Sunday, September 9, 2012

५० हजार प्रेक्षकांनी बघितलेले : सत्यशोधक



मराठी माणुस हा नाटकवेडा आहे.वैचारिक- सामाजिक आशयाची राजकीय नाटके मराठीत फार कमी आहेत.मराठी अभिरुची संपन्न करणारे ज्येष्ट नाटककार श्री.गो.पु.देशपांडे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर "सत्यशोधक" हे नाटक लिहीले आहे. प्रतिभावंत दिग्दर्शक श्री.अतुल पेठे यांनी या नाटकाचा प्रयोग पुणे मनपा सफाई कामगारांच्या समर्थ अभिनयातुन  उभा केला आहे.या नाटकाचे देशभरात अवघ्या साडेसहा महिन्यात ६५ प्रयोग झाले आहेत. आजवर ५० हजार प्रेक्षकांनी हे नाटक बघितले आहे.सामाजिक-राजकीय नाटकाला मिळालेला हा प्रतिसाद हा एक उत्साहवर्धक विक्रमच होय.
 ..................................................................................................................................................................

महात्मा जोतीराव फुले यांच्यासारख्या महापुरुषाचे संघर्षमय जीवनकार्य हा कोणत्याही नाटककारासाठी एक आव्हानात्मक विषय असतो.नाटककाराची प्रतिभा,पिंड आणि विचारधारा यांच्यानुसार तो त्या महापुरुषाचा आपल्यापरीने शोध घ्यायचा प्रयत्न करतो. १९५० साली महात्मा फुले यांच्यावर शंकरराव मोरे यांनी पहिले नाटक लिहिले.त्यानंतर अरुण मिरजकर यांच्यापर्यंत दहाबारा नाटके आली. १९९०साली जोतीरावांची स्मृतीशताब्दी होती.शाम बेनेगल यांनी पं.नेहरुंच्या पुस्तकावर आधारित "भारत एक खोज" नावाची मालिका दुरदर्शनवर सादर केली होती.त्यात त्यांनी एक एपिसोड जोतीरावांच्या जिवनावर केला होता.तो त्यांनी ख्यातनाम नाटककार श्री.गो.पु.देशपांडे यांच्याकडुन लिहुन घेतला होता. पुढे गोपुंनी जोतीरावांवर 'सत्यशोधक' हे नाटक लिहिले.ते दिल्लीतील जननाट्य मंच या सफदर हाश्मींच्या ग्रुपने १९९२ मध्ये सादर केले.त्याचे हिंदी भाषांतर चंद्रकांत पाटील यांनी केले होते. १९९३ मध्ये कोल्हापुरच्या प्रत्यय या संस्थेने हे मराठी नाटक महाराष्ट्रात सादर केले.ते मी तेव्हा पाहिलेले होते. त्याचे फारसे प्रयोग होवु शकले नाहीत.
२०११ साली प्रतिभावंत  दिग्दर्शक श्री.अतुल पेठे यांनी हे नाटक पुन्हा बसवले.या नाटकाद्वारे  मुख्य प्रवाहामध्ये फुल्यांना पोचविण्यासाठी  पेठे यांनी आपल्या आयुष्यातील एक वर्ष स्वत:च्या खिशाला खार लावुन विनामुल्य काम केले.पेठे यांनी या नाटकाच्या दिग्दर्शनातुन मराठी रंगभुमीची उंची वाढवणारे एक विलक्षण  नाट्यशिल्प निर्माण केले आहे. हे नाटक ज्यांनी ज्यांनी पाहिले ते झपाटुन गेले. ते सत्यशोधक कधीही विसरु शकत नाहीत. नाटकाची निर्मिती करणारी पुणे मनपा कामगार युनियन, सफाई कामगारांसाठी गेली अनेक वर्षे झटत आहे.का'.मुक्ता मनोहर या नाटकाच्या निर्मात्या आहेत.
 अतुल पेठे म्हणतात,"कचरा कोंडी"   या माहितीपटामुळे कचरा उचलणा-या कामगारांचे जगणे मी जवळुन बघितले होते.त्यातुन माझी आणि या कामगारांची घट्ट मैत्री जुळली.या श्रमिकांमध्ये कलेचे विलक्षण गुण आहेत.त्यांच्या गायन आणि वादनाने मला हे नाटक करायला उद्युक्त केले.जोतीराव आणि सावित्रीबाई यांच्या आचार-विचारांचे आजच्या काळात अर्थ लावण्याचा या नाटकात प्रयत्न आहे". नाटकाचा बाज हा सत्यशोधकी जलशाचा असुन गाणी,नृत्य,आणि नाट्याद्वारे जोतीरावांचा जीवनपट कलात्मकरित्या उलगडण्याचा यातला प्रयत्न प्रेक्षकांना हलवुन सोडतो.
