J1 झालं का? हा अनेक प्रतिभावंत फेबुकरांचा लाडका प्रश्न असतो.
ईशान्य भारतातील अनेक राज्यात त्यांच्या भाषेत "जेवन आहे का? जेवन काय आहे? जेवन झालं का?" असं विचारायचं असलं तर म्हणतात भात खाबो. भन्नाटच कल्पना. महत्वाचच विषय. जे मांसाहारी असतील त्यांची तिकडे चंगळ असते. तिन्ही वेळेला मंडळी मांसाहारावर ताव मारतात. माश्यांचे नानाप्रकार, पोर्क, बीफ, कोंबडी, बदक, बेडूक, कुत्रा, साप ही तुफान आवडीची पक्वान्नं असतात. अंड्यांचे शेकडो पदार्थ. उर्वरित देशभर उच्छाद मांडलेल्या तथाकथित गोरक्षकांचं नामोनिशानही या सात राज्यांमध्ये आढळत नाही. मांसाहाराला विरोध करणारांना ही मंडळी थेटच सरळ ताटात शिजवून खाऊन टाकतील. शाकाहार्यांना मात्र एकमेव मेनू. भात आणि फक्त भात. रानातली कोणतीही वनस्पती ओरबाडून आणतात आणि चिमुटभर मीठ टाकून उकळुन देतात. बांबू शूट्स म्हणजे बांबूच्या आतला गर अतिशय चविष्ट लागतो. भोपळ्यासारखं चिवचिवटं म्हणजे इस्कोट डोंगर उतारावर लावलेलं दिसतं. सर्वत्र मिळतं. खिरा [काकडी] मुबलक असते.
तिथली मिरची मात्र कोल्हापुरी मिरचीच्या सुमारे एक हजारपट तिखटजाळ असते. त्यामुळे तिथला ठेचा हा केवळ पदार्थ न राहता ती समोरच्याला हमखास रडवणारी प्रवृत्ती बनते.
सोनकेळी आणि पेरू मुबलक.
भाताची हजारो एकर शेती. जिकडं बघावं तिकडं भातशेती.
आपल्याकडं खेड्यात घरोघरी कोंबड्या पाळलेल्या असतात तशी तिथं घरटी डुकरं पाळलेली असतात. रस्त्यांवर भटकी कुत्री नावालाही आढळत नाहीत. कारण त्यांचं मांस हे सगळ्यात महाग असतं.
अमाप गरिबी आणि उद्योगधंदे शून्य त्यामुळं क्रयशक्ती नाही. किरकोळ टपरीवजा रेस्टॉरंटं, हॉटेलं, फारच कमी.
नागालॅंडमध्ये बोलली जाणारी नागा भाषा शांतपणे ऎकली तर मराठीच्या जवळ जाणारी ती भाषा असल्यानं नक्की समजते.
निसर्गाचं मुबलक वरदान पण अशांत प्रदेश, असुरक्षित प्रवास, आदिवासी जमाती व टोळ्यांमधली रक्तरंजित भांडणं आणि सरकार नावालाच यामुळं ही सुवर्णभुमी शापित आहे.
काश्मीरला स्वर्ग म्हणत असतीलही पण भारताच्या श्रीमंत निसर्गाची सर्वाधिक लोभस रूपं बघायची, अनुभवायची असतील तर एकदा तरी या सप्तभगिनींना भेट द्यायलाच हवी.
आसामातले चहामळे, सगळीकडची भातशेती आणि लाखो प्रकारची जैवविविधता तोडच नाही. इथं आलात की रमून जाल. स्वर्गाचा, जन्नतीचा विषयच संपला.
- प्रा.हरी नरके
No comments:
Post a Comment