Wednesday, February 15, 2017

यदिसरांसोबत..


ख्यातनाम संशोधक डा.य.दि.फडके सर साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष असताना मंडळाच्या वतीने देण्यात येणार्‍या जीवन गौरव पुरस्कारासाठी जुन्या जमान्यातील एक लेखिका आणि राम नगरकर यांची निवड करण्यात आली. सर म्हणाले, आपण या मान्यवरांच्या घरी जाऊन त्यांची रितसर संमती विचारू. ती मिळाल्यावरच पुरस्काराची घोषणा करू.
लेखिकाबाई पुण्यातल्या मंडईजवळ राहायच्या. त्यांचं घर शोधण्यात खूप वेळ गेला. रस्ता इतका अरूंद की सरांची अ‍ॅंबॅसिडर अडकून पडली.
एका सायकल दुकानदाराने मदत केली. दुपारची वेळ. उन्हाळ्याचे दिवस. अचानक मोठा आवाज झाला. रस्त्यावरून जाणार्‍या एकाच्या सायकलचे टायर बर्स्ट झालेय असे वाटले.. दुकानातला नोकर खोखो हसायला लागला. त्या सायकलस्वाराचा चेहरा पडला. काही क्षणानंतर त्याच्या लक्षात आले की आपण वरमायचे काही कारण नाही. आपला टायर व्यवस्थित आहे. मात्र आता आधी जो हसत होता त्याचा चेहरा पडला. कारण तो ज्या सायकलमध्ये हातपंपाने हवा भरीत होता तोच टायर फुटला होता. सर, म्हणाले, बघितलस, दुसर्‍यावर हसणं किती सोपं असतं, अशी स्वत:ची फजिती झाल्यावर कोणी हसेल का यापुढे?
आम्ही लेखिकाबाईंच्या घरी गेलो. यदिसरांची आणि बाईंची जुनी ओळख होती. सरांनी त्यांना मंडळाने त्यांची निवड केल्याचे सांगितले. पुरस्काराची रक्कम,पुरस्कारात कायकाय देतो हे सगळं सांगितलं. बाई म्हणाल्या, पुरस्कार स्विकारायचा की नाही याचा मला विचार करावा लागेल. सर म्हणाले, काहीच हरकत नाही. तुम्ही विचार करा, आठवड्याभराने आमचा मंडळाचा माणूस येईल त्याच्याकडे निरोप/निर्णय सांगा.
आम्ही रामभाऊंकडे निघालो.
सर म्हणाले, बघितलस, बाईंना पुर्वसुचना देऊन भेटलो, तरी बाईंनी कसे आढेवेढे घेतले. या पुणेकरांचं एक विशेष वाटतं, उन्हातान्हात घरी आलेल्याला साधं पाणीसुद्धा विचारत नाहीत. मला तहान लागली होती,पण असं पाणी कसं मागणार ना?
राम नगरकर लोकमान्यनगरमध्ये राहायचे.राधाबाईंनी अतिशय आपुलकीने स्वागत केले. पाणी दिलं. "चहा घेणार, सरबत चालेल की कोल्ड्रींक मागवू?" असं सरांना विचारलं. एव्हाना संध्याकाळची चहाची वेळ झालेलीच होती. सर म्हणाले, "कशाला त्रास घेता? असू द्या." राधाबाई म्हणाल्या, "साहेब मी यातलं काय चालेल ते विचारलंय, काहीतरी तर घ्यावंच लागेल."
आम्ही चहा चालेल असं सांगितलं. राधाबाईंनी केलेला चहा फक्कड होता. मी यदि सरांची राधाबाईंना ओळख करून दिली. रामभाऊंची चौकशी केली तर ते शूटींगसाठी कोल्हापूरला गेल्याचं राधाबाईंनी सांगितलं.
मला म्हणाल्या, "काय काम काढलस बाबा आज?"
सरांनी पुरस्काराची माहिती दिली. संमती विचारली. राधाबाई मला म्हणाल्या," हे साहेब काय विचारत्यात बाबा?"
मी म्हणलं, "सर विचारतात संमती म्हणजे पुरस्कार घेणार की नाय ते रामभाऊंना विचारून कळवा."
राधाबाई म्हणाल्या, "या बया, आन हे काय, असं बक्षिसाला कुणी नाय म्हणत असतं व्हय?"
"काय विचारायचीबिचारायची गरज नाय. म्या सांगते ते व्हय म्हणत्याल. कायतरी सोंगं आपली."
सर मला म्हणाले, " हे असं असतं नितळ मन. आपण आधी ज्यांच्याकडे गेलो होतो, त्याही होच म्हणणार, पण मानभावीपणानं आधी विचार करून सांगते वगैरे म्हणणार."
आम्ही निघालो तेव्हढयात रामभाऊ कोल्हापूरहून आले. आम्हाला त्यांनी थांबवलं. आता जेवूनच जा म्हणाले. आमच्या गप्पा चालू होत्या, तोवर राधाबाईंनी पोहे केले.
सरांनी विषय काढायच्या आत राधाबाईच म्हणाल्या, "आयकलं काहो? तुम्हाला बक्षिस देणारेत हे साहेब.आणि विचारत्यात घेणार का नाय ते? आता बक्षिसाला कोन नाय म्हणतं काय? काय तरी खूळ आपलं."
रामभाऊ म्हणाले, "सर, माझी संमती राधाबाईंनी दिलेलीच आहे. एकच विनंतीय. माझा सत्कार कराल तव्हा राधाबाईला पण एक पुष्पगुच्छ द्या."
सर म्हणाले, "ते सांगायची गरजच नाय. आम्ही त्यांनाही साडीचोळी देणारच आहोत."
राधाबई हरखल्या. म्हणाल्या, "अहो, आमच्या या येड्याचं करताय नव्हं, माझं आणि वेगळं कशाला?"
....................................

No comments:

Post a Comment