Saturday, December 31, 2016

2017 :- ओेबीसी बुद्धीजिवी ...

2017 :- ओेबीसी बुद्धीजिवी समाज प्रबोधनासाठी पुढाकार घेणार का?

ओबीसी हा देशातला निर्माणकर्ता समाज आहे. तो देशावरचा बोजा नाही. त्याच्या हातात कौशल्ये आहेत. डोक्यात पारंपरिक ज्ञानाचे भांडार आहे. ज्ञान आणि कौशल्ये या दोहोंनी संपन्न असा हा बलुतेदार, अलुतेदार, कष्टकरी, कारू नारू घटक आहे. ही ओळख लाज वाटावी अशी नाही. यात कमीपणाही नाही.आज राज्यात ओबीसी, विमाप्र आणि विजाभज [अ,ब,क,ड] हे सर्व मिळून आरक्षण 32% आणि त्यांची लोकसंख्या मात्र किमान 45 ते 50 % असावी.  मात्र तरिही लोक आपण ओबीसी आहोत हे जाहीर करायला घाबरतात, असे का?
महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण 1967 साली सुरू झाले.

1990 साली केंद्र सरकारने मंडल आयोगाची अंमलबजावणी केल्यावर चार वर्षांनी 23 एप्रिल 1994 रोजी आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारने एक जीआर काढून
राज्यात मंडल लागू केला. गेले वीस वर्षे भुजबळ-मुंढे लढले नसते तर जेव्हढे ओबीसींच्या पदरात पडले तेही ना मिळते.

महाराष्ट्र मंडल लागू करणारे पहिले राज्य असल्याची जाहिरात फसवी आहे. अर्धसत्य आहे. 23 एप्रिल 1994 रोजीच उत्तरप्रदेशात स्वतंत्र कायदा करून मंडल आयोग लागू करण्यात आला. कायदा करण्याला वेळ लागतो. जीआर तासाभरात निघतो.म्हणजे उ.प्र.मध्ये तो प्रथम लागू झाला, महाराष्ट्रात नाही.

तमीळनाडू हे देशातले प्रगत आणि अग्रेसर राज्यांपैकी एक महत्वाचे राज्य आहे. तिथे ओबीसी मंत्रालय 1950 मध्येच आले. कर्णाटक,आंध्र यांनीही 1960 च्या दशकात ही स्वतंत्र मंत्रालये
निर्माण केली.

महाराष्ट्रात गोपीनाथ मुंढे उपमुख्यमंत्री असताना 1995 ला हे खाते निर्माण झाले. ते 21 वर्षांनी आत्ता स्वतंत्र करण्यात आले.

मंडल लागू झाला तेव्हा राज्याच्या ओबीसी प्रवर्गात अवघ्या 201 जाती होत्या. 1994 ते 2014 या वीस वर्षात 154 जातींच्या नेत्यांनी आपापल्या जाती या आरक्षणात सामील केल्या. जाती सुमारे दुप्पट झाल्या तरी आरक्षणाची टक्केवारी मात्र तिळमात्र वाढली नाही.

कायद्याप्रमाणे राज्यात तीन प्रमुख घटक यात येतात आणि त्यांना तीन क्षेत्रात वेगवेगळे आरक्षण आहे.
1.ओबीसी 355 जाती. 2. विमुक्तजाती भटक्या जमाती [अ,ब,क,ड] 3.विशेष मागास प्रवर्ग.
राज्यातील विमुक्तजाती भटक्या जमाती यांना 1950 पासून  आरक्षण आहे.

राजकीय आरक्षणात म्हणजे संविधानाच्या कलम 243 नुसार असलेल्या पंचायत राज्यातील 27% आरक्षणात वरिल तिन्ही घटक एकत्र असतात. ग्रामपंचायत,पंचायत समिती, जिल्हापरिषद, नगरपरिषद, नगरपालिका आणि महानगर पालिका ह्या मिनी विधानसभा होत. यात ओबीसी आरक्षण आल्यानंतर गेल्या 20 वर्षात किमान 5 लाख लाभार्थी झालेत.

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीधारक दरवर्षी 5 ते 7 लाख असतात. व्यावसायिक अभ्यासक्रम आणि मेडीकल -इंजिनियरिंगला शिकणारे दरवर्षी सुमारे 2 ते 3 लाख असतात. हे गेल्या वीस वर्षातील किमान पन्नास लाख लाभार्थी आणि शासकीय,निमशासकीय नोकर्‍यांमध्ये ज्यांना आरक्षण मिळाले असे किमानपाच लाख लोक असे किमान 60 लाख आजवरचे लाभार्थी असताना ते सारे आत्ता कुठे गायब झालेत?
ओबीसी हे 1. अल्पभुधारक असणारे किंवा शेतमजुरी करणारे, शेतीवर उपजिविका करणारे, 2. नाभिक, सुतार, कुंभार, सोनार आदी बलुतेदारांची कामे करणारे, 3. पशूपालक अशा तीन गटात मोडतात. यांना राज्यात शिक्षण व नोकर्‍यात 19% आरक्षण आहे.

विमुक्त जाती भटक्या जमाती हा वर्ग अतिमागास वर्ग होय. यात अ व ब गट हे करमणुक करणारे, हरहुन्नरी, भिक मागून जगणारे किंवा गुन्हेगारीची पार्श्वभुमी असलेले आहेत.
क आणि ड हे ओबीसीतून 1990 च्या दशकात भटक्यात समाविष्ट केले गेलेत. या सर्वांना मिळून 11% आरक्षण आहे. विशेष मागास प्रवर्गाला 2% आरक्षण आहे. आज राज्यात ओबीसी, विमाप्र आणि विजाभज [अ,ब,क,ड] हे सर्व मिळून आरक्षण 32% आणि त्यांची लोकसंख्या मात्र किमान 45 ते 50 % असावी.
असे हे एकुण 32% आरक्षण असले तरी मेडीकल, इंजिनियरिंगला मात्र 30% च आरक्षण दिले जाते.
या सार्‍यांना जोडणारा एकच एक धागा नाही.

ओबीसी अस्मिताही निर्माण झालेली नाही. आजही गड्या आपुली जात बरी हीच भावना आहे.

व्होटबॅंक मात्र निर्माण होतेय.

ती आजवर राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा,भारिपा, राष्ट्रीय समाज पक्ष आणि राष्ट्रीय कांग्रेस यात विभागलेली होती.

या प्रवर्गात सर्वाधिक संघटित जात म्हणजे वैश्यवाणी ही होय. दुसरीकडे लोकसंख्येचा विचार केला तर 1.कुणबी, 2.धनगर, 3.माळी, 4.आग्री, 5.वंजारी, 6.भंडारी, 7.तेली, 8.साळी, 9. कुंभार, 10.वैश्यवाणी आदी जाती प्रमुख असाव्यात.

आज ओबीसी आरक्षण धोक्यात असताना यातले मोजके अपवाद सोडले तर नगरसेवक, आमदार आदी राजकीय नेते, पत्रकार, लेखक, शिक्षक, प्राध्यापक, डाक्टर, वकील, वक्ते, कलावंत, विचारवंत आदी बुद्धीजिवी, शासकीय अधिकारी सारेच कुठे गायब झालेत? सगळे लाभार्थी चंद्रावर गेलेत की अंर्टांटिकावर?
भित्रे असल्याने गप्प बसलेत की आश्रित असल्याने मालकांना घाबरलेत? गारठलेत?गोठलेत? ते विचारी आहेत की खंदकात बसलेत?

आप्पलपोटे असल्याने त्यांनी मौन धारण केलेय की जातीच्या अपराध भावनेने ते ग्रस्त आहेत? नेमके काय झालेय त्यांचे? नेमके काय झालेय त्यांना?

आपण त्यांना पाहिलेय काय?

जाहीरपणाने समजा व्यक्त होता येत नसेल तर भुमिगत राहून तरी ते काही करताहेत का?
उद्याच्या पिढ्यांना ते काय जाब देतील?
........................

