Tuesday, January 1, 2019

भिडेवाडा दुर्लक्षित का?







स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके

शनिवारवाडा, लालमहाल, विश्रामबागवाडा अशा ऎतिहासिक स्थळांचा विकास झाला, स्मारके झाली, मग स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक असलेल्या भिडेवाड्याकडे दुर्लक्ष का? हा वाडा कोणत्याही क्षणी कोसळेल अशा स्थितीत आहे. गेल्या १३ वर्षात स्मारकाच्या घोषणा अनेकदा झाल्या. बैठका, चर्चा रंगल्या. मोर्चे झाले.तरिही वाड्याचे जतन का होत नाहीये?
हे स्मारक कोणाला नकोय?
वाड्यातले भाडेकरू, दुकानदार, बॅंक,स्थानिक लोकप्रतिनिधी, पुण्याचे आजीमाजी कारभारी यांना हा वाडा नष्ट करण्यात रस का आहे?
पुणे महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत २१ फेब्रुवारी २००६ ला भिडेवाड्याचे स्मारक करण्याचा एकमताने ठराव झाला.

वाडा शासनाच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया ५ जून २००८ ला सुरू झाली. स्मारकाला विरोध असलेले भाडेकरू, दुकानदार, बॅंक ८ डिसेंबर २०१० ला मुंबई उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने भूसंपादनाच्या कामाला स्थगिती दिली. तेव्हापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधी व पुण्याचे आजीमाजी कारभारी यांचे आर्थिक हितसंबंध ह्या वाड्यात गुंतलेले असल्याने मनपा आणि राज्य सरकारचे वकील,न्यायालयात अनेकदा गैरहजर राहिले. मनपा अधिकार्‍यांना बिल्डरने खिश्यात घातल्याने ते इथे सावित्रीबाईंची मुलींची पहिली शाळा नव्हतीच अशी पोपटपंची करु लागले. आर्थिक प्रलोभन, राजकीय संगनमत आणि जनतेची उदासिनता यामुळे गेली ८ वर्षे एकही पाऊल पुढे सरकलेले नाही.
शाळेचे समकालीन दस्तावेजांमधील असंख्य पुरावे सादर करूनही ते वारंवार गहाळ केले जातात.
शाळा नसल्याचेच ढोल सगळे मिळून वाजऊ लागतात.

जोतीराव,सावित्रीबाई, भिडे,चिपळूणकर, गोवंडे, जोशी, भवाळकर,म्हस्के, शिंदे,लहुजी वस्ताद,राणबा महार,धुराजी चांभार, गणू मांग,फातिमा आणि उस्मान शेख असे उच्च वर्णीय, बहुजन,दलित, अल्पसंख्यांक एकत्र येऊन १७० वर्षांपुर्वी
एक ऎतिहासिक काम सुरू करतात. देशातली मुलींची पहिली भारतीय शाळा सुरू होते. स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे संस्कारकेंद्र उभे राहते.ज्ञानार्जनाचे, ज्ञाननिर्मितीचे उर्जाकेंद्र साकारले जाते.

आज पुणे हे देशातले सर्वात मोठे आणि प्रगत शैक्षणिक शहर आहे.इथे शेकडो महाविद्यालये व डझनांनी विद्यापिठे आहेत.
स्त्री,बहुजन,दलित चळवळीचे हे शहर म्हणजे मोहळ आहे. मग तरिही लिप सर्व्हीस वगळता काहीच का घडत नाही?
कोणाच कारभार्‍याला हा वाडा टिकवावा असे का वाटत नाही?
-प्रा.हरी नरके, १ जानेवारी २०१९

