Wednesday, April 23, 2014

साधूंचा वेश आणि विकासाची घोषणा






एक आटपाट नगर होतं. राजाचं राणीवर जिवापाड प्रेम होतं.एके दिवशी राणी आजारी पडली. राजानं दूरदूरून वैद्य बोलावले. सगळे औषधोपचार केले. राणीची तब्बेत काही सुधारेना. राजा काळजीत पडला. राणीला बरं करणाराला अर्धं राज्य देण्याची घोषणा राजानं केली.दूरदेशचा एक वैद्य पुढं आला. त्यानं राणीला बरं करण्याचा उपाय सुचवला. राणीला जर दररोज राजहंसाचं मांस खायला घातलं तर राणी बरी होईल असं सुचवलं. राजानं सेनापतीला बोलावलं. राज्यातल्या सगळ्या सरोवरांमधले राजहंस दररोज एक याप्रमाणे मारून आणण्यसाठी सैनिक पाठवले गेले. राणीला रोज राजहंसाचं मांस मिळू लागलं. मात्र चारच दिवसात सैनिक मोकळ्या हातानं परत आले. राजानं कारण विचारलं, सैनिक म्हणाले, "महाराज, राजहंस मोठे चतूर आहेत.सैनिक आले म्हणजे मरण आलं, हे ओळखून सारे राजहंस पळून जातात.शिकार काही मिळत नाही. नाईलाज आहे."
राजानं दवंडी पिटली. यावर उपाय काय याचा खूप खल झाला.दूर प्रांतीचा राजा मदतीला आला. तो म्हणाला, " सैनिक आलेले बघून राजहंस पळून जातात. यापुढे रणनिती बदला.सैनिकांना साधूंचे कपडे घाला. साधू सरोवराच्या विकासासाठी पुढाकार घ्यायला सरोवरावर येत असल्याची दवंडी द्या. राजहंसांना सहकार्यांचं कळकळीचं आवाहन करा. आमच्या राज्याचा दाखला द्या. आणि चमत्कार बघा."
साधूंचा वेश आणि विकासाची घोषंणा अचूक लागू पडली. राजहंस फसले. फशी पडले....राणीला राजहंसांचं मांस मिळू लागलं. राजा खूष झाला..........

No comments:

Post a Comment