आणि विखेंनी कुलगुरूंचे शिर्डीचे खासदारकीचे तिकीट अलगद कापले

कुलगुरूसाहेब तुम्हाला शेतीतले ** ही कळत नाही --
दिवंगत बाळासाहेब विखे हे अत्यंत कर्तबगार, मृदू, अभ्यासू आणि लोकसंग्राहक व्यक्तीमत्व होते.
ग्रामीण भागात य माणसाने अतिशय मोठे विश्व निर्माण केले होते.
विखे वादविवाद स्पर्धा, व्याख्यानमाला, साहित्य पुरस्कार या निमित्ताने त्यांच्याशी अनेकदा जवळून संबंध आला.
1. एकदा त्यांच्यासोबत प्रवास करीत असताना त्यांनी कार एका गावातील आठवडी बाजारात थांबवली.
गाडीतून उतरून घासाघीस करून भरपूर ताजा भाजीपाला खरेदी केला.
एक केंद्रीय राज्यमंत्री असा बाजारहाट करताना बघणे हा मस्त अनुभव होता.
मी त्यांना विचारले, नेहमी तुम्हीच बाजारहाट करता?
ते हसले आणि म्हणाले, " मी सलग 8 दिवस घराबाहेर होतो, सर. आता घरी गेलो की आमची कारभारीण चिडणार. पण नवर्‍याने आठवणीने असा ताजा भाजीपाला आणलेला बघून ती खूष होणार. तिचा राग कुठच्याकुठे पळून जाणार."
आणि झालेही तसेच. आम्ही त्यांच्या घरी पोचलो. त्यांच्या पत्नी रागावलेल्या आहेत, हे त्यांच्या देहबोलीवरून कळत होतं. मात्र जसा का त्यांनी पोतंभर भाजीपाला नवर्‍यानं आणलेला बघितला, त्या अपार खूष झाल्या. कुठंही गेले तरी नवर्‍याला घराची आठवण असते या भावनेने त्या खूश झाल्याचे उघड दिसत होते.
2. पुणे विद्यापिठाला मध्यंतरी एक बोलभांड आणि बेरकी कुलगुरू लाभले होते. ते त्यावेळच्या पंतप्रधानांच्या आपण किती जवळचे आहोत असा देखावा बेमालूमपणे करायचे. [ आता ते विद्यमान पं.प्र.च्या जवळचे असल्याचे सांगत असतात.]
त्यांना पुण्याचे खासदार व्हायचे होते. त्यांनी पुण्यात एका वर्षात साडेतीनशे सार्वजनिक कार्यक्रम घेतले. ते विद्यापिठात नसायचेच.
विद्यापिठाच्या कामासाठी त्यांना भेटायचे असेल तर एखाद्या मुतारीच्या किंवा कसल्या तरी उद्घाटनाला जावे लागायचे. तिथे ते हमकास भेटायचे.
तथापि पुण्यात कलमाडींमुळे डाळ न शिजल्याने त्यांनी विखेंच्या मतदारसंघात, शिर्डीला, खासदार व्हायचे ठरवले. विद्यापिठाच्या एका प्राध्यापकांच्यामार्फत कुलगुरू महोदयांनी विखेंना जेवायला बोलावले.
विखेंसमोर शेतकरी आत्महत्त्या या विषयावर प्रवचन द्यायला कुलगुरूंनी सुरूवात केली. खरे तर विखेंचा या विषयातला दांडगा अभ्यास होता. तास दीडतास कुलगुरूंची पोपटपंची ऎकून विखेंचा संयम सुटला.
त्यांनी संयतपणे कुलगुरूंच्या विधानातील अनेक भंपक गोष्टींमधील तर्कदुष्टता दाखवायचा प्रयत्न केला. परंतु "आपण जागतिक किर्तीचे अर्थशास्त्रज्ञ आहोत. विखे तुम्हाला शेतीतले काहीही कळत नाही" वगैरे बडबड कुलगुरूंनी सुरू करताच विखे उठले, म्हणाले," सर, आम्ही अडाणी असलो तरी शेती आमच्या रक्तात आहे. कुलगुरू, तुम्हाला शेतीतले ** ही कळत नाही. तुमचे जेवण नको,पण ही भंकस आवरा." आणि विखे ताडताड निघून गेले.
आणि पुढे विखेंनी कुलगुरूंचे शिर्डीचे खासदारकीचे तिकीट अलगद कापले.
......................

Tuesday, December 27, 2016

श्री.राधाकृष्ण विखे यांचे राजकीय अज्ञान

हा तर भारतीय संविधान, डा.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पं.नेहरू यांचा अवमान.. श्री.राधाकृष्ण विखे यांचे राजकीय अज्ञान ....................... राज्य सरकारने स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विधान सभेतले विरोधी पक्षनेते श्री.राधाकृष्ण विखेपाटील यांनी यामुळे जातीयवाद वाढेल अशी प्रतिक्रिया दिली. यातून त्यांचे घोर राजकीय अज्ञानच प्रकट झाले. 1930 साली मुंबई प्रांत सरकारने ओएचबी स्टार्ट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीत आमदार डा.बाबासाहेब आंबेडकर सदस्य होते. त्या समितीत म.गांधींचे सहकारी ठक्करबापाही होते.समितीने 3 वर्गांना घटनात्मक संरक्षण देण्याची शिफारस केली. 1.अनु.जाती. 2.अनु.जमाती, 3. इतर मागास वर्ग. यातूनच 1932 साली सरकारने समाज कल्याण खाते सुरू केले. पुढे घटना परिषदेत पं जवाहरलाल नेहरू यांनी संविधानाचा मुलभूत पाया ज्या ठरावावर आधारित होता, तो ठराव 13 डिसें. 1946 रोजी मांडला आणि त्यात 3 वर्गांना घटनात्मक संरक्षण देण्याचे वचन दिले.1.अनु.जाती. 2.अनु.जमाती, 3. इतर मागास वर्ग. त्यानुसार घटनेत कलम 15,16, 243, 330 ते 342 द्वारे या वर्गांना संरक्षण देण्यात आले. तमीळनाडू सरकारने 1950मध्ये तर कर्नाटक,आंध्र यांनी 1960 च्या दशकात स्वतंत्र ओबीसी मंत्रालये स्थापन केली. आक्टो. 1967 ला महाराष्ट्रात वसंतराव नाईक सरकारने ओबीसी आरक्षण सुरू केले. 1990 ला मंडल आयोगाची अंमलबजावणी झाल्यानंतर असे तिसरे मंत्रालय निर्माण करणे ही सरकारची जबाबदारीच होती. तेव्हापासून गेली 50 वर्षे प्रलंबित असलेली मागणी फडणवीस सरकारने मान्य केली.ओबीसी ही एक जात नसून तो देशात 2365 जातींचा आणि राज्यात [365+51+11= 427जाती व जमाती यांचा ] सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला वर्ग आहे. स्वत: एका जातीच्या कुंपणात अडकलेल्या जातीयवादी मानसिकतेला हे कळणे अवघडच आहे म्हणा. खरं तर 1995 मध्येच दि.गोपीनाथराव मुंढे यांनी हे स्वतंत्र मंत्रालय निर्माण केले. ते समाजकल्याणला जोडले. त्याला छगन भुजबळ यांनी 15 वर्षे सतत बळ दिले. आता या खात्याला स्वतंत्र मंत्री देण्याची घोषणा झाली. त्याचे स्वागत करण्याऎवजी विधान सभेतले विरोधी पक्षनेते जेव्हा असली मुक्ताफळे उधळतात तेव्हा ते भारतीय संविधान, डा.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पं.नेहरू, ठक्कर बाप्पा,यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक आदींचा अवमान करीत आहेत, याचे तरी भान त्यांना आहे काय? ...........................

स्वतंत्र ओबीसी मंत्रालय - तोंडाला पुसलेली पाने की विकासाचा राजमार्ग?


हे वर्ष ओबीसींसाठी ऎतिहासिक महत्वाचे वर्ष आहे. मंडल अहवाल सादर करणारे मंडलपर्वाचे जनक बिंदेश्वरीप्रसाद मंडल यांची जन्मशताब्दी सुरू आहे. मंडल अंमलबजावणी सुरू होऊन 25 वर्षे  झालीत. अशा काळात देशात प्रथमच ओबीसी व्होटबॅंक आकार घेऊ लागलेली असताना राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.