Sunday, December 30, 2018

महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समितीचा निरोप घेताना









२०१८ मध्ये महत्वाच्या ५ ग्रंथांच्या सुधारित आवृत्त्या मला प्रकाशित करता आल्या.
१. महात्मा फुले : समग्र वाड्मय,
२. सावित्रीबाई फुले : समग्र वाड्मय,
३. आम्ही पाहिलेले महात्मा फुले,
४. महात्मा फुले : साहित्य आणि चळवळ,
५. महात्मा फुले: गौरव ग्रंथ,
या पुस्तकांना वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. महात्मा फुले : समग्र वाड्मयच्या आठ महिन्यात तीन आवृत्त्या संपल्या

या मालिकेतला ६वा ग्रंथ, "महात्मा फुले:शोधाच्या नव्या वाटा" हा प्रकाशनासाठी तयार आहे.
इतरही डझनभर पुस्तकांची कामं पुर्णतेच्या जवळ पोचलेली आहेत.
आणखी काही पुस्तकं छपाईच्या प्रक्रियेत पाईपलाईनमध्ये आहेत.
सध्या प्रकाशनाच्या प्रक्रियेत असलेली ही पुस्तके प्रकाशित होतील की नाही हे मला माहित नाही.

सध्या या ग्रंथ प्रकाशन समितीची सुत्रे सनातनी, सरंजामी, जात्यंधाच्या हातात आहेत.
मुलत: फुले आंबेडकरद्वेशावरच ते पोसले गेलेले आहेत. प्रबोधनाशी हाडवैर असलेल्यांना समाजक्रांतीच्या विचारांबद्दल जन्मजात आकस आहे.नफरत आहे. या समतावादी विचारांचे विकृतीकरण करण्यासाठी तसेच हे विचार नष्ट करण्यासाठी आजवर ते कार्यरत होते. आजही आहेत.

सगळेच राजकारणी फुले-शाहू-आंबेडकरांचा जप करीत असतात. मात्र या सरकारी ग्रंथ प्रकाशन समितीकडे एकही मुद्रीतशोधक, संशोधन सहाय्यक किंवा संपादन सहाय्यक नाही. कधीही नव्हते. सगळे काम एकहाती संपादक/सदस्य सचिवाला करावे लागते. त्याचा प्रवासखर्चही मिळाला तर पाच दहा वर्षांनी कधीतरी मिळतो.
सदस्य सचिवाला या पुर्णवेळ कामासाठी शिपाई, हमाल, झाडूवाले आदींच्या मासिक पगाराच्या २५% पेक्षाही कमी मानधन मिळते. अर्थातच तेही आठदहा वर्षांनी कधीतरी मिळते.

खरंतर हा सगळा थॅंकलेस जॉब आहे.भरपूर शिव्या, दूषणे आणि मन:स्तापाचा खुराक मात्र मुबलक मिळतो. टेल्कोतली माझी नोकरी सोडून मी हे काम करण्यासाठी गेलो. अनेक हिन्दी, मराठी, इंग्रजी पुस्तकं प्रकाशित केली. शंभर वर्षात महात्मा फुले साहित्याचे हिन्ही, इंग्रजीत भाषांतर झालेले नव्हते. ते केले. त्यातून बंगाली, तेलगू, गुजराती, उर्दू, मल्याळम, कन्नड, सिंधी, उर्दूत अनुवाद होऊन फुले साहित्य देशभर पोचले. लोकव्यवहार आणि शासनव्यवहार यात फक्त ’स्व’हित पाहिले जाते. सामाजिक कृतज्ञतेचा बहुधा दुष्काळ असतो. फुले-आंबेडकरी चळवळीबद्दलची माझी समज खूपच भाबडी होती असे आज मला वाटते. प्रबोधन चळवळीच्या ह्या कामासाठी टेल्को सोडण्याचा, पुर्णवेळ वाहून घेण्याचा, स्वत:चे प्रचंड आर्थिक नुकसान करून घेण्याचा निर्णय चुकला की काय अशी मला आज शंका येते.

