Friday, April 25, 2014

खेळचे संपादकीय, अभिजात मराठी आणि मराठी साहित्यविश्व

खेळचे संपादकीय, अभिजात मराठी आणि मराठी साहित्यविश्व
खेळ या त्रैमासिकाच्या जा.फे.मार्च २०१४ च्या अंकातील संपादकीयात माझ्या अभिजात मराठीवरील लेखाच्या निमित्ताने काही उल्लेख करण्यात आलेले आहेत.त्याबद्दल मी संपादक श्री काळे यांचे आभार मानतो. खेळचे संपादक श्री. मंगेश नारायणराव काळे यांच्या या चार पानी संपादकीय मजकूरात ते नेमके काय म्हणतात, हे त्यांच्याच शब्दात वाचलेले बरे.त्यांनी "भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण - महाराष्ट्र", मुख्य संपादक-गणेश देवी, संपादक -अरुण जाखडे, या पद्मगंधा प्रकाशनाच्या,१७ आगस्ट २०१३ रोजी प्रकाशित झालेल्या ७८४ पानांच्या ग्रंथातील माझ्या लेखाचा संदर्भ दिलेला आहे. या रा‘यल आकारातील ग्रंथातील माझा "मराठी भाषेच्या अभिजात दर्जाविषयी" हा लेख दहा पानांचा आहे. हे दोन्ही लेख, {खेळचे संपादकीय आणि माझा लेख} मुळातून वाचून त्यावरील अभिप्राय आपण द्यावेत अशी विनंती आहे.त्यातून काही सकस चर्चा होऊन पुढे येणारे मुद्दे दिशादर्शक ठरू शकतील.
श्री.काळे यांनी ,"माय मराठी अभिजात झाल्याबरोबर तिचा डंका जगाच्या काना कोपर्‍यात वाजू लागेल असे स्वप्न पाहायला हरकत नसावी.तर हे स्वप्न थोडावेळ बाजूला ठेवून मागे वळून पाहिलं तर काय चित्र दिसतं? आजवर शासन,संस्थात्मक स्तरावर काय झालं?" असे म्हणून  मराठी साहित्यविश्वाचा आजचा आणि आजवरचा लेखाजोखा मांडलेला आहे. श्री.काळे यांचा भर मराठीच्या विद्यमान दूरावस्थेवर आहे आणि त्यातील बहुतांशी मुद्दे मला मान्यच आहेत.
माझा लेख मराठीला हा दर्जा मिळण्यासाठी ती केंद्र सरकारचे सर्व निकष कशी पूर्ण करते हे सांगणारा आहे. त्यात हा दर्जा मिळाल्यास पुढे कायकाय करता येईल याबाबतच्या माझ्या भविष्यातील कल्पना एका परिच्छेदात मांडलेल्या आहेत. लेखाच्या शेवटी  मराठीची स्वयंसिद्ध थोरवी सांगताना एका परिच्छेदात मी मला महत्वाचे वाटणारे तुकारामांपासून अवचटांपर्यंतचे ५७ मराठी लेखक दिलेले आहेत.त्यातील शिवाजी सावंत, रणजित देसाई, कुसुमाग्रज, खांडेकर, अनिल अवचट आणि रंगनाथ पठारे या सहा नावांना रा.रा. काळे यांचा आक्षेप आहे.खरंतर मला आवडणारे किंवा मोठे वाटलेले प्रत्येक नाव मा.काळेंना पटलेच पाहिजे असे नाही.व्यक्तीपरत्वे ही यादी बदलू शकते. काळेंनी मी दिलेली सगळीच्या सगळी म्हणजे ५७ नावे बाद केली असती तरीही माझी हरकत असणार नाही.
हा दर्जा मिळाल्यावर काय करायचे याबाबतही प्रत्येकाचे वेगळे विचार असू शकतात. आजच कोणी या लोकांच्या ग्रंथांचे भाषांतर हातात घेतले आहे आणि त्यामुळे काही राष्ट्रीय नुकसान होऊ लागले आहे,असे नाही. हे म्हणजे , "बाजारात तुरी आणि ......"
आज विहीरीतच नाही, आणि पोहर्‍यात कोणाकोणाच्या पडणार याची खात्री द्या अन्यथा विहीरीत पडताच कामा नये हे मला तरी कोतेपणाचे वाटते.
खांडेकर व कुसुमाग्रज यांना ज्ञानपिठ पारितोषिक मिळालेले आहे आणि शिवाजी सावंतांना ज्ञानपिठ समकक्ष मुर्तीदेवी सन्मान मिळालेला आहे.रणजित देसाई, अवचट आणि पठारे यांनीही राष्ट्रीय पातळीवरील साहित्यविषयक सन्मान मिळवलेले आहेत. हे सगळेच मराठीतील महत्वाचे लेखक आहेत असे मला वाटते.असे मत बाळगण्याची परवानगी कोणाकडूनही घेण्याची मला गरज वाटत नाही. त्यामुळेच "मराठीतही हे लेखक धड उभे राहात नाहीत" या रा.रा. काळे यांच्या मताशी मी सहमत नाही.
काळेसाहेबांच्या लेखाचा निष्कर्श त्यांच्याच शब्दात त्यांनी दिलेला आहे. "एकुण काय तर भाषासंवर्धनाची ,तिच्या विकासाची , साहित्याच्या भरभराटीची अभ्यासगटाची संकल्पना अशी लुटीपुटीच्या मनोराज्यावर उभी आहे, नि तिचा डोळा "अभिजात"ते कडे नसून येणार्‍या डबोल्यावर आहे." श्री.काळे यांचा हा हेत्वारोप अभ्यासगटावर अन्याय करणारा आहे. असा निष्कर्श काढण्यापुर्वी अभ्यासगटाचा सुमारे ५०० पानांचा अहवाल किमान चाळण्याचे तरी त्यांनी कष्ट घ्यावेत. माझ्या भविष्यातील मराठीबाबतच्या व्यक्तीगत कल्पना माझ्या स्वत:च्या आहेत, त्या माझ्या लेखात मी दिल्यात, त्या अभिजात मराठीच्या अहवालात नाहीत. असण्याचे कारणही नाही.
जाताजाता एक सांगायचे म्हणजे श्री.काळे यांनी भाषा सर्वेक्षणाच्या महत्वपूर्ण कामाबद्दल श्री.गणेश देवी यांचे अभिनंदन केले आहे.श्री.देवी, श्री. जाखडे आणि सहकार्‍यांचे हे काम खरेच फार मोलाचे आहे. त्यालाही जमशेदजी टाटा ट्रस्टचे अनुदान मिळाल्यानेच ते करता आले ही या ग्रंथाच्या स्वामित्व अधिकार पृष्ठावरील नोंद श्री.काळे यांनी पाहिलेली नसावी. ती ते वाचतील तर बरे होईल.
..............................-------------------..................................


.

No comments:

Post a Comment