आधुनिक भारताच्या सर्वांगिण उभारणीमध्ये ज्या नेत्यांचे महत्वपुर्ण योगदान आहे त्यात डा‘.बाबासाहेब आंबेडकर अग्रस्थानी आहेत.स्त्री-पुरुष समता, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप,सर्वांना शिक्षण,धर्मचिकित्सा ही मुलभुत विषयपत्रिका घेवून त्यांनी लढे उभारले. संवैधानिक हक्क, समाज प्रबोधन, संघटन, संघर्ष याद्वारे बाबासाहेबांनी राजसत्ता,अर्थसत्ता,धर्मसत्ता, प्रशासन, न्यायव्यवस्था, ज्ञानसत्ता, सांस्कृतिक सत्ता, माध्यमसत्ता या सगळ्यात स्त्रिया आणि अनुसुचित जाती,जमाती, भटके विमुक्त, इतर मागास वर्गिय, अल्पसंख्याक यांना प्रतिनिधित्त्व मिळाले पाहिजे यासाठी ते झुंजले. स्वत: आयुष्यभर लेखन,वाचन,चिंतन आणि ज्ञाननिर्मितीच्या कामात बाबासाहेब समर्पित राहिले. त्यांनी सर्व वंचित,दुबळे, पिडीत यांना अस्तित्त्व,उर्जा, अस्मिता आणि प्रकाश दिला.
बाबासाहेब हे आज सामाजिक न्यायाचे प्रतिक बनलेले आहेत. बाबासाहेबांचा झगडा समाजाचे शोषण आणि नेतृत्व करणारांशी होता. त्याकाळात जे लोकघटक यात पुढे होते त्यांच्यावर बाबासाहेबांनी आसूड ओढले.पण बाबासाहेब भगवान बुद्धांचे वारसदार होते. बुद्धाच्या {अनित्यतेच्या} परिवर्तनाच्या विचारावर त्यांचा विश्वास होता.बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर गेल्या ५७ वर्षात या सामाजिक नेतृत्वात काहीच बदल झाला नाही का? आज बाबासाहेब असते तर त्यांनी कोणाची झाडाझडती घेतली असती?
स्वातंत्र्यपुर्वकाळात भारतीय समाजावर एका घटकाचे वर्चस्व होते. त्यात आज लोकशाहीमुळे, निवडणुक व्यवस्थेमुळे बदल झालेला आहे. सध्या जातीच्या लोकसंख्येला, जास्त मतदार असणारांना महत्त्व आलेले आहे. जागतिकीकरणामुळे झालेली उलथापालथ विशेषत: त्र्यवर्णिकांचा झालेला आर्थिक विकास आणि मागास समुहांमधून निर्माण झालेला नवमध्यमवर्ग यामुळे झालेले बदल लक्षात घेवून नवी वैचारिक मांडणी करावी लागेल.तशी ती न करता जुनेच ताशे वाजवित बसणे योग्य नाही.
आज आपल्या देशात शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आत्महत्त्या करीत आहेत. १९१८ साली बाबासाहेबांनी शेतीवर "स्माल होल्डींग्ज इन इंडीया" हा शोधनिबंध लिहिला होता. त्यात त्यांनी जास्त संततीमुळे शेतीचे होणारे तुकडे आणि त्यामुळे उभे राहणारे प्रश्न यांची चर्चा केली होती.तुकडेबंदीचा मार्ग सांगुन त्यांनी शेतीवर वाढणारा बोजा कमी करण्यासाठी शेतकर्यांनी आपली मुले शेतीवर अवलंबून न ठेवता त्यांना व्यापार,उद्योग,शिक्षण क्षेत्रात घातले पाहिजे असा सल्ला दिला होता.असे झाले नाही तर शेतकरी संकटात सापडेल आणि त्याला जगणे मुश्कील होईल अशा इशारा त्यांनी ९५ वर्षांपुर्वी दिला होता हे त्यांचे द्रष्टेपण होते.त्यांच्या "स्वतंत्र मजूर पक्षातर्फे" त्यांनी मुंबई विधीमंडळात जमीनमालक खोतांविरुद्ध विधेयक आणून फार मोठे जनआंदोलन उभारले होते. त्या चळवळीमुळेच पुढे कुळकायदा आला आणि शेतकरी समुहांना जमीन मालकी मिळाली.शेतीसाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी १९४२ ते १९४६ या काळात केंद्रीय पाटबंधारे मंत्री असताना देशातील मोठ्या नद्या जोडण्याचा विचार पुढे आणला.दामोदर,महानदी, कोसी नदी, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीवरील धरणे आणि विजनिर्मिती प्रकल्प हाती घेतले. देशात जलसाक्षरता आणि उर्जा साक्षरता निर्माण करण्यासाठी ते झटले.आज राज्यात भीषण दुष्काळ आहे.पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे.अशावेळी वीज आणि पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना सगळ्याच जातीधर्माच्या मंडळींना बाबासाहेबांचा हा काळाच्या पुढचे बघणारा आवाका चकीत करून जातो.