महात्मा फुले यांच्या जीवनावर संशोधनाच्या नव्या प्रकाशात अद्ययावत चित्रपट करावा असा प्रस्ताव मी १९९९ साली राज्य शासनाला दिला होता. तो स्विकारला गेला होता. त्याच्या निर्मितीचे काम एन.एफ.डि.सी. व जब्बार पटेल यांच्याकडे सोपवले गेले होते. विजय तेंडूलकर, य.दि.फडके, गो.पु.देशपांडे, भा.ल.भोळे अशा दिग्गजांसोबत मला संशोधन व स्क्रिप्टवर काम करायला मिळेल हा आनंद होता.
तथापि ही चित्रपटनिर्मिती १८ वर्षे रखडली. त्याची कारणे सरकार, एन.एफ.डि.सी. व जब्बार पटेल हेच सांगू शकतील. या काळात संशोधन व स्क्रिप्ट टीममधल्या काही मान्यवरांचे निधन झाले. आता एन.एफ.डि.सी. व जब्बार पटेलांकडचे हे काम नविन संस्थेकडे सोपवण्यात आलेले आहे.
नवी टिम ह्या कामाला गती देणार आहे.
२०१९ मध्ये ही संस्था महात्मा फुले यांच्या जीवनावरील भव्य अशा हिंदी, मराठी, इंग्रजीतील चित्रपटाची निर्मिती करील अशी आशा आहे.

प्रा.हरी नरके, ३१ डिसेंबर, २०१८

Friday, December 28, 2018

तेथे पाहिजे जातीचे -बॅकलॉग, प्रा.हरी नरके


श्री.विनोद तावडे ज्या ज्या खात्यांचे मंत्री आहेत तिथल्या बहुतेक सर्व समित्या, संस्था, प्राधिकरणे यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती करताना एक सुत्र प्रमुख असल्याचे
दिसते. त्यांनी या ४ वर्षात खालील नियुक्त्या केलेल्या आहेत.
१. बालभारती, इतिहास समिती - अध्यक्ष- प्रा.सदानंद मोरे,
२. भाषा सल्लागार समिती, अध्यक्ष- प्रा.सदानंद मोरे,
३. साहित्य संस्कृती मंडळ, अध्यक्ष- प्रा.सदानंद मोरे,
४. सारथी, अध्यक्ष- प्रा.सदानंद मोरे,
५. ग्रंथ खरेदी तपासणी समिती, अध्यक्ष- प्रा.सदानंद मोरे,
६. साहित्य संस्कृती मंडळ, अध्यक्ष- श्री. बाबा भांड,
७. महाराजा सयाजीराव गायकवाड ग्रंथ समिती, सचिव- श्री. बाबा भांड,
८. उत्कृष्ठ वाड्मयनिर्मिती राज्य पुरस्कार समिती, अध्यक्ष- श्री. बाबा भांड,
९. राजर्षी छ.शाहू ग्रंथ समिती- सचिव- प्रा. रमेश जाधव,
१०. भाषा सल्लागार समिती, अध्यक्ष, प्रा. दिलीप धोंडगे,

११.. १२.. १३.. १४..१५..
अध्यक्ष वा सचिवपदी निवड झालेले हे सर्व गुणवंत मान्यवर त्यांच्या योग्यतेमुळे निवडले गेलेले आहेत यात शंका नसावी..
ते मंत्रीमहोदयांचे स्वजातीय असणे हा निव्वळ योगायोग समजावा. तो काही त्या अध्यक्षांचा वा सचिवांचा गुन्हा नाही.
अशा पद्धतीने गुणीजनांचा आजवर गेल्या ६० वर्षात असलेला बॅकलॉग बहुधा प्रथमच भरला जात असावा.
- प्रा.हरी नरके, २८ डिसेंबर, २०१८