1. कोणतेही राज्यकर्ते हे निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन मतदारांना गाजर दाखवण्याचे कार्यक्रम धुमधडाक्यात करीत असतात. ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय असावे ही ओबीसी चळवळीची मागणी होती. सरकारने आज घेतलेल्या निर्णयाचे मी दिलखुलासपणे स्वागत करतो.

2. मार्च 2017 ला राज्यसरकारचा अर्थसंकल्प घोषित होईल. त्यात जर या मंत्रालयाला शासनाने अनुसुचित जाती/जमातीच्या धर्तीवर लोकसंख्येच्या प्रमाणात भरीव निधी दिला तरच या घोषणेचा काही उपयोग होईल अन्यथा सध्या चालू असलेल्या नगर परिषद निवडणुका, लवकरच येणार्‍या पुणे,पिंपरी चिंचवड आणि मुंबई मनपा निवडणुका आणि त्यानंतर येणार्‍या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ओबीसींची मते मिळवण्यासाठी केलेली ती केवळ एक हातचलाखी असेल.

2. गेली 2 वर्षे या सरकारने ओबीसी मुलामुलींच्या उच्च शिक्षणातील शिष्यवत्त्या दिलेल्या नाहीत. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या आजवर मिळणार्‍या शिष्यवृत्त्या रोखलेल्या आहेत. लाखो विद्यार्थ्यांचे त्यामुळे नुकसान होत आहे.

3. नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पी.एस.आय.च्या 750 जागांची जाहीरात काढली. राज्यात ओबीसींना 19% आरक्षण आहे. भटक्यांना क व ड प्रवर्गाला 5.5% आरक्षण आहे. हे 24.5% आरक्षण या सरकारने शून्य टक्के केलेले आहे. हा घोर अन्याय आहे.

4. गेले दोन वर्षे सरकारने ओबीसी आयोगावरील नियुक्त्या केलेल्या नसल्याने आयोगाला कुलूप लागलेले आहे.

5. आयोगाने ज्या दुबळ्या जातींना भटक्यात व ओबीसीत समाविष्ट करण्याच्या शिफारशी 2 वर्षांपुर्वी केलेल्या आहेत त्याबाबतची साधी एक बैठक घ्यायला या सरकारला गेल्या 2 वर्षात वेळ मिळालेला नाही.
प्रश्न अनेक आहेत.

सवाल इच्छाशक्तीचा आहे.निकाल येत्या 3 ते 4 महिन्यात कळेल...

राज्यात सध्या मुक मोर्चे आणि प्रति मोर्चे यांनी वातावरण ढवळून निघालेले आहे.

ओबीसी,भटके विमुक्त यांना असुरक्षित वाटते आहे.

या पार्श्वभुमीवर हा निर्णय झालेला आहे.

अर्थसंकल्प हे सरकारच्या धोरण आणि इच्छाशक्तीचा आरसा असतो. तो सर्वात मौलिक धोरणात्मक दस्तावेज असतो.

एरवी असल्या घोषणा केवळ फसव्या असू शकतात.

येणारा 3 ते 4 महिन्यांचा काळच ठरवील की हे सरकार ओबीसींप्रति प्रामाणिक आहे की फसवणूक करणारे?
.....................

Wednesday, December 21, 2016

तर किमान 50 सुवर्णपदकं मिळवली असती भारतानं


यंदा गावाकडे मस्त थंडी पडलीय. विजय सुट्टीवर आल्याचं समजलं. बर्‍याच दिवसात भेट नव्हती. खूप गप्पा मारायच्या होत्या. 

कडकडून मिठी मारून विजय म्हणाला, "यार आपला देश खरोखरच बदललाय! लय भारी वाटतं यार."
"कसा काय?"

"हे बघ नोटाबंदीबद्दल काही नतद्रष्ट लोक गळे काढून रडत असतील,पण ते हे विसरतात की या निर्णयाचा देशाला जागतिक पातळीवर किती मोठा लाभ झालाय?"

"मी नाही समजलो."

"असं बघ, देशासाठी सीमेवर सैनिक... असं बोधवक्य उच्चारताच कशी जादूची कांडी फिरल्यासारखा परिणाम होतोय. ज्या इंग्रजांनी आपल्यावर 200 वर्षे राज्य केलं, त्यांच्याविरूद्ध आपण कसोटी क्रिकेटमध्ये 4*0 ने दणदणीत विजय मिळवलाय. करूण नायरनं त्रिशतक ठोकलं. हा नोटाबंदीचा विजय नाही?"

" काहीही काय बोलतोस? नोटाबंदीचा कसोटी विजयाशी अन त्रिशतकाशी काय संबंध? "

"आहेच मुळी. सीमेवरच्या सैन्याचं उदाहरण सतत दिल्यानं खेळाडूंमध्ये एकदम जोश आला. जणू पाकीस्तानशीच आपण युद्ध खेळत असल्याची भावना क्रिकेटपटूंमध्ये निर्माण झाली. मी तर म्हणतो, नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय आलिंपिक स्पर्धेच्या आधी घेतला असता तर किमान 50 सुवर्णपदकं मिळवली असती भारतानं"

" ते जाऊ दे. 
तुझा रेल्वे प्रवास कसा झाला?"

"ते मात्र विचारू नकोस. रिझर्व्हेशन असतानाही डब्यात खच्चून गर्दी होती. उभं राहायलाही जागा नव्हती. टीसीकडे तक्रार केली तर तो म्हणाला, काय राव देशासाठी सैनिक एव्हढा त्रास सोसतात आणि तुम्हाला बसायला जागा मिळाली नाही तर एव्हढी कुरकूर करता, शोभतं का तुम्हाला हे? झकत उभा राहून 1400 किलोमीटरचा प्रवास केला."

" सकूताईला भेटलास की नाही मुंबईत?"

" हो तर. आधी तिच्याकडे गेलो. मरणाची गर्दी त्या लोकलला. गर्दीत कोणीतरी पाकीट मारलं माझं. त्यात दोन बँकांची क्रेडीट कार्डं होती. पोलीसात तक्रार द्यायला गेलो तर पीआय म्हणाले, कसली तक्रार करताय? तिकडे देशासाठी सीमेवर सैनिक... ...!!धृ!! अन इकडं तुम्ही मारलं कोणी एखादं पाकीट तर लगेच निघाला तक्रार करायला? देशासाठी काहीतरी त्याग करायला शिका राव."

" सकूताईला गोडाधोडाचं करायचं होतं. पण घरात पैसे नव्हते. दाजी बॅंकेत गेले सकाळीसकाळी. दोन हजाराची बंदी नोट घेऊन आले. मग काय सुट्टे नाहीत म्हणून सगळ्या दोन हजाराची मिठाई घेऊन आले. मला सांग, नोटाबंदी नसती तर एरवी एव्हढी दोन हजारांची मिठाई मिळाली असती आमच्या सकूताईला?"

"खरय बाबा तुझं. बरं सध्या करतोयस काय? सुट्टी मजेत चाललीय ना?"

"अरे कसलं काय? गेल्या आठवड्यात जमीनीच्या कामासाठी दोनदा तलाठ्याकडे गेलो, त्याला चांगला ढोस दिला. म्हणलं, गेले चार वर्षे हेलपाटे मारतोय. यावेळी काम झालं नाही तर सरळ पीएमओ पोर्टलवर तक्रार करीन. मग होशील सस्पेंड."
"मग केलं का त्यानं काम?"

"तो म्हणाला, काय राव, तिकडे देशासाठी सीमेवर सैनिक... ...!!धृ!! अन तुम्ही किरकोळ जमिनीचं काम नाही झालं म्हणून थेट पं. प्र. ना त्रास देणार? सध्या जमिन व्यवहारात मंदी आल्यानं काहीच कमाई नाही. उद्या येताना दहा गुलाबी नवे कोरे गांधीबाबा घेऊन या. करून टाकू तुमचं काम."

काल बायको म्हणाली, " संपदाच्या शिक्षकांना जाऊन भेटा जरा. तिचा अभ्यास काही नीट चाललेला नाही." गेलो भेटायला तर शाळेत शिक्षकांचा पत्ताच नाही. पोरं सगळी क्रिकेट खेळत होती.

मुख्याध्यापकांना भेटलो. तक्रार केली तर ते म्हणाले, "काय राव, तिकडे देशासाठी सीमेवर सैनिक... ...!!धृ!! अन तुम्ही एका गरिब शिक्षकानं नाही शिकवलं वर्गात, नाही आला चार आठ दिवस शाळेत तो तर एव्हढे गळे काढायचे?"

