी आजही ताजी टवटवीत आहे.
"नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर मी हा देश सोडून जाईन  हे आपलं म्हणणं त्यांनी भारतच नव्हे तर हे जगच सोडून खरं करून दाखवलं.." असं विनय हर्डीकर म्हणतात.
अनंतमुर्ती या मुलाखतीत म्हणतात, "सर्वसामान्य भारतीय कुंभमेळ्याच्या काळातच { सध्या २१ वे शतक चालू असले तरी}जगत असतो...एकेकाळी मी आधुनिकतेचा पुरस्कर्ता होतो.पारंपरिक ते सगळं वाईटच समजत होतो.आता मला तितकी खात्री वाटत नाही.......
"आधुनिकतेविषयी मी पुर्वीइतका आता नि:शंक नाही, कारण युरोप सुखात आहे, अशी मला खात्री वाटत नाही.युरोपमध्ये आता महान कलाकृती निर्माण करण्याची क्षमता उरली आहे, असं वाटत नाही.....
"मी क्रिटीकल इनसायडर असेन.मी परंपरा टाकाऊ ठरवणार नाहीच,पण तिची समिक्षाही करतच राहीन...
"देशी असतं तेच वैश्विक असतं...
"माझ्या लिखाणात काव्यमयतेचा एक सशक्त धागा आहे, तसाच बुद्धीवादाचाही सशक्त प्रवाह आहे.....
" आता निवडणुका हे प्रकरण महागाईचं झालं आहे.निवडणुकीसाठी भरपूर पैसा लागतो आणि बराचसा भ्रष्टाचार या निवडणुकीसाठी लागणार्‍या बेसुमार पैशासाठीच केला जातो.....
" लोकशाही रचनेमध्ये आत्मटिकेला भरपूर वाव असला पाहिजे.आज तसा वाव फारसा उरलेला नाही...प्रसारमाध्यमांनी वाईट राजकारणाला उचलून धरलं आहे...
"श्रमिकांच्या शरिरात भिनलेल्या बुद्धीमत्तेचा - स्वत: हातांनी वस्तूंची निर्मिती करणार्‍या लोहार-सोनार यासारख्या कारागिरांच्या बुद्धीमत्तेचा सन्मान होईल. विणकर - नावाडी, मासे मारणारे - या सार्‍या श्रमिक वर्गाकडे प्रचंड ज्ञानाचा साठा असतो.. त्यांच्या कष्टांमध्ये खूप सौंदर्यही असते... इतर मागास जातींचं ऎक्य कधीच होणार नाही...
" भारतीय लोक सो‘फ्टवेअरमध्ये पुढे जातात पण त्या मानाने हार्डवेअरमध्ये मागे राहतात. याचं कारण जातीव्यवस्थेत आहे. ...हातात कौशल्यं असणारांची बौद्धिक क्षमता मोजण्याच्या कसोट्याच आपण तयार केलेल्या नाहीत.जातीनिर्मुलनाच्या क्रांतीच्या विचारातच बुध्दी व कौशल्ये यांच्या आंतरिक संबंधाचाही पुनर्विचार झाला पाहिजे...."

No comments:

Post a Comment