Tuesday, December 25, 2018

डॉ. आंबेडकर प्रकाशन समिती वाद






राष्ट्रीय स्वयंसेवक संघही आंबेडकरप्रेमी आहे, हे आता तरी समजून घ्यावे : तावडे, डॉ. आंबेडकर प्रकाशन समिती वादावर उत्तर, विशेष प्रतिनिधी | पुणे
'राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आस्था, आदर आणि प्रेम बाळगणारे आंबेडकरप्रेमी आहेत, याचा शोध जर या निमित्ताने कोणाला लागला असेल तर त्याचे स्वागतच आहे,' अशी खोचक प्रतिक्रिया राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ चरित्र साधने प्रकाशन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष विनोद तावडे यांनी दिली. राज्य शासनाने या समितीवर नव्याने केलेल्या नियुक्त्यांना विराेध करणाऱ्यांना तावडेंनी ही उत्तर दिले.
'शासकीय समित्यांवरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या हा नियमित कामकाजाचा भाग असतो. यामध्ये कोणी राजकारण आणण्याचा प्रश्न येत नाही. कोणती व्यक्ती कोणत्या विचारधारेशी बांधील वगैरे कोणताही विचार करण्याचे कारण नाही. डॉ. आंबेडकरांचे महान कार्य जगात पोहोचवण्याचा दृष्टिकोन ठेवून ताज्या दमाच्या, सक्षम व्यक्तींकडे ही जबाबदारी सोपवण्याचा विचार शासनाने केला. बाकी कोणताही हेतू नाही. 'संघाची माणसे नेमली' हा दावा निरर्थक आहे,' असे तावडेंनी 'दिव्य मराठी'ला सांगितले.
डॉ. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील निवृत्त उपकुलसचिव डॉ. सुधाकर बोकेफोडे यांना समितीचे सचिव करण्यात आले आहे. त्यांच्यापूर्वी ही जबाबदारी दिवंगत प्रा. अविनाश डोळस यांच्याकडे होती. 'कोणत्या निकषांवर आपली निवड झाली?' या प्रश्नावर डॉ. बोकेफोडे यांनी सांगितले, गेली ३२ वर्षे मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. व्यवस्थापनात माझा हातखंडा आहे. आंबेडकरी चळवळीशी मी निगडित आहे. याच विषयावर माझी दुसरी पीएचडीदेखील चालू आहे. हिंदुत्ववादी संघटनांशी जोडण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याबद्दल अधिक न बोलणेच इष्ट ठरेल. डॉ. आंबेडकरांचे सर्व उपलब्ध साहित्य जगभरच्या नव्या पिढीपर्यंत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न राहील. इंटरनेटच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांचे विचार आणखी विस्तृतपणे जगापुढे कसे ठेवता येतील यावर आमचा भर असेल. डॉ. आंबेडकरांचे अजूनही काही लेखन अप्रकाशित राहिले असेल तर त्याचा शोध घेण्याचाही प्रयत्न समिती करेल,' असे ते म्हणाले.
हिणवऱ्यांबद्दल बाेलणार नाही : मिलिंद कांबळे
नूतन समिती सदस्य मिलिंद कांबळे म्हणाले की, आम्हाला 'नवआंबेडकरवादी' किंवा 'जातीयवादी' म्हणून हिणवणाऱ्यांबद्दल मी काहीच बोलणार नाही. परंतु, डॉ. आंबेडकर यांचे सर्व उपलब्ध जगभर पोहोचवणारे खास संकेतस्थळ मी सर्वात पहिल्यांदा अठरा वर्षांपूर्वीच सुरू केले. 
डॉ. बाबासाहेबांचा अर्थक्रांतीचा, उद्यमशीलतेचा विचार देशभरच्या दलितांमध्ये रुजवून त्यांच्यात उद्योजक घडवण्यासाठी 'दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री'ची मुहूर्तमेढ मी रोवली. केवळ 'बोलका विचारवंत' न राहता डॉ. आंबेडकरांचे विचार जास्तीत जास्त आचरणात आणण्याचा प्रयत्न करत असल्याने कदाचित माझी निवड या समितीवर झाली असे मला वाटते.' असेही कांबळे यांनी या वेळी बोलताना सांगितले.
नेमका वाद आहे तरी काय ?
डॉ. आंबेडकरांच्या साहित्याचा प्रचार करणारी समिती संघ स्वयंसेवकांच्या ताब्यात गेली आहे, डॉ. आंबेडकरांच्या साहित्याशी फारसा संबंध नसलेली मंडळी या समितीवर आल्याचे सांगून वाद निर्माण केला जात आहे. डॉ. भीमराव भोसले, प्रा. रमेश पांडव, डॉ. सुनील भंडगे, प्रा. वैजनाथ सुरनर, डॉ. राजन गवस, डॉ. शरणकुमार लिंबाळे, डॉ. श्यामराव अत्रे, मिलिंद कांबळे आणि इतर नवे सदस्य संघाशी संबंधित असल्याचा आरोप हाेत आहे.
समिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताब्यात : हरी नरके
साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. आंबेडकर समितीवर यापूर्वी काम केलेले हरी नरके आदींनी नव्या नेमणुकांवर नाराजी व्यक्त केली आहे. 'अपरिचित लोकांची समिती' या शब्दांत डॉ. वाघमारे यांनी टीका केली, तर नरके यांनी 'नव आंबेडकरवाद्यांच्या समितीला हार्दिक शुभेच्छा' अशी बोचरी प्रतिक्रिया साेशल मीडियातून व्यक्त करत ही संपूर्ण समिती रा. स्व.संघाच्या ताब्यात गेल्याचे म्हटले आहे.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/…/25122018/0/5/
दिव्य मराठी, नाशिक, मंगळवार, दि. २५ डिसेंबर २०१८,पृ.५ Published on 25 Dec-2018 
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/…/25122018/0/5/