आम्ही दोघे माझ्या गाडीनं पुण्याला निघालो. रस्त्यात रिलांयन्सचा टोलनाका लागला. रस्त्यातल्या असंख्य खड्ड्यांनी विजयची हाडं खुळखुळी झालेली होती. पार वैतागला होता तो. टोलवाल्या पोराशी तो वाद घालू लागला. एव्हढे पैसे घेता टोलचे मग खड्डे बुजवता येत नाहीत?"

तो पोरगा म्हणाला, " काय राव, तिकडे देशासाठी सीमेवर सैनिक... ...!!धृ!! अन तुम्ही किरकोळ खड्डे नाय सहन करू शकत? काढा 200 रूपये."

विजयनं त्याचं आयकार्ड काढलं. टोलवाला पोरगा म्हणाला," हे कार्ड आमच्या नाक्यावर चालत नाही."
आम्ही निमुटपणे टोलचे पैसे भरले.

.... आणि सैन्यात अधिकारी असलेला माझा मित्र विजय पठाणकोटच्या आपल्या सैनिक तळावर ड्युटीवर हजर होण्यासाठी निघाला....

................................

[ डिसक्लेमर- यातील पात्रे, प्रसंग आणि संवाद काल्पनीक वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.]

Monday, December 19, 2016

नमोंचा डेमो...


जागतिक किर्तीचे इतिहासकार आणि राजकीय विचारवंत डा. रामचंद्र गुहा यांचा साप्ताहिक साधनातील लेख सर्वांनी वाचायला हवा.

" नमोंच्या डेमोची संस्थात्मक किंमत " या त्यांच्या 24 डिसें.2016 च्या साधनातील पृ. 7 ते 9 वरील लेखात त्यांनी अनेक मुलभूत मुद्दे उपस्थित केलेत. [लेखाचा मराठी अनुवाद- धनंजय बिजले]

1. नोटाबंदी हा नमोंचा डेमो होता. त्याच्या आर्थिक परिणामांचा विचार अर्थशास्त्रज्ञांनी जरूर करावा.

2. या निर्णयामुळे पं.प्र. यांनी संसद, मंत्रीमंडळ, आर.बी.आय. आणि निवडणुक आयोग यांची विश्वासार्हताच कमी केली आहे.

3. पं.प्र. सर्व भारतीय नागरिकांनी थेट निवडून दिलेल्या संसदेतील प्रतिनिधींसमोर महिनाभरात एक वाक्यही बोलले नाहीत.

4. हा निर्णय मंत्रीमंडळाला गोपनीय बैठकीत सांगतानाही पं.प्र.नी सर्व मंत्र्यांना आपापले मोबाईल बाहेर ठेवायला सांगितले होते.याचा अर्थ त्यांचा त्यांच्या मंत्र्यांवरही विश्वास नाही.

5. नव्या नोटा बाहेर यायला उशीर लागतोय याचाच अर्थ हा निर्णय आर.बी.आय. ला विश्वासात घेऊन केलेला दिसत नाही.

6. मनमोहन सिंग यांनी सोनिया गांधींचा हस्तक्षेप मान्य करून  मंत्रीमंडळ या संस्थेचे अवमुल्यन केलेच होते. पण नमोंनी वेगळ्या मार्गाने हा विश्वास आणखी कमी केलेला आहे. मनमोहन यांनी कमकुवत केलेले पीएमओ नमोंनी नको इतके शक्तीशाली केल्याने देशाची वाटचाल एकाधिकारशाहीकडे होण्याची भिती निर्माण झालीय.

7. नमोंच्या मंत्रीमंडळात अनेक देवकांत बरूआ आहेत.

8. संसद, मंत्रीमंडळ, आर.बी.आय. आणि निवडणुक आयोग यांच्या विश्वासार्हतेला धक्का देणारा हा निर्णय आहे.

.....शेवटी डा.गुहा म्हणतात, मला खात्री आहे, माझ्या या लेखातील युक्तीवादाला समर्पक युक्तीवादाने उत्तर देण्याऎवजी माझी निंदानालस्ती करूनच प्रत्युत्तर दिले जाईल.
..............................................

Sunday, December 18, 2016

हमाली करताना काळूचा मृत्यू

1. बाजारचा दिवस
गावाकडे सगळे व्यवहार आठवडी बाजारावर अवलंबून असायचे. सोमवारी गावचा बाजार असायचा. शेतातलं जे काही विकण्याजोगं असेल ते बाजारात विकायचं आणि गरजेच्या सगळ्या गोष्टी खरेदी करायच्या असा परिपाठ होता.
संध्याकाळी मंडळी बाजार करून परत यायची तेव्हा आम्ही कामधंदा, मुख्य म्हणजे खेळायचे सोडून वस्तीबाहेर रस्त्यावर बसायचो. बाजारातून आजीनं काहीतरी खाऊ आणलेला असायचा. जास्तकरून त्यात भेळ, गोडशेव, रेवड्या किंवा केळी असायची. त्यासाठी आठ दिवस वाट बघण्यात जायचे. आठवड्यातून एकदाच मिळणारा हा खाऊ जिव की प्राण असायचा.
मी चारेक वर्षाचा असतानाची गोष्ट.
एकदा माझ्या चुलत आजीने वाटेकडे डोळे लावून बसलेल्या मला तिच्या घरात नेलं. भेळ दिली खायला. ती गायीला पाणी पाजायला,चारा घालायला गोठ्यात निघून गेली. माझी भेळ खाऊन झाल्यावर मीही खेळायला निघून गेलो.
तासाभराने आजी भांडतच आली. तिने तिच्या सख्ख्या नातवंडांसाठी आणलेला शेवरेवड्याचा पुडा गायब झालेला होता. तिचा संशय माझ्यावर होता. तिने माझ्या आईकडे तक्रार केली. आईने मला बडवबडव बडवलं.
मी शेवरेवड्यांचा पुडा घेतलेला नव्हता. पण आळ माझ्यावर आलेला होता. मी खूप रडलो, आईने मारलं म्हणून आणि विनाकारण आळ आला म्हणूनही.
आठवड्याआधी खळं तयार झालं होतं.
खळ्यातल्या धान्याच्या त्या राशीत पुजेचा नारळ ठेवलेला होता. माझा मोठा चुलत भाऊ काळू आणि मी त्या खळ्याचं राखण करीत होतो.
काळूदादानं तो नारळ धान्यातून काढला. शेजारच्या मारूती मंदिरात जाऊन फोडला. मलाही त्यानं काही खोबरं खायला दिलं. भूकही लागली होती आणि खोबरं खाण्याचा मोहही होता. मात्र नारळाचं कोणाला सांगू नकोस नाहीतर गाठ माझ्याशी आहे असा त्यानं मला दम भरला.
दुसर्‍या दिवशी काकांच्या लक्षात आलं की नारळ गायब आहे. काळू आणि माझ्याकडं विचारणा झाली. काळुदादाच्या भितीने मी गप्प राहिलो. मला माहित नाही असं सांगितलं. पण मारूती मंदिरात फोडलेल्या नारळाच्या करवंट्या शेजारीच पडलेल्या होत्या. काकांनी त्याला लागलेल्या कुंकवावरून तो नारळ ओळखला.
काळूला आणि मला लाथाबुक्क्यांचा मार पडला.
आणि आठवड्यात चुलत आजीचा शेवरेवड्यांचा पुडा गायब झाला. मी शेवरेवड्यांचा पुडा घेतला नाही यावर कोणाचाच विश्वास बसला नाही.
एका चुकीमुळे दुसरीचा आळ आला याचं दु:ख होतं.
दोन दिवसांनी चुलत आजी सांगत आली, " अगं सोनाई तू उगीच मारलं लेकराला. अगं, आता मी अंडी ठेवायला उतरंडीजवळ गेले तर बघते तो काय? मेल्या उंदरांनी फाडला तोडलेला शेवरेवड्यांचा पुडा मिळाला बघ गाडग्यामागे पडलेला.त्यातल्या शेवरेवड्या कुरतडलेल्या आहेत."
माझ्या आईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं, आणि तिच्या आलं, म्हणून माझ्याही!
आज पन्नास वर्षांनी ही आठवण का बरं व्हावी?
............................

