स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी प्रथमच पुण्यात हवामान शास्त्रज्ञ डॉ.मेधा खोले या धर्ममार्तंड बाईंच्या म्हणे तथाकथित धार्मिक भावना एका स्वयंपाकीणीने दुखावल्या. डॉ. मेधाबाईंनी थेट पोलीसात तशी तक्रारच दाखल केली. केटरर मराठा बाईंनी स्वत:चे आडनाव यादवऎवजी कुलकर्णी सांगून मेधाबाईंचा धार्मिक कार्याचा 6 वेळा स्वयंपाक केला. त्यांना मेधाबाईंनी त्याचे 15 हजार रुपये दिले. त्यामुळे पितरांचा अपमान झाला. कारण मेधाबाईंच्या घरात विधवा चालत नाहीत, स्वयंपाक ब्राह्मण बाईनेच सोवळे नेसून करायचा असतो. इ.इ. म्हणे हा त्यांचा धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्यांची फसवणूक आहे.
खोलेबाई जेव्हा स्वत:च्या घरी कामासाठी दुसरी व्यक्ती नेमतात तेव्हा ती केवळ त्यांची खाजगी जागा राहत नाही. ती कायद्यानुसार घरेलू कामगाराची कामाची जागा म्हणजेच सार्वजनिक जागा बनते. त्यामुळे अशा जागेत केलेला जातीय भेदभाव हा भारतीय राज्यघटनेचा भंग ठरतो. खोलेबाईंचा गुन्हा तिहेरी आहे. त्या लिंगभाव, जात आणि वर्गीय भावनेने ग्रस्त असल्यानं त्यांनी हा फसवणूकीचा गुन्हा दाखल केलेला आहे. खरंतर पोलीस यंत्रणाही पक्षपातीपणाने वागलेली आहे. मालकाने दिलेली तक्रार दखलपात्र मात्र त्याचवेळी नोकरानं दिलेली तक्रार अदखलपात्र हा विधवेला आणि गरीबांना कमी लेखणारा भेदभाव का? करार कायद्यात कुठेच सोवळ्याओवळ्याला मान्यता नसल्यामुळे पोलिसांनी मेधाताईंची ही तक्रार दाखल करण्यापुर्वी सोवळ्याच्या कायदेशीरपणाविषयी शहानिशा करुन घेतली काय?
पोलीसांना दिलेल्या स्वत:च्या जबानीत डॉ.मेधा खोले या निर्मला यादव यांचा उल्लेख अनेकदा एकेरी करतात. वारंवार त्या निर्मलाबाईंच्या जातीचा आणि स्वयंपाकी ब्राह्मणच हवा असा जातीचा मुद्दा काढतात.
धर्मशास्त्राप्रमाणे दोघीहीजणी स्त्रिया असल्यानं शूद्र आहेत हो मेधाताई!
खरंतर हा खुळचटपणा विरूद्ध आधुनिकता असा वाद आहे. एक क्लास वन शास्त्रज्ञ बाईच आपल्याला विधवा चालत नाही असं म्हणुन दुसर्या बाईचा अपमान करीत असेल तर कर्वे -आगरकर-रानडे सारेच कपाळाला हात लावून बसले असतील.
सोवळ्यामागे स्वच्छतेचा मुद्दा असेल तर यादव बाईंनी स्वच्छता पाळलेली आहे. स्वयंपाक वाईट केला किंवा कामात हलगर्जीपणा केला अशी मेधाबाईंची तक्रारच नाहीये. तक्रार आहे जात, सोवळं आणि विधवा असण्याची!
एरवी सोवळ्यामागे स्वच्छता हा एक मुद्दा असेलही. पण प्रमुख मुद्दा जाती वर्चस्वाचा आणि जातीय अहंकाराचा असतो.
भारतीय राज्यघटनेच्या कलम 13,14,15,16 अन्वये मेधाबाईंनी जात आणि विधवापण यावरून केलेली निषिद्धता हा गंभीर दंडनीय गुन्हा आहे. या केसमध्ये निर्मलाबाईंनी खोटी जात सांगून फसवणुक केली हा भारतीय कायद्यात सोवळ्याओवळ्याला मान्यता नसल्यानं मुळात गुन्हाच होत नाही. अशा ठिकाणी जात विचारणं हाच गुन्हा आहे. यात कसलीही फसवणूक झालेली नाही.
