Tuesday, February 14, 2017

उठ लगा, पुण्याचं पाव्हणं बोलत्याती.


5 मार्च 1989 ला माझं पहिलं पुस्तक पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते प्रकाशित झालं. म.टा.च्या रविवार पुरवणीत गोविंद तळवलकर यांनी पुस्तकाचं कौतुक करणारं अर्धापान परीक्षण लिहिलं. टाइम्समध्ये दिलीप पाडगावकर, लोकमतमध्ये बाबा दळवी यांनी पुस्तक उचलून धरलं. भाषणाची खूप निमंत्रणं यायला लागली.
माझ्याकडे तेव्हा फोन नव्हता. पत्राने/तारेने निमंत्रणं यायची. अकलूजच्या एका मंडळानं खूप आग्रह केला. लागोपाठ तीन पत्रं आली. त्यांनी कळवलं की माझ्या भाषणाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तत्कालीन मंत्री नामदार विजयसिंह मोहिते पाटील असतील. त्यांची तारिख मिळाली की संयोजक मला तार करतील.
मी एका कार्यक्रमाहून रात्री 11 वाजता घरी पोचलो तर घरी अकलूजकरांची तार आलेली, उद्या कार्यक्रम आहे. संयोजकांनी तारेत वेळ मात्र लिहिली नव्हती. मंत्र्यांचे काय ते कदाचित सकाळची पण वेळ देतील म्हणुन मी पहाटेच उठलो. स्वारगेटला गेलो. माळशिरस मार्गे अकलूज गाडी मिळाली. तो रूट दूरचा निघाला. जवळचा / दूरचा मार्ग अशी काही माहितीच नव्हती. दुपारी उशीरा अकलूजला पोचलो. एस.टी. स्टॅंडच्या जवळच डा. राजेंद्र व्होरा सरांचा भला मोठा वाडा दिसला. ते गावीच होते. त्यांनी प्रेमानं विचारपूस केली. चहापाणी दिलं. त्यांना संयोजक माहित होते. त्यांनी संयोजकांना फोन केला. तर कार्यक्रम संध्याकाळी असल्याचं समजलं. संयोजक म्हणाले, कार्यक्रमाची तयारी झाली की आम्ही घ्यायला येतो. तुम्ही तिकडॆच थांबा.
मी सरांशी गप्पा मारत बसलो. संध्याकाळचे सहा वाजले तरी आयोजकांचा पत्ता नव्हता. मी स्वत:च कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलो. बघतो तर काय, दोघेतिघेजण सतरंज्या टाकत होते. मी म्हटलं, मंत्री येणार आणि तयारी कशी नाही?
ते म्हणाले, अचानक मंत्र्यांना अर्जंट मुंबईला जावं लागलय. ते येऊ शकत नाहीत. पण तुमचा कार्यक्रम होणारेय. तुम्ही बसा. लाऊडस्पीकर लावला गेला. अंधार पडला तरी लोक काही जमेनात. माझी आजची रजा झालेली होती. मला किमान दुसर्‍या दिवशी तरी नोकरीच्या ठिकाणी [टेल्कोत] हजर होणं आवश्यक होतं.
संयोजक मात्र अगदी निवांत होते. ते म्हणाले, ग्रामीण भागात असच असतं. लोकं शेतातून कामावरून आल्यानंतर गाईम्हशींचं दुध काढतात, चहापाणी करून मगच कार्यक्रमाला येतात. आठ साडेआठला आपण नक्की सुरू करू.
मी अजिजीनं त्यांना परतीच्या प्रवासाची व्यवस्था करायची विनंती केली. ते म्हणाले, काही काळजी करू नका. आम्ही दोन मोटारसायकली तयारच ठेवतो. तुमचं भाषण झालं की 2 घास खा. टेंभुर्णी इकडनं अगदी जवळच आहे. तुम्हाला तिकडून हायवेवरून पाचपाच मिनिटांनी पुण्याला जाणार्‍या गाड्या मिळतील.
मी निर्धास्त झालो. एकदाचे लोक जमले. दहा वाजता कार्यक्रम सुरू झाला.
पंचक्रोशीतील पुढारी, स्थानिक वक्ते असे बोलताबोलता अकरा वाजले. मी सारखा चुळबूळ करीत होतो.
अध्यक्ष मला म्हणाले, आज गावात आमचे जावई आलेत. त्यांना बोलायला दिले नाही तर ते रुसतील. शेवटी मुलीचा प्रश्न आहे.