2. हमाली करताना काळूचा मृत्यू
माझा मोठा चुलत भाऊ काळू गावातल्या बाजारपेठेत हमाली करायचा.
एकदा ट्रकमधून धान्याची पोती उतरून घ्यायचं काम हमाल करीत असताना ड्रायव्हरचा कंट्रोल गेला आणि ट्रकचा समोरच्या हमालाला धक्का लागला. तो ट्रकच्या पुढच्या चाकाखाली आल्यानं त्याचा जागेवरच मृत्यू झाला. क्लिनर ओरडला म्हणून ड्रायव्हरने ट्रक रिव्हर्समध्ये घेतला. पाठीवर धान्याचं पोतं असल्यानं काळूला दिसलं नाही आणि ट्रकचं मागचं चाक काळूच्या अंगावरून गेलं. त्याचाही जागेवरच मृत्यू झाला.
काळूचं नुकतच लग्न झालेलं होतं. लग्नाला अवघे सहा महिने झालेली, अंगावरची हळदही अजून उतरली नसताना वहिनी विधवा झालेली.
काकाकाकूंचा कमावता मुलगा गेला. ट्रकमालकानं पोलीसांशी संधान साधलं. पोलीसांनी काकांना सांगितलं, ट्रकच्या मागच्या चाकाखाली माणूस गेला तर कसलीही भरपाई मिळत नसते. कायद्याप्रमाणं ती काही ड्रायव्हरची चूक मानली जात नाही. काकांनी गावातल्या एका पुढार्‍यांकडे चौकशी केली. त्यांची त्या व्यापार्‍याबरोबर भागीदारी असल्यानं ते म्हणाले "खरय पोलीसांचं."
मग काका गप्प राहिले.
तेव्हा मी आठवीत होतो.
कर्वेनगरचे ओगले नावाचे एक सामाजिक कार्यकर्ते अपघात नुकसान भरपाईच्या केसेसमध्ये मोफत सल्ला द्यायचे. मी त्यांना भेटलो. माहिती दिली. ते म्हणाले,पंचनाम्याची प्रत आणा, आपण ट्रायब्युनलकडे नुकसान भरपाईची केस दाखल करू.
काकांनी आणि मी पोलीस चौकीत अनेक हेलपाटे मारले. पोलीस काही पंचनाम्याची प्रत देईनात. मी पोलीसांकडे लेखी अर्ज करून त्याचा लेखी पाठपुरावा करीत राहिलो.
अपघाताला सहा महिने उलटून गेल्यावर पोलीसांनी पंचनाम्याची प्रत दिली.
ओगलेंनी ट्रायब्युनलकडे अपघात नुकसान भरपाईची केस दाखल केली. अपघाताला सहा महिने उलटून गेल्याने ट्रायब्युनलने मुदतबाह्य केस म्हणून केस फेटाळून लावली.
ओगलेंनी "अपघात नुकसान भरपाई " या आपल्या पुस्तकात ही सगळी व्यथा विस्ताराने मांडलेली आहे.
काका शिकलेले नव्हते. कायद्याची निरक्षरता, पोलीसांचे आणि नेत्यांचे व्यापार्‍याशी असलेले संगनमत आणि कायद्याची मुदतीतच केस दाखल व्हायला हवी ही आंधळी वृती, परिणामी गरिब काकांना आणि काळूच्या विधवेला तो कामावर असताना अपघातात मृत्यू पावला असूनही भरपाई मिळालीच नाही.
...............................

विहीरीतच नाही तर पोहर्‍यात येईल कुठून ?


गेला सुमारे दीड महिना नोटाबंदीमुळे देशाची नोटाबंदीविरोधक आणि नोटाबंदीसमर्थक अशी फाळणी झालीय. या दोन्हीतही नसलेल्या आमच्यासारख्यांना तटस्थपणे बघितल्यावर काही मुलभूत प्रश्न पडतात. 1. सर्व व्यवहार कॅशलेस करायचे तर देशात 1 कोटी किराणा दुकाने आहेत. भाजीपाला विक्रेते, कापड दुकानदार, पुस्तक विक्रेते, खाऊच्या टपर्‍या, हातगाडीवाले,Hotels.औषध विक्रेते असे इतर सर्व 1 कोटी आहेत. या 2 कोटींना प्रत्येकी किमान एक तरी स्वाइप मशिन [पीओएस = Point of Sale] हवे. 2. देशात आज अवघी 14 लाख 40 हजार स्वाइप मशिन [पीओएस = Point of Sale] आहेत. उर्वरित मशिन्स तयार करणे किंवा आयात करणे यासाठी किमान पुढचे वर्षभर वेळ द्यायला हवा. 3. यातले 11लाख 60 हजार मशिन्स ज्या 5 बॅंकांच्या मालकीची आहेत त्यातल्या चार बॅंका फक्त शहरात आहेत. ग्रामीण भागात त्यांची एकही शाखा नाही. 4. आरबीआयच्या म्हणण्यानुसार देशातील 4 लाख खेड्यांमध्ये एकाही बॅंकेची शाखा नाही. जिथे देशभरात मिळून एटीएम केंद्रे अवघी 2 लाख 50 हजार आहेत, ती आधी किमान सात लाख करायला हवीत. 5. एटीएम मशिन्स आणि स्वाइप मशिन चालवण्यासाठी 24 तास वीज आणि वेगवान इंटरनेट सेवा हवी. जिथे शहरातही अनेकदा भारनियमन [लोडशेडींग] करावे लागते आणि ग्रामीण भागात आजही 12 ते 14 तास वीज नसते तिथे या सोयी करायच्या तर आरामात चारसहा वर्षे जातील. 6. रिझर्व बॅंक म्हणते, देशभरात जुलै 2016 मध्ये एटीएम मशिन्स आणि स्वाइप मशिन मधून झालेल्या व्यवहारातील 85% व्यवहार हे एटीएम केंद्रातून पैसे काढणारे व्यवहार होते. 92% रक्कम यातून काढली गेली. उर्वरित 8% व्यवहार स्वाइप मशिन द्वारे झाले. 7. आयसीई360 कॅश सर्व्हे 2014 नुसार आपल्या देशात होणार्‍या एकुण व्यवहारापैंकी केवळ 5% व्यवहार कार्डाद्वारे होतात. उर्वरित 95 % व्यवहार करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, प्रशिक्षण देणे यासाठी वेळ द्यायला नको? 8. "मॅकेन्झी ग्लोबल इनसाईट" चा अहवाल म्हणतो, स्वातंत्र्याला 69 वर्षे झाल्यानंतरही देशातले 99% व्यवहार रोखीने होतात. 9. वेगवान इंटरनेट सेवा, वीज, साक्षरता, कॅशलेसचे प्रशिक्षण, विक्रेता व ग्राहक या दोघांची नवी मानसिकता तयार करणे, किमान मानसिकता बदलणे, हे सारे केल्याशिवाय कॅशलेस व्यवहार कसे होणार? [आजही रोखीने बोहणी झाल्याशिवाय दुकानदाराला व्यवहार सुरू झाले असेच वाटत नाही, तो पहिल्या नोटेची लक्ष्मी म्हणून पुजा करून ] मगच पुढे जातो. 10. जी मंडळी सामाजिक सुधारणांसाठी लोकांना वेळ द्यायला हवा, त्यांच्या कलाने घ्यायला हवे असा कायम युक्तीवाद करतात त्यांनाच कोणत्याही पायाभूत सुविधा निर्माण न करता आर्थिक सुधारणा मात्र रातोरात व्हायला हव्यायत ही मोठीच विसंगती नाही काय? ......................................... [संदर्भ - आजच्या लोकसत्तातील 1.मिलिंद मुरूगकर, 2. नीरज पंडित आणि म.टा.तील 1.विहंग घाटे, यांचे लेख.] .........................................


सार्‍या देशाला कवायत करायला लावलीय

हातातल्या घड्याळाचा सेल संपला होता. 
शेजारच्या दुकानात गेलो. दीडशे रूपये झाले. मी विचारले, "कार्ड चालेल का?"

