Wednesday, April 30, 2014

इतिहासकारांचा "श्रीमंती" कल्पनाविलास

भाग २: [दि.३०एप्रिल, २०१४]
या पोस्टवर क्रमांक ६वर पुढील माहिती देण्यात आलेली आहे."6:- छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर "बैरीस्टर" झाल्यावर, त्यांची कोल्हापूर शहरात रथातून मिरवणूक काढून फुले उधळली होती."
वस्तुस्थिती मात्र वेगळीच दिसते. बाबासाहेबांना [बार अ‘ट ला‘] बे‘रिस्टर ही पदवी लंडनच्या "ग्रेज इन" ने २८ जून १९२२ रोजी दिली.बाबासाहेब त्यानंतर ही पदवी घेऊन  लंडनहून भारतात  परत आले तेच ३ एप्रिल १९२३ ला. [पाहा: डो‘. बाबासाहेब आंबेडकर चरित्र, धनंजय कीर, पो‘प्युलर प्रकाशन, मुंबई, २००७, पृ.५९२] आणि ही पदवी मिळण्यापुर्वीच ६ मे १९२२ ला राजर्षि शाहू महाराज यांचे निधन झालेले होते. तेव्हा महाराजांनी अशी रथातून मिरवणूक काढली, बाबासाहेबांवर फुले उधळली हा साराच "बिग्रेडी"


इतिहासकारांचा "श्रीमंती" कल्पनाविलास म्हणावा लागतो.
या पोस्टवर असेही म्हटले आहे की, "1:-महाडच्या चवदार तळ्याच्या सत्यागृहावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जावून शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यानी "जय शिवरायच्या" घोषणा दिल्या.बाबासाहेबांनी महाड चवदार तळ्याच्या सत्यागृहाची सुरुवात शिवरायांचे दर्शन घेवून केली."
ही माहिती अर्धसत्य आणि दिशाभूल करणारी आहे. वस्तुस्थिती अशीय की, बाबासाहेंबांनी १९-२० मार्च १९२७ रोजी महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. बाबासाहेबांनी या सत्याग्रहाची सुरूवात शिवरायांचे दर्शन घेऊन केले ही माहिती निखालस खोटी आहे.{पाहा:डो‘. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक, दुसरी आवृत्ती, २००८, संपा.प्रा. हरी नरके, पृ.१ ते ४६} बाबासाहेबांनी महाडला मनुस्मृती दहनासाठीची परिषद २५ डिसेंबर १९२७ रोजी घेतली होती. तिच्या समाप्तीनंतर बाबासाहेब व काही कार्यकर्ते  रायगड  पाहण्याच्या इराद्याने मागे राहिले. "परिषदेचे अधिवेशन संपल्यावर स्थानिक व मुंबईहून आलेली मंडळी परत गेली.परंतु डो‘. आंबेडकर, शिवतरकर व मुंबईहून आलेली १०-१२ मंडळी रायगड पाहण्याच्या इराद्याने मागे राहिली." {पाहा: उपरोक्त, पृ.१७२}
  पोस्टवर पुढे असेही म्हटले आहे की, "5:- बाबासाहेब आंबेडकर लहान असतांना "कृष्णराव अर्जुन केळुस्कर" गुरुजींनी त्यांना "बुद्ध चरित्र" भेट दिले होते. या चरित्रामुळे बाबासाहेबांना धर्मांतराची प्रेरणा मिळाली. केळुस्कर गुरुजी जन्माने "मराठा" होते." खरी गोष्ट अशीय की बाबासाहेब मे‘ट्रीकची परिक्षा पास झाल्याबद्दल त्यांचा सी.के. बोले यांच्या अध्यक्षतेखाली जानेवारी १९०७ मध्ये सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांना हे पुस्तक भेट देण्यात आले असले तरी त्या घटनेमुळे त्यांना धर्मांतराची प्रेरणा मिळाली असे म्हणणे  म्हणजे त्यांनी १९०७ सालीच धर्मांतराचा निर्णय घेतला होता असे म्हणण्यासारखे होईल.  १९३५ साली त्यांनी येवला येथे  धर्मांतराची घोषणा केली. ही २८ वर्षांनंतरची घटना १९०७लाच झाल्याचे सांगणे हे जरा अतिच होत नाही का?
या पोस्टवरील इतरही घटनांना आधार दिलेला नाही. त्यांमुळे त्या तपासणार कशा?
त्यामुळे यातील क्रमांक २ आणि इतरही माहिती तपासूनच घ्यावी लागणार...
........................................
Prasanna Joshi: Hari Narke अशाच प्रकारे आणखी एक संदर्भ वारंवार काही मंडळी पोस्ट करतायत. त्यात लिहिलेलं आहे की, बाबासाहेब असं म्हणाले होते की, घटना लिहिण्यासाठी मला फार कष्ट घ्यावे लागले नाहीत. कारण, माझ्यासमोर शिवरायांचं स्वराज्य होतं. मुद्दा हा की, याबद्दल काही शंका जरी उपस्थित केली तर जातीयवादाचा आरोप होतो (मराठा-दलितांमध्ये तुम्ही भांडण लावता वगैरे....). वरील संदर्भ खरा असेल तर मात्र काहीच मतभेद नाहीत. नरके सर, कृपया प्रकाश टाकावा...
प्रसन्ना: मी बाबासाहेंच्या साहित्याचे जे काही १ ते २२ खंड वाचले आहेत, तसेच खैरमोडे, कांबळे, गायकवाड, थोरात, ओम्वेट, झेलीयट, रो‘ड्रीग्ज,  कीर, फडके, मून आणि इतर मान्यवर संशोधकांनी बाबासाहेबांची लिहिलेली चरित्रे किंवा अन्य संदर्भग्रंथ वाचलेले आहेत त्यात मला तरी बाबासाहेब असे म्हणाल्याचे कुठेही आढळून आलेले नाही. हा  "पुरुषोत्तमपराक्रम" असणार! 

No comments:

Post a Comment