Tuesday, September 2, 2014

राखीगढी सिंधू संस्कृतीच्या शोधाची नवी दिशा...


 डॉ. वसंत शिंदे
रविवार, 31 ऑगस्ट 2014 - 01:45 AM ISTसिंधू संस्कृतीमधल्या ‘मोहेंजोदडो-हडप्पा’ या स्थळांवरून सिंधू संस्कृतीचा कालखंड इसवीसनपूर्व ३५०० धरला जातो. डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागानं हरियानामधल्या हिस्सार जिह्यातल्या ‘घगर’ खोऱ्यात नव्यानं केलेल्या उत्खननात ‘राखीगढी’ हे स्थळ अलीकडंच आढळून आलं आहे. राखीगढीचा कालखंड इसवीसनपूर्व सुमारे ४५०० ते १५०० अर्थात साडेसहा हजार वर्षांपूर्वीचा आहे. याचा अर्थ ‘घगर’ ही संस्कृती विकसित होत ती सिंधू संस्कृतीचा भाग झाल्याचं संशोधनातून पुढं येऊ शकेल. या उत्खननाविषयी...

सिंधू संस्कृतीचा उगम सिंधू नदीच्या खोऱ्यात झाल्याचं सांगितलं जातं.  भिराणा, गिरावड, फर्माना, मिठाथल आणि राखीगढी अशा पाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वसाहती होत्या. यातला सिंधू संस्कृतीचा कालखंड इसवीसनपूर्व ३५०० धरला जातो. मात्र, डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागानं हरियानामधल्या  हिस्सार जिह्यातल्या ‘घगर’ खोऱ्यात केलेल्या उत्खननात ‘राखीगडी’ हे स्थळ सापडलं आहे. याचा कालखंड ५५०० वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळं सिंधू संस्कृतीच्याही आधी दीड हजार वर्षांपूर्वी राखीगढी इथं या संस्कृतीची सुरवात झाली असावी, असा अंदाज आहे. 

सिंधू संस्कृतीच्या विकासाचे तीन टप्पे :
१) हडप्पन संस्कृतीची सुरवात साधारणत: इसवीसनपूर्व ५५०० ते तीन हजार वर्षांपूर्वीच्या कालखंडात हा हडप्पा संस्कृतीला सुरवात झाली होती. या कालखंडात ग्रामीण संस्कृतीचे टप्पे दिसून येतात. मोहेंजोदडो-हडप्पा उत्खननात ग्रामीण संस्कृतीचे पुरावे दिसून येतात.

२) दुसऱ्या टप्प्यात शहरीकरण दिसून येतं. हा कालखंड इसवीसनपूर्व ३००० ते २००० अर्थात एक हजार वर्षांचा. हा सिंधू संस्कृतीच्या भरभराटीचा काळ दिसून येतो. याच वेळी या संस्कृतीचा इजिप्त, इराण, मध्य आशिया अशा विदेशी, तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, तमिळनाडू असा देशांतर्गत व्यापारीसंबंध दिसून येतो. 

३) तिसऱ्या टप्प्याचा कालखंड हा इसवीसनपूर्व २००० ते १५०० पर्यंतचा आहे. या काळात सिंधू संस्कृतीला उतरती कळा लागल्याचं दिसून येतं. इसवीसनपूर्व २००० ते १९०० या १०० वर्षांच्या काळात या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं सिंधू खोरं निकामी झालं. शेतीवर विपरीत परिणाम झाल्यामुळं मोठ दुष्काळ पडला. याच काळात सरस्वती नदी लुप्त झाली. त्यामुळं तिथल्या लोकांचं स्थलांतर मोठ्या प्रमाणात राजस्थान, गुजरात, हरियाना, पाकिस्तान, अफगाणिस्तान या ठिकाणी झालं. 
याच कालखंडात समुद्राची पातळी दोन ते तीन मीटरनं खाली गेली; त्यामुळं सिंधू संस्कृतीमधली जवळपास ३० बंदरं निकामी झाली. या बंदरामुळं या ठिकाणी परदेशी संपत्ती मोठ्या प्रमाणात येत होती. ३० बंदरांमुळं सौराष्ट्र, अफगाणिस्तान, बलुचिस्तान या संपूर्ण भागात आर्थिक व्यवस्था भक्कम झाली होती. मात्र, समुद्राची पातळी कमी झाल्यानं बंदरंही कामाची राहिली नाहीत. त्यामुळं तिथल्या आर्थिक ऱ्हासाला दुष्काळ कारणीभूत ठरला. 