दुकानदार म्हणाला, " सर, गेला दीड महिना धंदाच झाला नाय. जेमतेम 20 ते 25% गिर्‍हाइक आहे. कार्डाचं मशिन काय फुकट मिळतय? दुकानाच्या भाड्याचे पैसे कुठून आणायचे याची चिंता पडलीय. खरं सांगतो, दररोज एकदा तरी मनात येतंच, कोठून दुर्बुद्धी सुचली आणि कधी नव्हे ते यावेळी मतदान करायला गेलो."

मी म्हटलं, " 2000 रूपयांची नोट देतो, चालेल?"

तो म्हणाला, " जो उठतो तो गरिबाची चेष्टा करतोय. मी कुठून आणू सुट्टे पैसे?"

इतक्यात एकजण आले, ते आमचं बोलणं ऎकत होते. म्हणाले, " आम्हाला कष्टाच्या 2000 रूपयांसाठी या ***** चारचार तास रांगेत उभे केलं. तिकडं मात्र दहा दहा कोटीच्या नव्या नोटा आरामात पोचताहेत.

सगळ्या राजकीय पक्षांना सूट.

मी 35 वर्षे इमानेइतबारे नोकरी केली तेव्हा कोठे किरकोळ पेन्शन मिळतेय. आणि या ******* विधानसभेत नुसतं बुड जरी टेकलं तरी दीडदीड लाख रूपये पेन्शन यांना. लोकसभेत दमडीचंही काम नाही. कोट्यावधी रूपये पाण्यात. पण यांचे भत्ते चालू. पेन्शन चालू. सारे एकाच माळेचे मणी. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर. 

माझ्या लहानपणी मी दोन रूपयात जेवायचो. आज 200 रूपये लागतात. याचाच अर्थ आजच्या 1000 रूपयाच्या नोटेची किंमत आहे अवघी 10 रूपये.
 ह्या नोटा बंद करून या ****** सार्‍या देशाला कवायत करायला लावलीय.

 मुर्खपणा चाललाय सगळा."

तो चहा कायम कोरला गेलाय

मी शाळेत चौथीत असतानाची गोष्ट.

असेच डिसेंबर महिन्यातले थंडीचे दिवस होते. कडाक्याची थंडी पडलेली होती. रेल्वेने मी एकटाच मामाच्या गावी चाललो होतो. एका मधल्या स्टेशनवर गाडी थांबलेली होती.

एक छोटा, फाटके कपडे घातलेला गरिब मुलगा तोंड दीनवाणे करून मला म्हणाला, "चहा प्यायला दहा पैसे द्याना. खूप थंडी वाजतेय."

खरंतर मीही खूप गारठलेलो होतो. मी वैतागून म्हटलं, "माझ्याकडे दहाच पैसे आहेत आणि मलाही चहा प्यायचाय."
तेव्हा रेल्वेतला कटींग चहा 20 पैशाला मिळायचा.

तो मुलगा पटकन पुढे आला, त्याने त्याच्या खिश्यात हात घातला, 10 पैसे काढले आणि मला म्हणाला, "दोस्ता, माझ्याकडेही दहाच पैसे आहेत. हे तू घे. तू तरी चहा पी."

मला खूप लागलं ते. मी ते पैसे घेतले नाहीत. 

त्याने मला बराच आग्रह केला.

मी त्याचे पैसे घेत नाही म्हटल्यावर त्याने परत माझ्याकडे पैसे मागितले.
मी माझे 10 पैसे त्याला देऊन टाकले.

त्याने शेजारच्या चहावाल्याकडून चहा विकत घेतला.

अर्धा चहा असलेला कप त्याने मला दिला नी कपातला निम्मा बशीत ओतून तो प्यायला."

इतकी वर्षं झाली या घटनेला पण हा चहा कायम कोरला गेलाय माझ्या डोक्यात आणि जिभेवरही!

Tuesday, December 13, 2016

वर्गातले विद्यार्थी मला बोलूच देत नाहीत

विद्यापिठातले एक सहकारी प्राध्यापक भेटले. म्हटलं, "सर, बर्‍याच दिवसात आला नाहीत विभागात?"
म्हणाले, "कसा येणार? माझ्या वर्गातले विद्यार्थी मला बोलूच देत नाहीत!" 

"काय सांगता काय? पण तुम्ही विभागात आले तर प्रश्न येईल ना बोलू देण्या ना देण्याचा?"

" कुलगुरू तर तुमचेच पाहुणे आहेत ना? त्यांच्याकडे का नाही तक्रार करीत? शिवाय तुम्हीच विभागप्रमुख आहात. तुमचे सगळे सहकारीही तुमच्याच बाजुचे आहेत. मग अडचण काय आहे?"

"असं बघा, ही सगळी नापास पोरं आहेत. ती मला शिकवूच देत नाहीत. म्हणून मी विद्यापिठात येतच नाही. सरळ घराजवळच्या बालवाडीत जाऊन शिकवतो."

"सर, पण तुम्हाला पगार विद्यापिठ देतं की बालवाडीवाले? तुमची निवड बालवाडीसाठी करण्यात आलीय का विद्यापिठासाठी?"

त्यावर सर फक्त मधाळ हसले.

मी म्हटलं, "सर मग टारगट पोरांना रस्टीकेट का करीत नाही?"

सर म्हणाले, "त्यासाठीच तर पुर्वतयारी करतोय. आधी ही पोरं नापास आहेत, ती मला शिकवूच देत नाहीत, म्हणून तर मी विद्यापिठात येत नाही, बालवाडीत जातो, वातावरणनिर्मिती नको व्हायला?"
..........................................................................
[गुजराती बृहदकथा, खंड, 1 ला, कथा तिसरी, अहमदाबाद, 2016, पृ.क्र.12345 ]

Sunday, December 11, 2016

एकेरी आणि धमकावणीची भाषा कितपत योग्य?


महाराष्ट्र 1 वाहिनीवरील कालची आणि आयबीएन लोकमतवरील परवाची मराठा आरक्षणावरील चर्चा ऎकताना असे जाणवले की वाहिन्या या चर्चेला मराठा समाजाचे 4 वक्ते आणि इतर एखादाच अशा पद्धतीने निमंत्रित करतात.

परम आदरणीय माजी न्या. बी.जी. कोळसेपाटील महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत प्रा.डा.रावसाहेब कसबे यांच्याबद्दल चक्क एकेरी भाषेत बोलत होते. "कोण रावसाहेब कसबे?त्याचा काय संबंध?तो काय तज्ञ आहे काय?" ही त्यांची भाषा ऎकून धक्का बसला.विशेष म्हणजे त्याचवेळी मा. कोळसे पाटील त्यांच्या समाजातल्या एका पोरसवदा नेत्याला मात्र "अहो जाहो " करीत होते.

भाजपाचे मा. आमदार आशिष शेलार यांची प्रा.कसबे यांच्याबद्दलची भाषा सत्ताधार्‍यांच्या रितीला धरून अतिशय उद्दाम आणि अवमानकारक होतीच.

काल मा.आमदार विनायक मेटे यांनी तर कडीच केली. ते रावसाहेब कसबे यांच्या समोर जी धमकीची भाषा वापरत होते ती तर अत्यंत निंद्य होती. " कसबे तुमच्यासारख्या विचारवंतांची महाराष्ट्राला गरज नाही. तुमच्या पापाची फळे तुम्हाला भोगावी लागतील" अशा शब्दात ते पुन्हापुन्हा धमकावत होते.

सुत्रसंचालन करणारे आमचे स्नेही वाहिनीचे कार्यकारी संपादक आशिष जाधव त्यांना किमान त्यावर अशा धमकावणीच्या भाषेत बोलू नका अशी सुचना तरी करतील अशी मी शेवटपर्यंत अपेक्षा बाळगून होतो.

मराठा समाजाचे सगळे वक्ते एकत्र मिळून उरलेल्याची कोंडी करतात. त्यांना बोलूच दिले जात नाही.
मतभेद असले तरी सभ्य भाषेत ते व्यक्त करता येणार नाहीत काय?

