Thursday, April 24, 2014

बगळा आणि खेकडा यांची झुंज
नरहरी म्हणे.....
1...


बगळा आणि खेकडा यांची झुंज
एक विराट आटपाट नगर होतं. मोठमोठे तलाव होते. तळी होती. मासे मुबलक होते. बगळ्यांची चैन होती. कितीही खा, कमतरता नाही. एकदा फार मोठा दुष्काळ पडला.सगळे तलाव आटून गेले. पाण्यातले मासे मरून गेले. उरलेसुरले बगळ्यांनी खाऊन टाकले.मासे संपले आता जगायचे कसे? बगळ्यांना चिंता पडली. मोठा बगळा म्हणाला, काळजी करू नका. शेजारच्या राज्यातील डोंगराच्या पलिकडे मोठमोठे तलाव आहेत. मी करतो व्यवस्था. तो तिकडे गेला. त्याने तलावाला सदिच्छाभेट दिला. माशांशी संवाद साधला. तो म्हणाला, "गड्यांनो, इकडे मला हालाखीची परिस्थिती दिसते. तुमचे राज्य फारच मागासलेले दिसते. माझ्या राज्यात चला. बघा आमच्या राज्यात आम्ही डोंगराएव्हढा विकास केलेला आहे.परमेश्वराला पर्याय आम्हाला सापडला आहे. आमचा राजा म्हणजे प्रतिपरमेश्वर नाही तर खुद्द परमेश्वरच आहे. दुष्काळ आम्हाला माहितच नाही. बारामाही दुथडी भरून वाहणार्‍या नद्या, नी तुडुंब भरलेले असंख्य तलाव ही आमच्या राज्याची जगात ओळख आहे. तुमच्या राज्याचं काही खरं नाही. तळ्याचं पाणी आटत चाललय.तुम्हाला लवकरच उपाशी मरावे लागेल.तेव्हा आत्ताच जागे व्हा. माझ्यासोबत या. मी तुम्हाला आरामच आराम मिळेल याची व्यवस्था करतो.सगळी सुखं तुमच्या समोर हात जोडून उभी असतील.माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमची मान झुकू देणार नाही."
एक मासा धीट होता.तो म्हणाला, "पण आजवरचा इतिहास सांगतो, बगळे माशांना खातात.तुमचा भरवसा काय?"
बगळा म्हणाला, "मी वेगळा बगळा आहे. मी माश्यांवर अतोनात प्रेम करतो. माझ्या राज्यात येऊन बघा. तुमची खात्री पटेल.आमच्या विरोधकांनी पसरवलेल्या अफवांवर अजिबात विश्वास ठेऊ नका. इतिहास काहीही असो, तुम्ही मला एक संधी देऊन बघा.आम्ही बगळे आता बदललो आहोत.माझ्या राज्यात...."
बरेच मासे भारावून गेले. शंका व्यक्त करणारांना ते म्हणाले, " याला एक संधी द्यायला काय हरकत आहे?"
एक मासा तयार झाला. तो बगळ्यासोबत गेला.बगळ्याने त्याला आपल्या राज्यात नेले. त्याचा सत्कार केला. सगळ्या उपाशी बगळ्यांना त्याने बोलावले, म्हणाला, " याला प्रेमाने आणि सन्मानाने वागवा. खा पण प्रेमाने खा. त्याचा अपमान होणार नाही, याची काळजी घ्या."
सगळ्या बगळ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. त्यांनी माशाला आदराने वागवले. सन्मानाने खाल्ले. त्याचे काटे त्यांनी  स्मृती म्हणून आदरपुर्वकन जतन करून ठेवले. दुसरा दिवस दुसरा मासा तयार झाला. तिसरा दिवस... चौथा दिवस...
चौदा वर्षे मजेत गेली.बगळेकंपनी नेत्यावर खूष होती. म्हणाली, असा मुत्सद्दी, वेगळा नी नि:स्पृह नेता झाला नाही.
शेजारच्या राज्यातले सगळे मासे संपून गेले.त्यांच्या काट्यांचे सन्माननीय स्मृतीवन उभारण्यात आले. सगळ्या झाडांखाली काट्याचे ढीगच ढीग.
"वेगळा" बगळा विचार करू लागला. मासे तर संपले, आता पुढे काय?
त्याने आपला मोहरा खेकड्यांकडे वळवला, तो त्यांना म्हणाला, "गड्यांनो, माझ्या राज्यात चला.बघा, मी कसा राज्याचा विकास केलाय. माझ्या राज्यात दह्यादुधाच्या नद्या वाहतात. तुमच्या राज्यातले सगळे मासे माझ्यावर विश्वास ठेऊन माझ्या राज्यात आले. बघा तरी ते किती मजेत जगतायत.निदान ते पाहायला तरी चला.माझ्या राज्यात...."
खेकडे म्हणाले, "ते सगळे ठिक आहे.पण आम्ही तुझ्यावर का विश्वास ठेवावा?आमचा बगळ्यांच्या बाबतीतला पुर्वानुभव चांगला नाही."
बगळा म्हणाला, "इतिहास विसरा. पुढे चला. तेचतेच कितीवर्षे उगाळणार आहात? मला सगळ्या विश्वाने क्लीनचीट दिलेली ती तरी पहा.माझ्यावर भरोसा ठेवा. मी तुम्हाला स्वर्गीय आनंद देईन.तक्रारीची संधीच ठेवणार नाही. माझ्यासोबत आलेल्या तुमच्या राज्यातल्या माशांना विचारा....."
एक खेकडा तयार झाला. तो म्हणाला, "मी तुझ्यासोबत यायला तयार आहे, पण माझ्या काही अटी आहेत."
वेगळा बगळा म्हणाला, तुझ्या सगळ्या अटी मला मान्य आहेत. चर्चेनी आणि संवादानेच प्रश्न सुटतात. माझ्या राज्यात...."
खेकडा म्हणाला, "अट क्र.१, मी तुझ्यासोबत येईन, पण तुझ्या चोचीत धरून तुला मला नेता येणार नाही. मी तुझ्या मानेवर बसेन.माझ्या दोन पायांनी मी तुझ्या मानेला धरीन."
बगळा म्हणाला, " तू जे काही म्हणशील ते सगळे मला मंजूर आहे."
खेकडा निघाला. ते बगळ्याच्या राज्यात पोचले.
मात्र खेकडा सावध होता. त्याची नजर चौफेर फिरत होती. मासे कुठे दिसतच नव्हते. माशांच्या काट्यांचे ढीगच ढीग लागलेले होते.प्रसंग बाका होता.खेकडयाने परिस्थिती ओळखली.बगळा आपल्याला खाणार हे लक्षात येताच, खेकड्याने आपल्या नांग्या आवळल्या.बगळ्याच्या मानेवरचा ताण वाढला.बगळा म्हणाला, "मित्रा तू हे काय करतोयस? माझी मान का आवळतोयस?"
खेकडा म्हणाला, "मोठ्या दादा, तू मला सोड.मी तुझी मान सोडतो. पण लक्षात ठेव, मी माशांसारखा सहजासहजी मरण पत्करणार नाही.तु आणि तुझे भाऊबंद मला मारणार असाल तर मी तुला जिवंत सोडणार नाही. आपण दोघे मित्र आहोत. तरीही तुम्ही मला मारणार असाल तर मी तुला मारूनच मरेन.आपण दोघे सोबतच मरूया...."
"वेगळा" बगळा  विचार करू लागला......
आणि त्याने खेकड्यावरची पकड सैल केली....
खेकड्याने बगळ्याच्या मानेवरची पकड सैल केली.............