Monday, December 24, 2018

ब्रिलियंट कॉंमेडी, रापचिक म्युझिकल आणि जळजळीत वास्तवाची अनोखी सफर




काल बालगंधर्वला तोडी मिल फॅंटसी चा शुभारंभाचा प्रयोग बघितला. ह्या ब्रिलियंट कॉंमेडी आणि हटके म्युझिकल असलेल्या, तनमनाला प्रसन्न झिणझिण्या आणणार्‍या,गारूड करणार्‍या  अनुभवातून मला अद्यापही बाहेर येता आलेलं नाहीय. आज मराठी रंगभुमीवर पाचकळ विनोदी आणि कृत्रिम मध्यवर्गीय जाणिवांच्या नाटकांची चलती आहे. मात्र खरा विनोद किती धमाल असतो, तो किती खळखळून हसवतो, हसताहसता डोळ्यातून पाणीही काढतो याचा अस्सल अनुभव घ्यायचा असेल तर मग तुम्ही "तोडी मिल फॅंटसी" हे नवं नाटक बघायलाच हवं. यातलं रापचिक म्युझिक तुम्हाला भन्नाट जगात घेऊन जातं. यातली आजच्या तरूणाईची बोली आणि प्रमाण भाषेचं देखणं मिश्रण करणारी जिवंत भाषा आरपार भिडते. ही सगळीच टीम अवघ्या पंचविशीतली आहे. कलेच्या जगात आज नविन काहीच घडत नाही, सगळं कसं शिळंशिळं आणि घिसंपिटं असतं, आजकालची तरूण मुलं फारशी गंभीर नाहीत असली टिका करणारांनी तर हे नाटक आजिबात चुकवता कामा नये. आजच्या भाकड मालिकांच्या, निर्बुद्ध करमणूकीच्या आणि नटव्या बॉलीवूडच्या जगात अडकलेल्या प्रेक्षकांना इतका पॉवरफुल कंटेट व सादरीकरण आणि अस्सल अभिनय रंगभुमीवर फार क्वचितच पाहायला मिळेल.