मेधाबाईंना घटनेच्या कलम 25 अन्वये विवेकाचा आणि धर्मस्वातंत्र्याचा अधिकार असला तरी त्यांनी स्वत: सोवळं नेसावं, पुजा कशी करावी, याचा तो अधिकार आहे. निर्मलाबाईं त्यांचा स्वयंपाक करीत होत्या. तो चांगला असल्यानंच त्यांना पुन्हापुन्हा काम देण्यात आलं. निर्मलाबाई त्यांच्या देवघरात घुसलेल्या नाहीत. त्यांनी मेधाबाईंच्या सोवळ्याला हात घातलेला नाही. आक्षेप घेतलेला नाही. निर्मलाबाईंनी सोवळं नेसणं हा जर धार्मिक गुन्हा असेल तर मग मेधाबाईंनी उच्चशिक्षण घेणं हा अधिकार कोणतं धर्मशास्त्र देतं? त्यामुळे धर्मस्वातंत्र्याचा भंग झाल्याचा मेधाबाईंचा हा चक्क कांगावा आहे. त्या उच्चपदस्थ बाई असल्यानं पोलीस त्यांच्या दबावाला बळी पडलेले आहेत. निर्मलाबाईंनी कायद्यानुसार कसलाही गुन्हा केलेला नाही. आपला देश संविधानानुसार चालतो, धार्मिक कायद्यानुसार नाही.
आपला हा समाज आधुनिक व्हावा यासाठी फुले, शाहू, आंबेडकर, शिंदे, सानेगुरूजी, आगरकर आदींनी अपार खस्ता खाल्लेल्या आहेत. मेधाबाई त्या विसरलेल्या दिसतात.
मेधाबाईंनी सोवळं नेसावं की नाही, त्यांनी देवघरात पुजा कशी करावी, त्यांनी स्वत: धार्मिक स्वयंपाक कसा करावा हा विषय असता तर धार्मिक भावनांचा मुद्दा ठीक होता. आईवडीलांबद्दल तुम्हाला आदर आहे ना मग स्वत: स्वयंपाक करा ना! मृत व्यक्तींसाठी जिवंत माणसांच्या प्रतिष्ठेला बाधा कशी आणता येईल? दुसर्यांची जात काढण्याचा अधिकार कोणता कायदा मेधाबाईंना देतो?
आधी यादवबाईंच्या घरी जाऊन नीट पाहणी करून मगच त्यांना मेधाबाईंनी हे काम दिले. यादवबाईंच्या कामाच्या दर्ज्याबद्दल आजही मेधाबाईंची कोणतीही तक्रार नाहीये.
मुद्दा आहे कंत्राटी काम देण्याचा आणि काम चोख बजाऊन घेण्याचा. का विशय करार कायद्यात येतो. मात्र काम देताना अशा सोवळ्याओवळ्याच्या / जातीपातीच्या अटी घालणे हाच मुळात गुन्हा आहे. तेव्हा गुन्हा यादवबाईंनी केलाय की मेधाबाईंनी?
यादवबाईंच्या घरी जाऊन त्यांना मारहाण करणे, धमक्या देणे, कामाचे ठरलेले पैसे न देणे, शिवीगाळ करणे हे गुन्हे मेधाबाईंनी केलेयत अशी तक्रार यादवबाईंनीही पोलीसात दाखल केलेलीय. या दोन्ही तक्रारीतलं खरंखोटं आता कोर्टात ठरेल.
मेधाबाई उद्या खुळचटपणानं म्हणतील, स्वयंपाकाला वापरलेले धान्य, भाजीपाला हे पिकवणारा शेतकरीही सोवळं घातलेला असावा, त्यात विधवा नकोते. उद्या त्या असंही म्हणतील की पुजेला वापरलं जाणारं पुणे मनपाचं पाणी सोडणाराही त्यांना सोवळंवाला हवाय. मग फुलं आणून देणारा माळीही सोवळंवाला का नको? त्यातही सुवासिनीच हव्यात.
पुजेचं दुध ते सोवळ्यातल्याच आणि सुवासिनी गाईचंच हवं.
जे लोक अंधश्रद्धेतून किंवा जातीप्रेमातून मेधाबाईंचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन करतात तेही इतर जातीयवादी संघटनांच्या हातात कोलीतच देत आहेत. मेधाबाईंच्या समर्थनात उतरलेले हे उच्चशिक्षित खुळचट लोक बघून आपण आजही किती मागासलेले आहोत हेच सिद्ध होते. विवेक हरवून जातींच्या लढाया करायच्या की विवेक आणि आधुनिकतेच्या आधारे जातीनिर्मुलन करायचे हे ठरवायला हवं. मेधाबाई तुमच्या अशा खुळचट वागण्यामुळे तुम्ही आधुनिक आणि प्रागतिक लोकांना लाज आणता आहात.
सगळ्याच जातीत चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे लोक असतात. म्हणून एका बाईच्या वागण्यासाठी सगळ्या जातीलाच टार्गेट करणं हाही जातीयवादच झाला.
मेधाबाई, तुम्ही काय पंचांगांच्या आधारे पावसाचा अंदाज सांगत होतात काय? तुमचे शेकडो अंदाज चुकले म्हणून आम्ही तुमच्यावर फसवणूक केल्याचे खटले भरावेत काय?
कृपाकरून तुमच्या खुळचटपणाला धार्मिक भावनांचा मुलामा देऊ नका. हा वाद मुळात जात-धर्म यांचा नसून आधुनिकता आणि सनातनीपणा यांच्यातला आहे.
-प्रा.हरी नरके
No comments:
Post a Comment