जावई शिवाजी विद्यापिठात प्राध्यापक होते. ते दीड तास झाला तरी भाषण काही थांबवितच नव्हते.  चिठ्ठ्या देऊदेऊ अध्यक्ष कंटाळले. जावई फुल फार्मात होते. शेवटी एक वाजता माझा धीरच सुटला. मी उठलो आणि जावयांमागे जाऊन उभा राहिलो. ते चिडले. म्हणले, पुणेकर वक्ते लईच आघाव असतात, त्यांना दम म्हणून निघत नाही. वगैरे.... मला निमुटपणं सारं ऎकून घ्यावं लागलं.
शेवटी एकदाचा माझा नंबर लागला आणि माईक हातात आला तेव्हा रात्रीचा सव्वाएक वाजला होता. सकाळपासून मी फक्त चहावर होतो. जाम अ‍ॅसिड उसळलेलं होतं. एव्हाना मैदानातली निम्मी गर्दी कमीच झालेली होती. तोवर बरेच श्रोते डुलक्याही मारू लागले होते. संयोजकांनी काय करावं?
त्यांनी बादलीभर पाणी आणलं, आणि झोपलेल्यांच्या तोंडावर ते पाणी मारू लागले. "ए, सट्व्या, उठ लगा. पुण्याचं पाव्हणं बोलत्याती. उठ! आपल्या गावची अशानं काय इज्जत राहील." दहावीस जण उठून बसले.
सगळेमिळून साठ सत्तर लोक असतील.
मी अवघ्या अर्ध्या तासात उभ्या महाराष्ट्राचं प्रबोधन वगैरे करून खाली बसलो.
अध्यक्षीय भाषण, आभार प्रदर्शन यानंतर सभा संपली.
मोटरसायकलवाले कुठेयत म्हणून मी चौकशी केली.
संयोजक म्हणले, त्याचं कायय की एक मोठा प्राब्लेम झालाय. एकजण पिऊन टाईट आहे. दुसरा एकटा यायला घाबरतोय. इकडे रस्त्याच्या कडेला सगळीकडे उस अस्तोय. दरोडेखोरांनी लई हैदोश मांडलाय. नुसतं लुटून सोडत नाहीत. जिवं मारूनच टाकतात. तुमच्या गॅरंटीवर जात असाल तर ठिकय. आम्ही काय तुमचा जीव धोक्यात घालावा असं म्हणणार नाय. उद्या सकाळी मात्र आम्ही तुम्हाला नक्की सोडतो. शब्द म्हणजे शब्द.
सरपंच म्हणाले, तसं कशाला, मी पहाटेच माझ्या जीपनं पुण्याला निघतोय. सरांना पाक पुण्यातच नेऊन सोडतो.
तोडगा छानच होता.
आम्ही सरपंचांच्या फार्म हाऊसवर पोचलो. सरपंच म्हणाले, पडा वाईच. एक डुलका काढा. पहाटे पाचला निघूच आपण. मला अंगणात उघड्यावर मस्त चांदण्यात कधी डोळा लागला कळलंच नाही.
विशेष म्हणजे बरोबर पाचला जाग आली. मी सरपंचांना उठवलं. ते म्हणले, निघूच. एव्हढी काय घाई करताय. मला ड्युटीवर पोचायचं होतं. मी टक्क जागा. शेवटी सरपंच ऊठले. त्यांनी घरातल्या मंडळींना उठवलं. पाणी तापवून सगळ्यांच्या आंघोळी सुरू झाल्या.
माझी चुळबूळ बघून सरपंच म्हणाले, त्याचं कायय की, मुलगी बघायला पुण्याला जायचा कारेक्रम हाये. बाया मान्सांचं उरकलं की निघूच.
मी चडफडत होतो. शेवटी बायकापोरांचं उरकून सकाळी सात वाजता जीप एकदाची पुण्याला निघाली.
इंदापूरच्या जवळ आली आणि डिझेल संपले. जवळ एक पंप होता. डिझेल भरून गाडी पुढं निघाली.
हायवेला येताच मागचा टायर पंक्चर झाला.
जवळपास पंक्चर काढायची सोय नव्हती. ड्रायव्हर चाक काढून घेऊन इंदापूरला गेला. बर्‍याच वेळाने पंक्चर काढून घेऊन आला. एव्हाना अकरा वाजले होते. आता मला हाफ डे सुद्धा मिळणार नव्हता.
भिगवणला रस्त्यात दुपारच्या जेवणात तासभर गेला. संध्याकाळी पाच वाजता आम्ही स्वारगेटला पोचलो.
सरपंच म्हणाले, सर, असातसाही तुमचा दिवस गेलाच आहे, आल्यासरशी चला आमच्या बरोबर मुलगी बघायला.
मी त्यांचा इतका धसका घेतला होता, की धूम पळालो आणि दिसली ती बस पकडली. पिंपरीला पोचायला.
अशारितीने उभ्या आडव्या महाराष्ट्राचं आणि माझं स्वत:चंही प्रबोधन करण्याचं काम सुरू झालं!

........................

No comments:

Post a Comment