Tuesday, February 14, 2017

ओळखीचा कारेक्रम..


अनुभव पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचा --
1990 साली कोपरगावच्या सोमय्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आग्रहाने भाषणाला बोलावलेलं, तेव्हा मी टेल्कोत नोकरी करायचो. फर्स्ट शिफ्ट करून दुपारी 4 वाजताची एस.टी. पकडली. ती रात्री 12 वाजता कोपरगावला पोचली.
प्राचार्य म्हणाले होते, "रात्री स्टॅंडवर तुम्हाला घ्यायला 4 मुलं पाठवतो. जेवायलाच घरी या. मी थांबतो जेवायचं."
कोपरगावच्या स्टॅंडवर शुकशुकाट होता. डिसेंबर महिन्यातली चावरी थंडी पडलेली.
प्राचार्यांचा बंगला कुठेय हे विचारायचं तरी कुणाला? फोन करावा तर कुठून करावा? दुकानं, हाटॆलं सगळं बंद झालेलं. रात्रीचं पेट्रोलिंग करणारे 2 पोलीस दिसले. ते म्हणाले," नदीच्या पलिकडे आहे प्राचार्यांचा बंगला, कालेजशेजारीच. नदीतून जपून जा. अंधारात पाणी दिसायचं नाय. वाहून गेले तर प्रेतही मिळायचं नाय. लांबून जायचं तर लई मोठा हेलपाटा पडंल आन कुत्री लई तरास देतील. सांभाळून जावा."
रस्त्याच्या कडेची एक फांदी मोडून घेतली हातात, काठी म्हणून.
कुत्री म्हणावीत का पिसाळलेले लांडगे?
अंगावर धावूधावू येऊ लागलेली.
एका चौकातल्या कुत्र्यांना बहुधा मी काळे गटाचा वाटलो असणार, तर पुढच्या चौकातल्या कुत्र्यांना कोल्हे गटाचा! केव्हा लचका तोडतील नेम नाय.
जीव मुठीत की काय असतो, तसा घेऊन नदीत उतरलो. पाण्याचा अंदाज येत नव्हता. पोहता येत होतं एव्हढाच आधार.
कुत्री काय मागे हटत नव्हती. इतक्यात पाण्यातल्या शेवाळावरून पाय घसरला. पाणी मरणाचं थंडगार होतं. चिंब भिजलो. कसाबसा सावरत बंगल्यावर पोचलो तर तिथली कुत्री अंगावर धावली.
प्राचार्य गेटवर आले. म्हणाले, "हे काय, आमच्या मुलांना कुठं सोडलत?"
"अहो सर, मुलं आलीच नाहीत स्टॅंडवर."
प्राचार्यांच्या घरचे गावी गेलेले. त्यांनी अन्न गरम केलं.मी कपडे बदलले. आमची जेवनं झाली.
इतक्यात कालेजची चार मुलं आली. म्हणाली, "सर,तुमचे ते पुण्याचे पाहुणे काय आलेच नायत. दोनतीन गाड्या बघितल्या. काळंकुत्रंपण नाय आलं. एका गाडीतनं एक पोरगा तेव्हढा उतरला. पाव्हणं मातर काय आलं नायत."
प्राचार्य वैतागले, म्हणाले, तुम्ही मुळात होता कुठं? पाहुणे म्हणतात स्टॅंडवर तर कुणीच नव्हतं.
सर, मरणाची थंडी पडल्याली. तव्हा आम्ही स्टॅंडच्या समोरच्या कोपर्‍यातल्या गणप्याला उठवलं. च्या बनवायला लावला. पण आमचं स्टॅंडकडं चांगलं लक्ष होतं.
एक पोरगा सोडला तर गाडीतून कोणपण उतरल नाय.
मला बघताच पोरांचे चेहरे उतरले. ते म्हणाले, सर, तुम्ही म्हणला पुण्याचा पाव्हणा, आमाला काय माहित असा पोरगुलासा असणार. आम्ही म्हणलं लईकरून साठ सत्तरीचा तरी बाप्या असल. आम्ही 2 तास स्टॅंडवर होतो बघा."
दुसर्‍या दिवशी कार्यक्रमाच्या स्टेजवर प्राचार्य कानात म्हणाले, "सर, तुमची ओळख मला करून द्यायचीय, तुमचा जन्म कधीचा?"
मी म्हणालो, "63 चा."
ते म्हणले, "असं? पण वाटत नाय."
आता त्यात काय वाटायचय
प्राचार्य ओळख करून द्यायला उभे राहिले. म्हणाले "मित्रांनो,काही लोकांना चिरतारूण्याचं वरदान असतं. आता हेच बघा, आपले हे पाहुणे वाटतात पंचविशीचे. पण मी आत्ताच त्यांना विचारले तर ते म्हणाले, त्यांचं वय 63 वर्षे आहे."
मी म्हटलं, सर माझं वय 63 नाही, माझा जन्म 63 सालचा आहे.
त्यावर प्राचार्य म्हणाले, "ऎकलंत? पाहुणे कन्फर्म करतायत की ते 63 वर्षांचे आहेत."
तेव्हापासून मी लेखी परिचय जवळ बाळगू लागलो.
पहिलीपासून इंग्रजीच्या मोहिमेत मी झंजावाती दौरे केले होते. यवतमाळ जिल्ह्यात माझ्यासोबत एक उपशिक्षण अधिकारी असायचे. ते दिवसभर प्रत्येक सभेत माझा परिचय करून द्यायचे. दिवसभरात सकाळी 7 ते रात्री 10 माझ्या 12 सभा झाल्या.
पहिल्या सभेत उपशिक्षण अधिकारी म्हणाले, आजचे आपले पाहुणे नरी हरके यांची मी ओळख करून देतो. खरं म्हणजे त्यांची खरी ओळख त्यांच्या भाषणातूनच होणार आहे तरी मी त्यांना भाषणाची विनंती करतो.
दुसर्‍या सभेत ते म्हणाले, आजचे आपले पाहुणे हरी नडके,
तिसरीत ते म्हणाले, आजचे आपले पाहुणे हरी फरके,
नरी फडके, फरी हारके, हरी नरूटे, नरी नरके,....
पठ्ठयाचं माझ्याशी काय वैर होतं ते कळलं नाय पण दरवेळी तो माझं नवच नाव घ्यायचा...
शेवटच्या सभेत मी म्हटलं, सर ओळखीचं राहू द्या. मीच करून देतो, माझी ओळख, तर ते म्हणाले, असं कसं? मला शिक्षण अधिकार्‍यांनी बजावलय, आजचे आपले पाहुणे थेट शिक्षण मंत्र्याच्या श्यामकृष्ण मोरे यांच्या अगदी जवळचे आहेत, तुम्ही त्यांची बडदास्त नीट ठेवा. मी ओळख करून देणारच..
" शिक्षकांनो, आजचे आपले पाहुणे रामकृष्ण नटके ......"
मी हसावं का रडावं ते न सुचुन सुमडीत बसलो.
गेल्या वर्षी तेच अधिकारी नांदेडच्या सीईओ नी घेतलेल्या कार्यक्रमात भेटले. म्हणाले, "काय नरी हरकेसाहेब मला ओळखलं की नाय? आमच्या सायबांना सांगा तुमची माझी किती जवळची ओळख आहे ती. आणि भाषणात माझ्या नावाच्या स्पेशल उल्लेख करा. जेवताना साहेबांना सांगा मला प्रमोशन द्यायला."
असे एकेक प्रेमळ अधिकारी!
...........................