हे नाटक मी अनेकवेळा बघितलेले आहे.ते अत्यंत श्रेष्ट दर्जाचे नाटक आहे.अतुल पेठे यांनी रंगावृत्ती गोळीबंद करुन एका मोठ्या उंचीवर नेवुन ठेवलेली आहे. .हजारो लोकांना विचार करायला लावणारे,अस्वस्थ करणारे,अनेकांच्या डोळ्यांतुन अश्रु काढणारे हे नाटक म्हणजे फुले-आंबेडकरी चळवळीला ताकद देणारे आजचे  श्रेष्ट नाटक आहे. ज्या लोकांनी आयुष्यात कधीही नाटकात काम केलेले नव्हते अशा सफाईकामगारांना नाटकात घेवुन आठआठ महिने अहोरात्र राबुन पेठेंनी रंगमंचावर समर्थपणे व सफाईने हे नाटक उभे केले आहे. जोतीरावांचे वडील गोविंदराव फुले, शाहीर, कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे, जोतीरावांचे पुर्वज शेटीबा फुले,विष्णुशास्त्री चिपळुणकर, डा'.घोले, न्या.रानडे, आदिंच्या भुमिका करणा-या कलाकारांनी कमाल केलेली आहे.  खास उल्लेख करायला हवा तो शाहीर सदशिव भिसे, डा'.दिपक मांडे, पर्ण पेठे आणि ओंकार गोवर्धन यांचा. पर्णने  या नाटकात सावित्रीबाईंची भुमिका अत्यंत तळमळीने साकारली आहे.  जोतीरावांच्या भुमिकेतील ओंकार गोवर्धन यांचा अभिनय साक्षात जोतीरावांचे सगळे पदर चिमटीत पकडुन प्रेक्षकापु्ढे जिवंत करणारा  आहे.  हे सगळे भुमिका जगले आहेत. त्या व्यक्तींशी आपली कडकडुन भेट घडवुन  आणण्याचे काम हे रंगकर्मी करतात. त्यांना सगळ्या टीमची उत्तम साथ मिळालेली आहे.शेखर जाधव,भीमराव बनसोडे,ब्रह्मानंद देशमुख,संतोष पवार यांचे संगीत आणि प्रदीप वैद्य यांची प्रकाशयोजना दोन तास आपल्याला खिळवुन ठेवतात.
या नाटकाचे ८ जानेवारीपासुन गेल्या सात महिन्यात ६५ प्रयोग झालेले आहेत. आजवर सुमारे ५० हजार लोकांनी हे नाटक बघितले आहे.पहिल्या प्रयोगाला डा'.श्रीराम लागु,डा'.बाबा आढाव,यांच्यासारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.डा'.लागु हे नाटक बघुन अत्यंत प्रभावित झाले होते.त्यांचे सगळे आयुष्य नाटकात गेलेले. परखड बोलण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. ते म्हणाले "अतिशय उत्तम नाटक आज मला बघायला मिळाले.अप्रतिम प्रयोग.मी अगदी भारावुन गेलो आहे." आजवर हे नाटक  बघणारांमध्ये फुल्यांवरील अनेक अधिकारी विद्वान,जाणते रंगकर्मी, सामाजिक चळवळींचे नेते,कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक यांचा समावेश  आहे.ते सारेच या नाटकाने असेच भारावुन जातात.
या नाटकातुन पैसे कमावणे हा निर्मात्यांचा किंवा पेठेंचा  हेतु नाही. आजवर मोफत, अल्पदरात किंवा चेरिटी शो करुन त्यांनी फुले-आंबेडकरी चळवळीतील अनेक संस्थांना  लाखो रुपयांची मदत या नाटकातुन  मिळवुन दिलेली आहे.कामगार युनियनने कृतज्ञतेपोटी काही रक्कम पेठ्यांना प्रवासखर्चासाठी दिली.  तीही त्यांनी सफाई कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तिथल्यातिथे देणगी म्हणुन देवुन टाकली.  मी या नाटकाच्या निर्मितीप्रक्रियेत सुरुवातीपासुन आहे. पेठेंनी सावित्रीबाईंच्या रोलसाठी अन्य अभिनेत्रींची निवड केलेली होती. तिघीजणींना  त्यांच्या व्यक्तीगत अडचणींमुळे तालमी केल्यानंतरही  नाटक सोडावे लागले.शेवटी प्रयोगाचा दिवस जवळ येवुन ठेपल्यानंतर पर्णने  स्वता:हुन ही भुमिका मी करीन पण नाटक झालेच पाहिजे असे कर्तव्यबुद्धीने सांगितले आणि ताकदीने साक्षात सावित्रीबाई साकार केल्या.
  गोपुंच्या सत्यशोधकची संहिता पुस्तकरुपाने १९९६ मध्ये साकेत प्रकाशनाने  प्रकाशित केलेली आहे. अतुल पेठे यांनी उभे केलेले सत्यशोधक जनमनाची पकड घेवु लागल्यानंतर या पुस्तकाची दुसरी आवृती लोकवाड.मय गृहाने अलिकडेच प्रकाशित केली आहे.हे नाटक वाचण्यातही  मोठी प्रेरक शक्ती आहे.मात्र प्रयोग पाहण्यातली उर्जा अफाट आहे. आयुष्य समृद्ध करणारा तो अनुभव आहे. हा प्रयोग बघण्याची संधी कोणीही सोडता कामा नये.