महाराष्ट्राला बलदंड वैचारिक वारसा लाभलेला आहे. मतभिन्नता, मतभेद, वैचारिक वाद, ज्याला आगरकर "विचारकलह" म्हणायचे त्याची फार मोठी परंपरा आपल्याकडे राहिलेली आहे. फुले - रानडे, टिळक - आगरकर,गांधी - आंबेडकर यांच्या वादातून फार मोठे वैचारिक प्रबोधन झालेले आहे. लोकहितवादी, र. धों. कर्वे, भालेकर, लोखंडे, महर्षि वि.रा.शिंदे आणि आणखी कितीतरी यांनी ही परंपरा श्रीमंत केलेली आहे.

आपल्या आधीही समाज होता, आपल्यानंतरही तो राहणार आहे यान भान ठेवले गेले पाहिजे. वेगळे मत म्हणजे शत्रुत्व हे समीकरण पुढच्या पिढ्यांचे नुकसान करणारे आहे.

फुले-आगरकर - शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा अशा पद्धतीने उधळला जात असताना व्यथित व्हायला होते ना?

मराठा समाजातील लेखक - विचारवंतांच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया काय आहेत? म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतोय त्याचे काय?

रावसाहेब कसबे यांच्यासारख्या ज्येष्ठ विचारवंताबद्द्ल अशा भाषेत बोलले जात असताना खटकणारच ना?

बहुजन ऎक्य वगैरे चिराऊ होवो!
......................

Thursday, December 8, 2016

छत्रपती श्री शिवाजीमहाराज आणि अनैतिहासिक वक्तव्ये

सौजन्य - श्री Dinanath Manohar
October 8, 2013 ·
काल फेसबुक वर डॉ. विकास आमटे ह्यांनी एक एक पोस्ट टाकली होती. ह्या पोस्टमध्ये कॉम्रेड हो ची मिन्ह ह्यांनी पत्रकाराला आपण गनिमी काव्याचे तंत्र श्री शिवाजी महाराजांकडून घेतले हे, '' देशाला नमवण्यासाठी मी एका महान राजाचं चरित्र वाचलं होतं आणि त्यातून मिळालेल्या प्रेरणेतून मी युद्धनितीचा वापर केला आणि सहज विजय संपादन केला...अशा अर्थाच्या शब्दात सांगितले असं म्हटलं आहे, शिवाय पुढे ''काही वर्षांनंतर राष्ट्रध्यक्षांचा मृत्यू झाला आणि त्यांनी आपल्या समाधीवर "शिवाजी महाराजांचा एक मावळा समाधीस्त झाला" असं लिहून ठेवलंय.... असंही विधान केलंय. (Fwd frm Dr Ashok N. Digras) ह्या प्रस्तावनेत कॉ. हो ची मिन्ह ह्यांच्े नाव न घेता, केवळ राष््ट्राध्यक्ष असा उल्लेख आहे. एकूणच कॉ. हो ची मिन्ह ्हयांच्या तोंडी ज्या प्रकारची विधान टाकली आहेत ती वाचल्यावर मनात शंका येणं अटळ होतं. त्याप्रमाणे काही जणांनी शंका व्यक्त केल्याही. त्यावर प्रशांत जगताप ह्यांनी चक्क सकाळ टाईम्समधील लिंक देऊन असं झाल्याचा पुरावा म्हणून storHiain recalls Shivaji’s war tactics historian recalls Shivaji's war tactics अशा हेडींगने आलेली बातमीच दाखवली. ह्या पोस्ट्च्या सत्यतेबद्दल मी ही, ''आश्चर्य म्हणजे प्रस्तावनेत कॉम्रेड हो ची मिन्ह ह्याचं नाव का घेतलं गेलेलं नाही, ते कम्युनिस्ट होते ह्याचा उल्लेख नाही. व्व्हििएतनामच्या कुठल्या मंत्री येथे आल्या होत्या, कधी आल्या होत्या त्याचा खुलासा नाही. एतनामचा संघर्ष आणि हा लढ्याचा काळ भारत स्वतंत्र झाल्यवरचा. भारताचे त्यावेळच्या नेहरू सरकारचा ह्या जनसंघरषाला पाठींबा होता शिवाय येथील कम्युनिस्ट पार्टीचाही पाठींबा होता. एसं असून एवढ्या दीर्घ काळात ही कहाणी अंधारात कशी राहिली हा प्रश्न पडणं सहाजिक आहे.'' अशा शब्दात शंका व्यक्त केली होती. त्यामुळे मी प्रशांत जगताप ह्यांना लिंक दिल्याबद्दल लाईकवर क्लिक केलं. तरीही माझ्या मनात शंका होती, म्हणून थोडा शोध घेतला. लिंकमधील बातमीत ''he (हो ची मिन्ह) told the then Planning Commission Deputy Chairman Mohan Dharia that they had studied and used Shivaji's guerrilla warfare techniques to fight the American army,” said Bedekar.'' असा स्पष्ट मजकूर होता.. ह्याचा अर्थ मोहन धारीया प्लॅनिंग कमिशनमध्ये असताना हो ची मिन्ह त्यांना असं म्हणाले होते. हो चि मिन्ह ह्यांनी भारताला भेट दिली ते साल होते १९५८ (यु ट्यूब वर क्लीप उपलब्ध) त्यावेळी श्री. मोहन धारिया पुणे म्युन्सिपल कार्पोरेशनचे सदस्य होते (१९५७- ६०) मूळात ते राज्यसभेत गेले ६४ आणि ७० साली. आणि प्लॅनिंग कमिशनमध्ये होते दोन वेळा होते जोन वेळा , एका मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर प्लॅनिंग मे १९७१ ते आक्टो. ७४ आणि त्यानंतर डेप्युटी चेअरमन ऑफ प्लॅनींग कमिशन (डिसे. ९० ते जून ९१) कॉ. हो ची मिन्ह ह्यांचा मृत्यू १९६९ मध्ये झाला. मूळात मोहन धारीया राज्यसभेत गेले ते ६४ आणि ७० साली. ह्या सर्व माहितीच्या आधारे मुळात श्री मोहन धारीया कॉम्रेड हो ची मिन्ह ह्यांना भेटल्याची संभवनियताच दिसत नाही. कॉ. हो ची मिन्ह ह्यांनी ५८ नंतर भारताला भेट दिली होती का ह्याबद्दल मी शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण तशी भेट झाल्याचे दिसत नाही. आता प्रश्न हा पडतो, की कोण खोटं बोलतोय मोहन धारिया की बेडेकर? श्री मोहन धारीयानी अशी थाप मारली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकारणी नेत्यांना बिनधास्त असली विधानं करण्याची सवंय असते. परंतु श्री बेडेकर इतिहासतद्न्य म्हणून ओळखले जातात, त्यांनी ह्या विधानाची सत्यासत्यता तपासून बघायला हवी असं कोणीही अपेक्षा करेल. ह्याशिवाय श्री शिवाजी महाराज ह्यांची महानता, त्यांचे युद्धकौशल्य सिद्ध करण्यासाठी प्रत्यक्षात घडलेल्या ऐतिहासिक घटना पुरेशा बोलक्या आहेत. असं असताना हे कॉ. हो ची मिन्ह सारख्या नेत्यांना वेठीस धरण्याची गरजच काय होती? हा ही प्रश्न निर्माण होतो. मला वाटतं ह्यातून निष्कर्श एवढाच काढता येईल की जे स्वत:ला इतिहास तद्न्य म्हणवतात अशांनी केलेल्या विधानावरही अंधविश्वास ठेवणं चूकीचं आहे. पण मग सामान्य वाचकानं विश्वास ठेवायचा तरी कुणावर?
................................
31 You, Sunil Tambe, Satish Tambe and 28 others
..........................
5 shares
15 Comments
..................................
Sunil Tambe आगापिछा नसलेली माहिती विकास आमटेंसारख्या व्यक्तींनी प्रसृत करू नये. ह्या माहितीचा शोध घेतल्याबद्दल धन्यवाद.See Translation
Atul Patankar हिटलरने अशीच काही विधाने सुभाषचंद्र बोसंशी बोलताना केली, अशी एक विनोदी पोस्ट बऱ्याच वेळा वाचली आहे. सोबत पुरावा म्हणून त्यांच्या दोघांच्या भेटीचा फोटो! पण हिटलर किंवा सुभाषचंद्र यांच्या कुठल्या चरित्रात याचा उल्लेख आहे; शिवाजी चरित्र तेव्हा जर्मन भाषेत...See MoreSee Translation
Bharat Patankar very fitting responce, ...appreciated.
Dinanath Manohar ह्या पोस्टमध्ये मी पोस्ट टाकणाऱ्या आणि चर्चेत सहभागी झालेल्या काही व्यक्तींचा उल्लेख केला आहे, ह्या व्यक्तीं ह्यात दोषी आहेत, असं विलकूल म्हणायच नाही. उलट प्रशांत जगताप ह्यांनी मूळ बातमीची लिंक दिली असा मी मुद्दामून उल्लेख केला. तरीही फेसबूकवर ह्या चर्चेत सहभागी झालेल्यापैकी कुणी दुखावलं गेलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.See Translation
Shyam Ranjankar याच सारखा एक प्रकार, सुभाषचंद्र बोस म्हणे , स्वातंत्रयवीर सावरकरांचा सल्ला घेण्यासाठी रत्नागीरीत ये त्यांच्या गुप्त बैठका होत, ते सावबकरांचे आशिर्वाद घेउन पुढील कार्यक्रम आखीत.. कुणी याचा उलगडा करुन सावरकांचं कर्तुत्व जास्त प्रकाशात आणेल काSee Translation
Dinanath Manohar SR- हे हिटलरबद्दल सांगितलं जातं. तो पाणबुडीतून कोकण किनाऱ्याला येऊन सावरकरांना भेटून गेला होता म्हणे..See Translation
Suresh Karale मंत्रालय - विधिमंडऴ वार्ताहर संघाच्या विद्वान अध्यक्षानी असाच पोष्ट whatsup वर टाकली होती. या गृहस्थाना हो ची मिन्ह हे नाव ही माहित नाही.See Translation
Vishnu Dhoble well done ,thanks.
Vidyadhar Date http://books.google.co.in/books?id=n-KUICFfA00C&pg=PA432.... this link gives an idea of how an intellectual is pilloried for simply questioning, not criticising Shivaji. the late ranade was my mama.
Vilas Salunkhe मोहन धारीया हे तत्वनीष्ट, समाजवादी विचासरणीचे नेते होते, ते असे काहीही बिनबुडाचे सांगतील हे पटण्यास जरा अवघड आहे. बेडेकर हे इतिहासाचा अभ्यास/संशोधन करताना सापडेल तो इतिहास सनातनी हिंदूत्ववाद्यांना कसा अनुकूलपद्धतीने पुढे आणता येईल याकडेच जास्त लक्ष देत असत, याच बेडेकरांनी शिवाजी महाराजांना दैवत्व बहाल करण्यासाठी शिवरायांचे अष्टभुजाधारी रुपातले चित्र तयार करवून घेतले होते.
Prakash Zaware Patil सर ! आपण दिलेला मोहन धारीयाजींच्या कर्तृत्वकालाचा आलेख अचूक. विएटनामचे युध्दपर्वात मराठी वृत्तपत्रांत जाणकारांचे लेख येत आणि भाषणेही होत. व्हिएटनामचे युध्द " शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने लढले जात आहे " असे उल्लेख होत. त्यावरुन असा " ढगात गोळीबार " सुरु होऊ शकतो. डॉ.विकास आमटे सर..इतिहासाचे वाचक किंवा श्रोते असू शकतात. परंतू तो त्यांचा अभ्यास विषय नाही. सबब सार्वत्रिक लोकभ्रमाचा सहज आधार घेतला असावा.
Vilas Salunkhe या थापेबाजीचा कळस म्हणजे हो चि मिन्ह हे रायगडावर येऊन शिवसमाधीच्या पाया पडले होते व त्यांनी समाधीजवळची माती एका संदुकीत भरुन नेली होती आणि मुख्य म्हणजे त्यांनी हे सर्व भारत सरकारला न कळवता गनीमी काव्याने रायगड दर्शन केले होते म्हणे.
Anil Mokal भावनेच्या आणि उत्साहाच्या भारत ,इतिहासाचा आधार नसलेली आणि अशी कालविसंगत विधाने केली जातात .इतिहासाच्या प्रत्येक अभ्यासकाने अशी विधाने तपासून घेणे श्रेयस्कर . आता शिवाजी महाराज आणि कॉम्रेड हो ची मिन्ह हे दोघेही मोठे धोरणी आणि लढवय्ये नेते होते हे निःसंशय ..
21 hrsLike2
Arun Thakur नवा इतिहास पुन्हा घडवू!
9 hrsUnlike2
राजु चांदे नेपोलियन कॅस्ट्रो अशा अनेक लोकांच्या बाबतीत शिवरायांचं नाव घेऊन असल्या खोटारड्या स्टोऱ्या तयार केल्या जातात ,