हे नाटक जिथे घडतं ती जागा युनिक आहे. आजवर कोणत्याही सिनेमा-नाटकात या स्थळावर नाटक घडताना मी तरी बघितलेलं नाही. मुळात तिथं नाटक घडू शकतं असा विचारच एकदम भारीय. तो सादर करताना त्यातलं नाट्य कमालतर विकसित केलंय. त्यासाठी वापरलेलं नेपथ्य, लाईट्स, म्युझिक सारंच कल्पक, अस्सल नी अफलातून आहे. मुलत: आजच्या बदलत्या जगावरचं ते एक व्यंग आहे. त्यातला जळजळीत उपरोध आणि जादूई वास्तववाद काळजाला भिडणारा आहे. आजच्या पिढीचं आजचं नाटक. एकदम हटके.

आजची ही पंचविशीतली महानगरी क्रियेटिव्ह तरूणाई स्टार्टअप इंडीयाची बघत असलेली स्वप्नं, त्यांचा ओरिजिनल असा धगधगता जिवनानुभव फॅंटसीच्या अंगाने आपल्या अंगावर अक्षरश: कोसळतो.

मुंबईच्या कापडगिरण्या गेल्या आणि त्या जागांवर प्रचंड मोठे टॅावर्स उभे राहिले. चाळी तोडून, झोपडपट्ट्या हटवून प्रचंड माँल्स उभे राहिले. स्काय वॉकवर झोपणारा पण टुरिझम बिझनेसची टोलेजंग स्वप्नं बघणारा नायक "घंट्या" हा जेव्हा हाय प्रोफाईल जगातल्या मॉडेलला भेटतो, तेव्हा नेमकी कोणती फॅंटसी घडते हा सस्पेन्स तसाच राहायला हवा. ती प्रत्यक्ष बघण्यात जी मजा आहे ती सांगण्यात नाही.


या नाटकाचा लेखक सुजय सुरेश जाधव हा प्रतिभावान मुलगा आहे. जयंत पवार यांच्या फिनिक्सच्या राखेतून उठला मोर, या अकादमी विजेत्या कलाकृतीची आठवण करून देणारी पण कॉपी नसलेली एकदम ओरिजिनल आयडिया आणि तिचा स्वाभाविक विकास आपल्याला इथे अनुभवायला मिळतो. विनायक प्रभात कोळवणकर हा अफाट ताकदीचा अतिशय गुणी दिग्दर्शक आहे. ब्रिलियंट. जब्बार पटेल, चंद्रकांत कुलकर्णी, अतुल पेठे आणि नागराज मंजुळे यांच्या झेप, उर्जा आणि प्रतिभेच्या जगातला. पण या कुणाचीही नक्कल न करणारा, अस्सल जीवनानुभव आपल्या चिमटीत पकडून ताकदीने मांडणारा. संपुर्ण ओरिजिनल. त्याची नाटकं प्रायोगिकतेच्या दुर्बोध चौकटीत न अडकता नवं, प्रवाही, सहज संवादी, अस्सल देणारी आणि मनाला आरपार भिडणारी. सतत नव्याच्या शोधात असलेला. संहिता, सादरीकरण, जाहीरातीपासून याची प्रत्येक गोष्ट वेगळी आणि स्वत:ची मुद्रा असलेली .

तोडी मिल फॅंटसी ची रंगमंच आपल्या खांद्यावर सहज पेलणारी कलाकार, संगितकार आणि बॅकस्टेजची टीमही एकदम तगडी आहे. झपाटलेली. काहीतरी वेगळं, भन्नाट करून दाखवणारी.