  महात्मा फुल्यांच्या जडणघडणीत बुद्ध,अश्वघोष, येशु,प्रेषित महंमद पैगंबर, कबीर, तुकाराम, टामस पेन आणि मिशनरी अशा अनेकांचा वाटा होता.त्यांच्या प्रतिभेचे आणि द्रष्टेपणाचे सगळे पदर उलगडवुन दाखवणे हे अतिशय अवघड काम आहे. जोतीरावांचे पुर्वज शेटीबा हे कटगुण साता-याचे. गावच्या अत्याचारी कुलकर्ण्याचा त्यांच्याहातुन खुन होतो. ते गाव सोडतात. आधी खानवडी{सासवड}आणि नंतर पुण्याला येतात.  ब्राह्मण मित्राच्या लग्नातील अपमानाने जोतीरावांच्या  आयुष्याला वेगळे वळण लागले. भारतीय कामगार चळवळीला जन्म देणारे जोतीरावांचे सहकारी ना.मे.लोखंडे  यांनी मुंबईत उभ्या केलेल्या ताकदवान कामगार चळवळीपर्यंत जोतीराव-सावित्रीबाईंचा जीवनप्रवास कलात्मकरित्या हे नाटक उभे करते.
जोतीराव स्वत: मराठीतले पहिले आधुनिक नाटककार आहेत. त्यांनी  १८५४ साली "तृतीय रत्न" हे नाटक लिहिलेले आहे. हे नाटक पेठेंनी स्वखर्चाने ब्रेललिपीत प्रकाशित केलेले आहे.
सत्यशोधक, "हे नाटक म्हणजे जोतीरावांचे समग्र चरित्र नव्हे.एका मोठ्या माणसाचे अल्पसे दर्शन घडवण्याचा त्यामागे इरादा आहे..फुले पतीपत्नीच्या गौरीशंकराएव्हढ्या कामाचे टेकेडीवजा दर्शन घडवणारा हा एक सत्यशोधक जलशा आहे" असे स्पष्ट आणि स्वच्छ निवेदन नाटकाच्या सुरुवातीलाच  केलेले आहे.  "फुले-विश्व फार अर्थपुर्ण आणि व्यामिश्र आहे.त्याचा अल्पसा प्रदेश दाखवण्याचा हे नाटक प्रयत्न करते.हे मुलत: राजकीय नाटक आहे. कामगारांना जोडीला घेवुन ,त्यांच्यातले लोक घेवुन एका क्रांतिकारक  आणि भारतातील पहिल्या परिवर्तनवाद्याची कहाणी सांगावी हयापरते सुख ते काय?"अशी भावना गो.पु. देशपांडे  यांनी व्यक्त केलेली आहे.
 लेखक,दिग्दर्शक आणि निर्माता, हे जर मिशनरीवृतीचे असतील आणि सोबतची सगळी टीम त्यांनी या विचाराने भारुन टाकली असेल तरच "सत्यशोधक"सारखा  मराठी माणसाला श्रीमंत करणारा एक सार्वकालीक नाट्यानुभव जन्माला येतो.हजारो भाषणे आणि अनेक पुस्तके यांनी जे जोतीराव-सावित्रीबाई जनसामान्यांपर्यंत पोचणार नाहीत ते या नाटकाने आजवर ५० हजार लोकांपर्यंत पोचविले आहेत.त्यासाठी आपण गोपु,पेठे,मनोहर आणि टीमचे कृतज्ञ असले पाहिजे.

                                                     .............................

3 comments:

  1. Mahatma Phule once stood begging donations, in front of Vishram Baug Wada, Pune, for ensuring safety of Vishram Baug Wada, Pune, which was about to collapse due its weak foundations and dilapidated conditions........! He was true Mahatma !

    ReplyDelete
  2. From:facebook.........
    Jaydip Kulkarni, Sanjay Dandgavhane and 18 others like this.

    Chandrakant Puri: लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि मनपा सफाई कामगारांचे हार्दीक अभिनंदन. मुंबईत प्रयोग असल्यास जरूर कळवा.
    7 hours ago · like · 1

    Meher Gadekar: It was a great experience watching the play at Solapur in the august company of Annaji, Mrs Renake & Adv. Pallavi Renake. It is a wonderful dramatic production, with all its parts, viz. story, acting, music, timing, etc being excellent. Congrats to Shri G P Deshpande & Shri A Pethe for their bold & brave effort.
    4 hours ago · Like

    ReplyDelete