ह्या असल्या स्टोर्यात कसलीही सत्यता नाही
9 hrsLike1
Vidyadhar Date this is an old fraud and has been exposed before.
2 hrsUnlike1
Dinanath Manohar बेडेकरांच्या पोस्टमध्ये एक व्हिएतनामच्या स्त्री अॅम्बॅसॅडरचीही कहाणी दिली होती. ही लाल किल्ल्याची भेट नाकारून रायगडावर आली होती, आणि महाराजांच्या समाधीजवळील ओंजळभर माती आपल्या पर्समध्ये घेतली अशी कथा होती. कुणीतरी व्हिएतनामच्या अॅॅम्बेसीकडे चौकशी केली आणि त्यांनी भारतात आमची कधीही स्त्री अॅम्बॅसॅडर नव्हती असं लेखी उत्तर दिले होते, ते ही फेबुवर आले होते.
1 hrEditedUnlike4
Mahendra Singh Sengar Mohan Dhariya himself was a fraud why no one saying this? Moreover he was in congress..
1 hrLike
Dinanath Manohar आणखी एक माहिती य़ेथे देणे अवाजवी होणार नाही. इसवीसन पूर्व ५व्या शतकात चीनमध्ये सन त्सू नावाच्या माणसाने आर्ट ऑफ वॉर नावाचे पुस्तक लिहिले. ह्या पुस्तकात मुख्यतः प्रत्यक्ष युद्ध करण्याचे टाळून, शत्रुच्या तुलनेत परिस्थितीवर आपले नियंत्रण कसे ठेवायचे ह्याचे तंत्र वर्णन केले आहे. ह्या पुस्तकाची अनेक भाषात रूपांतरे झाली आहेत, आणि जगातील युद्धशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे एक अभ्यासायलाच हवे असे पुस्तक आहे. माओ आणि दुसऱ्या महायुद्धात स्टॅलीननेही ह्याचा उपयोग केला आहे. शिवाजी महाराजांचे हीच युद्धनिती होती, त्यांनी मोगलांशी सरळ सामना करण्याचे टाळले, तशी वेळ आल्यावर तह केला, पण औरंगजेबाला महाराष्ट्रात नियंत्रण अखेरपर्यन्त मिळवू दिले नाही. चीन आणि ह्विएचनाम ह्याचे ऐतिहासिक संबंध लक्षात घेता, हो चि मिन्ह ह्यांनी (जर त्यांना पुस्तकाची गरज वाटलीच असेल तर) ह्या ट्रीटीचा उपयोग केला असण्याची शक्यता जास्त आहे. मात्र सन त्सू दोन हजार वर्षे आधी होऊन गेला, महाराज पाचशे वर्षापूर्वी मोगल सत्तेशी लढत होते, म्हणून ह्याचा अर्थ त्यांनी सन त्सू चे तंत्र आत्मसात केले आणि उपयोगात आणले असे हास्या्स्पद विधान कोणी करू शकेल का?
1 hrEditedLike
Madhav Gole This is not by mistake. It is deliberately done. To spread rumours the teqnic is mastered by R. S. S. There r many examples like Sheikh Abdulla was half brother of Pandit Nehru etc.
54 minsLike1
Sharad Ramchandra Gokhale <<श्री शिवाजी महाराज ह्यांची महानता, त्यांचे युद्धकौशल्य सिद्ध करण्यासाठी प्रत्यक्षात घडलेल्या ऐतिहासिक घटना पुरेशा बोलक्या आहेत. असं असताना हे कॉ. हो ची मिन्ह सारख्या नेत्यांना वेठीस धरण्याची गरजच काय होती? >> शत-प्रतिशत सहमत !!
37 minsEditedLike2