राखीगढी इथं सर्वांत मोठं उत्खनन
राखीगडी इथल्या उत्खननात सापडलेली धान्याची कोठारं
आता पाकिस्तानात असलेल्या ‘मोहेंजोदडो व हडप्पा’पेक्षा मोठं उत्खनन राखीगडी  ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी राखीखास व राखी शहापूर अशी दोन गावे वसलेली आहेत. दोन गावांना मिळून राखीगढी अर्थात राखेची उंच टेकडी आहे. राखीगढीचं एकूण क्षेत्रफळ ३५० हेक्‍टर असून इथं सिंधू संस्कृतीचं मूळ सापडण्याची दाट शक्‍यता आहे. या ठिकाणी झालेल्या उत्खननात सिंधू संस्कृतीप्रमाणेच विकासाचे टप्पे दिसून येतात. इथल्या दोन थरांचे अवशेष मिळतात; त्यामुळं या ठिकाणी प्रगती व ऱ्हास ही प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

उत्खननात मिळाली धान्याची कोठारं
राखीगढी इथल्या उत्खननात पाच पिढ्यांची घरं आढळून आली आहेत. त्यात धान्याची मोठी कोठारं आढळून आली असून, संपूर्ण गावाचं हे कोठार असल्याचं दिसून येतं. धान्याची कोठारं मातीने सारवलेली असून, धान्याला कीड लागू नये, यासाठीचीसुद्धा व्यवस्था केलेली दिसून येते. कोठारात तांदूळही मिळाले आहेत. उत्खननात सात खोल्या आढळून आल्या असून उत्कृष्ट रंगकाम केलेली मातीची भांडी, लाल दगडापासून बनवण्यात आलेले मणी, त्रिकोणी आकाराच्या सजावट केलेल्या, नक्षीकाम केलेल्या टेराकोटाच्या बांगड्या, कुंभाराचा आवा (भट्टी), मऊ दगडापासून तयार केलेला एकशिंगी प्राणी, पाच अक्षरं (अद्याप ही अक्षरं ओळखता आलेली नाहीत) असे पुरावं मिळाले आहेत. 

सुरवातीला गावकऱ्यांचा विरोध 
भारतीय पुरातत्त्व सर्व्हेक्षण विभागानं (एएसआय)  राखीगढी इथं यापूर्वी १९९९ मध्ये उत्खनन केलं होतं.  मात्र, ‘भारतीय पुरातत्त्व सर्व्हेक्षण विभागानं आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक देत नाही,’ असं सांगत गावकऱ्यांनी उत्खनन बंद पाडलं होतं. माजी केंद्रीय मंत्री एस. के. मिश्रा यांची ‘इंडियन टूरिस्ट फॉर रूरल हेरिटेज अँड डेव्हलपमेंट’ या संस्थेच्या माध्यमातून राखीगढीमध्ये विकासकामं सुरू आहेत. मिश्रा यांनी ‘राखीगढी इथल्या उत्खननातल्या वस्तू गावातच राहतील, इथले रस्ते, तटबंदी, स्नानगृह यांचं जतन व संरक्षण केलं जाईल, त्याचं संग्रहालय तिथली पंचायतच चालवेल आणि गावाचा विकास करेल,’ अशी ग्वाही दिल्यानंतर गावकऱ्यांनी  २०१३ पासून उत्खननाला परवानगी दिली.

हजारो वर्षांपूर्वीच्या मानवाचे ‘डीएनए’ शोधणार !
उत्खननातल्या सुबक नक्षीकाम केलेल्या टेराकोटा

दक्षिण कोरियातल्या ‘सेऊल नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन’नं हजारो वर्षांपूर्वीच्या मानवाचे ‘डीएनए’ शोधण्याचं तंत्र अवगत केलं आहे. मानवी आतड्यांमध्ये प्रदूषित पाणी किंवा अन्नातल्या सूक्ष्म जंतूंची अंडी असतात. दफनानंतरही मानवी शरीराचं व सांगाड्यांचं विघटन झालं, तरी ही अंडी मातीत हजारो वर्षं राहू शकतात. या अंड्यातले ‘डीएनए’ वरून मानवाच्या मृत्यूचे कारण, त्याचा आहार, रक्तगट, वंशज, पेहराव समजू शकतो. या आधारेच येथील मानवाचा निश्‍चित कालखंड समजू शकतो.

राखीगडी जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ :
 प्राथमिक अहवालानुसार राखीगडीचा कालखंड सुमारे इस.पूर्व ४५०० ते १५०० अर्थात साडेसहाशे हजार वर्षांपूर्वीचा आहे. याचा अर्थ ‘घगर खोऱ्यातून’ ही संस्कृती विकसित होत ती सिंधू संस्कृतीचा भाग झाला असल्याची शक्‍यता आहे. जगातील सर्वांत मोठे उत्खनन असल्यामुळे ‘राखीगडी’ला ‘जागतिक वारसा’ मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे हरियाना राज्य  व केंद्र सरकार हे ठिकाण जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणार आहे. 
राखीगडी येथील उत्खनन पुढील दहा वर्षे सुरू राहणार आहे. उत्खननामध्ये नीलेश जाधव, प्रा. पी. डी. साबळे, सतीश नाईक, कांती पवार, सुतप्पा लाहिरी, अवरादीप मुन्शी आदींच्या पथक संशोधन व अभ्यास करत आहे.

(शब्दांकन : दिलीप कुऱ्हाडे )
(लेखक डेक्कन कॉलेजचे कुलगुरू आहेत)
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4990853815328714002&SectionId=3&SectionName=%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97&NewsDate=20140831&Provider=%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87&NewsTitle=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%97%E0%A4%A2%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%82%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE

No comments:

Post a Comment