या नाटकातला दणकट, कधी हळुवार तर कधी स्वप्नरंजनात रमलेला सर्व टिमचा म्युझिकल आणि अभिजात अभिनय एकदम पॉवरफुल. जब्राटच. शुभंकर एकबोटे, प्रमिती नरके,कपिल रेडेकर,सुरज कोकरे, जयदीप मराठे यांचा परफॉर्मन्स केवळ अफलातून. ही पोरं अफाट क्षमता आणि स्वत:ची झेप असलेली तगडी मुलंयत. आजउद्याची रंगभुमी आपल्या दणकट खांद्यांवर पेलण्याची अपार गुणवत्ता त्यांच्यात आहे. चैतन्य देशपांडे, अनामिका डांगरे, अगस्ती परब,प्रज्वल खेडेकर, अमेय अडिवरेकर, आशिष मंडलू यांनीही उत्तम साथ दिलीय.

नाटकात असं सगळंच रसायन जमून येणं ही फार दुर्मिळ चीज. थिएटर फ्लेमिंगो आणि भारत कला केंद्र निर्मित तोडी मिल फॅंटसी हे स्वत:चा रिदम सापडलेलं, कलदार मुद्रा उमटवणारं नाटक तुफान गाजणार. जबरदस्त चालणार असा मला विश्वास वाटतो.
अभिनंदन आणि शुभेच्छा टीम तोडी मिल फॅंटसी. #तोडीमिलफँटसी #TodiMillFantasy #natak #drama#theatre #marathitheatre Music : @desiriff_official @kapil_redekar Theatre Flamingo आणि @desiriff_official निर्मित 'तोडी मिल Fantasy'

-प्रा.हरी नरके, २४ डिसेंबर २०१८

Friday, December 21, 2018

सर्वांचेच आरक्षण रद्द करा- सराटेंची याचिका






अ] SC,ST, OBC, VJNT, SBC, मराठे या सर्वांचेच आरक्षण रद्द करा, त्याऎवजी आर्थिक निकषांवर सवलती द्या, मंडल आयोगाचा अहवाल १९८०, जो मा.केंद्र सरकार व मा.सर्वोच्च न्यायालयाने स्विकारलाय तो रद्द करावा असे श्री सराटे उच्च न्यायालयाला सांगताहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या ७ न्यायाधिशांच्या घटनापिठाने दिलेला आदेश उच्च न्यायालय बदलू शकते काय? मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमधल्या शेतकर्‍यांच्या आक्रोशात ज्यांची सरकारे वाहून गेली, तेच शेतकर्‍यांच्या प्रश्नांचे गांभिर्य कमी करण्यासाठी व शेतकरी ऎक्य मोडीत काढण्यासाठी श्री. बाळासाहेब सराटेंच्या काठीने जातीयुद्ध भडकावित आहेत काय? सध्याचे राज्य व केंद्रीय मागास वर्ग आयोग मा. सराटेंना मान्य नाहीत. त्यांना तिसरीच शक्ती हवीय.

ब] मराठ्यांचीही नॉन क्रिमी लेयरची वार्षिक मर्यादा रू. ८ लाखाहून वार्षिक रू. ६० हजारपर्यंत इतकी कमी करणे आवश्यक आहे अशी त्यांची मागणी आहे.

क] मा.सराटे मराठ्यांचेही आरक्षण का रद्द करायला सांगताहेत?

ड ] SC,ST, OBC, VJNT, SBC, या सर्वांचेच आरक्षण काढून घ्यायला ते का सांगताहेत?

इ] मा.सराटेंचा बोलवता धनी कोण आहे?

सध्याची आरक्षण पद्धत म्हणजे लोकशाहीची हत्त्या असल्याचा मा.सराटेंचा दावा आहे.