१९३८ साली त्यांनी कुटुंब नियोजनाचा आग्रह धरला.त्यासाठी कायदा करावा म्हणून विधीमंडळात विधेयक आणले.ते तत्कालीन नेत्यांच्या अडाणीपणामुळे पास झाले नाही.आज वाढती लोकसंख्या ही आपली डोकेदुखी आहे. बेकारी, गरीबी, निरक्षरता, बेघरपणा हे प्रश्न त्यातूनच जन्माला आलेले आहेत.२० जुलै १९४२ रोजी बाबासाहेब म्हणाले होते, कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातील स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजली पाहिजे.स्त्रिया गुलाम नाहीत. त्या पुरूषांच्या बरोबरीच्या आहेत.प्रत्येक स्त्रीने नवर्याची मैत्रीण बनले पाहिजे.हिंदु कोड बिलाद्वारे सर्व स्त्रियांना कायदेशीर अधिकार मिळवून देण्यासाठी ते लढले.
इतर मागास वर्गाच्या उन्नतीसाठी १९३० साली त्यांनी स्टार्ट कमेटीच्या अहवालात त्यांना आरक्षण आणि कायदेशीर संरक्षण देण्याची शिफारस केली.घटनेच्या कलम ३४० नुसार केंद्र सरकारने ओबीसी आयोग नेमला नाही म्हणून त्यांनी १९५१ मध्ये कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला."शुद्र पुर्वी कोण होते?" हा ग्रंथ लिहून इतर मागास वर्गाचे प्रबोधन केले.भटक्या विमुक्तांच्या विदारक स्थितीला "जाती निर्मुलन"या ग्रंथातून वाचा फोडली.
बाबासाहेबांनी केलेले विपुल ग्रंथलेखन म्हणजे ज्ञानाचे महाभांडार आहे.त्याचे २२ खंड महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेले आहेत. त्यातील १७ ते २२ खंडाचे संपादन करताना लक्षात आले की कोणताही ग्रंथ लिहिताना ते किती अफाट पुर्वतयारी करीत असत.भारतीय राज्यघटना आणि बुद्ध धम्माचे पुनर्जागरण यातून त्यांनी सार्या देशावर उपकार करून ठेवले आहेत.
अशा महापंडिताला अभिवादन करण्यासाठी सारा भारत का पुढे येत नाही?त्यांनी दलितांसाठी काम केले हे खरेच आहे.पण ते सार्या भारतीयांचे नेते होते. त्यांनी देशाच्या समग्र विकासाचे मांडलेले संकल्पचित्र पाहिले की त्यांना फक्त दलितांपुरते मर्यादित करणे अन्यायाचे ठरते. १९१९ साली त्यांनीच सर्वप्रथम साउथबरो कमिशनसमोर सर्वच भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे अशी मागणी केली होती.१९३८ साली ते म्हणाले होते की आपली सर्वांची ओळख जात, धर्म, प्रदेश,भाषा यावरून न सांगता फक्त भारतीय म्हणून सांगितली पाहिजे. आज आपण जे कोणी भारतीय मतदार आहोत ते खर्या अर्थाने देशाचे मालक आहोत. अशा या अधिकाराची खरी आणि पुरती ओळख आपल्याला खरेच पटली आहे काय?
आपल्या देशात लिंगभाव, धर्म,जात आणि वर्गिय भेदामुळे भारतीय समाज एकजिव होत नाहीये. निवडणुकीच्या राजकारणामुळे त्याला आणखी चिरफळ्या पडतात.अशा स्थितीत राजकीय,आर्थिक आणि सामाजिक हितसंबंध एकमेकांवर मात करतात. आपण राष्ट्र म्हणून उभे राहायचे असेल तर आपल्याला बाबासाहेबांचेच विचार पायाभुत मानावे लागतील.बाबासाहेब म्हणत, भारतात प्रत्येक जात हे स्वतंत्र राष्ट्र आहे. जातीची विषमता पायर्यांची श्रेणीबद्ध विषमता आहे.ती घालवायची तर राष्ट्रीय निर्धाराची गरज आहे. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण हा निर्धार करू शकलो तर भारताला एकोपा असलेले राष्ट्र बनण्यापासुन आणि जगाची महासत्ता बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
No comments:
Post a Comment