मा. सराटेंच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत -

१. राज्य शासनाचा १८ मे १९५९ चा आर्थिक दृष्ट्या मागासलेपणावर आधारित आरक्षण देण्याचा आदेश पुन्हा लागू करावा,

२. पुढील सर्व कायदे, शासन आदेश रद्द करावेत,
अ] शासन आदेश ९ एप्रिल १९६५, च्या आदेशाने सरकारी नोकरीत आरक्षण देण्यात आले.
ब] शासन आदेश १३ ऑक्टोबर १९६७, १८० ओबीसी जातींना व विजाभज यांना १४% आरक्षण देण्यात आले.
क] शासन आदेश १३ एप्रिल १९६८,
ड] शासन आदेश २३ मार्च १९९४,
ई] महाराष्ट्र राज्य आरक्षण अधिनियम २००४, सरकारी नोकरीतले आरक्षण रद्द करावे,
फ] महाराष्ट्र राज्य आरक्षण अधिनियम २००६, उच्च शिक्षणातले आरक्षण रद्द करावे,

वरील सामाजिक न्यायाचे सर्व शासनादेश व कायदे लोकशाहीची हत्त्या करणारे आहेत असे श्री.सराटे याचिकेत म्हणतात.
ते म्हणतात, नॉन क्रिमी लेयरची वार्षिक मर्यादा रू. ८ लाखाहून वार्षिक रू. ६० हजारपर्यंत इतकी कमी करावी.

आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे, ही सराटे करीत असलेली मागणी कोणाची आहे?

- प्रा.हरी नरके, २१ डिसेंबर २०१८

Wednesday, December 19, 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ समिती रा.स्व.संघाच्या ताब्यात-









डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारी साहित्य हे आंबेडकरी चळवळीचा जीव की प्राण.
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे" यांचे २२ खंड प्रकाशित करणारी राज्य शासनाची ग्रंथ समिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपुर्ण कब्ज्यात गेलेली आहे.
या समितीचे सदस्य सचिव प्रा.अविनाश डोळस यांना त्यांच्या अकाली दु:खद निधनापुर्वी ११ दिवस आधीच समितीवरून हटवण्यात आलेले होते. स्मृतीशेष प्रा.अविनाश डोळस यांच्यासह प्रकाश आंबेडकर, प्रा. जनार्दन वाघमारे, प्रा. आ.ह.साळुंखे, बाबा आढाव, जनार्दन चांदूरकर, प्रा. जयसिंगराव पवार,प्रा. रमेश जाधव, प्रा. रावसाहेब कसबे, प्रा.दत्ता भगत, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, नितीन राऊत यांनाही समितीवरून कमी करण्यात आले.

डोळस यांच्या जागेवर सुधाकर बोकेफोडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
रा.स्व.संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते, रमेश पांडव, सुनिल भंडगे, वैजनाथ सुरनर, शामराव अत्रे, मिलिंद कांबळे, प्रविण रणसुरे, ईश्वर नंदापुरे, श्यामा घोणसे, संजय साळवे, पी.जी.जोगदंड यांची नवे आंबेडकरी तज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. साहित्यिक नामदेव कांबळे, शरणकुमार लिंबाळे व राजन गवस यांनाही या समितीवर नेमलेले आहे.
शिक्षण मंत्री विनोद तावडे हे समितीचे अध्यक्ष आहेत.

ही समिती ४० वर्षांपुर्वी स्थापन करण्यात आली असून या समितीवर स्मृतीशेष वसंत मून, प्रा.हरी नरके, प्रा.दत्ता भगत आदींनी संपादक तथा सदस्य सचिव म्हणून १९७८ ते २०१० या काळात काम केले होते.
२०१० ते ३१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत प्रा.डोळस समितीवर काम करीत होते. ११ नोव्हेंबर २०१८ ला त्यांचे अकाली निधन झाले.

रा.स्व.संघाच्या या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांची पुस्तके चाळलेली वा वाचलेली असणार असे मी गृहीत धरतो. यापुढे ते बाबासाहेबांचे साहित्य अधिक जोमाने व प्रामाणिकपणे प्रकाशित करतील अशी अपेक्षा आहे. या नव आंबेडकरी तज्ज्ञांना हार्दीक शुभेच्छा.


प्रा.हरी नरके, १९ डिसेंबर २०१८